'काळ'कर्त्यांचे स्मरण

By admin | Published: June 22, 2014 12:35 PM2014-06-22T12:35:09+5:302014-06-22T12:35:09+5:30

मराठी पत्रकारितेला मोठा इतिहास आहे; पण याचबरोबर निबंधकार, उत्तम वक्ता व साहित्यिक अशा विविध क्षेत्रांत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. शिवराम महादेव परांजपे! त्यांची १५0वी जयंती येत्या २७ जून रोजी आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध..

Remembering the 'dark' | 'काळ'कर्त्यांचे स्मरण

'काळ'कर्त्यांचे स्मरण

Next

अमेय गुप्ते

मराठी पत्रकारितेला मोठा इतिहास आहे; पण याचबरोबर निबंधकार, उत्तम वक्ता व साहित्यिक अशा विविध क्षेत्रांत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. शिवराम महादेव परांजपे!  त्यांची १५0वी जयंती येत्या २७ जून रोजी आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध..

---------------
प्रखर राष्ट्रीय बाण्याचे साहित्यिक व प्रभावी वक्ते कै. शिवराम महादेव परांजपे यांची 
दि. २७ जून रोजी १५0वी जयंती.! 
मराठी पत्रकारितेला मोठा इतिहास आहे; पण याचबरोबर निबंधकार, उत्तम वक्ता व साहित्यिक अशा विविध क्षेत्रांत आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे कै. शिवराम महादेव परांजपे! त्यांचा जन्म दि. २७ जून १८६४ रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील महाड येथे झाला. त्यांचे वडील महादेवराव हे एक यशस्वी वकील, तर मातोश्री पार्वतीबाई या सुसंस्कारित होत्या. शिवरामपंतांचे प्राथमिक शिक्षण महाड येथे तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरी व पुणे येथे झाले.
रत्नागिरी येथील शाळेत त्यांना कै. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासारखे थोर शिक्षक लाभले व त्यांच्या प्रेरणेने शिवरामपंतांनी पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे प्रवेश घेतला. सन १८८४मध्ये संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती मिळवून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. ही शिष्यवृत्ती मिळविणारे ते पहिले विद्यार्थी होते. त्याच सुमारास रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील गणेशपंत गोखले यांची कन्या बयोताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फग्यरुसन व डेक्कन महाविद्यालय येथे झाले. सन १८९५मध्ये ते एम. ए. झाले व या परीक्षेत त्यांना ‘गोकुळदास’ व ‘झाला वेदांत’ ही पारितोषिके मिळाली. या नंतर पुण्यात नवीन स्थापन झालेल्या ‘महाराष्ट्र महाविद्यालय’ येथे २ वर्षे संस्कृत शिकविले; परंतु लोकमान्य टिळकांच्या चळवळीत सहभाग घेऊन देशकार्य करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयातील नोकरीचा राजीनामा दिला. उत्कट देशाभिमानाच्या प्रेरणेने त्यांनी सन १८९८मध्ये ‘काळ’ हे साप्ताहिक सुरू केले. 
या साप्ताहिकाची जाहिरात धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि वाड्मयीन विषयांची निष्पक्षपातीपणे व निर्भयपणे पूर्ण चर्चा करणारे वृत्तपत्र, अशा शब्दांत केली होती. त्यांच्या लिखाणात देशाभिमान, पांडित्य व रसिकता यांचे मिश्रण होते. व्रकोक्ती व व्याजोक्ती ही त्यांच्या लिखाणाची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांनी केलेल्या लेखनामुळे त्यांच्यावर इंग्रज सरकारने राजद्रोहाचा आरोप करून त्यांना १९ महिने कारावासाची शिक्षा फर्मावली व ‘काळ’ या साप्ताहिकावर बंदी घातली. दि. ५ ऑक्टोबर १९0९ रोजी त्यांची मुक्तता झाली. परांजपे हे काँग्रेसचे सर्मथक होते. त्यांनी महात्मा गांधी यांच्या असहकारितेचा पुरस्कार केला. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांनी दि. १२ ऑगस्ट १९२0 रोजी ‘स्वराज्य’ हे नवे साप्ताहिक काढले.
परांजपे हे प्रामुख्याने ‘काळकर्ते’ म्हणून ओळखले जातात. ‘काळ’ हे नाव त्यांनी इंग्रजीतील ‘टाईम्स’ या वृत्तपत्रावरून घेतले. त्यांच्या निबंधात देशाच्या स्वातंत्र्याची आकांक्षा व प्रखर राष्ट्रीय बाणा यांचा उत्कट व प्रभावी आविष्कार झाला आहे. त्यांनी आपली धारदार लेखणी एखाद्या अस्राप्रमाणे वापरली व प्रतिपक्षाला नामोहरम केले. अभिजात लेखनशैलीसाठी आजही त्यांचे निबंध मराठी वाड्मयात महत्त्वाचे ठरतात. 
‘प्रणयिनीचा मनोभंग’ हे ठाकूर सिंगांच्या चित्राचे त्यांनी केलेले रसग्रहण मराठीतील कलासमीक्षेचा एक उत्तम नमुना आहे. नागानंद, अभिज्ञान शाकुंतल, मृच्छकटिक या संस्कृत नाटकांवरील त्यांचे टीकात्मक आणि संशोधनपर लेखही उल्लेखनीय आहेत. ‘गोविंदाची गोष्ट’ आणि ‘विंद्याचल’ या कादंबर्‍या रम्याद्भूत आहेत. त्याचप्रमाणे त्यांची पहिला पांडव, भीमराव, मानाजीराव, रामदेवराव, संगीत कादंबरी ही नाटके प्रसिद्ध आहेत. देशभक्तीचा महिमा तसेच फितुरीचे दुष्परिणाम त्यांच्या नाटकातून दाखविले आहे. ‘अहल्याजार’ हे त्यांनी लिहिलेले प्रदीर्घ काव्य. या शिवाय त्यांनी काही स्फुट कविता व नाटकातील पदेही रचली आहेत. परांजपे यांनी काव्य, नाटक, निबंध, पत्रकारिता यांबरोबर कथालेखनही केले होते. आम्रवृक्ष, एक कारखाना, प्रभाकरपंतांचे विचार व अशा कथांतून त्यांनी राजकीय विचार पेरले आहेत. त्यांच्या काही कथा या स्वैर कल्पनाविलासाने नटल्या आहेत.
सन १९२९ रोजी बेळगाव येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी 
अध्यक्षपद भूषवले. दि. २७ सप्टेंबर १९२९ रोजी मधुमेहाच्या विकाराने वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. एक थोर व्यक्तिमत्त्व अनंतात विलीन झाले. कै. शि. म. परांजपे यांच्यासारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त माझे त्रिवार वंदन..!
(लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.)

Web Title: Remembering the 'dark'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.