आठवण- कळसूत्री बाहुल्यांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 01:03 AM2019-01-06T01:03:55+5:302019-01-06T01:05:22+5:30

मोबाईलच्या पडद्याला नुसता हलकासा स्पर्श करताच आता मनोरंजनाचे अख्खे विश्व आपल्यासमोर उघडले जाते. मोबाईल, संगणकाच्या नव्या दुनियेत मनोरंजनाची उपलब्धता इतक्या गतीने आणि सोपी झाली आहे की, त्याविषयीचे कुतूहलही राहिलेले नाही

Remembrance - Kunduturi dolls | आठवण- कळसूत्री बाहुल्यांची

आठवण- कळसूत्री बाहुल्यांची

Next
ठळक मुद्दे तर पुन्हा पावणेदोनशे वर्षांपूर्वीचा तो कळसूत्री बाहुल्यांच्या मनोरंजनाचा जादुई प्रयोग नव्या पिढीलाही अनुभवता येणार आहे.

- अविनाश कोळी
मोबाईलच्या पडद्याला नुसता हलकासा स्पर्श करताच आता मनोरंजनाचे अख्खे विश्व आपल्यासमोर उघडले जाते. मोबाईल, संगणकाच्या नव्या दुनियेत मनोरंजनाची उपलब्धता इतक्या गतीने आणि सोपी झाली आहे की, त्याविषयीचे कुतूहलही राहिलेले नाही; पण दीडशे, दोनशे वर्षांपूर्वीचा काळ कसा असेल आणि मनोरंजनाचा प्रवास किती खडतर असेल, याची कल्पना आता कोणी करूही शकत नाही. अशाच काळात आद्य नाटककार विष्णुदास भावे यांनी निर्जीव बाहुल्यांचा सजीव भास निर्माण करून मनोरंजनाचे एक द्वार रसिकांसाठी खुले केले.

सांगलीच्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये निर्जीव कळसूत्री बाहुल्यांनी रंगविलेल्या ‘सीता स्वयंवर’च्या नाट्यप्रयोगाच्या घटनेला तब्बल पावणेदानशे वर्षे पूर्ण झाली आहेत. आधुनिकतेच्या रंगात रंगलेल्या व त्याच्या विश्वात खूप दूरवर गेलेल्या आपल्यासारख्या रसिकांना याचे मूळ प्रवेशद्वार दाखविण्याचा प्रयत्न सांगलीतून होणार आहे.
सांगलीतील रंगकर्मी मुकुंद पटवर्धन, डॉ. दयानंद नाईक व त्यांचे सर्व कलाकार आता याच कळसूत्री बाहुल्यांच्या प्रयोगाला नव्या पिढीसमोर ठेवू पाहत आहेत. पुढीलवर्षी नाट्यसंमेलनाची शताब्दी साजरी होणार आहे. सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जात असल्याने साहजिकच या शताब्दी वर्षात सर्वांत मोठे योगदान सांगलीतील रंगकर्मींचे राहणार आहे. संमेलनाची सुरुवातही येथूनच होण्याची चिन्हे आहेत. वर्षभर नाट्यसंमेलनाची शताब्दी साजरी करण्याचा विचार सुरू झाल्यानंतर, त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांची संकल्पना सादर करण्याचे आवाहन नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केल्यानंतर कळसूत्री बाहुल्यांचा विषय समोर आला. नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य असलेल्या सांगलीच्या मुकुंद पटवर्धन यांनी विष्णुदास भावे यांच्या कळसूत्री बाहुल्यांना पुन्हा रंगमंचावर आणण्याचा विचार मांडला. नव्या पिढीला या बाहुल्यांची आणि भावेंच्या थक्क करणाऱ्या त्या प्रयोगाची कल्पना यावी, हा त्यामागचा उद्देश आहे. ही संकल्पना अनेकांना आवडल्याने त्यादृष्टिकोनातून आता एक वर्ष अगोदरच त्याची तयारी सांगलीतील रंगकर्मींनी सुरू केली आहे. विष्णुदास भावेंच्या कळसूत्री बाहुल्या रंगमंचावर उतरून लोकांचे कशाप्रकारे मनोरंजन करायचे, हे दाखविण्याचा हा प्रयत्न असेल. अख्खं नाटक बाहुल्यांच्या माध्यमातून सादर करताना काय कसरत सादरकर्त्याला करावी लागत होती, तेही यानिमित्ताने समोर येईल. बाहुल्यांचा खेळ पुरातन काळापासून चालत आला असला तरी, भावेंची रंगकर्मी ठरलेली बाहुली ही जादुई आणि पाहणाºयांना मोहीत करणारी होती, याचा प्रत्यय अनेक घटनांवरून येतो.

ब्रिटिशांच्या राजवटीत सांगलीच्या पटवर्धन सरकारांच्या राजवाड्यातील विवाह सोहळ्यास इंग्लंडहून गव्हर्नर व काही ब्रिटिश अधिकारीही आले होते. त्यावेळी राजवाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ एक बाहुली सर्वांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत करीत होती. ब्रिटिश अधिकाºयांना या बाहुलीने मोहीत केले. त्यांनी याच्या निर्मात्याविषयी चौकशी केल्यानंतर, विष्णुदास भावेंचे नाव समोर आले. ब्रिटिश अधिकाºयांनी इंग्लंडला नेण्यासाठी अशा काही बाहुल्यांची मागणी त्यावेळी पटवर्धनांकडे केली होती, अशी एक आठवण मुकुंद पटवर्धन यांनी सांगितली. अनेक किस्से कळसूत्री बाहुल्यांमुळे जन्माला आले.

विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाली करवून घेता येऊ शकतील, अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदास भावे यांनी बनविल्या होत्या. आता त्याच बाहुल्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न सांगलीतून होणार आहे. विष्णुदास भावे यांच्यावर लिहिलेल्या एका नाट्यसंहितेचे वाचन यापूर्वी सांगलीत झाले होते. संहितेला नाट्यरूपाने रंगमंचावर आणण्याचा विचारसुद्धा याठिकाणी सुरू झाला आहे. या दोन्ही गोष्टी साकारल्या, तर पुन्हा पावणेदोनशे वर्षांपूर्वीचा तो कळसूत्री बाहुल्यांच्या मनोरंजनाचा जादुई प्रयोग नव्या पिढीलाही अनुभवता येणार आहे.

Web Title: Remembrance - Kunduturi dolls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.