स्मरण अक्कांच्या जन्मशताब्दीतील स्मरणाचं

By admin | Published: May 6, 2014 05:06 PM2014-05-06T17:06:13+5:302014-05-06T17:06:13+5:30

प्रख्यात कवयित्री इंदिरा संत, अर्थात सर्वांच्या अक्का यांची जन्मशताब्दी नुकतीच झाली. त्यानिमित्ताने साहित्यक्षेत्रातील नामवंतांनी विविध पद्धतींनी त्यांचे साहित्यस्मरण केले

Remembrance Recollection of the Birth Centenary | स्मरण अक्कांच्या जन्मशताब्दीतील स्मरणाचं

स्मरण अक्कांच्या जन्मशताब्दीतील स्मरणाचं

Next

 -वीणा संत

प्रख्यात कवयित्री इंदिरा संत, अर्थात सर्वांच्या अक्का यांची जन्मशताब्दी नुकतीच झाली. त्यानिमित्ताने साहित्यक्षेत्रातील नामवंतांनी विविध पद्धतींनी त्यांचे साहित्यस्मरण केले. याचा एकीकडे आनंद असतानाच एका पुस्तकाच्या रूपाने एकांगी व एकतर्फी चित्रण मांडले गेले. इंदिरा संत यांनी त्यांच्या सर्व पुस्तकांचे हक्क त्यांच्या सुनेकडे दिलेले आहेत. त्यांनी याविषयी मांडलेली त्यांची सुस्पष्ट भूमिका.

श्रीमती इंदिरा संत (अक्का, माझ्या सासूबाई) यांनी आपल्या सर्व पुस्तकांचे हक्क माझ्या स्वाधीन केले आहेत. त्यांच्या लेखनासंबंधी कोणीही परवानगी मागितली तर अक्कांनी काय केलं असतं, असा विचार करून मी निर्णय घेते. ४ जानेवारी २0१३ ते ४ जानेवारी २0१४ हे अक्कांचं जन्मशताब्दी वर्ष. रसिक वाचकांनी, निरनिराळ्या संस्थांनी, त्यांच्यावर लोभ असणार्‍या व्यक्तींनी त्यांची आठवण कृतज्ञतापूर्वक, प्रेमपूर्वक जागवली. आम्हाला त्याचा फार आनंद झाला. आमचाच गौरव झाल्यासारखं वाटलं; केवळ त्यांची सून म्हणून नव्हे, तर त्यांच्या सर्व लेखनाची वारस म्हणून या सर्वांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत.
इंदिराबाईंची जन्मशताब्दी या वर्षी आहे, याची चाहूल आणि दखल बर्‍याच जणांनी घेतली होती. आम्ही संतमंडळी काय खास करणार आहोत, अशी विचारणाही होत होती. अचानक एक दिवस अंजलीचा (गीतांजली अविनाश जोशी, अक्कांची भाची, स्वत: कवयित्री आणि ना. सी. व कमल (फडके) यांची लेक) फोन आला. तिनं आमंत्रणच दिलं. पुण्यात तिनं एक कार्यक्रम आयोजित केला होता. ‘कमला-नारायण मोहिनी’ या संस्थेतर्फे हा कार्यक्रम होणार होता. अंजली आणि अमित त्रिभुवन यांनी तो 
सादर केला. ‘सहवास’ हा इंदिराबाई आणि त्यांचे 
पती ना. मा. संत यांच्या पुस्तकावर तो आधारित होता. त्यांच्या नात्यातील मृदू भाव, सौजन्य, प्रेम दोघांनी अतिशय सर्मथपणे व्यक्त केले. अक्कांचेच खूप जवळचे स्नेही, त्यांच्यावर आईसारखं प्रेम करणारे ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांचं भाषण झालं.
अंजलीनं आणखी एक कार्यक्रम सादर केला. फारच अनोखा असा ‘आयतन आर्ट गॅलरी’च्या खुल्या अंगणात तिनं स्वत: आणि सोबत सुनंदाताई पानसे, श्रुती विश्‍वकर्मा यांना घेऊन अक्कांच्या निसर्गावरील कविता सादर केल्या आणि १२ हौशी चित्रकारांनी त्यातून स्फूर्ती घेऊन चित्रं काढली. ‘सहवास’ हा कार्यक्रम एकूण १३ ठिकाणी सादर करण्यात आला. दादर-माटुंगा कल्चरल सेंटर, लोकमान्य ग्रंथालय बेळगाव इ. आणि अन्य ठिकाणी त्याचा प्रयोग झाला. आपल्या मावशीवरील प्रेम, तिनं काय करू, कसं करू असं करीत न बसता, अत्यंत उत्स्फूर्तपणे हे कष्ट घेतले याचं आम्हाला अप्रूप वाटलं. मुंबईच्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरनं केलेल्या कार्यक्रमात ‘सहवास’ हा कार्यक्रम आणि पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांचा कवितागायनाचाही कार्यक्रम झाला. त्यांची कवितेची समज, त्यांचं सुरेल गायन अक्कांच्या प्रेमळ आठवणी यांमुळे तो अविस्मरणीय झाला.
लोकमान्य ग्रंथालय, बेळगावतर्फे ‘इरा प्रॉडक्शन’तर्फे एक सुंदर कार्यक्रम झाला. मीनल जोशी, मानसी आपटे आणि स्वाती फडके या तिघींनी मिळून काव्यगायन, काव्यवाचन आणि अक्कांच्या ललिनलेखनाचं अभिवाचन, असं त्याचं स्वरूप होतं. या कार्यक्रमानं एक वेगळीच उंची गाठली. मीनल जोशीचा आवाज आणि भावपूर्ण गायन यांना रसिकांची दाद मिळाली.
तुषार दीक्षित (सिंथेसायझर) आणि यश सोमण (तबला) यांचा त्यातला सहभाग लक्षणीय होता. सर्वांनाच अक्कांविषयी किती आदर होता, प्रेम होतं आणि त्यांच्या लेखनाची किती छान समज होती, हे पाहून फार आनंद झाला.
कमला नारायण मोहिनीतर्फे ‘शततारका’ नावाचं, गेल्या ८00 वर्षांतील निवडक कवयित्रींच्या कविता आणि त्यांच्यासंबंधीची माहिती यांचं संकलन असलेलं पुस्तक प्रकाशित झालं. अक्कांसारख्या थोर कवयित्रीचा केवढा सन्मान झाला! अक्कांची शताब्दी हे निमित्त आणि ते त्यांनाच अर्पण केलं आहे. त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याजवळ पुरेसे शब्द नाहीत.
बेळगावच्या लोकमान्य ग्रंथालयानं इंदिराबाईंची स्मृती चिरस्थायी स्वरूपात राहावी म्हणून त्यांच्या नावानं एक खुला रंगमंच बांधला आहे. या मंचाच्या उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ लेखक मधू मंगेश कर्णिक, कवयित्री अश्‍विनी धोंगडे, लोकमान्यचे सर्वेसर्वा किरण ठाकूर यांची समयोचित भाषणे झाली. रंगमंचावरील अक्कांचा हसरा-प्रसन्न फोटो, मोकळी हवा, हिरवीगार झाडी, ना. मा. संत आणि इंदिराबाईंचा एकत्र असा दुर्मिळ फोटो आणि इंदिराबाईंवरील प्रेमाच्या ओढीनं आलेले प्रेक्षक; त्यामुळे वातावरण भारलं गेलं.
वर्षाच्या सुरुवातीला ‘आकाशवाणी’नं इंदिराबाईंवरील आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिरात भव्य कार्यक्रम सादर केला. श्रोत्यांच्या गर्दीत सादर झालेल्या या कार्यक्रमाला अरुणा ढेरे, वीणा देव, श्रीनिवास कुलकर्णी, हिमांशू कुलकर्णी, विजय कुवळेकर आदींचा सहभाग होता.
पॉप्युलर प्रकाशनानं शताब्दी वर्षाच्या निमित्तानं अरुणा ढेरे संपादित अक्कांच्या समग्र वाड्मयाचा ग्रंथ प्रकाशित करण्याचा संकल्प सोडला. तो नुकताच प्रकाशित झाला. एका अर्थी, हे त्यांचं चिरस्थायी असं स्मारक ठरावं. बेळगावच्या सुप्रसिद्ध लेखिका, माजी प्राचार्या माधुरी शानभाग यांची सोलापूर, लातूर, कोल्हापूर इथं अभ्यासपूर्ण विवेचनात्मक भाषणं झाली. त्यातून अक्कांच्या विविध पैलूंचा परार्मश घेतला गेला. सर्वांची इंदिराबाईंविषयीची आत्मीयता, एक प्रतिभावंत म्हणून जनमानसात असलेली त्यांची उत्तुंग प्रतिमा पाहून आम्ही भारावून गेलो. गेले कित्येक दिवस, महिने आम्ही याच भावाकुल अवस्थेत होतो.
जगाच्या इंदिराबाईंचं, आमच्या अक्काचं अशा प्रकारे नाना पातळ्यांवर नाना प्रकारे साहित्यिक स्मरण केलं जात असतानाच त्यांच्या प्रतिमेला तडा जाईल, त्यांच्या संवेदनशीतेबद्दल शंका निर्माण करेल, असं दीर्घ लेखन एका पुस्तकाच्या रूपानं यावं, हा दैवदुर्विलासच म्हणायचा. नात्यानं अक्कांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीनं ते लिहावं आणि अक्कांच्या घनिष्ठ स्नेहातल्या प्रकाशन संस्थेनं प्रकाशित करावं, याला काय म्हणावं? हा ‘ऐतिहासिक ऐवज’ ठरू नये म्हणून हे लिहीणं भाग आहे.
मराठी रसिक वाचकांना अजून खूप काही देण्याची क्षमता असलेल्या आपल्या गुणी मुलाला आणि नानांकडून लेखनाचा वारसा घेतलेल्या आपल्या थोरल्या मुलाला अक्का समजून घेऊ शकल्या नाहीत, कळत-नकळत त्यांच्या मनस्तापाला कारण झाल्या, सूनबाईंच्या महत्त्वाकांक्षेचं मोल त्यांनी जाणलं नाही, त्यांच्या संदिग्ध वागण्यानं कुठं तरी त्यांची घुसमट झाली, कुचंबणा झाली, असा सूर ‘अमलताश’मध्ये डोकावतो. तसं सुचवणारे काही घरगुती प्रसंग पुस्तकात सविस्तर लिहिलेले आहेत. या प्रसंगांच्या उल्लेखानं आम्ही कुटुंबीय मनोमन व्यथित झालो. उल्लेख केलेल्या या सर्व प्रसंगी माझे पती रवी, नणंद पुष्पा उपस्थित होते. १९६५च्या डिसेंबरमध्ये माझं लग्न झाल्यापासून मी स्वत:ही त्यांना साक्ष आहे. हे वाक्य लिहीत असताना, ‘साक्ष’सारखा न्यायालयीन शब्द वापरताना जिवाला क्लेश होतात. साक्ष न्यायालयात देतात. तिथं खटले-दावे चालतात. दोन माणसांच्या मतभेदांवर तिसरा कोणी तरी तोडगा काढायला बघतो. मुख्य म्हणजे त्या ठिकाणी आरोपीला आपली बाजू मांडायची पुरेपूर संधी असते. दुर्दैवानं संबंधित दोन्ही व्यक्ती या जगात नसताना अशा प्रकारे एकांगी, एकतर्फी चित्रण जगासमोर यावं का, हा प्रश्न आमच्यासारख्या आप्तांना, सुहृदांना निश्‍चितपणे बोचतो आहे.
‘अमलताश’मधील एकही घटना खोटी नाही; पण ती संपूर्णपणे खरीही नाही. सोयीच्या किंवा आवडीच्या रंगात रंगवून, काहीशी विपर्यस्त पद्धतीनं मांडली गेली आहे, असं आम्हाला जाणवतं. शेवटी घरगुती घटना त्याच असतात, व्यक्तिगणिक इंटरप्रिटेशन्स बदलतात, अर्थच्छटा बदलतात हे आपण कौटुंबिक जीवनात अनेकदा बघतो, अनुभवतो. प्रस्तुत पुस्तकामध्ये प्रकाशांना, त्यांच्या कुटुंबाला ज्या घटनांमुळे त्रास झाल्याचं दर्शवलं आहे, त्याच घटनांची स्वत: इंदिराबाईंना किती मानसिक किंमत मोजावी लागली, किती क्षोभ झाला, किती वेळा त्यांच्या मनाला पीळ पडला, हे आम्ही जवळून पाहिलंय. पतीच्या पश्‍चात कठोर परिश्रमांनी तीन मुलांना नावारूपाला आणण्यासाठी अक्कांनी जिवाचं रान केलं. त्या अर्थानं थकलेल्या त्यांच्या जिवाला ही तगमग सोसणं किती कठीण गेलं असेल, याची कुणालाही कल्पना करता येईल; पण त्यांच्या स्वभावगत सौजन्यानं त्याची वाच्यता त्यांनी चुकूनही केली नाही. ‘कधी कधी न अक्षरांत मन माझे ओवणार’ या निर्धारानं व्रतस्थ जीवन अंगीकारलं. या पार्श्‍वभूमीवर, आम्ही कधीच या कशाचीही वाच्यता करायला नको, याचं आम्हाला भान आहे; पण अन्यत्र ती व्हावी याचा अतीव खेद होतो, तो व्यक्त केल्याशिवाय राहवत नाही.
अक्कांना औपचारिक मानमरातबांची मुळीच इच्छा नव्हती. सरकारदरबारी आणि वाचकांकडून त्यांना ते खूप मिळाले होते. त्याची त्यांना कदर होती; पण दिखाऊ मानसन्मानांसाठी त्या कधीच हपापलेल्या नव्हत्या. खोट्या मानसन्मानांची त्यांना क्षिती नव्हती. अपेक्षा असेलच, तर ती चांगुलपणाची. त्या-त्या नात्याला अपेक्षित चांगुलपणानंच त्या वागत; मग ते उद्योगपती असोत, कलावंत असोत, कविता दाखवायला आलेले नवशिके कवी असोत, त्यांच्या कॉलेजचा प्यून बाबू असो, नाही तर माझे किंवा आसावरीचे-अक्कांची नातसून-आई-वडील म्हणजे त्यांचे व्याही असोत. अंगभूत सहजपणानं, सौजन्यानं त्या वागत. त्यांची अगत्याची, प्रेमाची, मानाची कल्पना अगदी साधी, सोपी, सरळ होती. त्यांना संसारातली महत्त्वाकांक्षा, ऐहिक उपलब्धी यांपेक्षा संबंधितांचं मन जपणं, नातं जपणं, सहवास, अशा छोट्या-छोट्या गोष्टींतला गोडवा अभिप्रेत होता.
तर, थोडक्यात हे असं आहे. रवींच्या मते, ‘श्री. पु. भागवत असते, तर दुसरी बाजू जाणून घेऊन मगच हे लेखन प्रकाशित झालं असतं. आज आहे त्या स्वरूपात नक्कीच झालं नसतं.’ 
जिथं-जिथं मराठी भाषा वाचली जाते, तिथं-तिथं अक्कांची कविता वाचली जाणार. एक प्रतिभावान म्हणून त्यांची आठवण काढली जाणार आणि ज्यांचा त्यांच्याशी वैयक्तिक परिचय होता, नातं होतं, मैत्री होती ते-ते त्यांची प्रेमानं, आदरानं आठवण 
काढणार. अक्कांचं शताब्दी वर्षात अनेकांनी केलेलं पुण्यस्मरण याचचं निदर्शक आहे. या स्मरण सोहळ्यानं आम्हाला आनंद तर झालाच; पण आमच्या दु:खाचं सांत्वनही झालं.
(लेखिका कवयित्री इंदिरा संत 
यांच्या स्नूषा आहेत.)

Web Title: Remembrance Recollection of the Birth Centenary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.