पोर्तुगीज गोव्यातील भारतप्रेमी संशोधक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 07:00 AM2019-05-26T07:00:00+5:302019-05-26T07:00:08+5:30

जुलमी पोर्तुगीजांनीही ज्यांचा सन्मान केला ते गोव्यातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंंग सखाराम पिसुर्लेकर-शेणवी यांची ३० मे रोजी १२५ वी जयंती आहे.

researchers of loving india from Portuguese Goa | पोर्तुगीज गोव्यातील भारतप्रेमी संशोधक 

पोर्तुगीज गोव्यातील भारतप्रेमी संशोधक 

googlenewsNext
ठळक मुद्देगोव्यात राहून देशाच्या इतिहासाचा शोध घेणाऱ्या या हाडाच्या संशोधकाचे स्मरण.

- अनिकेत यादव-  

डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांचा जन्म गोव्यातील ‘पिसुर्ले’ गावात दि. ३० मे १८९४ रोजी झाला. सुरुवातीला शिक्षकी, नंतर वकिली व्यवसाय केला, मात्र, संशोधनाचा पिंंड असल्याने त्यांनी सन १९२४ पासून गोवा पुरातत्व खात्यात काम करण्यास सुरुवात केली. ‘पगार मिळणार नाही’ या बोलीवर त्यांना ही नोकरी मिळाली. आर्थिक परिस्थिती नाजूक असूनही त्यांनी ती आनंदाने स्वीकारली. पुढे त्यांना २९ रु. महिना पगार देण्यात आला. सन १९३० मध्ये त्यांच्या कामाची चिकाटी पाहून पोर्तुगीज सरकारने त्यांची नेमणूक गोवा दफ्तरखान्याचे प्रमुख म्हणून केली. १९३० ते १९६१ अशी ३१ वर्षे पिसुर्लेकरांनी येथे अविरतपणे काम केले. या काळात येथील अस्ताव्यस्त व अत्यंत दुर्लक्षित असलेले दप्तर त्यांनी व्यवस्थित लावले, त्याची सूची तयार केली. याशिवाय १२५ हून अधिक ग्रंथ व लेख असे प्रचंड लिखाण त्यांनी केले. जवळपास ३ तपांच्या या प्रदीर्घ काळात नोकरी सोडावी, असे पिसुर्लेकरांना कधी वाटले नाही की, पिसुर्लेकरांच्या जागी दुसरा माणूस नेमावा, असे पोर्तुगीज सरकारला वाटले नाही. या सर्व कामाचे श्रेय पोर्तुगीज सरकारने पिसुर्लेकरांना दिलेले आहे. पोर्तुगीज सरकारने त्यांचा अर्धपुतळा केला, त्यांना अर्धा तोळ्याची अंगठी भेट दिली, पोर्तुगालच्या लिस्बन विद्यापीठाने त्यांना ‘डी.लिट.’ पदवी दिली.  
 याशिवाय पोर्तुगीज-मराठे संबंध, मराठ्यांच्या गोव्याकडील स्वाºया, गोव्याचे ख्रिस्तीकरण, नानासाहेब पेशवा व फिरंगी सरकार, निवृत्तेश्वरीचा शोध, फिरंगी परराष्टÑ खात्याचे हिंंदू वकील, माधवराव पेशव्यांचा पोर्तुगीज वैद्य, महाराष्टÑेतिहाससंबंधाने पोर्तुगीज इतिहास साधने, युरोपामध्ये पहिल्यांदा मराठीत छापलेले पुस्तक, शिवाजीच्या बारदेशवरील स्वाºया, शिवाजी आणि पोर्तुगीज, शिवाजीमहाराजांचा एक पोर्तुगीज चरित्रकार असे विविध प्रकारचे लेखन त्यांनी केले व मराठी राज्याच्या इतिहासावरही प्रकाश टाकला. 
पोर्तुगीज गोव्यात म्हणजे परकीय राज्यात काम करूनही पिसुर्लेकर अत्यंत देशप्रेमी होते. त्यांनी भारत सरकारकडे दिलेल्या पुराव्यांमुळे दादरा-नगर-हवेली हा प्रांत भारत सरकारकडे आला. गोवा प्रांत मराठी असल्याचेदेखील अनेक पुरावे त्यांनी दिले. एवढेच नाही तर बेळगाव-कारवार हा प्रांतदेखील मराठी असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. त्यांना पोर्तुगीज सरकारकडून मिळालेली अर्ध्या तोळ्याची अंगठीदेखील त्यांनी गोवा मुक्ती संग्रामासाठी दान केली.
अधिक संशोधनासाठी ते लिस्बन व पॅरिसला गेले असता तेथे त्यांना अनेक दुर्मिळ ग्रंथ, नकाशे, हस्तलिखिते पाहायला मिळाली. ‘अनंत कामत वाघ’ यांनी सन १७७६ मध्ये ‘हिंदू धर्मावर पोर्तुगीज भाषेत लिहिलेले पहिले पुस्तक’ येथे पाहिले. गोव्याचे आद्य मराठी कवी कृष्णदास श्यामा यांनी लिहिलेले ‘श्रीकृष्ण चरित्र’ येथे पाहिले. ‘कॉस्मो-द-गार्दा’ याने लिहिलेले पहिले शिवचरित्र त्यांनी येथे पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांवर पिसुर्लेकरांचे अतिशय प्रेम होते. केवळ राष्टÑप्रेमाचा विचार करूनच त्यांनी आपले संशोधनकार्य केले. ‘मला फितुरांच्या इतिहासाचा अभ्यास करावा लागला’ असे ते म्हणत. मात्र, शिवाजी महाराजांवरील कागदपत्रांचा अभ्यास करताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून येई. त्यामुळे ते म्हणत, ‘शिवरायांना आणखी दहा वर्षांचे आयुष्य मिळाले असते तर गोवा सर्वप्रथम मुक्त झाला असता!’
पोर्तुगीजांनी सन १५४१ पूर्वी गोवा बेटातील सर्व देवालये पाडून टाकली होती. त्यापैकी बºयाचशा मंदिरांची माहिती पिसुर्लेकरांनी शोधली, त्याची यादी तयार केली. शिवाय यापैकी काही महत्त्वाची स्थळे हुडकून काढली. गोव्यातील सप्तकोटेश्वर मंदिर अत्यंत प्राचीन मंदिर असून त्याचा जिर्णोद्धार स्वत: शिवाजीमहाराजांनी केलेला होता. ते मंदिर देखील पिसुर्लेकरांनी शोधले. राज्याभिषेकाच्या दुसºयाच वर्षी शिवाजीमहाराजांनी फोंड्याचा किल्ला जिंंकून त्याच्या दरवाज्यावर गणेशपट्टी बसविली होती. पिसुर्लेकरांनी ती किल्ल्याच्या परिसरातून शोधून काढली.
सन्मान, सत्कार व प्रसिद्धी हे अभ्यासकाचे तीन शत्रू असल्याने पिसुर्लेकर त्यापासून नेहमी दूरच राहिले. अखेरच्या दिवसात त्यांना ‘कॅन्सर’सारखा दुर्धर आजार जडला. १० जुलै १९६९ रोजी आपल्या राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. पिसुर्लेकरांनी अखेरपर्यंत आपले संशोधन कार्य व संशोधकांना मदत करण्याचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले होते. त्यांच्याकडील सर्व दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते, नकाशे, मायक्रोफिल्मस असे ४००० हून अधिक साहित्य त्यांनी आपल्या हयातीतच मुंबई विद्यापीठाच्या पणजी केंद्रास दिले. सध्या ते गोवा विद्यापीठात ठेवलेले आहे. ‘कागदाचा एकही कपटा मी घरी ठेवला नाही. जे साहित्य मी जमविले, त्याचा उपयोग नवीन पिढीने करावा’ असे त्यांचे अखेरचे म्हणणे होते. पोर्तुगीज मराठा संबंधावर संशोधन करणारे डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर हे पहिले संशोधक, मात्र फारशी प्रसिद्धी त्यांच्या वाट्याला आली नाही. संशोधक व अभ्यासक यांना आपल्या समाजात फारसे सन्मानाचे स्थान नाही, हे एक कटू सत्य आहे. मात्र, त्यांच्या संशोधन कार्यामुळे शिवचरित्रात व मराठ्यांच्या इतिहासात मोलाची भर पडली हे सर्वच इतिहास संशोधकांना कबूल करावे लागेल.
३० मे २०१९ रोजी डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांची १२५ वी जयंती आहे. तर १० जुलै २०१९ रोजी ५० वी पुण्यतिथी. त्यामुळेच यावर्षी गोवा पुराभिलेख विभाग, गोवा सरकार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विविध उपक्रम राबवत आहेत. पिसुर्लेकरांवरील चरित्रात्मक लेख व पिसुर्लेकरांच्या काही दुर्मिळ लेखांचा समावेश असलेला डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर स्मारक ग्रंथ प्रसिद्ध होत आहे. आपल्या देशाची उज्ज्वल ऐतिहासिक परंपरा पुढे यावी म्हणून डॉ. पिसुर्लेकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, त्यांचे स्मरण करणे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. 
(लेखक इतिहास अभ्यासक आहेत.)

Web Title: researchers of loving india from Portuguese Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.