उकिरड्यातला प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 06:04 PM2019-03-03T18:04:00+5:302019-03-03T18:05:04+5:30

मुलं मातीत, चिखलात खेळत होती, इथपर्यंत ठीक होतं; पण आज त्यांनी कमालच केली. त्यांनी चक्क उकिरड्यातून वस्तू हुडकायला सुरुवात केली. त्यावरून बराच हंगामा झाला, पण मुलांची बाजूही महत्त्वाची होतीच.

'Revolutionary' Project From Seed to Plant by children.. | उकिरड्यातला प्रकल्प

उकिरड्यातला प्रकल्प

Next
ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन

‘‘मावशी, तुमची इरा परत चिखलात खेळतीये खाली’’, रोहितने न राहवून इराच्या आईला सांगितलंच.
‘‘बरं, बघते.’’ इराची आई म्हणाली खरी; पण ती काही इराकडे बघायला सोसायटीच्या अंगणात गेली नाही. कारण इराचं मातीत खेळण्याचं वेड तिला माहिती होतं.
इरा अगदी लहान होती तेव्हा तिला रोज मातीत आणि उन्हाळ्याच्या दिवसात चिखलातच खेळायला आवडायचं. आणि इराच्या नशिबाने तिच्या आईबाबांना सगळीकडे सारखे ‘किटाणू’ दिसण्याचा आजार झालेला नव्हता. त्यामुळे ते तिला मनसोक्त मातीत खेळूही द्यायचे. ती लहान होती तोवर कोणाला त्याचं काही वाटायचं नाही. पण आता इरा पाचवीत होती. आणि पाचवीतल्या मुलीने सारखं मातीत खेळणं सोसायटीतल्या काही जणांना विचित्र वाटायचं. कॉलेजला जाणारा रोहित त्यातलाच एक होता. तेही इराच्या आईला माहिती होतं. त्यामुळे तिने त्याच्याकडे फार लक्ष दिलं नाही आणि ती तिचं तिचं काम करत राहिली.
अजून अर्ध्या तासाने इराच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आजी आल्या. त्या म्हणाल्या, ‘‘अगं बाई, तुझी लेक अजून ४-५ मुलांना घेऊन मातीचे लाडू करत बसलीये खाली. एकदा बघून ये तिचा अवतार. पार केसातपण चिखल-माती गेलीये तिच्या.’’
‘‘हो का?’’ आईने आता ही माहिती जरा सिरियसली घेतली ती दोन कारणांनी. पहिलं म्हणजे मोठी झाल्यानंतर इरा अशी केसात वगैरे चिखल जाईल असं काही खेळायची नाही. दुसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ती जी कोणी अजून ४-५ मुलं होती, त्यांच्या आईवडिलांना चिखलात खेळलेलं चालतं का ते माहिती नव्हतं. त्यांना ते चालत नसेल, तर त्या मुलांनी बिचाऱ्यांनी घरी जाऊन बोलणी खाल्ली असती. त्यामुळे ती आजींना म्हणाली की मी बघते. पण तिला एक ब्लॉग घाईने लिहून पूर्ण करायचा होता. तेवढा संपवून जाऊया बघायला असं म्हणून ती परत लिहीत बसली. पण अजून वीस मिनिटांनी मात्र तिला उठायलाच लागलं, कारण खालून जोरात कोणाचा तरी रागवण्याचा आवाज यायला लागला. त्यामुळे इराची आई नाइलाजाने उठली आणि एक मजला उतरून सोसायटीच्या अंगणात गेली आणि बघते तर काय?
खरंच इरा आणि तिच्याबरोबर गोल करून बसलेल्या मुलांच्या अंगाला बºयापैकी चिखल लागलेला होता. त्यांच्या मध्ये चिखलाचे गोळे करून ठेवलेले होते. त्यातला चेहेºयाला चिखल लागलेला एक मुलगा उभा राहिला होता आणि त्याची आई त्याला जोरात रागवत होती. तो बिचारा खाली मान घालून ऐकून घेत होता. रडत होता. बाकीची मुलंपण कावरीबावरी झालेली होती. या सगळ्याकडे दुर्लक्ष करून त्याची आई त्याला झाप झाप झापत होती.
‘‘गधड्या! हे शिकवलं का आम्ही तुला इतकी वर्षं? काही कमी पडू दिलं नाही, जे मागितलंस ते आणून दिलं, आणि तरी सगळ्यांसमोर आमची अशी लाज काढलीस? थांब येऊ दे बाबांना. तेच बघतील तुझ्याकडे!..’’ असं म्हणत आईने त्या मुलाला बखोट्याला धरून ओढायला सुरुवात केली. आता मात्र इराच्या आईला राहवेना. मुलं चिखलात खेळली तर एवढं चिडणं तिला योग्य वाटेना. म्हणून ती न राहवून मध्ये पडली आणि त्या मुलाच्या आईला म्हणाली,
‘‘तुमचं चिडणं मी समजू शकते. पण जाऊ द्या. मुलं आहेत. चिखलात खेळली तर एवढं काही बिघडत नाही. माझी मुलगीपण खेळतीये.’’
‘‘चिखलात खेळल्याबद्दल कोण काय बोलतंय? चिखल काय, धुतला की जातो. पण या कार्ट्याने आमचं तोंड काळं केलंय त्याचं काय करायचं???’’
आता इराच्या आईच्या लक्षात आलं, की इथे मुलांनी आपल्याला माहिती नसलेला मोठ्ठा काहीतरी राडा केलेला आहे. तिने संशयाने इराकडे बघत विचारलं,
‘‘इरा, या काकू काय म्हणतायत? काय करताय तुम्ही?’’
‘‘तिला कशाला? माझ्या कार्ट्याला विचारा ना. सांग रे. सानियाताईने बघितलं तेव्हा तू काय करत होतास?’’
तो मुलगा काहीच न बोलता मुसमुसत राहिला. शेवटी त्याची आईच चिडून म्हणाली, ‘‘अहो उकिरडे फुंकत होता. माझ्या भाचीने बघितलं तेव्हा हा कोपºयावरच्या उकिरड्यात हात घालून काहीतरी बाहेर काढत होता. तिने सांगितलं म्हणून मला कळलं तरी. पण आता हे सगळ्या नातेवाइकांमध्ये पसरेल तेव्हा सगळे काय म्हणतील???’’ त्या आईचा संताप संताप झाला होता, आणि आता इराच्या आईचापण संताप झाला होता. चिखलमातीत खेळणं ठीक आहे; पण उकिरड्यावरून वस्तू उचलून आणायच्या? पण आलेला सगळा राग मनात ठेवून आई वरवर शांतपणे इराला म्हणाली,
‘‘इरा, हे खरंय?’’
‘‘हो, पण..’’
‘‘पण काय पण?’’ आता आईचापण आवाज चढला. ‘‘असं काय आहे जे तुम्हाला घरात मिळत नाही? जे शोधायला तुम्हाला उकिरड्यावरून वस्तू आणायला लागतात. सांग ना!’’
यावर सगळीकडे शांतता पसरली आणि मग त्या ग्रुपमध्ये मांडी घालून बसलेला पाच वर्षांचा अनिस म्हणाला, ‘‘बिया!’’
‘‘बिया? कसल्या बिया?’’
‘‘अगं काकू, फलांच्या बिया.’’ अजूनही थोडं बोबडं बोलणारा अनिस म्हणाला, ‘‘या लाडूत घालायला.’’
‘‘म्हणजे?’’ इराच्या आईला काही कळेना. आणि सगळा विषय कळल्याशिवाय मुलांना रागवणं तिच्या मनाला पटेना.
‘‘अगं काकू, अशा सगळ्या बिया आहेत ना, त्या या लाडूत घालायच्या आहेत.’’ अनिसने एका छोट्याशा ढिगाकडे बोट दाखवलं. इतका वेळ तो ढीग इराच्या आईला दिसला नव्हता. त्या ढिगात वेगवेगळ्या फळांच्या बिया होत्या. आता आईच्या लक्षात आलं; पण तरी या सगळ्यात उकिरडा कुठून आला ते तिला कळेना. इरा म्हणाली, ‘‘आमचं कालच ठरलं होतं, की आज असे बिया घातलेले मातीचे गोळे बनवायचे. म्हणजे मग ते पावसाळ्यात बाहेर गेल्यावर टाकता येतात आणि त्यातून झाडं येतात.’’
‘‘ती आयडिया छान आहे गं तुमची’’ इराची आई रडवेल्या झालेल्या मुलांना चुचकारत म्हणाली. त्यांना बिचाऱ्यांना कळतच नव्हतं, की आम्ही शाळेत सांगितलेला प्रकल्प करतोय तरी सगळे आम्हाला का रागवतायत. पण आईने पुढे विचारलं, ‘‘पण तो मुलगा उकिरड्यावरून काय घेऊन आला?’’
एव्हाना तो मुलगा रडायचा थांबला होता. तो म्हणाला, ‘‘तिथे मला एक अर्धवट खाल्लेलं सीताफळ दिसलं. इतका वेळ आमच्याकडे सीताफळाच्या बिया नव्हत्या. म्हणून मी बियांसाठी ते सीताफळ उचललं तेवढ्यात सानियाताईने बघितलं.’’ आणि मग एकदम चिडून त्याच्या आईकडे बघून तो म्हणाला, ‘‘मला आधी विचारायस ना? तुला काय वाटलं, मी ते खाणार आहे?’’
त्याच्या आणि इराच्या आईने मुलांना समजावून सांगितलं की असं काही करायचं असेल तर आम्हाला मोठ्या माणसांना सांगा. आम्ही तुम्हाला सगळ्या फळांच्या बिया आणून देऊ. आणि मग इराची आईपण चिखलाचे लाडू करायला बसली. कारण त्यातून उगवणाºया झाडांची सावली तिलापण मिळणार होती!..

(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)

lpf.internal@gmail.com

Web Title: 'Revolutionary' Project From Seed to Plant by children..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.