रिओ, सचिन आणि कांदेपोहे

By admin | Published: August 12, 2016 05:59 PM2016-08-12T17:59:25+5:302016-08-12T18:27:29+5:30

कोणाचा कोणता देश? कोणती भूमी? ब्राझीलमध्ये फिरून आॅलिम्पिकची पवित्र मशाल रिओमध्ये आली, तो दिवस विसरणं अशक्यच! अनेक रिओवासीयांबरोबर रस्त्यावर उसळलेल्या समुद्रात मीही होते.

RIO, SAINT AND KANDEPOHE | रिओ, सचिन आणि कांदेपोहे

रिओ, सचिन आणि कांदेपोहे

Next

-  सुलक्षणा वऱ्हाडकर

कोणाचा कोणता देश? 
कोणती भूमी?
ब्राझीलमध्ये फिरून आॅलिम्पिकची पवित्र मशाल रिओमध्ये आली, 
तो दिवस विसरणं अशक्यच!
अनेक रिओवासीयांबरोबर रस्त्यावर उसळलेल्या समुद्रात मीही होते. 
हातात भारताचा झेंडा आणि डोक्यावर ब्राझीलची टोपी!
त्या गर्दीतल्या कुणीतरी मला विचारले, कुठला देश तुझा?
मी म्हटले, ‘इंडिया... 
पण आता ब्राझीलसुद्धा. 
सध्या कर्मभूमी आहे ही आमची.’
समोरच्या ब्राझीलियन तरुणीने 
मला गळामिठी घातली.
... हे सारे मैदानाबाहेर होते 
आणि लक्षात राहून जाते.
आॅलिम्पिकच्या या सोहळ्यात 
माझी जन्मभूमी 
(हे लिहित असताना तरी) रिकाम्या हातांची आणि निराश आहे.
...तर कर्मभूमी संतापलेली, उद्विग्न!



रिओमधून हे लिहीपर्यंत भारतीयांसाठी एकही आनंदाची पदक-बातमी आलेली नसली, तरी माझ्यासारख्या इथे काम करणाऱ्या स्वयंसेवकांना मात्र आॅलिम्पिकच्या क्रीडाग्रामात जन्मभर जपून ठेवण्यासारखे कितीतरी क्षण मिळत आहेत.
माझी तर झोळी आत्ताच भरून गेली आहे.
सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरेची ज्या दिवशी मॅच होती तो माझा आॅलिम्पिक स्वयंसेवकगिरीतला कोर्टावरचा पहिला दिवस होता. माझी ड्यूटी खरे म्हणजे शेजारच्या कोर्टवर होती. पण मी विनंती करकरून, नंतर चक्क भांडून भांडून सानियाच्या कोर्टवर ड्यूटी बदलून घेतली. जेवढे काही पोर्तुगीज शब्द येत होते त्या शब्दांच्या जोरावर, जितके विनम्र होता येत होते तेवढे विनम्र होऊन मी सानियाच्या कोर्टवर मेन गेटवर जॉइन झाले. 
खरी गंमत तर तिथून सुरू झाली. माझ्याबरोबर आणखी एक मराठी मुलगा टेनिस कोर्टवर होता. त्याला बॉल बॉयचे काम देण्यात आले. त्याने त्या कामाला चक्क नकार दिला. त्याचे म्हणणे होते, मी एक इंजिनिअर आहे आणि तसे माझ्या अर्जात स्पष्ट लिहिले होते. मी हे असले बॉल बॉयचे (हलके) काम का करू?
... त्यानंतर तो मला टेनिस कोर्टवर एकदाही दिसला नाही. 
सानियाच्या सामन्याआधी मी प्रार्थनाच्या घरच्यांशी बोलले. प्रार्थनाची आई सांगत होती, १५ तारखेपर्यंत राहण्याची सोय आहे. त्यानंतर कुठे राहणार याची व्यवस्था करतो आहोत आम्ही.. 
त्या कुटुंबीयांची एका मराठी स्वयंसेवकाशी ओळख करून देऊन मी सानियाची वाट पाहत बसले, तर समोर साक्षात सचिन तेंडुलकर!
सचिनबरोबर त्यांचा मॅनेजर होता बहुधा. आधी क्षणभर काही सुचेचना. मग आठवले... फोटो!!! सचिनबरोबर आॅलिम्पिकमध्ये फोटो!!!
खरे तर ते बरे नसेल दिसले, पण मोह आवरला नाही. मी सचिनबरोबर एक दोन नाही तर चक्क साताठ फोटो काढले.. म्हणजे सचिनच्या मॅनेजरने काढून दिले. ब्राझीलियन सवयीप्रमाणे ओळख असो नसो, कमरेत हात घालून फोटोसाठी पोझ द्यायची असा इथे शिरस्ता आहे. पण मी स्वत:ला सावरले आणि भारतीय पद्धतीने थोडे अंतर ठेवून फोटो काढले. 
सचिन माझ्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या हॉटेल विंडसर बाहामध्ये उतरला आहे, असे मला आधीच कळले होते. माझ्या घरातून त्याचे हॉटेल अगदी जवळ आहे. म्हणून मग मी ट्विट केले सचिनला टॅग करून, की इथे रिओमध्ये आला आहेस, तर कांदेपोहे खायला नक्की माझ्या घरी ये. 
पुढे ध्यानीमनी नसताना त्याची प्रत्यक्षच भेट झाली. अवघी काही मिनिटे का होईना, गप्पा झाल्या. त्या गप्पांमध्ये मग मी त्याला समक्षच म्हटले, कांदेपोहे!
सचिन स्वभावाने फारच विनम्र. तो म्हणाला, ‘माझ्या मॅनेजरलाही कांदेपोहे खूप आवडतात. आम्हाला नक्की आवडले असते पण आमचे शेड्यूल खूप बिझी आहे...’
शिवाय सचिनच्या पायाला दुखापत झाली होती त्यामुळे तो जास्त प्रवास करणार नव्हता. 
सानिया आणि प्रार्थनाचा सामना पाहायला सचिन आला आहे, ही बातमी आॅलिम्पिकमधल्या समस्त भारतीय स्वयंसेवकांपर्यंत काही मिनिटांत पोचली. रिओमध्ये अनेक भारतीय स्वयंसेवक आलेले आहेत. प्रत्येकाची ड्यूटी वेगवेगळ्या स्टेडियममध्ये लागलेली. त्यामुळे सगळे विखुरलेले. त्यात बाहामध्ये साठ टक्के गेम्स होत आहेत. त्यामुळे तिथे १० किलोमीटरच्या परिसरात अनेक भारतीय स्वयंसेवक होते. आमचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहे. त्यावर भराभर निरोपानिरोपी झाली.
सचिन आलाय म्हटल्यावर प्रत्येकाने हातातली कामे टाकून टेनिस कोर्टवर धाव घेतली. 
मी कोर्टाच्या गेटवरच होते. त्यामुळे भारतीय दिसणाऱ्या कुणालाही त्या दिवशी त्या सामन्यासाठी तिकिटाची गरज पडली नाही. 
जो तो सेल्फी काढण्यात गर्क! सचिन पाय सांभाळत हसत सौजन्यानं सगळ्यांशी बोलत होता. सगळ्या स्वयंसेवकांबरोबर सचिनने ग्रुप फोटोही काढले.
...त्या दिवशी अनेक भारतीय नजरांमध्ये मी पाणी पाहिले!!
कोणाचा कोणता देश? कोणती भूमी?
ब्राझीलमध्ये फिरून आॅलिम्पिकची ती पवित्र मशाल रिओमध्ये आली, तो दिवस माझ्या अजून लक्षात आहे. अनेक रिओवासीयांबरोबर रस्त्यावर उसळलेल्या समुद्रात मीही होते. 
एक बिंदू! हातात भारताचा झेंडा आणि डोक्यावर ब्राझीलची टोपी या अवतारात ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’ म्हणत दोनेक किलोमीटर धावत गेले. रस्त्यावरून सगळे जण माझ्याकडे पाहत होते.
त्या गर्दीतल्या कुणीतरी मला विचारले,
कुठला देश तुझा?
मी म्हटले, ‘इंडिया... पण आता ब्राझीलसुद्धा. सध्या कर्मभूमी आहे ही आमची.’
समोरच्या अनोळखी ब्राझीलियन तरुणीने मला गळामिठी घातली... हे सारे मैदानाबाहेर होते आणि लक्षात राहून जाते.
आॅलिम्पिकच्या या सोह्ळ्यात माझी जन्मभूमी (हे लिहित असताना तरी) रिकाम्या हातांची आणि निराश आहे ...तर कर्मभूमी संतापलेली, उद्विग्न!
स्थानिकांना सामन्यांमध्ये रस नाही.
खदखद आहे ती डोक्यात साचलेला संताप रस्त्यावर येऊन उधळून देण्याची!! ब्राझीलमधली राजकीय अस्थिरता, आर्थिक चणचण, बेकारी आणि त्याच्या डोंबल्यावर उभा राहिलेला हा आॅलिम्पिकचा डोलारा याविषयी स्थानिकांमध्ये राग असणे तसे स्वाभाविकच!!
त्यात झिकाचा संसर्ग आणि दहशतवादी हल्ल्यांच्या शक्यतेची टांगती तलवार आहेच!
- भारतीय गोटामध्ये दाटत चाललेले निराशेचे मळभ कधी दूर होते, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
सुवर्ण नाही तर निदान रौप्य किंवा कांस्य 
- बातमीची वाट पाहणे कधी संपते आणि कोण संपवते ते आता पाहायचे.
पण भारतातून आलेल्या ‘रिओ जाओ, सेल्फी खिंचो, खाली हाथ वापिस आओ’वाल्या खवचट शेरामारीचे दु:ख, विषाद आणि राग इथे आलेल्या भारतीय स्वयंसेवकांच्या ग्रुपमध्येसुध्दा स्पष्टपणे उमटलेला दिसला, तर मग खेळाडूंचे काय?
...आॅलिम्पिकमध्ये यशासाठी रक्त-अश्रू वेचलेल्या आणि त्यापायी अगणित अडचणी, कष्ट सोसलेल्या दत्तू भोकनळसारख्या खेळाडूंचे काय?
...रविवारच्या फायनलसाठी तयार होत एकाग्रता साधण्याकरता स्वत:ला खोलीत कोंडून घेतलेल्या दीपा करमाकरच्या फोनचे सीमकार्ड तिच्या कोचने काढून घेतले ते बरेच झाले म्हणायचे!!

Web Title: RIO, SAINT AND KANDEPOHE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.