इन्स्टंट लग्नाची रोमँटिक गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 08:33 PM2021-05-22T20:33:38+5:302021-05-22T20:34:20+5:30
अमेरिकेत लॉकडाऊनचे नियम कडक असताना, एकत्र येण्यावर बंदी असताना एका छोट्याशा टपरीवजा बूथ समोर झालेल्या इन्स्टंट लग्नाची कहाणी !
(संकलन : शर्मिष्ठाभोसले)
एकमेकांमध्ये हरवून गेलेल्या या जोडप्याच्या अमेरिकन लग्नाची ‘कोरोना-कहाणी’ सध्या जगभरात गाजते आहे... कारण अमेरिकेत लॉकडाऊनचे नियम कडक असताना, एकत्र येण्यावर बंदी असताना एका छोट्याशा टपरीवजा बूथ समोर झालेलं त्यांचं इन्स्टंट लग्न ! रॉडनी आणि मोनिका कॉसबी.. या न्यू नॉर्मल काळात भव्य चर्च, सुरेल संगीत, देखणी सजावट, असंख्य मित्र आणि नातेवाईकांचं ओसंडून वाहणारं प्रेम असा नजारा काही या कॅलिफोर्नियातल्या गोड जोडप्याला अनुभवता आला नाही. मात्र त्यातूनही त्यांनी मार्ग काढला. मोनिकानं ख्रिश्चन पद्धतीतला डौलदार शुभ्र गाऊन आणि रॉडनीनं ब्लॅक सूट घातला होता. दोघे चर्च ऐवजी उभे होते एका ' सोशली डिस्टंट पॉप-अप मॅरेज बूथ ' समोर. कोरोनाची साथ ऐन भरात असताना हे लग्न सुरक्षित आणि सुखात पार पडलं. यामागे होती एक अनोखी कल्पना. ही कल्पना प्रत्यक्षात आणली कॅलिफोर्नियातल्या ऑरेंज कौंटीमधील होंडा सेंटरनं.
इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पार्किंग लॉटच्या मोकळ्या जागेत हे बूथ उभारले. एरवी या जागेत बदकं बागडत असायची. बूथमध्ये बसून कर्मचारी समारंभ पार पडण्याच्या आवश्यक त्या सूचना देणार आणि बूथ समोर प्रत्यक्ष विवाह होणार अशी ही कल्पना. तिलाच प्रत्यक्षात आणत मोनिका आणि रॉडनी एकमेकांचे झाले. यावेळी केवळ एका साक्षीदाराला उपस्थित राहण्याची परवानगी दिली गेली.
एकमेकांत हरवून किस करताना, हातात हात घेऊन खळखळून हसतांनाचा या जोडप्याचा आनंद याहून या ‘न्यू नॉर्मल’ काळात रोमँटिक ते काय असेल?