‘रूप तेरा’ ते ‘भीगे होंठ’

By admin | Published: May 16, 2015 02:01 PM2015-05-16T14:01:47+5:302015-05-16T14:01:47+5:30

‘प्रेम’ हाच हिंदी चित्रपटांचा सुरुवातीपासूनच गाभा होता, पण शारीर प्रेम किंवा ओढ व्यक्त करताना सारेच बिचकायचे, अवघडायचे. शुद्ध शारीर आकर्षण, कामुकता व्यक्त तर करायची आहे, पण त्यासाठी समर्थ अशी सांगीतिक आणि दृश्य भाषा मात्र पुरेशी गवसलेली नाही. ही कोंडी पहिल्यांदा फोडली ती ‘आराधना’ने.

'Roop Tera' Te 'Bhge Lip' | ‘रूप तेरा’ ते ‘भीगे होंठ’

‘रूप तेरा’ ते ‘भीगे होंठ’

Next
- विश्राम ढोले
 
हिंदी चित्रपटांनी प्रेमाला अगदी सुरुवातीपासूनच सर्वाधिक महत्त्वाचं स्थान दिलं असलं तरी स्त्री-पुरुषांमधील शारीर प्रेम किंवा ओढ जेव्हा व्यक्त करण्याची वेळ यायची तेव्हा ते अनेक वर्षे बिचकायचे, अवघडायचे. आणि अर्थातच त्यांचे प्रेक्षकही. चित्रपटातील गाणी म्हणजे तर सूक्ष्म, अवघड आणि उत्कट भावना व्यक्त करण्याची, फँन्टसीला आधार पुरविण्याची हक्काची जागा. त्यामुळे बहुतेकवेळा शारीरिक जवळीक किंवा उघड कामूक प्रसंग गाण्यांच्या आश्रयानेच दाखवले जायचे. पण सेन्सॉर बोर्डाचा धाक आणि एक अदृश्य सांस्कृतिक दडपण यामुळे त्यात अवघडलेपण असायचेच. मग चुंबनाचे प्रतीक म्हणून कधी दोन फुले एकत्र येताना दाखव, शारीरिक उत्कटतेचा प्रसंग आला की मग झुडुप, धगधगती आग वगैरेंचा ‘आडोसा’ घे अशी प्रतीकात्मकता चालायची. शब्द जरी थोडेफार बोल्ड झाले तरी दृश्य, संगीत आणि गाण्यातील मानवी ध्वनी मात्र बरेचदा तुलनेने सौम्य असायचे. शुद्ध शारीर आकर्षण, उत्कटता, कामुकता व्यक्त तर करायची आहे, पण ती करण्याची समर्थ अशी सांगीतिक आणि दृश्य भाषा मात्र पुरेशी गवसलेली नाही, अशी ही कोंडी होती. 
ही कोंडी फोडली 1969 साली आलेल्या ‘आराधना’ने. शक्ती सामंतांचा हा चित्रपट सुपरहिट तर झालाच, शिवाय त्याने तीन महत्त्वाचे बदलही प्रस्थापित केले. 
पहिले म्हणजे राजेश खन्नाच्या रुपाने एक सुपरस्टार प्रस्थापित केला. दुसरे म्हणजे आर. डी. बर्मन नावाच्या एका अवलिया संगीतकाराच्या क्षमतेचा, वेगळेपणाचा परिचय करून दिला आणि तिसरे म्हणजे किशोरकुमारला एक नवा जन्म दिला. 
आर. डी. आणि किशोरची अशी नवीन ओळख प्रस्थापित होणो ही चित्रपटसंगीताच्या दृष्टीने महत्त्वाची घटना होती. खरंतर या चित्रपटाचे संगीत सचिन देव बर्मन यांचे. त्यांनी त्यानुसार राजेश खन्नासाठी मोहम्मद रफीच्या आवाजात ‘गुनगुना रहे हैं भंवर’ आणि ‘बागों मे बहार है’ ही दोन गाणी रेकॉर्डही करून ठेवली होती, पण नंतर सचिनदा खूप आजारी पडले. काम करणो शक्यच नव्हते. त्यामुळे उरलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी मुलावर येऊन पडली. आर.डी.ने मग राजेश खन्नावरील दोन सोलो गाणी रफीच्या ऐवजी किशोरकुमारकडून करून घेतली. आणि त्यातून साकारली ती ‘मेरे सपनों की रानी’ आणि ‘रूप तेरा मस्ताना’ ही इतिहास निर्माण करणारी दोन गाणी. 
खरेतर, आर.डी. बर्मन या त्याआधीही छोटे नबाबपासून संगीतकार म्हणून स्वतंत्रपणो काम करीतच होते. किशोरकुमार तर अगदी पन्नासच्या दशकापासून प्रसिद्ध होते. पण या दोन गाण्यांमुळे आर.डी. आणि किशोर हे चित्रपटसृष्टीतील एक नव्या सांगीतिक युगाचे कॉम्बिनेशन प्रस्थापित झाले. त्यातही ‘रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना’चे योगदान अधिक लक्षणीय. कारण या गाण्याने उत्कट शारीरता, अनावर आकर्षण आणि त्याचा धीट, थेट उच्चार याबाबत झालेली कोंडी फोडली. गाण्याचा प्रसंग नेहमीचाच असला तरी त्याचा दृश्य आणि सांगीतिक आविष्कार मात्र खूप वेगळा होता. 
प्रेमावर समाजमान्य विवाहाचे शिक्कामोर्तब न झालेल्या एका तरुण जोडप्याला अचानक एका वादळी-पावसाळी संध्याकाळचा एकांत लाभतो आणि मग शारीरिक आवेगाचे एक नवे वादळ कसे निर्माण होते असा तो प्रसंग आहे. धगधगत्या आगीच्या प्रतीकाभोवती राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांनी तो साकारला आहे. त्यातील दृश्य धिटाई आजच्या मानाने तशी सामान्य वाटली तरी त्या काळाच्या तुलनेत ती बरीच होती. 
- पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे होते ते गाण्याचे सांगीतिक परिमाण. विशेषत: किशोरकुमारचा नव्याने लागलेला सेन्शुअल सूर आणि त्याच्या जोडीला ती सेन्शुअॅलिटी, ते शारीरिक आवाहन गडद करणारे आर.डी. चे संगीत!
- उत्तम गळ्याच्या, उत्तम शैलीच्या गायकांची तेव्हा काही कमी होती असे नाही. पण अशा प्रसंगात लागावी अशी मादकता, अधीरता आणि चंचलता व्यक्त करू शकणारा पुरुषी सूर उपलब्ध नव्हता. पुरुषांनीही तसा सूर लावावा ही सांस्कृतिक अपेक्षाच बहुधा तोपर्यंत नव्हती. बहुतांश पुरुष प्रेक्षकांसाठी बनविल्या जाणा:या चित्रपटांमध्ये ही अपेक्षा असायची ती स्त्रीस्वरांकडून. आशा भोसले, गीता दत्त यांचा सूर अशी शारीर मादकता, अधीरता आणि चंचलतेसाठी वापरला जायचा. पण पुरु षी स्वर सुंदर, भरीव, दमदार, आश्वासक, मुलायम, शांत वगैरे असला तरी पुरून जायचे. पुरुषी सुरालाही मादकतेचे अस्तर असावे आणि पुरुष गायकांनीही कामुक उसासे, उमाळे, श्वास, कुजबुज वगैरे आपल्या गायकीतून व्यक्त करावे असे काही तोपर्यंत फार घडायचे नाही. ‘रूप तेरा मस्ताना’तून ते घडले. प्रचंड लोकप्रियही झाले. दृश्य, सूर, शैली आणि संगीत या चारही निकषांवर ‘रूप तेरा मस्ताना’ने आवेगी शारीर संगप्रसंगांचा एक नवा साचा प्रस्थापित केला. हिंदी चित्रपटसंगीतात पुरुषी आवाजाला मादकतेचे, अधीरतेचे, रॉ-पणाचे आणि धिटाईचे एक नवे परिमाण दिले. आणि पुढे अनेक वर्षे स्वत: किशोरकुमारपासून ते सोनू निगमपर्यंत अनेकांनी या साच्याशी मेळ खाणारीच अनेक ‘धुंद’ गाणी गायली.
या साच्यापासून प्रेरणा घेतलेले, पण त्याच्याहीपुढे जाणारे लक्षणीय गाणो आले ते 2क्क्4 सालच्या मर्डरमध्ये. ‘भिगे होंठ तेरे प्यासा दिल मेरा’ हे कुणाल गांजावालाने गायलेले गाणो या संगप्रसंगाशी संबंधित गाण्याचा पुढचा टप्पा. दृश्य, शब्द, सूर आणि शैली या तीनही बाबतीत ‘रूप तेरा’पेक्षा अधिक धीट, अधिक थेट आणि अधिक उन्मादी. अपराधगंडापासून मुक्त असे कामूक आवाहन ते थेटपणो मांडते. इतकेच नव्हे तर संपूर्ण गाण्यामध्ये येत राहणारा कुणाल गांजावालाचा ओ ओ ओहो हा कामुक हुंकार गाण्याला एक खूप वेगळा असा उन्मादी परिमाण देतो. असा हुंकार हिंदी चित्रपटगीतांतील पुरुषी सुरासाठी खूप नवा आहे. या सा:या मादक, आवेगी सांगीतिक जाम्यानिम्याला मल्लीका शेरावत आणि इम्रान हाश्मीच्या बोल्ड दृश्यांनी आणखी उंचीवर नेऊन ठेवले आहे. एका अर्थाने रूप तेरा मस्तानाने सुरू केलेल्या धिटाईला ‘भिगे होंठ तेरे’ने उत्सवी सहजकृतीचे रूप दिले आहे. 
- हिंदी चित्रपटसंगीतातील कामुकता, पुरुषीपणा आणि शारीरता याबाबत म्हणूनच ही दोन गाणी ऐतिहासिक ठरतात. 
 
‘तेव्हा’ आणि ‘आता’
 
‘रूप तेरा’ घडते ब:यापैकी निर्जन स्थळी. पाऊस आणि वादळाच्या साथीने. 
 
‘रूप तेरा’मध्ये ‘भूल कोई हमसे ना हो जाए’ या शब्दात या अनावर आवेगाबद्दल हलकीशी का होईना अपराधभावना आहे. 
 
‘रूप तेरा’मध्ये शारीर आवेगापुढे  ‘भूल कोई हमसे ना हो जाए’ अशी मानवी स्खलनशीलता मांडली आहे. ‘रोक रहा है हम को जमाना, दूर ही रहना पास ना आना’ अशी परिणामांची धास्तीही त्यात आहे. शारीर आवेगाला, अधीरतेला ‘रात नशीली मस्त समाँ ह’ै असे निसर्गाच्या कोंदणात बसवून काहीतरी वैधता मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
 
‘भिगे होंठ तेरे’ घडते ते लिफ्टमध्ये, महानगरी उंच इमारतीच्या गच्चीवर, समुद्रकिना:यावर भरदिवसा.
 
‘भिगे होंठ’मध्ये ‘मेरे साथ रात गुजार. तुङो सुबह तक करू प्यार’ असे (दिवसाढवळ्या)  थेट, भीडभाड न बाळगता केलेले उन्मादी आवाहन आहे. 
 
‘भिगे होंठ तेर’े असा कोणताही खटाटोप करत नाही. 
आवेगाला आवरणो, समाजाची वा परिणामांची भीड बाळगणो किंवा शारीरिकतेला निसर्गाच्या कोंदणात वगैरे बसवून 
त्याचा दर्जा उंचावणो वगैरे कशाच्याही भानगडीत हे गाणो पडत नाही. 
 
(लेखक माध्यम, तंत्रज्ञान आणि संस्कृती या विषयाचे अभ्यासक आहेत.)

 

Web Title: 'Roop Tera' Te 'Bhge Lip'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.