घाई आणि आत्मघात

By Admin | Published: June 4, 2016 11:52 PM2016-06-04T23:52:42+5:302016-06-04T23:52:42+5:30

ख्यातनाम केंब्रिज विद्यापीठातल्या लॉ-स्कूलमध्ये गेल्या आठशे वर्षातली पहिली स्त्री प्रोफेसर म्हणून मानाची नेमणूक मिळवणा:या डॉ. अंतरा हलधर यांच्याशी संवाद.

Rush and suicide | घाई आणि आत्मघात

घाई आणि आत्मघात

googlenewsNext
>- अपर्णा वेलणकर
 
ख्यातनाम केंब्रिज विद्यापीठातल्या लॉ-स्कूलमध्ये गेल्या आठशे वर्षातली पहिली स्त्री प्रोफेसर म्हणून मानाची नेमणूक मिळवणा:या डॉ. अंतरा हलधर यांच्याशी संवाद.
 
बहुराष्ट्रीय कंपन्यांना आपला माल खपवायचा आहे, राजकीय पक्षांना निवडणुका जिंकायच्या आहेत, 
एनजीओंना निधी पदरात पाडून 
घ्यायचा आहे, यूएनसारख्या संस्थांना  
‘डेव्हलपमेंट गोल्स’ ठरवायचे आहेत.. 
या सगळ्या ध्येयनिश्चितीमुळे ज्याला-त्याला 
तयार उत्तरं उचलून पुढे धावण्याची 
घाई आहे आणि ही घाईच गरिबांच्या मुळावर उठली आहे, असं अंतरा म्हणते.
शेकडो वर्षाच्या व्यवहारांमधून उन्नत होत होत 
समाजात अस्तित्वात आलेल्या पारंपरिक रचनांवर आधुनिक विचार-व्यवस्थांचं 
कलम करण्याची घाई ही 
विकसनशील अर्थव्यवस्थांना लागलेली 
घातक सवय आहे, असं अंतराचं मत !
आधुनिकता, आर्थिक विकास म्हणजे 
पश्चिमेकडे अस्तित्वात असलेल्या व्यवस्था 
इकडे आणून सगळं चित्र भसाभस 
बदलू बघणं, त्यासाठी पूर्वीचं सगळं 
पुसलंच जाईल अशी धोरणं आखणं 
हा तिला आत्मघात वाटतो.
 
‘लंडनसारख्या आधुनिक पश्चिमी महानगराचे पहिले मुस्लीम महापौर म्हणून सादीक खान यांनी कुराणाला साक्षी ठेवून शपथ घेण्याची इच्छा प्रदर्शित केली, तेव्हा लक्षात आलं; की शपथविधीच्या ठिकाणी कुराणाची प्रतच नाही. लोकशाही आणि समतेच्या मूल्यांची जन्मभूमी मानल्या जाणा:या देशातलं हे चित्र तथाकथित ‘ग्लोबल नॉर्थ’वाल्या गटाच्या नैतिक वरचष्म्याचा बुरखा किती विरविरीत आहे, हे सांगत नाही का?’
- डॉ. अंतरा हलधर विचारतात, तेव्हा एरवी ठरावीक साच्याचे विचारव्यूह-युक्तिवाद आणि कोरडय़ा निष्कर्षाच्या चक्रात सुखेनैव फिरत राहणा:या ‘अॅकॅडेमिक स्कॉलर’शी आपण बोलतो आहोत, हे खरंच वाटत नाही.  
उत्तर-आधुनिक जगातल्या बदलत्या अर्थव्यवस्थेची अपत्यं म्हणून आकाराला येणारी विकासाची प्रतिमानं, जित्याजागत्या माणसांची स्वप्नं-महत्त्वाकांक्षा आणि अडचणींशी संबंधच न उरलेली आर्थिक-राजकीय अपरिहार्यता, त्यातून रचल्या जाणा:या (आणि म्हणूनच कालांतराने कोसळणा:या) अदूरदर्शी व्यवस्था याकडे बारीक नजर ठेवून असणा:या डॉ. हलधर हा अर्थशास्त्रज्ञांच्या जागतिक प्रज्ञा-वर्तुळातला तरुण भारतीय आवाज आहे! 
आंतरराष्ट्रीय विद्यापीठीय स्तरावर नावलौकिक कमावलेली डॉ. अंतरा उन्हात होरपळत्या गुजरातचा अभ्यास दौरा संपवून लंडनला परतण्याच्या वाटेवर असताना ‘लोकमत’ला भेटली. विकास आणि प्रगतीच्या रूढ प्रतिमानांपुढे प्रश्नचिन्ह लावणारी, आर्थिक विकासदराच्या आकडय़ांइतकीच रस्त्यावरच्या माणसाची उपजत शहाणी व नव्या अर्थव्यवस्थेत जमेची बाजू मानली पाहिजे असा आग्रह धरणारी आणि सतत पश्चिमेच्या तुलनेत आपली प्रगती तोलण्याची सवय लागलेल्या विकसनशील पूर्वेला चार खडे बोल सुनावण्याला न डगमगणारी ही तरुण संशोधक-अभ्यासक पेशाने केंब्रिज युनिव्हर्सिटीतल्या सुप्रसिद्ध लॉ स्कूलमध्ये प्राध्यापक आहे.
- पण ही ‘ओळख’ एवढय़ापुरतीच सीमित नाही. ब्रिटिश संस्कृतीतल्या व्हिक्टोरियन, कडवट सोवळेपणाचा अर्क मानल्या जाणा:या केंब्रिज विद्यापीठात ‘लॉ अॅण्ड डेव्हलपमेंट’ शिकवायला नेमली गेलेली गेल्या आठशे वर्षाच्या इतिहासातली ही पहिली स्त्री!  त्यातून पहिली अ-श्वेत, पहिली अ-युरोपियन आणि अर्थातच पहिली भारतीय! ‘बहुसंख्येने ‘गो:या’ असलेल्या माङया वर्गात शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला मी पहिलं पाऊल ठेवते, तेव्हा माङया विद्याथ्र्याच्या नजरेतलं आश्चर्य लपत नाही.’ - अंतराची ही कबुली जगाच्या नव्या रचनेत, त्यातून प्रख्यात विद्यापीठांच्या प्रांगणातही वर्णवर्चस्वाचे पीळ अजूनही किती चिवट आहेत, हेच सांगते. गो:या वर्णाचं उघड वर्चस्व असलेल्या केंब्रिजमध्ये रंग, लिंग, नागरिकत्व, भाषा या सर्वच बाबतीत ‘पोलिटिकली अनकरेक्ट’ असणं ही महत्त्वाची जबाबदारीच आहे, असं अंतरा मानते.
‘मी बदल नसेन, पण बदलाची सुरुवात आहे. रूढ व्यवस्थेला मोडता घालणारी व्यक्तीच अखेर बदलाच्या शक्यता खुल्या करते’ अशा उमेदीने वाटेतले अडथळे ओलांडत पुढे जाणं अंतराला लहानपणापासूनच सवयीचं आहे.
कुटुंब बंगाली. कोलकात्याचं. अंतराचा जन्म मुंबईतला. वडील लहानपणीच गेले. अंतराला वाढवलं ते तिच्या आईने आणि प्रामुख्याने आजीने. आई भली तर्कदुष्ट. प्रत्येक कृतीमागे विचार, अभ्यास हवा असा आग्रह धरणारी. आजी तडकभडक. जे योग्य वाटेल ते करून मोकळं व्हावं, संधीची वाट पाहत बसू नये, संधी खेचून घ्यावी हे बाळकडू अंतराला पाजलं ते आजीने. ब्रिटिशांच्या काळातला हिंदुस्थान डोळसपणो पाहिलेल्या/जगलेल्या अल्पशिक्षित आजीने अबोल अंतराला हरेक मुक्कामावरून पुढे ढकलतं ठेवलं.
‘शी लीट द फायर इन माय बेली’ - अंतरा सांगते. दिल्लीच्या सेंट स्टीफन्समधली कायदा आणि अर्थशास्त्रची पदवी, पुढे अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठातलं उच्चशिक्षण, नंतर केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमधली पदवी, पुढे तिथेच पूर्ण केलेली डॉक्टरेट आणि त्यामागोमाग जिथे शिकायला येणं हेच भाग्याचं होतं अशा प्रतिष्ठेच्या केंब्रिज लॉ कॉलेजमध्ये नव्याने तयार केलेल्या  ‘पोस्ट’वर नेमणुकीचं पत्रच मिळणं हा सारा प्रवास अंतराने वयाच्या तिशीतच पूर्ण केला.
ती शिक्षणाने विद्यापीठीय वर्तुळात गेली, अभ्यास आणि चिकित्सक औत्सुक्याच्या बळावर विविध शिष्यवृत्त्या आणि सन्मानांची धनी झाली; पण तिने स्वत:ला आकडेवारीच्या कोरडय़ा जंजाळात अडकवून घेणं निग्रहाने नाकारलं.
कायदा, अर्थशास्त्र आणि सामाजिक-आर्थिक विकास अशा तीन महत्त्वाच्या कोनांमध्ये गुंफलेली आंतरशाखीय तज्ज्ञता हे अंतराचं वैशिष्टय़!
कायद्याचा अभ्यास हा त्या तज्ज्ञतेचा गाभा. त्यात आधुनिक कायद्यांची संकल्पना आणि रचनाही जिथे आकाराला आली, जिथून जगभरात निर्यात केली गेली त्या लंडनमध्ये ती शिकली आणि आता शिकवतेही. तरीही आपल्या वेगळ्या सामाजिक वास्तवाचा विचार न करता ब्रिटिशांनी त्यांच्यासाठी घडवलेली व्यवस्था जशीच्या तशी उचलणा:या भारतासह अन्य देशांचा बौद्धिक आळस अंतराच्या
मते अजिबातच क्षम्य नाही. तोच न्याय आर्थिक विकासाच्या उसन्या संकल्पनांनाही! पश्चिमेकडल्या एखाद्या संपन्न, झगमगत्या महानगरांची प्रतिकृती घडवणं म्हणजे विकास, तिकडल्यासारखी चंगळ इकडे शक्य करणं म्हणजे समृद्धी ही गृहीतकं अंतराला संताप आणतात. 
सामान्यांच्या भाषेतल्या जगाच्या विभागणीला विद्यापीठीय वर्तुळातली नेमकी संकल्पना आहे  ‘ग्लोबल नॉर्थ-ग्लोबल साऊथ’! त्याविषयीचा अंतराचा वेगळा दृष्टिकोन घडवला तो प्रारंभीच्या काळात तिने बांगला देशात केलेल्या भ्रमंतीने! डॉ. मोहम्मद युनूस यांनी मायक्रो-फायनान्सच्या माध्यमातून उभ्या केलेल्या ‘ग्रामीण बॅँक मॉडेल’चा अभ्यास करण्यासाठी अंतराने बांगला देशातली खेडीपाडी तुडवली आहेत.
198क् च्या दशकात दक्षिण आशिया आणि लॅटिन अमेरिकन देशांमध्ये मायक्रो फायनान्स या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या बचतगटांनी सुमारे अब्जभर (1 बिलियन) लोकांना अपारंपरिक अर्थव्यवस्थेचा भाग बनवून त्यांच्या हाताला रोजगार पुरवला होता. कजर्फेडीची टक्केवारी तब्बल 8क् टक्क्यांहून जास्त असलेल्या या मॉडेलने सगळ्याच अर्थतज्ज्ञांना भुरळ घातली होती. बांगला देशचे मोहम्मद युनूस यांची ग्रामीण बॅँक ही या प्रयोगाची उद्गाती! सायकलवरून गावागावात फिरणारे बचतगटांचे प्रतिनिधी आणि या बायसिकल बॅँकर्समार्फत होणारं कजर्वाटप-वसुली या चक्राचा अभ्यास करत विद्यार्थीदशेतली अंतरा बांगला देशात फिरली होती. ज्यांना ‘सिस्टीम’ ओळखीची नाही, कर्ज घेण्यासाठी जे बॅँकांच्या दारात जाणार नाहीत आणि कजर्वसुलीसाठी ज्यांना नोटिसा देऊन कोर्टात खेचणं अव्यवहार्य असल्याने शक्य नाही अशा खेडुत स्त्री-पुरुषांनी चालवलेली ही व्यवस्था उभी होती ती परस्पर विश्वास आणि ओळखीपाळखीवर! शेजारच्या राङिायाशी असलेली ‘ओळख’ हीच बचतगटाचं कर्ज घेऊन ते योग्य त्याच कारणासाठी वापरण्याची प्रेरणा आणि ‘पैसे फेडले नाहीत तर मोहल्ल्यात मान खाली जाईल’ हीच कजर्फेडीची खात्री!
पुढे याच मॉडेलचं कार्पोरेटायङोशन करण्याच्या हव्यासाने बडय़ा कंपन्या भांडवल घेऊन उतरल्या आणि सगळी व्यवस्थाच कोसळली; त्याला कारण मोठी उलाढाल, नफ्याच्या घाईतून आलेला हव्यास आणि  समाजमनाशी फटकून वागू पाहणारा अर्थव्यवहार असं अंतरा सांगते.
‘पाच बायकांना एकत्र आणा. त्यांना भांडवल पुरवा. नफा कमवा.. अशी गणितं मांडायला बचतगट म्हणजे मॅकडोनाल्डची दुकान-साखळी नव्हे. प्रत्येक आर्थिक व्यवहाराचं कार्पोरेटायङोशन त्यातून उचित, अपेक्षित परिणाम मिळवून देईलच असं नव्हे, याचा हा महत्त्वाचा धडा आहे’ - अंतराचं हे विश्लेषण महाराष्ट्रात एकेकाळी बहरलेल्या बचतगटांच्या अधोगतीचंही उत्तर देतं. शेकडो वर्षाच्या व्यवहारांमधून उन्नत होत होत समाजात अस्तित्वात आलेल्या पारंपरिक रचनांवर आधुनिक विचार-व्यवस्थांचं कलम करण्याची घाई ही विकसनशील अर्थव्यवस्थांना लागलेली घातक सवय आहे, असं अंतराचं मत आहे. आर्थिक विकास म्हणजे पश्चिमेकडे अस्तित्वात असलेल्या व्यवस्था इकडे आणून सगळं चित्र भसाभस बदलू बघणं, त्यासाठी पूर्वीचं सगळं पुसलंच जाईल अशी धोरणं आखणं हा तिला आत्मघात वाटतो.
- अशा विचारशून्य, दीर्घदृष्टीचा अभाव असलेल्या घिसाडघाईतूनच मग रोजगारांची निर्मिती न करणारा वाढत्या आर्थिक विकासदराचा पोकळ डोलारा उभा राहतो, असं तिचं निरीक्षण! आर्थिक विकासाची प्रतिमानं निश्चित करून ठरवलेल्या अंतिम टोकाशी घाईघाईने पोचण्याचा हव्यास (रशिंग द डेव्हलपमेंट गोल्स) धरण्यापेक्षा आणि त्यासाठी प्रगत देशांमधल्या व्यवस्थांची आळशी उचलेगिरी करण्यापेक्षा आपल्याकडे काय अस्तित्वात आहे, त्यात कोणते कालोचित बदल घडवता येतील, लोकांच्या सवयीची प्रतिमानंच त्यातले दोष काढून अधिक सक्षम कशी करता येतील हा दूरचा पण शाश्वत रस्ता आहे, असं अंतराचा अभ्यास सांगतो.  आज प्रगत असलेल्या देशांनीही त्यांच्या उन्नयनाच्या काळात हेच केलं, त्यातूनच जागतिक व्यवहारांना आकार देणा:या दीर्घकालीन व्यवस्था उभ्या राहिल्या. भारताने ही संधी नाकारणं म्हणजे या उपखंडात उन्नत झालेल्या हजारो वर्षाच्या पारंपरिक शहाणिवेपासून जागतिक समुदायाला वंचित ठेवणं आहे, असं अंतरा म्हणते. या मातीतल्या शहाणपणाला जागतिक विचारविश्वात स्थान/नाव नसेल, तर तो (आपला बौद्धिक आळस आणि) पश्चिमेकडल्या शब्दसंग्रहाचा तोकडेपणा झाला, असं तिचं मत.
 ग्रामीण भागातल्या जुन्या व्यवस्थांमध्येच अंतराला नव्या शक्यता दिसतात. विकसनशील/ अविकसित अर्थव्यवस्थांमध्ये ‘अॅकॅडेमिक इंटरेस्ट’ असलेले अभ्यासक इथे येतात ते ‘व्हॉट इज नॉट वर्किंग’ शोधायला. अंतराचा ध्यास आहे तो ‘व्हॉट इज वर्किंग’ हे शोधण्याचा!
- आणि त्याही प्रश्नाला बरीच उत्तरं मिळतात, फक्त त्यासाठी ग्रामीण भारतातले धूळभरले रस्ते तुडवायची तयारी हवी, असं तिचा अनुभव सांगतो.     ‘आणि हा डोळ्यातून हुकमी पाणी काढणारा रोमॅँटिसिझम नाही’ - हेदेखील ती लगोलग स्पष्ट करते. ग्रामीण भागातल्या प्रश्नांची तीव्रता तिने अनुभवली आहे. पण तरीही स्वत:ची एक जीवनपद्धती, रुळलेली अर्थव्यवस्था, सामाजिक चौकटी असलेल्या अशा प्रदेशांना सरसकट मागास ठरवून त्यांना विकासाच्या म्हणजे बेबंद शहरीकरणाच्या लोंढय़ात ढकलून देणं अंतराला असंवेदनशील आणि क्रूर वाटतं. मर्यादित अर्थाने का असेना, पण स्वयंपूर्ण असलेल्या गुजरातच्या खेडय़ांमधल्या शेता-मातीतून ओढून काढून तरुण मनुष्यबळाला साणंदच्या लेबर कॅम्पमध्ये कोंबणं आणि त्यांना गुराढोरांहूनही हीन वागवणारी ‘आर्थिक उन्नतीची संधी’ देणं म्हणजे विकास या व्याख्येला अंतराची तीव हरकत आहे.
 प्रत्येक गोष्टीचा निर्णय ‘मार्केट’च्या मोजपट्टय़ांनी करणं / होऊ देणं अंतराला मान्य नाही. आणि ‘मार्केट डीटरमाईन्स एव्हरीथिंग’ या गृहीतकाविषयी तर तिच्या बोलण्यात उघड संतापच दिसतो. व्यक्ती म्हणून जे तातडीच्या महत्त्वाचं ते समाज म्हणून प्राधान्याचं असेलच असं नाही, हे साधं भान सोडून ‘बाजारपेठे’ला भुललेल्या विचारविश्वाबद्दल तिला तीव्र खंत आहे. बदलत्या राजकीय/सामाजिक पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून आर्थिक सुधारणा रेटून नेण्याचा अंतिम परिणाम काय होतो, हे चीनच्या सद्यस्थितीवरून दिसतं आहे. या पाश्र्वभूमीवर भारतासाठी अंतराकडे पर्याय आहे : मेकॅनिक्स ऑफ अचिव्हिंग अॅग्रिएबल थिंग्ज! 
- सर्वसहमतीने सुयोग्य अशा सवरेपयोगी ध्येयांच्या प्राप्तीसाठी व्यवस्था उभी करणं!
 वरवर पाहता हे सबगोलंकारी, जवळपास अप्राप्य असंच ध्येय वाटत असलं, तरी लांबचा रस्ता घेण्याला पर्याय नाही, यावर अंतराचा विश्वास आहे.   2क्क्8 साली उद्भवलेल्या अर्थसंकटानंतर सावरू पाहणा:या जागतिक अर्थव्यवस्थेत सर्वाधिक संधी  ‘ग्लोबल साऊथ’ला असतील आणि या भूभागातील देश जागतिक अर्थकारणात आपले स्थान बळकट करण्यासाठी अधिक आक्रमक होतील, असं ती म्हणते. अंतराचा प्रवास सोपा नाही. निव्वळ आकडेवारीवर निष्कर्षाचे डोलारे उभारण्याला सरावलेल्या अर्थशास्त्रज्ञांच्या-अभ्यासकांच्या प्रतिष्ठित विद्यापीठीय वर्तुळात अविकसित जगातली धूळभरली खेडी तुडवणा:या, आकडय़ांपेक्षा माणसांशी बोलण्याचा आग्रह धरणा:या आणि नवं ते सारं स्वीकारण्याआधी जुनंही तपासून पाहू म्हणणा:या अंतरासारख्यांपुढे आव्हानं अधिक. पण केंब्रिजमधल्या पदवीच्या मोहाने तिच्या वर्गात प्रवेश घेणा:या बुद्धिमान विद्याथ्र्याना संशोधनासाठी ग्रंथालयांऐवजी थेट ‘फिल्ड’वर पाठवण्याचा तिचा धडाका आता केंब्रिजलाही सरावाचा होऊ लागला आहे. लाखभर पौंडाच्या जॉब ऑफर्स सोडून तरुण अभ्यासक खेडय़ातल्या अशिक्षित माणसांशी जोडून घेणारे रिसर्च प्रोजेक्ट करायला पुढे येतात, हे सुचिन्ह आहे, असं अंतरा आनंदाने सांगते.
अभ्यासक आणि धोरणकत्र्याची भंबेरी उडवून देणारे मोठमोठय़ा आकडेवारीचे तक्ते तोंडावर फेकणा:या स्मार्ट संशोधनाने विद्यापीठीय रिसर्च-पेपरच्या चौकटी तेवढय़ा भरतात (तिचेच शब्द वापरायचे तर, ‘सिडक्टिव्ह, सेक्सी डेटा’), पण त्याने दिशा गवसत नाही. माणसं सापडत नाहीत, असा अंतराचा अनुभव. अर्थशास्त्रच्या आकडय़ांपलीकडची माणसं शोधण्यासाठी थेट त्यांच्या जगात जाऊन धडकण्याची उत्सुकता अंतराच्या आजीने तिच्या डोक्यात भरली.. आणि जे दिसेल, हाती लागेल त्याच्या उलट-सुलट संदर्भाचा अन्वय लावण्याची चिकित्सक क्षमता आईच्या गुणसूत्रंमधून तिच्यात उतरली. ‘त्याअर्थाने मी स्कीझोफ्रेनिक आहे’ - अंतरा हसत सांगते. तिच्यात असणारी ही जिजीविषा तिला केंब्रिजच्या चार भिंतीत राहू देणार नाही हे उघडच आहे. पुढेमागे प्रत्यक्ष कृतीसाठी मैदानात उतरण्याचा विचार आहे का, या थेट प्रश्नाचं स्वाभाविक उत्तर ती टाळत नाही. अंतरा म्हणते, 
 ‘मी दोन्हीकडे असेन. गावातल्या बायकांसाठी बोअरवेलची कशी आवश्यकता आहे, हे आकडेवारीने पटवत बसण्यात कशाला वेळ घालवायचा. त्यापेक्षा आपण आपल्या हाताने विहीर खणायला घ्यावी असं माझी आजी सांगते. असं मातीत हात घालणं मला आवडतं. महत्त्वाचं वाटतं. कधीतरी मी उतरीनच मातीत. पण माङयातल्या ऊर्जेचा साठा संपला; की उतरलेली बॅटरी रि-चार्ज करण्यासाठी पुन्हा संशोधनाकडे, अभ्यासाकडे परतावंसं मला वाटेल.’
- आणि अंतरा आज लंडनमध्ये असली, तरी ज्यात हात घालण्याची तयारी चालू आहे. ती माती भारताची असेल, हे तिला न विचारताच सहज समजतं.
 
 रूढ स्त्रीवादाला वळसा
कायदा, अर्थशास्त्र आणि आर्थिक-सामाजिक विकास अशा क्लिष्ट त्रिसूत्रीतल्या तज्ज्ञतेशी जोडल्या जाऊ शकण:या शुष्क कोरडेपणाचा अंशही अंतराच्या व्यक्तिमत्त्वात नाही. तिला सिनेमे आवडतात, नृत्य-संगीतामध्ये जाणकारी आहे. भारतीय साडीसह उत्तम पोषाखांची चोखंदळ निवड हा आपल्या व्यक्तिमत्त्वात साधता येऊ शकणा:या प्रयोगशीलतेचाच भाग आहे असं ती मानते. ‘मी स्त्री आहे, आशियाई आहे, गो:या त्वचेची नाही या जन्माने मिळालेल्या ‘पोलिटिकल आयडेंटिटी’चा वृथा अभिमान बाळगण्याची जरुरी नसली, तरी त्यामुळे सक्तीच्या तडजोडी माङया माथी मारल्या जाणार नाहीत याबद्दल मात्र मी आग्रही असेन.’ - अंतराचा उत्तर आधुनिक स्त्रीवाद हा इतका स्पष्ट आहे. राग यावा असं वर्तमान ती नाकारत नाही, पण ‘सतत रागात असण्याला, अकारण आग्रही आणि करकरीत असण्याला’ अंतराचा विरोध आहे.  ‘आय रिफ्यूज टू बी हार्श, अनप्लीजंट, अॅँग्री यंग वुमन’ - अंतरा सांगते. स्त्रीत्व हा आपल्या मार्गातला अडसर नसून तीच आपली ताकद आणि वेगळं असण्याची शक्यता आहे, असं अंतराचं म्हणणं आणि अनुभवही आहे. कुणी आपला हक्क नाकारू नये, आपल्याला गृहीत धरू नये, संधी हिरावून घेऊ नये म्हणून स्त्रीला पुरुषांपेक्षा अधिक सावध राहावं लागतं, हे तिला मान्य आहे.. पण रूढ स्त्रीवादाला वळसा घालण्याचं चातुर्यही तिने कमावलेलं दिसतं. अंतरा म्हणते, ‘विदाउट बीइंग अ मॅन इन वुमन्स बॉडी, आय अॅम प्लेइंग माय गेम’.
 
(लेखिका ‘लोकमत’च्या फीचर एडिटर आहेत.)
aparna.velankar@lokmat.com

Web Title: Rush and suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.