सचिन एक वर्षानंतर
By admin | Published: November 14, 2014 10:14 PM2014-11-14T22:14:28+5:302014-11-14T22:14:28+5:30
सचिन तेंडुलकरला नवृत्त होऊन एक वर्ष झालं. वर्ष कधी संपलं, कळलंच नाही. वर्ष पळण्यासाठी अलीकडे चित्त्याचे पाय उसने घेत असावीत.
Next
द्वारकानाथ संझगिरी (लेखक ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आहेत.) -
सचिन तेंडुलकरला नवृत्त होऊन एक वर्ष झालं. वर्ष कधी संपलं, कळलंच नाही. वर्ष पळण्यासाठी अलीकडे चित्त्याचे पाय उसने घेत असावीत. सचिन नवृत्त झाला आणि भारतीय क्रिकेटचं एक पर्व संपलं. सचिनची पोकळी जाणवणारच होती. सचिन, नेहरू, दिलीपकुमार, रफी, अत्रे अशा विविध क्षेत्रांतल्या दिग्गजांच्या नवृत्ती किंवा जाण्यामुळे झालेली पोकळी जाणवतेच; पण जग पुढे जातं. शो गोज ऑन! काहींना विराट कोहलीमध्ये अगदी सचिन नाही, तरी चौथ्या क्रमांकावरचा फलंदाज, ज्याला शतकाचं आकर्षण आहे असा फलंदाज सापडला. अर्थात, दोघांत शाहरुख खान आणि सलमानइतका फरक आहे. सचिनच्या बॅटवरचा संस्कार आधुनिक असला, तरी मनावरचा संस्कार जुना होता. त्यामुळे मैदानावरचं आणि मैदानाबाहेरचं त्याचं वागणं. ‘कुठल्याही बापाने आपल्या मुलाला सचिनसारखं वर्तन ठेव’ असं सांगण्यासारखं. विराट कोहलीचा बॅटवरचा संस्कार आधुनिक, तसा मनावरचाही आधुनिक! धावा केल्यावर बॅटने पॅव्हेलियनमध्ये बसलेल्या प्रियतमेला फ्लाईंग किस देण्याची विराटची आधुनिकता मला भावली, तरी सचिनला असं स्वप्न पडणंही कठीण होतं. बरं, विराटच्या बॅटच्या आधुनिक संस्कारांना जुन्या भक्कम बचावाची साथ नाही, हे इंग्लंडमध्ये जाणवलं. कुठल्याही चांगल्या आऊटस्विंगवर, विशेषत: अँडरसनच्या, त्याची विकेट लिहिलेली असायची. विराटला भारतात विराट परफॉर्मन्सची सवय होती. इंग्लंडमध्ये त्याचा परफॉर्मन्स सूक्ष्मात गेला. जी मंडळी उतावीळपणे विराटचा पाय सचिनच्या बूटात जातो का पाहत होते, त्यांना कळलं, की तो बूट फार मोठा आहे. सुनील, कपिल, सचिनचे बूट नियतीने एवढय़ा मोठय़ा मापाचे बनवले आहेत, की चटकन त्यात कुणाचा पाय कसा फिट्ट बसू शकतो?
इंग्लंडमध्ये सचिनची आठवण प्रचंड आली. राहुल द्रविडची आली. सचिन कॉमेंट्री रूममध्ये होता. मी त्याला म्हटलंसुद्धा, ‘‘अजून बॅट घेऊन मैदानात उतर. नुसतं तुला पाहून भारतीय फलंदाजी सुधारेल.’’
वर्षभर सचिन कुठे होता?.. टीव्हीवर तो भारतरत्न मिळेपर्यंत दिसला होता. त्यानंतर टीव्हीवर नरेंद्र मोदींचं राज्य सुरू झालं. त्या काळात सचिनची एकदा भेट झाली. तो किती बिझी आहे, हे त्याने सांगितलं. अनेकांना वाटायचं, की क्रिकेट संपलं, आता सचिन मोकळाच मोकळा. सत्काराला येईल, अमक्याला येईल, तमक्याला येईल. काही जण तर निर्लज्जपणे म्हणाले, ‘‘मोकळा तर आहे आता!’’ अरे त्याला त्याचं आयुष्य नाही का? पंचवीस वर्षे देशासाठी खेळताना त्याला वैयक्तिक आयुष्यात जे काही गमवावं लागलं, त्यातलं काही जगायला त्याने सुरुवात करू नये का? सध्या तो आभाळाकडे बघत, माशी मारत वेळ काढतो, असं लोकांना वाटतं तरी कसं? त्यात त्याचं कुटुंब मोठं. सचिनने कुटुंबाची व्याख्या मी, मुलांचा बाप, माझी मुलं आणि आई इतकी कोती कधी ठेवलीच नाही. भाऊ-बहीण, काका-काकू, आत्या, मामा हे सारे सचिन तेंडुलकर परिवाराचेच भाग असतात. त्यांचं आजारपण, त्यांच्यातला एखादा मृत्यू, या क्लेशदायक घटनांतूनही त्याला जायला लागलं. सचिन तेंडुलकरकडे अर्जुनाच्या अक्षय भात्याप्रमाणे धावांची अक्षय बॅट असली, तरी अक्षय सुखाचा सदरा नाही. त्यामुळे मानवी सुख-दु:खाचा त्यालाही या वर्षात सामना करावा लागलाच.
पण सध्या सचिनकडे पाहिल्यावर, त्याने थोडं बाळसं धरल्यासारखं वाटतं. इतके दिवस आहारावर ठेवलेलं नियंत्रण थोडं तरी उठलं असावं. तो जेव्हा लंडनला लॉर्ड्सवर वनडेचा एक महोत्सवी सामना खेळला, तेव्हा त्याचे काही स्ट्रेट ड्राईव्ह्ज आणि कव्हर ड्राईव्ह्ज पाहून मी त्याला एक मेसेज टाकला होता, ‘नवृत्त होण्याची घाई केलीस, असं वाटलं. छ्री ुीॅ्रल्ल२ ं३ ा१३८. इंग्लंडमध्येच थांब. भारतीय संघाला तुझी गरज लागणार.’ त्याचं उत्तर आलं, ‘दिवसाच्या खेळानंतर जे अंग दुखलं, ते पाहून वाटलं, निर्णय योग्य होता.’ खरंच होतं ते. फिटनेससाठी तो बॅडमिंटन खेळतो; पण मॅच फिटनेस वेगळाच असतो. नवृत्तीपूर्वी काही दिवस आधी आमच्या घरी जेवायला आलेल्या सचिनला मी म्हटलं होते, ‘‘कॉमेंट्री करणार?’’
त्याने मलाच प्रतिप्रश्न टाकला, ‘‘तुला वाटतं का?’’
मी म्हटलं, ‘‘नाही.’’
तो म्हणाला, ‘‘तू मला बरोबर ओळखलंस.’’
मी त्याला म्हटलं, ‘‘एका बाबतीत ब्रॅडमनचा आदर्श ठेव. ते क्वचित बोलायचे; पण जे बोललं जाणार, ते आकाशवाणीसारखं वाटलं पाहिजे.’’
सचिनने वर्षभरात जीम क्वचित वापरली; पण इंग्लंडमध्ये कसोटीत कोसळलेल्या भारतीय संघासाठी वनडे खेळायला जेव्हा रैना गेला, तेव्हा तो जाताना सचिनचं अनुभवी दार ठोठावून गेला. सचिन त्याला एमसीएमला घेऊन गेला आणि युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या. रैनाचा इंग्लंडमधला परफॉर्मन्स सुधारला. हा निव्वळ योगायोग नव्हता. किंबहुना, इंग्लंड दौर्यानंतर विराट कोहलीनेही सचिनचं दार ठोठावलं. भारतीय खेळाडूंना एक खात्री आहे, की ते एक असं दार आहे, की जे ठोठावल्यावर कुठलाही याचक तिथून विन्मुख जात नाही.
या वर्षभराच्या काळात सचिनने फुटबॉलचा संघ घेतला आणि गावही दत्तक घ्यायचा संकल्प सोडला. झाडूही हातात घेतला; पण तो फक्त प्रतीकात्मक नको. ज्या समाजाने सचिनला भरभरून दिलं, त्या समाजाला परत काही तरी द्यायचं कार्य सचिनने सुरू केलंय. ते वाढवलं पाहिजे. ते कार्य इम्रान खान किंवा स्टीव्ह वॉच्या सामाजिक कार्यासारखं भक्कम, किंबहुना त्याच्या पुढे जाणारं असावं. दत्तक घेतलं जाणारं गाव, त्याचं पहिलं पाऊल ठरूदेत. वर्षभरात त्याचं आत्मचरित्रंही आलं. त्याने स्वत:चे विक्रम मोडले, याचं मला आश्चर्य वाटलं नाही. एक तर सचिनचं गुडविल जगभर आहे. त्यात तो आजपर्यंत कमी बोलल्याने अपेक्षा खूप आहेत. मी ते चरित्र अजून वाचलेलं नाही; पण त्यात परदेशी खेळाडूंना काढलेले चिमटे किंवा एखाद-दोन धपाटे सोडले, तर भारतीय स्तरावर वादग्रस्त ठरावं असं काही असणार नाही, हे नक्की! तो सचिनचा स्वभाव नाही. हलवायाकडून झणझणीत मटणाची अपेक्षा ठेऊ नये. त्याने पुस्तक प्रकाशनाच्या मोठय़ा समारंभापूर्वी त्याच्या कारकिर्दीत त्याला साथ देणार्या पत्रकारांना भारताच्या विविध भागांतून बोलावलं. किंबहुना, नवृत्त होतानाही त्याने त्याच्या जवळच्या खेळाडू पत्रकारांना स्वत: फोन करून नवृत्ती कळवली होती. हा संस्कार राहुल द्रविडनेही नवृत्तीच्या वेळी दाखवला होता. हे पुस्तक रसिकांना त्याच्या कारकिर्दीतून फिरवून आणेल; पण नवृत्तीपूर्वी मी त्याला म्हटलं होतं, ‘‘डॉन ब्रॅडमनने ‘अ१३ ा उ१्रू‘ी३’ नावाचं पुस्तक लिहिलं. ते क्रिकेटपटूंसाठी गीता ठरावं, इतकं ग्रेट आहे. त्यापुढे अनुभव, ज्ञान या बाबतींत एकच क्रिकेटपटू जाऊ शकतो. तो म्हणजे तू! तुलाही क्रिकेटच्या विविध फॉरमॅटचा अनुभव आहे - वनडे, टी-२0! तसं एक पुस्तक लिही. त्यावर वाचकांच्या उड्या कदाचित पडणार नाहीत; पण उमलत्या क्रिकेटपटूंची ही गीता असेल.’’ हे त्याला पटलंही होतं. बरं सचिन, पुढच्या वर्षात कृष्ण हो आणि नवी गीता सांग. तो मान आणि हक्क फक्त तुझाच आहे.