सचिनचा वारसदास
By Admin | Published: November 22, 2014 06:02 PM2014-11-22T18:02:52+5:302014-11-22T18:02:52+5:30
अगदी दुसरा सचिन म्हणणं अतिशयोक्तीचं ठरेल, कारण सचिनचेच मापदंड लावायचे झाले, तर सचिन हा सचिनच.. पण रोहित शर्माची कामगिरी पाहता, इसमे भी दम है असं म्हणता येईल, असा दमदार खेळाडू. एकदिवसीय सामन्यात दोनदा द्विशतक ठोकून विश्वविक्रम करणार्या या खेळाडूची बातही कुछ और है..
>स्वदेश घाणेकर
मुंबईचे क्रि केटपटू म्हणे खडूस असतात. एकदा खेळपट्टीवर चिकटले की बाद होण्याचे नावच घेत नाहीत.. या खडूस मुंबईकरांची ज्यांना ज्यांना माहिती आहे, ते त्यांच्या वाट्याला जाणे टाळतात. श्रीलंकन खेळाडूंना सचिन तेंडुलकरकडून अनेकदा फटके बसल्यानंतरही बहुधा समज आलेली नाही आणि म्हणून की काय जणू त्यांनी रोहित शर्माला एक नव्हे, तर तब्बल तीन वेळा जीवदान देण्याचे धाडस दाखवले. हेच त्यांच्या अंगलट आले. तेव्हा रोहितने एकट्याने अडीचशेहून अधिक धावा चोपून लंकादहन केले. रोहितने त्या सामन्यात केवळ २६४ धावा केल्या नाही, तर वनडेत दोन द्विशतक ठोकणारा तो जगातला एकमेव फलंदाज बनला आहे. तसेच, एका सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा करणार्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. लंकन संघाला रोहितची ती खेळी एक भयानक स्वप्न म्हणून कायम स्मरणात राहील.
सचिन तेंडुलकरसारखीच शैली रोहितकडे आहे. विराट कोहली सुरात आल्यावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवायला मोकळा होतो, तसाच काहीसा, परंतु रोहितच्या प्रत्येक फटक्यात एक लय आणि अचूकता आहे. चेंडूची दिशा ओळखून, थोडासा वेळ घेत अचूक फटका मारणे, हा त्याचा हातखंडा. गोलंदाजाचा अभ्यास करून, त्याची रणनीती अचूक हेरून प्रत्येक चेंडूवर तुटून पडायचे हे गणित आखून तो मैदानात उतरतो आणि परिस्थितीनुसार त्यात झालेल्या बदलातही स्वत:ला सावरतो. याचा प्रत्यय लंकेविरु द्धच्या सामन्यात आलाच. दोन-अडीच महिन्यांच्या विश्रांतीनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर बॅटरूपी दांडपट्टा चालवायला मिळाल्याने त्याचा वेग आणि त्याने होणारे घाव हे अधिकच खोल व प्रभावी असणारच. २0११मध्ये वर्ल्डकपचे तिकीट न मिळाल्याची सल रोहितच्या मनात होतीच. त्यामुळे आता मिळालेल्या प्रत्येक संधीवर हा दांडपट्टा असाच चालवायचा आणि २0१५साठी आपली जागा निश्चित करायची, हा एकमेव ध्यास रोहितच्या मनात आहे. त्या दिशेने लंकेविरुद्ध द्विशतक ठोकून रोहितने पहिले पाऊल टाकले. त्याची फलंदाजी पाहून लहानपणीचा रोहित आठवला. अगदी ४-५ वर्षांचा रोहित आपल्या लहान भावासोबत क्रिकेट खेळायचा. त्याला गोलंदाजी करायला लावून स्वत: तासन्तास फलंदाजी करायचा. त्याच्या या चिकाटीमुळे लहान भावालाही रडू यायचे आणि तो वडिलांकडे बॅटिंग मिळत नसल्याची तक्रार करायचा. लंकेच्या खेळाडूंची अवस्था काहीशी अशीच झाली. पण ही व्यथा मांडायची कुणाकडे?
रोहितला लहानपणापासून क्रिकेटची आवड. त्याची टीम म्हणजे वडील, भाऊ आणि तो. वडील आणि भावाने गोलंदाजी करायची व आपण केवळ फलंदाजी करायची, असा त्याने बनवलेला नियम. रोहितला बाद करणे या दोघांनाही न जमल्याने तो तासन्तास फलंदाजी करायचा. जसजसा रोहित मोठा होत गेला त्याची ही टीम वाढत गेली. घराशेजारील मैदानात बच्चेकंपनीची टीम घेऊन तो धावा कुटायचा. आपल्याला क्रिकेटपटू बनायचे आहे, हा एकच ध्यास तो उराशी बाळगून होता. म्हणूनच क्रिकेटच्या सराव शिबिरांमध्ये तो आवर्जून सहभाग घ्यायचा. अशाच एका सराव शिबिरात प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितमधील गुणवत्ता हेरली आणि त्याला आपल्या संघाकडून खेळविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रोहितला स्कॉलरशीप मिळवून दिली आणि स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत दाखल करून घेतले. लाड यांनी त्याला गोलंदाज म्हणून संघात घेतल्याने रोहितला सातव्या-आठव्या क्रमांकावर फलंदाजी करायला मिळायची. त्यामुळे आपल्यातील गुणवत्ता दाखवण्यासाठी त्याला एका संधीची आवश्यकता होती. आंतरशालेय स्पर्धेत त्याच्या संघाचे फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे रोहितला ती संधी मिळाली आणि त्याने त्या सामन्यात जीव ओतून खेळ केला. या खेळीनंतर तो त्यापुढे प्रत्येक लढतीत शालेय संघाकडून सलामीवीर म्हणून उतरू लागला.
हॅरिस व गाईल्स शिल्ड स्पर्धांमध्ये त्याने यशाचा आलेख चढता ठेवला. बोरीवली ते चर्चगेट असा नियमित प्रवास त्याचा ठरलेला असायचा. सकाळी सहा-साडेसहाला उठून तयार व्हायचे, क्रिकेटचे साहित्य असलेली बॅग पाठीवर टाकायची आणि साडेसातच्या सुमारास बोरीवली स्थानक गाठायचे. मग त्या धक्काबुक्कीतून स्वत:ला आणि आपल्यापेक्षा वजनाने दुप्पट असलेल्या त्या बॅगला सावरत जागा पकडून चर्चगेट गाठायचे. त्यानंतर दिवसभर सराव करून अभ्यास सांभाळून घर गाठायचे आणि सायंकाळी पुन्हा सराव.. असा त्याचा दिनक्रम ठरलेला असायचा. कालांतराने त्याचे काका रवी यांनी रोहितला चर्चगेटला सोडायची आणि तिथून परत आणण्याची जबाबदारी स्वीकारली.
आंतरशालेय स्पर्धा गाजवणार्या रोहितची निवड २0 वर्षांखालील मुंबई संघात झाली. त्यानंतर तो एकेक पायरी चढत गेला. १७ व १९ वर्षांखालील भारतीय संघात त्याने दबदबा निर्माण केला. २00६च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत त्याची बॅट चांगलीच तळपली आणि सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्ये त्याने ११वे स्थान पटकावले. मार्च २00५ मध्ये त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि उत्तर विभागाविरु द्ध १२३ चेडूंत १४२ धावा कुटून तो प्रकाशझोतात आला. याच कामगिरीमुळे त्याची निवड भारत ‘अ’ संघात झाली. त्यानंतर चॅम्पियन चषक स्पर्धेसाठीच्या संभाव्य ३0मध्ये त्याने स्थान पटकावले, परंतु अंतिम संघात जागा मिळवण्यात तो अपयशी ठरला.
२00७मध्ये त्याने भारताच्या वनडे आणि टी-२0 संघात स्थान पटकावले. त्यात त्याने अनेक महत्त्वपूर्ण खेळी केल्या; परंतु त्यात सातत्य राखण्यात अपयश आल्याने तो नेहमी आत-बाहेर होत राहिला. त्यामुळे मधल्या फळीतील त्याची जागा धोक्यात आली. सुरेश रैना आणि विराट कोहली यांनी ती आपल्या कर्तृत्वावर मिळवली आणि रोहित बॅकफूटवर गेला. प्रचंड क्षमता असलेल्या या खेळाडूला आपले नक्की काय चुकतेय, याची जाणीव होतच नव्हती. काहींच्या मते रोहितचा अतिआत्मविश्वास घातक ठरत होता आणि त्यात थोडेफार तथ्यही होते. अल्पावधीत मिळालेल्या लोकप्रियतेचा परिणाम झाल्याचे जाणकारांचे मत होते. यातून बाहेर आल्यास रोहित एक उत्कृष्ट फलंदाज बनेल, यावर कुणाचेही दुमत नव्हते.
२0११च्या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात त्याला वगळले आणि ही बाब रोहितच्या जिव्हारी लागली. त्यानंतर त्याच्यात आमूलाग्र बदल झाला आणि तो सर्वांनीच पाहिला. २0११च्या वेस्ट इंडीज दौर्यावर तेंडुलकर, सेहवाग व धोनी यांना विश्रांती देण्यात आल्याने रोहितला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने त्या दौर्यात दमदार खेळ केला. २0१३मध्ये सलामीवीर म्हणून त्याला संधी मिळाली आणि शिखर धवन याच्यासोबत त्याने ही भूमिका अगदी चोखपणे बजावली. २0१२मध्ये हुकलेली कसोटी पदार्पणाची संधी त्याला २0१३मध्ये मिळाली आणि ईडन गार्डनवरील पहिल्याच कसोटीत त्याने १७७ धावा चोपल्या. त्यापाठोपाठ वानखेडेतही त्याने १११ धावा केल्या आणि आपली गुणवत्ता सिद्ध केली.
रोहितचा हा पुनर्जन्मच म्हणावा लागेल. आश्चर्याची बाब म्हणजे ती मालिका विक्रमादित्य सचिन तेंडुलकर याच्या कारकिर्दीची अखेरची मालिका होती आणि सचिनची रिक्त जागा कोण भरून काढणार, हा प्रश्न चर्चेत होता. सचिनसारखीच फलंदाजीची शैली असलेल्या रोहितने सचिनच्या अखेरच्या कसोटी मालिकेत दोन खणखणीत शतके ठोकली. त्याची ही शैलीदार खेळीच चर्चेला उत्तर ठरेल, असे वाटलेले आणि श्रीलंकेविरुद्ध रोहितने द्विशतक ठोकून हे उत्तर प्रत्यक्षात उतरवले.
(लेखक लोकमत मुंबई आवृत्तीमध्ये उपसंपादक आहेत.)