स्वातंत्र्यसूर्य: शिर्डीचे साईबाबा क्रांतिकारकांशी निकट संपर्कात होते, त्याची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:47 AM2022-08-22T07:47:06+5:302022-08-22T07:48:10+5:30

लोकमान्य टिळकांनी १९ मे १९१७ रोजी शिर्डीत येऊन साईबाबांची भेट घेतली. जवळपास सात-आठ तास शिर्डीत थांबलेल्या टिळकांच्या व साईबाबांच्या भेटीतील महत्त्वाचा तपशील मात्र कधीच उजेडात आला नाही.

Saibaba of Shirdi was in close contact with freedom fighters of india | स्वातंत्र्यसूर्य: शिर्डीचे साईबाबा क्रांतिकारकांशी निकट संपर्कात होते, त्याची कहाणी!

स्वातंत्र्यसूर्य: शिर्डीचे साईबाबा क्रांतिकारकांशी निकट संपर्कात होते, त्याची कहाणी!

googlenewsNext

साईबाबा हयात असताना प्रापंचिक इच्छापूर्तीसाठी त्यांच्याकडे येणारे असंख्य भाविक होते. अध्यात्मात प्रगती करू पाहणारेही अनेक भक्त त्यांच्याकडे येत. परंतु भक्तांच्या या गर्दीत भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित असणाऱ्याही अनेक व्यक्ती होत्या.

लोकमान्य टिळकांनी १९ मे १९१७ रोजी शिर्डीत येऊन साईबाबांची भेट घेतली. जवळपास सात-आठ तास शिर्डीत थांबलेल्या टिळकांच्या व साईबाबांच्या भेटीतील महत्त्वाचा तपशील मात्र कधीच उजेडात आला नाही. लोकमान्य टिळकांचे खंदे समर्थक आणि त्यांच्या सुटकेसाठी लंडनपर्यंत कायद्याच्या माध्यमातून लढा देणारे ख्यातनाम कायदेपंडित अमरावतीचे दादासाहेब खापर्डे साईबाबांचे निस्सीम भक्त होते. 

खापर्डे हे बराच काळ साईबाबांच्या संपर्कात होते. त्यांनीच टिळकांना शिर्डीत जाऊन साईबाबांची भेट घेण्याबाबत सुचवले होते. एकदा लोकमान्य टिळक खापर्डे यांच्यासह अमरावतीहून संगमनेरला आले होते. त्यावेळी टिळकांनी शिर्डीला जाऊन साईबाबांची भेट घेतली होती, असे मानले जाते. या भेटीच्या वेळी साईबाबा अतिशय प्रसन्न होते. ही प्रसन्नता म्हणजे दोन महापुरूषांच्या तेजाचे जणू काही प्रतिबिंबच होते. साईबाबांना इतके प्रसन्न मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते, असेही दादासाहेब खापर्डे यांनी त्यांच्या रोजनिशीत नमूद करून ठेवले आहे.

लंडनमधील प्रयत्न अपयशी झाल्यानंतर लंडनहून ते थेट टिळकांकडे मंडालेला व तेथून अमरावतीमार्गे तातडीने साईबाबांच्या भेटीला आल्याच्या नोंदी आहेत. साईबाबांनी आपल्या कृतीतून व सांकेतिक भाषेत खापर्डे यांना मदत केल्याच्या नोंदीही खापर्डे यांच्या रोजनिशीत आहेत.

सन १९२८ मध्ये भगतसिंग व राजगुरू यांनी ‘सॅन्डर्स’ या इंग्रज अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार मारले. त्यानंतर भूमिगत झालेले राजगुरू डॉ. हेडगेवारांच्या मदतीने नागपूरजवळील मोहपा येथे भीष्मांच्या घरी महिनाभर गुप्तपणे राहात होते.  अस्पृश्यता आणि वंगभंग चळवळीतही भीष्मांचा सहभाग होता.

साईभक्त हरी सीताराम ऊर्फ काकासाहेब दीक्षित हे लोकमान्य टिळकांच्या अनेक खटल्यात सॉलिसीटर होते. दीक्षित, मवाळवाद्यांचे नेते फिरोजशहा मेहतांचे अनुयायी, तर लोकमान्य टिळकांचे स्नेही होते. 

१९०७ साली नागपूर काँग्रेसच्या वेळी त्यांनी जहाल व मवाळ यांच्यातील मतभेद दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक व १९०१च्या सुमारास कायदे कौन्सिलचेही सभासद होते.

मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल सर सी. शंकरन नायर यांनी १८९७ साली राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते. १९१५ च्या सुमारास ते भारताच्या व्हॉईसरॉय यांच्या कार्यकारी परिषदेत दाखल झाले होते. या निर्णयाबद्दल त्यांच्या मनात संदेह असल्याने खापर्डे यांच्यामार्फत त्यांनी बाबांकडे मार्गदर्शन मागितले होते. याबाबतचा पत्रव्यवहारसुद्धा आजवर तसा पडद्याआडच राहिला आहे.

साईबाबांचा काळ हा १८५७ चा उठाव आणि पहिले महायुद्ध (१९१४ - १९१८) या दोन प्रमुख घटनांच्या दरम्यानचा आहे, साईबाबांनी आपली ओळखही कधी उघड केली नाही. अनेक क्रांतिकारक त्यांचे भक्त असल्याने ब्रिटिशांना साईबाबांचे क्रांतिकारकांशी गुप्त संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे स्थानिक पोलीस व हेरांच्या माध्यमातून साईबाबांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येई. दर पंधरा दिवसांनी याबाबत डीसीआय (केंद्रीय गुप्तवार्ता निदेशालय), कोलकाता येथे अहवाल पाठवण्यात येत असे. ब्रिटिशांना अखेरपर्यंत त्यात काहीही आक्षेपार्ह आढळल्याचे मात्र दिसत नाही.

साईबाबांच्या आरत्या रचणारे आणि शिर्डीतील पहिल्या रामनवमीचे कीर्तनकार कृष्णशास्त्री जागेश्वर भीष्म यांचा स्वातंत्र्यलढ्याशी संबंध होता. त्यांना काही काळ तुरुंगवासही झाला. ते डॉ. खानखोजे, रामलाल बाजपी यांच्यासह अनेक देशभक्तांच्या संपर्कात होते. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाचे डॉ. मुंजे यांच्याकडे असलेले एकमेव हस्तलिखित जप्त करण्यासाठी ब्रिटिशांनी जेव्हा डॉ. मुंजे यांच्या घरावर धाड टाकली, तेव्हा भीष्मांनीच प्रसंगावधान राखून ते हस्तलिखित लपवले होते. रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार, डॉ. गोपाळराव ओगले, भैयाजी कावरे, विश्वनाथ केळकर आदींशी त्यांचा निकटचा संबंध होता.

शब्दांकन व संकलन : प्रमोद आहेर, लोकमत प्रतिनिधी, शिर्डी

Web Title: Saibaba of Shirdi was in close contact with freedom fighters of india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :shirdiशिर्डी