सायबाचे पेंटर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2018 02:37 PM2018-01-20T14:37:26+5:302018-01-21T10:49:21+5:30
कंपनी सरकारने ब्रिटिश साम्राज्याची मुळे हिंदुस्तानात रोवायला घेतल्यावर राज्यकर्ते अधिकारी आले, तसे फिरस्ते युरोपियन चित्रकारही आले. त्यांनी पाहिलेला-अनुभवलेला-रंगवलेला ‘ब्रिटिशराज’कालीन हिंदुस्तान ही एक खास कहाणी आहे.
- शर्मिला फडके
इ.स. १८०० ते १८५० हा काळ चित्रकलेच्या, एकंदरीतच कलेच्या इतिहासात रोमॅण्टिक कालखंड मानला जातो. या कालावधीत अनेक तरुण, धाडसी, फिरस्ते डच आणि फ्लेमिश चित्रकार आपल्या ‘चित्र-प्रवासा’करता बाहेर पडले. काही रोमला गेले, फ्लोरेन्सला गेले, काही जर्मनीत गेले, ºहाईन व्हॅलीला जाऊन पोहचले. जेकब व्हॅन आणि लुई स्पेन मोरोक्कोला गेला, लुईस अपोल उत्तर ध्रुवापर्यंत जाऊन पोहचला... असे किती एक!
कला-फिरस्तीच्या बाबतीत दर्यावर्दी, धाडसी डच सर्वाधिक खंदे. हिंदुस्तानच्या किनाºयावरही ते अर्थातच येऊन थडकले. एकंदरीतच सतराव्या शतकापासून युरोपियन प्रवाशांच्या गर्दीने हिंदुस्तानचा किनारा कायम गजबजलेला राहिला. त्यात डच होते आणि ब्रिटिश, पोर्तुगिजही होते. त्यातले बहुसंख्य व्यापारीवृत्ती ठेवून आलेले, इथली समृद्धी लुटायला अधीर. पण त्यात अनेक कलंदर कलावंतही होते. नवे जग पाहायला उत्सुक असलेले.
अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने संपूर्ण हिंदुस्तानचा ताबा घेतला. आर्थिक, सामाजिक, राजकीय अधिसत्ता त्यांच्या हातात गेली आणि या भूमीचा चेहरा-मोहरा, व्यक्तिमत्त्वच बदलून गेले. ही प्रक्रिया घडत असताना इथे आलेल्या या फिरस्त्यांच्या रोजनिशीत, स्केचबुकांमध्ये ती नकळत, बरेचदा जाणीवपूर्वकही नोंदवली गेली.
आज मागे वळून पाहताना अधिकृत ब्रिटिश दस्तावेजांमधील नोंदी, तटस्थ आणि कोरडी राजकीय निरीक्षणे यांच्या तुलनेत ही रेखाटने, चित्रे, चित्रांमधल्या नोंदी कितीतरी जास्त जिवंत आणि खºया वाटतात.
या युरोपियन चित्र-प्रवाशांनी आपल्या प्रिण्ट्स आणि पेंटिंग्जद्वारे हिंदुस्तानच्या भूमीवरील ब्रिटिशांच्या नव्या वसाहतींच्या सामाजिक दस्तावेजीकरणाचे काम चोख पार पाडले. इथला निसर्ग, लोकजीवन, जाती-जमाती, त्यांचे पोशाख त्यांनी आपल्या चित्रांतून रंगवले.
या पेंटिंग्जमध्ये काय नाही? पर्वतराजी, झाडे, फुले, वन्यप्राणी, आदिवासी याबरोबरच नागरी जीवन, रस्ते, पाळीव गुरे, लहान व चिंचोळ्या मार्गिका, नद्यांची भव्य पात्रे, काठावरचे जनजीवन, साधू, भिकारी, बनारसचे घाट, स्मशाने, लहानमोठ्या संस्थानिकांचे दरबार, स्थानिक कला-कारागिरांचे काम, राजदरबारातल्या नर्तकी, विविध जाती-धर्मांचे रंगीबेरंगी पोशाख घातलेले लोक. युरोपियन चित्रकारांनी भरभरून स्केचेस केली, चित्रे काढली, ती रंगवली. पौर्वात्य जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्यातून दिसतो. नंतरच्या काळात पश्चिमी देशांमध्ये असलेली भारताची ‘एक्झॉटिक’ आणि ‘गूढ’ प्रतिमा नेमकी कशी, कशामुळे निर्माण झाली हे या पेंटिंग्जमधून कळते.
इ.स. १७७० ते १८२० या काळात भारतात साठ ब्रिटिश पेंटर्स आले. ब्रिटिशराजचे दस्तावेजीकरण करण्याच्या कामात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वेगवेगळ्या कालावधीत भारतात आलेल्या या पेंटर्समध्ये तैलरंगावर प्रभुत्व असलेले ३० पोर्टेÑट पेंटर्स आणि २८ मिनिएचरिस्ट होते. मुख्यत: चित्र रंगवण्याकरताच त्यांनी हिंदुस्तानचा हा प्रवास केला होता. यापैकी बरेचसे व्यावसायिक कामे मिळण्याच्या आशेने इथे आले होते. जॉन जोफानी, विल्यम होजेस, टिली केटल, थॉमस डॅनिएल्स, एमिली एडेन हे त्यापैकी काही महत्त्वाचे चित्रकार. इथल्या प्रदेशाची विविधता, निसर्गदृश्ये, लोकजीवन, ऐतिहासिक स्थळे इत्यादी पेंटिंग्जमधून रेकॉर्ड करायला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्यांना प्रोत्साहन दिले. या काळात ब्रिटनमध्ये सुंदर निसर्गदृश्ये रंगवण्याचा प्रघात होता. भारतातली भव्य पर्वतराजी, दाट व सदाहरित जंगले, नद्या, दºयाखोºयांनी समृद्ध प्रदेश या चित्रकारांना आव्हानात्मक वाटला यात नवल नाही.
सतराव्या शतकाच्या मध्यापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत भारतातील विविध प्रांतांमध्ये या चित्र-प्रवाशांचा ओघ सतत वाहता राहिला. विल्यम होजेस १७८० ते १७८३ या काळात भारतात आला. त्याने देखणी निसर्गदृश्ये रंगवली. थॉमस डॅनिएल आणि त्याचा पुतण्या विल्यम हे दोघे १७८६ ते १७९४ मध्ये आले. टिली केटल, जॉन जोफानी आणि आर्थर डेव्हिस हे अठराव्या शतकाच्या शेवटच्या तीन दशकांमध्ये आले. याच दरम्यान जॉन स्मार्ट, ओजियस हम्फ्रेही आले.
हे चित्रप्रवासी भारतभर फिरले. स्थानिक धनवान, संस्थानिकांकडे पोर्टेÑट पेंटिंग्जची, दरबारातल्या महत्त्वाच्या प्रसंगांची चित्रे काढण्याची कामे त्यांना मिळाली. त्याव्यतिरिक्त आपल्या भ्रमंतीमध्ये त्यांना एक्झॉटिक वाटलेल्या निसर्गदृश्यांची, ऐतिहासिक स्थळांचीही पेंटिंग्ज त्यांनी केली. बहुतांश पेंटिंग्ज आॅइलमध्ये, पाश्चिमात्य तंत्राच्या अकॅडेमिक रिएलिझम शैलीत केलेली आहेत. लिनियर परस्पेक्टिव्हवर त्यात भर दिलेला आहे. निसर्गचित्रे जलरंगात केली. यापैकी काही पेंटिंग्ज नंतर एनग्रेविंगकरता, लिथोग्राफ्ससाठी वापरली गेली.
ब्रिटिशराजमधल्या चित्र-प्रवाशांकरता, लेखकांकरता हिंदुस्तानचा भूभाग हा आवडता, सर्जनशील विषय होता. आपल्या युरोपियन देशबंधूंना हा असा ‘वेगळा’, ‘अद्भुत’ प्रदेश प्रत्यक्ष पाहणे शक्य होणार नाही त्यामुळे आपण घेत असलेला अनुभव त्यांच्यापर्यंत पोचवायला हवा या हेतूने आपल्या चित्रांमध्ये, नोंदींमध्ये त्यांनी शक्य तेवढा ‘जिवंतपणा’ ओतण्याचे प्रयत्न केले. त्यात जास्तीत जास्त वास्तवदर्शीपणा आणला.
**
‘पिक्चरिंग इंडिया : प्लेसेस अॅण्ड द वर्ल्ड आॅफ द ईस्ट इंडिया कंपनी बाय मॅकक्लिअर’ या पुस्तकात अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात भारतात आलेल्या युरोपियन चित्रप्रवाशांनी चितारलेल्या, इतिहासात पुढे अजरामर झालेल्या घटनांचा चित्रवृत्तांत आहे. कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या भारतातील तीन प्रमुख बंदर शहरांना भेटी दिलेल्या, या शहरांच्या अक्षरश: प्रेमात पडलेल्या चित्र-प्रवाशांनी तेथील जनजीवनाची, घटनांची केलेली स्केचेस, पेंटिंग्ज यात आहेत. कमिशन्ड पेंटिंग्जही आहेत. हा चित्रांकित दस्तावेज ईस्ट इंडिया कंपनीने समुद्रमार्गे केलेल्या व्यापारातून पुढे निर्माण केलेले, विस्तारलेले मार्ग, वसाहतींची रुजुवात, बंदरांवर त्यांनी पद्धतशीर, विचारपूर्वक कब्जा नेमका कसा केला याचे प्रत्ययकारी दर्शन घडवतो.
या प्रवासी चित्रकारांनी शहरांमधल्या वास्तू, किल्ले, घरे यांची रंगवलेली चित्रे अतिशय तपशीलवार आणि सुरेख आहेतच; पण त्यांनी त्या चित्रांखाली लिहिलेल्या नोंदी जास्त चित्रदर्शी आहेत.
ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार सुरत या शहरातून सुरू झाला असला तरी, भारतातला कंपनीचा पहिला कायमस्वरूपी किल्ला होता मद्रासमधला सेंट जॉर्ज फोर्ट. मद्रास बंदराला भेट दिलेल्या प्रत्येक चित्रप्रवाशाच्या चित्रांमध्ये हा सेंट जॉर्ज फोर्ट दिसतो.
विल्यम होजेसच्या अशा एका चित्राखाली नोंद लिहिलेली आहे - ‘सेंट जॉर्ज फोर्टमधल्या इंग्लिश वसाहतीला निळ्याशार, सुंदर समुद्राचा वेढा आहे, गावातल्या स्थानिकांची घरे चुन्याच्या गिलाव्याची; पण ती दिसत आहेत मुलायम संगमरवरांनी बांधल्यासारखी. गुळगुळीत गिलावा करण्याची त्यांची कारागिरी थक्क करून टाकते. इथल्या सगळ्याच इमारती रुबाबदार दिसतात. उंच खांब, उघडे सज्जे, गच्ची आणि सपाट छते असणारी ही घरे अलेक्झांडरच्या काळातल्या देखण्या ग्रेशियन शहराची आठवण करून देतात.’
मात्र होजेसचे आवडते शहर होते कलकत्ता. त्याची पाच पेंटिंग्ज या शहराची आहेत. ‘आशियातलेच नव्हे, जगातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक’, असे या शहराचे वर्णन तो करतो. हुगळी नदी, ग्रामीण जनजीवन, आसपासच्या बेटांची अनेक स्केचेसही त्याने केली.
१९व्या शतकाच्या सुरुवातीची मुंबई ब्रिटिशांचे प्रमुख व्यापारी केंद्र बनलेली होती. जॉर्ज लॅम्बार्ट आणि सॅम्युअल स्कॉटसारख्या चित्रकारांनी रंगवलेली तेव्हाची ऐटदार मुंबई आपला ग्लॅमरस, श्रीमंती आब राखून आहे. मुंबईची बहुतेक चित्रे ‘फोर्ट’ भागातली आहेत. ब्रिटिश व्यापाराची गुदामे आणि शिपिंगचा कारभार जिथून चाले त्या कुलाबा बंदराची स्केचेस अतीव देखणी दिसतात.
***
भारतात आलेल्या, असंख्य कष्ट सोसून, मेहनत करून त्या काळातला खडतर प्रवास केलेल्या या चित्रप्रवाशांना आपल्या सुंदर निसर्गचित्रांकरता एक्झॉटिक विषय मिळण्याव्यतिरिक्त या हिंदुस्तानच्या भूमीने नेमके काय दिले, हे मात्र यापैकी कोणाच्याच नोंदीवरून फारसे स्पष्ट होत नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली असेल, मानमरातब मिळाला असेल, सामाजिक प्रतिष्ठाही वाढली असेल, व्यावसायिकदृष्ट्या ते स्थिरावले असतील, अनुभवसमृद्ध तर नक्कीच झाले. याबद्दलचा तपशील फार उपलब्ध नाही.
या कंपनी पेंटर्सनी चित्रे भरपूर काढली.. लोकांची, गावांची, ऐतिहासिक, धार्मिक स्थळांची, प्राण्यांची, राजदरबाराची, रस्त्यांची.. पण कदाचित भाषिक अडचणींमुळे असेल किंवा वांशिक, राजकीय श्रेष्ठत्वाच्या भावनेमुळेही असेल, जनमानसाच्या अंतरंगात ते शिरलेले दिसत नाहीत. त्यांच्या चित्रांखालच्या नोंदींमध्ये वास्तूंची, निसर्गदृश्यांची, घटनांची वर्णने सविस्तर आहेत, सामाजिक, राजकीय भाष्ये आहेत; पण त्यात वैयक्तिकता कमी आहे.
या चित्रांमध्ये ‘जिवंत’पणा आहे, मात्र ‘संवाद’ नाही.
चित्रकारांनी आपल्या चित्रप्रवासात रंगवलेल्या निसर्गदृश्यांमधून एखाद्या प्रदेशाचा, भूभागाचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आलेख नोंदवला जाणे, त्याला महत्त्वाच्या दस्तावेजाचे स्वरूप येणे ही किमया ब्रिटिशराजमधल्या या पेंटर्सच्या कलाकृतींद्वारे घडली हे विशेष उल्लेखनीय.
कला-इतिहासात म्हणूनच या पेंटिंग्जना वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व आहे. भारतीय आधुनिक कला-इतिहासाच्या प्रवाहाचे उगमस्थान त्यात आहे.
नवी दिल्ली येथील नॅशनल गॅलरी आॅफमॉडर्न आर्टमध्ये युरोपियन चित्रप्रवाशांच्या या कलादस्तावेजांकरता एक खास दालन उभारले आहे.
अमेरिकन आर्टिस्ट एडविन लॉर्ड विक्स याने १८९५ला लिहिलेल्या ‘ब्लॅक सी थ्रू पर्शिया आणि इंडिया’ या पुस्तकामध्ये रंगवलेला भारत बाहेरच्या, म्हणजे पाश्चिमात्य चित्र-प्रवाशाच्या नजरेतून दिसलेले प्रातिनिधिक ब्रिटिशराज म्हणायला हरकत नाही. एडविन खंदा फिरस्ती. १८८२मध्ये पर्शियाच्या प्रवासावरून परतताना तो भारतात आला. एडविनने आपल्या चित्रांखाली सविस्तर तपशील लिहिले. ताजमहालाचे वर्णन करताना तो लिहितो : ‘यमुनेच्या तीरापलीकडचा ताजमहाल स्वच्छ निळ्याभोर आकाशात हलकासा उन्हाळी ढग तरंगावा तसा दिसतो आहे, त्याचे पाण्यात पडलेले उलटे प्रतिबिंब यमुनेच्या खोल निळाईत किंचित थरथरते आहे.’