समाधी

By Admin | Published: May 10, 2014 04:23 PM2014-05-10T16:23:22+5:302014-05-10T16:23:22+5:30

प्रकृतीच्या पलीकडे जाण्यासाठी त्याविषयी दृढवैराग्य, पराकाष्ठेचे वैराग्य म्हणजे परवैराग्य या अवस्थेतच जाऊनच द्रष्ट्याला जाणावे लागते.

Samadhi | समाधी

समाधी

googlenewsNext

- बी. के. एस. अय्यंगार, कु. गीता अय्यंगार 

 
प्रकृतीच्या पलीकडे जाण्यासाठी त्याविषयी दृढवैराग्य, पराकाष्ठेचे वैराग्य म्हणजे परवैराग्य या अवस्थेतच जाऊनच द्रष्ट्याला जाणावे लागते. द्रष्टा म्हणूनच स्थिर होतो. हाच तो आत्मसाक्षात्कार. या आत्मसाक्षात्काराशिवाय परमात्म साक्षात्कार होत नाही. समाधी म्हणजेच साक्षात्कार.
 
समाधी ही एका बैठकीत सिद्ध होत नाही. आजच्या ‘शॉर्ट आणि क्रॅश कोर्स’च्या जमान्यात तर नाहीच नाही. वेगवान व धावत्या जगात, मानसिक आवेगाचे भान नसताना समाधीचा विचार करणे निर्थक आहे. बाह्य विकास अर्मयाद व अंतरविकास मात्र शून्य. त्यामुळे समाधीची माहिती गोळा करणेही अर्थहीन. तरी देखील त्यात थोडे डोकावून बघू.
समाधीमध्ये जाण्यासाठी चित्ताची अवस्था समापत्तीची असणे आवश्यक होय. ही समापत्ती अवस्था म्हणजे शुद्ध, वृत्तीरहित चित्त. इतर सर्व वृत्ती जाऊन जो समाधीचा विषय आहे, तेवढाच विषय म्हणजे एकवृत्तीय चित्त होय. आसनाभ्यासातूनच ही समापत्ती अवस्था प्राप्त करून घेण्याची आस असावी लागते. अर्थात, चित्तावर अनेक वृत्ती सतत मारा करीत असताना प्रत्येक गोष्ट चित्तावर स्पष्ट उमटते असे नाही. साधक आसनात असताना मन भटकंती करीत असेल, तर भटकंतीची चित्रे त्या चित्तावर स्पष्ट वा अस्पष्ट उमटत जातात. अशावेळी त्या चित्तावर आसनाची प्रतिमा उमटतच नाही. तेव्हा चित्त हे कोर्‍या कागदासारखे असावे लागते. आसनात खोलवर शिरणे म्हणजेच संपूर्ण आसन त्या चित्तावर ठसणे.
हा आसन आणि चित्त यांचा संबंध लक्षात आल्यास समाधीसाठी तयारी कशी असावी लागते हे समजेल. चित्ताची ही समापत्ती-स्थिती आवश्यक असते. आसन करण्यास लवचिकता असावी व मेद कमी असावा ही अपेक्षा सर्वांची असते; परंतु लवचिकता, बारीक व भक्कम शरीर हे शेवटी प्राप्त करून घ्यावे लागते. हे सर्व आपोआप होत नाही. त्याचप्रमाणे चित्ताला समापत्ती प्राप्त करून घ्यावी लागते, ही चित्ताची लवचिकता होय. चित्तावर अनेक वृत्तींचा, क्लेशांचा मेद, षड्रिपूंचा माद आणि विषय-वस्तूंचा उन्माद चढलेला असतो. त्यांचे थर काढून आतला स्तर बघावा लागतो. तेव्हा चित्ताच्या वृत्ती क्षीण झाल्या, की चित्त स्फटिकासारखे पारदर्शक होते. त्या चित्ताला वस्तू दाखविली, की त्या वस्तूची प्रतिमा स्पष्ट उमटते, जसे स्वच्छ आरशात आपले प्रतिबिंब स्पष्ट आणि जसेच्या तसे उमटते. तेव्हा अभिजात स्फटिकरुपी चित्तामध्ये जे जाणून घ्यायचे त्याचीही प्रतिमा स्पष्ट उमटत जाते. तेव्हा समाधीसाठी समापत्तीरुपी चित्त हवे. असे चित्त म्हणजे समाहित चित्त होय. सप्तांगाभ्यासाने असे चित्त प्राप्त करून घ्यावे लागते. असे चित्त हे सात्त्विकच असते.
समाधीचे टप्पे आहेत. साधनेचे जसे बहिरंग, अंतरंग व अंतरात्म असे तीन टप्पे असतात, तसेच समाधीचे टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे संप्रज्ञात आणि दुसरा असंप्रज्ञात होय. या संप्रज्ञात समाधीला सबीज समाधी आणि असंप्रज्ञात समाधीला निर्बीज समाधी असेही म्हटले जाते. झाडासाठी बीज हा जसा आधार आहे, तसाच समाधीलाही आधार लागतो, आलंबन लागते. या आधारभूत समाधीला सबीज म्हणतात. या आलंबनावर ती समाधी अवलंबून असते. कालांतराने ते आलंबन सोडले, की ती समाधी निरालंबीत होते. ती समाधातील निरालंबन स्थिती होय. त्याला निर्बीज समाधी म्हणतात.
सबीज अर्थात संप्रज्ञात समाधीचे चार स्तर असून, त्यांचे प्रत्येकी दोन प्रकार आहेत. चार स्तर म्हणजे वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता होय. वितर्काचे सवितर्क व निर्वितर्क, विचाराचे सविचार व निर्विचार, आनंदाचे सानंद व निरानंद, आणि अस्मितेचे सास्मित आणि निरास्मित हे दोन प्रकार होत. चित्ताच्या स्थित्यंतराची ही समापत्तीद्वारे होणारी प्रक्रिया म्हणजे आरंभापासून अंतिमावस्थेपर्यंत पोहोचण्याची दिशा. सबीज आणि निर्बीज या कालखंडात विरामाचा जो काळ येतो तेथे मार्ग चुकण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आत्मसाक्षात्काराऐवजी प्रकृती-साक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कारासाठी मात्र निर्बीज समाधीच साधावी लागते. आत्म्याने आत्म्याला जाणून आत्म्यातच राहणे अशी ही स्थिती होय. व्याकरणात वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी कर्ता, कर्म आणि क्रियापद लागते, तसेच ध्यानपूर्ततेसाठी ध्यान करणारा कर्ता म्हणजे ध्याता, ध्यान करण्याची क्रिया म्हणजेच ध्यानकृती आणि ध्यान पूर्ण होणे म्हणजे अर्थपूर्णता येणे म्हणजेच ध्येयपूर्ती होणे हेच ध्येय होय. ध्यानासाठी ही त्रिपुटी म्हणजे ध्याता, ध्यान, ध्येय असावे लागते.
ध्यान लावता-लावता एक अशी स्थिती येते, की जेथे ध्याता आणि ध्यान दोन्ही म्हणजेच कर्ता आणि क्रिया लय पावून, केवळ ध्येयच ध्येयपूर्ती या स्थितीत राहते. एखादे काम करीत असताना आपण त्यात इतके गुंतून जातो, की आपण आपल्याला विसरतो. आपले स्वत:चे भान राहत नाही. हा सामान्य अनुभव सर्वांना असतो.  काम हे त्या वेळी आलंबन असते. कामात मन गुंतते, पूर्ण रमते; परंतु कामातून बाहेर आल्यावर आपले अस्तित्व, आपले शरीर, मन, बुद्धी या सर्वांची जाणीव, जशीच्या तशी परतते. आपण जी ‘व्यक्ती’ म्हणून असतो, त्याच स्वरुपात आपण परततो. ती व्यक्ती भूत-भविष्यासह जशीच्या तशी असते; परंतु समाधीत मात्र ती व्यक्ती पूर्ण बदललेली असते. हा बदल म्हणजेच समापत्ती होय. ध्याता हा ध्येयरुपाने पूर्ण व्याप्त राहतो ती समाधी होय. म्हणून तो ‘समाधी-साधक’ त्याचे साधकत्व, साधन सर्व विसरुन जे साध्य सिद्ध झाले त्या स्वरुपातच राहतो. तेथे मी, मी-पणा, माझे, मला हे सर्व नष्ट होते.
आता संप्रज्ञात किंवा सबीज समाधी ही वितर्क, विचार, आनंद आणि अस्मिता या चार स्तरांवर होत असते. या चारही स्तरांवरुन आत जाऊन चित्ताच्या नितळ स्तरावर पोहोचण्याचा मार्ग सापडतो. समाधी-क्रियेचे स्वरुप यातून स्पष्ट होते. समाधातील ध्येयवस्तू ही सूक्ष्म असल्याने तर्क, विचार, समाधान किंवा आनंद आणि अस्मिता म्हणजे स्व-अस्तित्वाची सूक्ष्म रुपात जाणीव अजून असणे हे ते स्तर होत. ही ती समापत्ती क्रिया होय.
आत्मा असतो, की नसतो असा संशय बाळगणारे असताना या संशयात्म्यांनी आपला संशय दूर करणे आवश्यक असते. त्यासाठी शरीररुपी गुहेत शिरावे लागते. त्यासाठी शरीर व त्याच्या प्रत्येक पेशी ज्या स्थूल पंचमहाभूतात्मक आहेत. त्या तर्काच्या धारेवर घासून त्यांचे सूक्ष्म अस्तित्व लक्षात घेऊन ‘हा आत्मा नाही’ असे संशयाचे निराकरण करावे लागते. हा प्रवास सवितर्क ते निर्वितर्क असा असतो, असे साध्या शब्दात सांगता येईल. तर्कात पृथक्करणरुपाने संशय दूर केला जातो. तर्कानंतर विचाराधाराने गुहेत शिरुन सूक्ष्म तन्मात्रांवर समापत्ती साधत सूक्ष्म शरीरापलीकडे जावे लागते. हा प्रवास सविचार ते निर्विचार असा होतो. ती सविचार-निर्विचार समापत्ती होय. येथे शरीरापासून चित्तापर्यंत हे आत्म्याचे स्वरुप नाही हे लक्षात येते.  ही समाधानयुक्त आनंदी अवस्था आत्म्याजवळ गेल्याची समापत्ती होय. या अवस्थेत अस्मिता अजून शिल्लक राहते. ही अस्मिता शुद्ध अहंकाररुपाने असते. ‘मी’ पणा जातो, पण ‘आहे’ ही जाण राहते. कारण या ‘आहे’ला अजून प्रवास करायचा आहे. ही ती अस्मितानुरूप संप्रज्ञात समाधी होय. तिचा प्रवास सास्मिता पासून निरास्मितापर्यंत असतो. या सर्वांचा समावेश सबीज समाधीत होतो.
प्रकृतीच्या प्रत्येक घटकांवर समापत्ती साधत समाधीत जायचे आहे, हा याचा थोडक्यात अर्थ होय. त्यांना पायरीपायरीने जिंकायचे आहे. सबीज समाधीत प्रकृती तर निर्बीज समाधीत आत्म्यावरच समापत्ती साधून या प्रकृतीबंधातून मुक्त व्हायचे आहे. म्हणजेच पंचभूतांचा हा देह, त्या भूतांच्या पंचतन्मात्रा, इंद्रिये अर्थात् कमेंद्रिये व ज्ञानेंद्रिये, त्यानंतर मन, बुद्धी यांना संघटितरित्या धारण करणारे चित्त म्हणजे अंत:करण या सर्वांचा निरोध करुन साध्य होते, ती सबीज म्हणजेच संप्रज्ञात समाधी होय. प्रकृतीला जाणून प्रकृतीच्या सहाय्याने प्रकृती म्हणजे पुरूष नव्हे, हे ओळखून पुरूषाला जाणणे म्हणजे संप्रज्ञात समाधी होय.
सबीजातून एकदम निर्बीजात प्रवेश होत नाही. प्रत्येक टप्प्यानंतर परिवर्तन होण्याचा एक प्रगतीपूर्वक टप्पा असतो, अंतर असते, खंड असतो. एका पाठोपाठ एक असे हे घडत नाही. सबीज आणि निर्बीज या दोहोंतील साधनांतरामध्ये जो खंड पडतो तेव्हा त्यास विरामप्रत्यय असे म्हणतात. हा अवस्थांतराचा काळ होय. या काळात आत्मा किंवा द्रष्टा हे समाधीचे विषयवस्तू होत नाही. प्रकृती मात्र विषयवस्तू होते. अशा स्थितीत साधकाला प्रकृती-साक्षात्कार होतो. निर्बीज समाधीत मात्र प्रकृती संपते आणि आत्मा अर्थात् पुरूष साक्षात्कार होतो. या अवस्थेमध्ये मात्र प्रकृतीचे सहाय्य न घेता केवळ पुरूषच जाणला जातो. याला धर्ममेघ समाधी असेही म्हटले जाते.
हा भाग समजण्यास अवघड वाटला, तरी शेवटी एवढेच म्हणावे लागेल, की प्रकृतीच्या पलीकडे जाण्यासाठी त्याविषयी दृढवैराग्य, पराकाष्ठेचे वैराग्य म्हणजे परवैराग्य या अवस्थेतच जाऊनच द्रष्ट्याला जाणावे लागते. द्रष्टा म्हणूनच स्थिर होतो. हाच तो आत्मसाक्षात्कार. या आत्मसाक्षात्काराशिवाय परमात्म साक्षात्कार होत नाही. समाधी म्हणजेच साक्षात्कार.
 

Web Title: Samadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.