पेरलं तेच पेटलं

By admin | Published: June 14, 2014 08:08 PM2014-06-14T20:08:59+5:302014-06-14T20:08:59+5:30

भारताविषयीचा विखारी द्वेष. त्यातूनच पाकिस्तानात जन्माला आला दहशतवाद. अफगाणिस्तानमध्ये ओसामा बिन लादेनला धरून जे अमेरिका करू पाहत होती तेच पाकिस्तान भारतात करू लागला; पण जे पेराल तेच उगवणार.. इथे तर ते पेटू लागलं आहे. कराचीतील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर तरी पाकिस्तान काही धडा घेईल का?

That same kind of planting was done | पेरलं तेच पेटलं

पेरलं तेच पेटलं

Next

 दत्तात्रय शेकटकर 

 
 
 
आम्ही चुकीच्या झाडाला पाणी दिले, तर तुम्हाला स्वादिष्ट फळे कशी मिळतील? विषारी फळेच वाट्याला येणार. जीवनाचे हे तत्त्वज्ञान व्यक्तिगत आयुष्याप्रमाणेच, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही लागू आहे. आजच्या संदर्भात बोलायचे, तर हे तंतोतंत लागू व्हावे अशी सध्याची परिस्थिती दिसून येत आहे. 
धार्मिक, सामाजिक विद्वेषातून पाकिस्तानने भारताशी कायम शत्रुत्व ठेवले आणि त्यांनी भारताच्या विरोधात दहशतवाद नावाचा भस्मासुर उभा केला. त्याला सातत्याने खतपाणी देऊन मोठे केले. अगदी आजपर्यंत त्याचा वापर केला जात आहे. आज परिस्थिती अशी आहे, की भारताने कितीही प्रयत्न केले, तरीही २0३५ पर्यंत तरी हा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद कमी होणार नाही. पण, आता चित्र वेगळ्य़ाच पद्धतीने बदलू लागले असल्याचे गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून दिसून येत आहे. पाकिस्तानने ज्या वेगाने दहशतवाद पसरवला आणि पोसला त्या पाकिस्तानला त्याच दहशतवादाने एखाद्या कर्करोगाप्रमाणे ग्रासले आहे.  हा कर्करोग पाकिस्तानच्याच मुळावर उठणार असून, पाकिस्तानमध्ये अंतर्गत विरोधाला कारणीभूत ठरणार आहे. पाकिस्तानमधील कराची विमानतळावर दहशतवाद्यांनी सलग दोन दिवस घातलेले थैमान व घडवून आणलेला रक्तपात हे त्याचेच अत्यंत बोलके उदाहरण आहे. 
पाकिस्तानचा दहशतवाद हा भारतविरोधातूनच जन्माला आलेला आहे. त्यामुळे शासन कोणाचेही असो, त्यांचे प्रयत्न भारतात अशांतता निर्माण करण्याचेच असतात. पण, या वेळी मात्र काहीसे वेगळे विपरीत घडले. भारतात नवे केंद्र शासन स्थापन झाले आणि त्यानंतर काही कालावधीतच ८ जून २0१४ रोजी रात्री पाकिस्तानातील कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात अनेक जण मारले गेले, कित्येक जण जखमी झाले. हे दहशतवादी गणवेशात आले. त्यांच्याकडे रॉकेट लाँचर होते. ही शस्त्रे पाकिस्तानातील पोलिसांकडे नसतात. प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यासाठी लष्कर दाखल झाले. त्यामध्ये काही दहशतवादीही मारले गेले. यापूर्वीही कराचीमध्ये नौदलाच्या विमानांवर आक्रमण करून आधुनिक विमाने व उपकरणे उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. मग प्रश्न निर्माण होतो, की कराचीमध्ये सातत्यानेच दहशतवादी हल्ले का होत असतात? 
या वेळी हल्ला करण्यासाठी आलेले दहशतवादी हे पूर्ण मोठय़ा लढाईच्या तयारीने आलेले होते. त्यांच्याकडे खाद्यपदार्थ, पाणी, शस्त्रसामग्री, जखमा लगेच बर्‍या करणारी औषधे असे सारे होते. त्यामुळे कराची हल्ला झाल्यानंतर मुंबईतील २६/११ची आठवण होणे अपरिहार्य आहे; कारण त्यात साम्य आहे. दोन्हीकडे साधारणत: दहा अतिरेकी आलेले होते. मुंबईत आल्यानंतर दहशतवादी विविध ठिकाणी विखुरले. तोच प्रकार कराची विमानतळावर आल्यानंतर दहशतवाद्यांनी केला. प्रत्येकाचे लक्ष्य निश्‍चित होते व वेगवेगळे होते. माझ्या अभ्यास आणि विश्लेषणानुसार हे दहशतवादी सिंध प्रांतातील असण्याची शक्यता फारच कमी आहे. पाकिस्तान लष्कराच्या विरोधात असणार्‍या तहरीक - ए- तालिबान पाकिस्तान या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानमधीलच एका राजकीय पक्षाचाही छुपा पाठिंबा आहे. पाकिस्तानमध्ये सध्या टी. टी. पी., पाकिस्तान तालिबान, पंजाबी तालिबान, अल कायदा, हक्कानी संघटन आदी दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. पाकिस्तानच्या राजकीय व सामाजिक प्रोत्साहन व पाठबळावरच या संघटना उभ्या राहिल्या असणार, हे उघड आहे. 
अमेरिकेचा सर्वांत मोठा शत्रू असलेला ओसामा बिन लादेन याला अमेरिका आणि पाकिस्ताननेच तर मोठा केला. तोच क्रूरकर्मा अमेरिकेवर उलटला आणि त्याने ९/११ घडवून हाहाकार उडवून दिला. विविध दहशतवादी संघटनांना पाकिस्तानच्या आयएसआयची मदत असते, हे उघड गुपीत आहे. काश्मीरमध्ये सक्रिय असणार्‍या व भारतविरोधात हिंसक कारवाया करणार्‍या दहशतवादी संघटनांनाही पाकिस्तानच्या शासकीय यंत्रणेचाच पाठिंबा आहे. 
मुख्य मुद्दा असा आहे, की कराची विमानतळावर दहशतवादी हल्ला करण्यासाठी हीच वेळ का निवडली असावी?  इतर विमानतळांवर जिथे सुरक्षाव्यवस्था तुलनेने शिथिल आहे तिथे दहशतवादी हल्ला का केला नाही? पाकिस्तानची वायू व समुद्र मार्गांनी होणारी सर्व वाहतूक कराचीमार्गानेच होते. सिंध प्रांत व कराची पाकिस्तानमध्ये सक्रिय मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट (एम. क्यू. एम.) ही संघटना अत्यंत प्रभावशाली आहे. दहशतवादी संघटनांना ज्या पाकिस्तानने आश्रय दिला त्याच आता त्यांच्यावर उलटत आहेत किंवा अमेरिका विरोधातून नव्या जन्म घेत आहेत. त्यांना जणू हाच संदेश प्रत्येक हल्ल्यातून द्यायचा आहे, की आम्ही कुठूनही कधीही सुनियोजित पद्धतीने तुमच्यावर आक्रमण करण्यासाठी सक्षम आहोत, तुम्ही आम्हाला निष्क्रिय समजण्याची गफलत करू नका. 
कराचीत हल्ला होताक्षणी भारतासह अवघ्या जगात त्याची दखल घेतली गेली. दहशतवाद्यांनी या हल्ल्यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. या वर्षी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सर्व सैन्य परत जाणार आहे. त्यासाठी काबूल, कंदाहार, कराची ही विमानतळे महत्त्वाची आहेत. सर्व शस्त्रास्त्रे व साधनसामग्री परत नेण्यासाठी कराची हे एकमेव सोयीचे बंदर आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच हा हल्ला करण्यात आला आहे. विमानतळावरील सर्व वाहतूक, दूरसंचार व सुरक्षाव्यवस्था यांचा नेमकेपणाने अभ्यास करूनच हा हल्ला झाला आहे. त्यात रेल्वेचेही काही लोक सहभागी असण्याची दाट शक्यता आहे. इंधनाने भरलेले एखादे विमान किंवा धावपट्टीवर आलेले एखादे विमान उडवले असते, तर किती जीवितहानी झाली असती, याची कल्पनाही करता येणार नाही. उद्या अशीच परिस्थिती भारतातल्या कोणत्यातरी मोठय़ा विमानतळावर उद्भवूच शकणार नाही, याची खात्री आपण देऊ शकतो का?
दहशतवादी कारवायांद्वारे त्यांनी पाकिस्तानच्या राजकारण्यांना, शासनकर्त्यांना आणि जनतेला एक स्पष्ट संदेश दिला आहे. तो म्हणजे, भारताकडे मैत्रीचा हात पुढे करण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करू पाहत असले, तरीही दहशतवादी संघटनांचेच वर्चस्व आता कायम राहणार आहे. जर वेळीच पाकिस्तानने या दहशतवादी संघटनांवर अंकुश घातला नाही, तर येत्या १५ वर्षांत पाकिस्तानमध्ये आणखी एक फाळणी होऊन सिंध आणि बलुचिस्तान हे प्रांत स्वतंत्र होतील. 
पाकिस्तानने या सर्व प्रकरणांपासून किमान एक धडा घेणे आवश्यक आहे. ज्या ज्या राष्ट्रांनी दहशतवादाचा भस्मासुर मोठा केला, त्या सर्वांचा शेवट फार वाईट झाला आहे. तसेच, ज्या राष्ट्रांनी (अगदी अमेरिकेसह) दहशतवादी संघटनांना प्रोत्साहन दिले आहे त्यांना फार मोठी किंमत मोजावी लागली आहे व ती भविष्यातही मोजावी लागणार आहे. 
पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादाचा हा भस्मासुर नष्ट केला नाही, तर तो या राष्ट्रालाच भस्म केल्याखेरीज राहणार नाही. न जाणो या दहशतवाद्यांच्या हाती उद्या पाकिस्तानची आण्विक शक्ती सापडली, तर मग त्यांच्या भवितव्याचा खुदा ही मालिक है असे म्हणावे लागेल.
(लेखक नवृत्त लेफ्टनंट जनरल असून, दहशतवाद विषयाचे गाढे अभ्यासक आहेत.)

 

Web Title: That same kind of planting was done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.