सास्कीया हास-राव - अभिजात भारतीय संगीतासाठी जीव वेचणार्या परदेशी साधकांच्या दुनियेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 06:04 AM2020-03-22T06:04:00+5:302020-03-22T06:05:15+5:30
भारतीय संगीत दूरच, भारत नावाचा देश या पृथ्वीवर आहे हेसुद्धा मला तेव्हा ठाऊक नव्हते. माझ्याच नकळत संगीतशिक्षणाची पद्धत मात्र मी थेट भारतीय वळणाची निवडत होते. अचानक एकदा भारतीय संगीताची झलक कानावर पडली आणि ते लोभस रूप बघताना, ऐकताना वाटू लागले, या रूपाशी माझ्या स्वरांचे खूप जिव्हाळ्याचे नाते आहे. त्याचाच शोध घेत मी भारताकडे निघाले.
- सास्कीया हास-राव
किती सुंदर असतो भारतातील पाऊस. झाडांची पाने पुन्हा तजेलदार आणि माणसांची मने तरतरीत करणारा.! संथ लयीत सुरू होतो आणि मैफलीतील तबल्याची लय हळूहळू वाढत जावी तसा हळूहळू वेग पकडत जातो..! दिल्लीमधील माझ्या घराच्या खिडकीतून जेव्हा-जेव्हा हा पाऊस बघते तेव्हा नेहमी मला या देशामध्ये मी प्रथम पाय ठेवला तो दिवस आठवतो. संपूर्ण अनोळखी, परक्या देशात ठेवलेले पहिले पाऊल.! तेव्हा, आपल्या देशाच्या सीमेबाहेर खूप मोठे जग आहे आणि या जगातील माणसांची आपापली संस्कृती आहे हे ठाऊक नसलेल्या करोडो लोकांपैकी मी एक होते. ते सगळे अनोळखीपण घेऊन हॉलंडमधून भारताच्या मातीत उतरत होते. हॉलंडमधील एका छोट्या गावात, एखाद्या चित्रात दिसावे, अशा नदीकिनारी असलेल्या घरात वाढले मी. माझा भला मोठा चेलो घेऊन मी रियाझासाठी रोज नदीच्या निवांत काठावर जाऊन बसायची. नदीच्या पलीकडे असलेल्या हिरव्या कुरणात चरणार्या गायींच्या गळ्यातील घंट्यांची किणकिण मला रियाझाला साथ करायची. आयुष्य म्हणजे काय तर, निरभ्र आकाशात दूरपर्यंत दिसणार्या भिरभिरणार्या पवनचक्क्या बघत चेलो वाजवणे असे वाटण्याचे ते भाबडे दिवस होते. चित्राच्या या फ्रेममधून बाहेर पडून भारतात येताना मी एका मोठय़ा कोलाहलात उतरत होते. चारही दिशांनी अंगावर येणारी वाहतूक आणि माणसे. वातावरणातील चिकट उष्मा त्याबरोबरच एक खास, अनेक मिर्श वासांचा मिळून बनलेला उग्र दर्प; पण हे माझ्यासाठी फक्त जाणिवेच्या पातळीवर होते, त्याला हवे-नकोसेपणाचे कोणतेच लेबल नव्हते. कारण, त्रास वाटावा अशा या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे असलेली एक सुरेल धून मनाच्या कोपर्यात सतत वाजत होती. काही महिन्यांपूर्वी कॉलेजमधील वर्गात ऐकलेले डागर बंधूंचे गायन. स्थिर आणि ठाम स्वर पण ताना घेताना लवचीकतेने वळणारा. रागाची चौकट पक्की पण त्यातून स्फुरणार्या ताना आणि स्वरांचा विस्तार मात्र कित्येक वाटा, वळणे घेत स्वरांचे जाळे विणणारा.! भारतीय संगीताचे हे लोभस परस्परविरोधी रूप बघताना, ऐकताना वाटू लागले, या रूपाशी माझ्या स्वरांचे खूप जिव्हाळ्याचे असे नाते आहे. त्याचाच शोध घेत मी भारताकडे निघाले. इथे येण्यामागे कोणती प्रेरणा होती या प्रश्नाचे माझ्या दृष्टीने एकच उत्तर होते, मला इथे यावे लागणार आहे हे मी मनोमन जाणून होते. आपल्या घरी येत असल्याची प्रबळ भावना विमानातून बाहेर पडताना मनात होती तेव्हा प्रश्न पडला, हे नाते कोणते कोणत्या जन्माचे असावे?
ते नाते नसते तर पाश्चिमात्य संगीत मी एखाद्या भारतीय शिष्याप्रमाणे शिकले नसते! आईच्या बोटातून उमटणारे पियानोचे आणि बहिणीच्या बासरीचे स्वर ऐकत मी वाढले. हातात चेलोसारखे आव्हानात्मक वाद्य घेतले ते टिबोर डी मशुलासारखा अतिशय प्रतिभावंत गुरु मिळाला म्हणून. वाद्याची ओळख झाली की कागद समोर ठेवून एकेक रचना वाजवायला शिकायचे ही कोणतेही पाश्चिमात्य वाद्य शिकण्याची पारंपरिक पद्धत. ती नाकारून, गुरु वाजवतील त्याचे अनुकरण करीत शिकण्याची थेट भारतीय पद्धत मला का आवडली असेल? भारतीय संगीत दूर राहो, भारत नावाचा देश या पृथ्वीवर आहे हेसुद्धा मला तेव्हा ठाऊक नव्हते आणि माझ्याच नकळत संगीतशिक्षणाची पद्धत मात्र मी थेट भारतीय वळणाची निवडत होते. गुरु चे वादन लक्षपूर्वक ऐकत, स्वत:ची शैली आणि प्रतिभा विकसित होईपर्यंत गुरुमागून जात राहायचे! रॉटरडॅम कॉन्झव्र्हेटरीमध्ये भारतीय संगीतविषयक अभ्यासक्र माचे प्रमुख असलेले पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची भेट झाली. आणि भारतीय संगीत नावाच्या अर्मयाद जगाचे दरवाजे किंचित किलकिले झाले. आणि मग कानावर पडले ते डागर बंधूंचे गायन. स्वरांना अलौकिकाचा स्पर्श असतो तो कसा त्याचे जणू ते प्रात्यक्षिकच देत होते. त्या क्षणी मला जाणवले, मला भारतात जायला हवे..! रॉटरडॅममध्ये मला हरीजी यांनी गुरु म्हणून दिलेली एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्वर हाताळण्यासाठी लागणारी संवेदनशीलता. वाद्यावर सफाईने हात फिरण्यासाठी एखाद्या जिमनॅस्टसारखी अखंड कठोर मेहनत लागते; पण वाद्यातून उमटणार्या स्वरांमध्ये प्राण फुंकण्यासाठी त्यांना अतिशय तरलतेने हाताळावे लागते. स्वर जेव्हा उत्फूर्तपणे सुचतात तेव्हा ते आपल्याबरोबर मांडण्याचा वेग आणि आदब घेऊन येत असतात. आपण फक्त त्या प्रक्रि येत पूर्ण सहभागी होण्यासाठी दर क्षणाला त्या स्वरांबरोबर असणे गरजेचे..! वर्गातील आमची गुरु -शिष्याची जोडी मोठी गमतीदार दिसायची, हातात बासरी घेऊन जमिनीवर बसून गुरु शिकवत असताना त्यांची शिष्या मात्र तिच्या वाद्याच्या भल्याथोरल्या उंचीमुळे खुर्चीवर बसून शिक्षण घ्यायची.! गुरुबरोबर जमिनीवर बसण्यासाठी मला माझ्या वाद्याचे आकारमान कमी करावे लागणार होतेच, पण त्यापेक्षा महत्त्वाचे होते ते या नव्या, भारतीय चेलोवादनाची स्वत:ची शैली निर्माण करणे. हरीजी पुन्हा पुन्हा सांगत होते, तुझे वाद्य रसिकांनी ऐकावे, त्यांना त्यातील वेगळेपण जाणवावे असे वाटत असेल तर या वाद्याची स्वत:ची वादनशैली निर्माण करायला हवी. हे वाद्य घेऊन भारतीय रसिकांपुढे जाणारी तू पहिली कलाकार असणार आहेस आणि तुझ्या वाद्यावर तू त्यांना त्यांचे संगीत ऐकवणार आहेस..! तेव्हा सरसरून जाणवले, या देशाशी अनेक बाबतीत जमवून घेण्याच्या आव्हानापेक्षा हे आव्हान अधिक खडतर आहे. मी शोध सुरू केला तो मला भारतीय संगीताशी नाते निर्माण करून देणारे वाद्य घडवू शकेल अशा कलाकाराचा. त्याला केवळ वाद्य बनवण्याचे शास्र आणि तंत्र अवगत असून चालणार नव्हते, संगीताची समज असणे गरजेचे होते. असा अविलया मला भेटला आणि भेटले हरीजींसारखे आणखी काही गुरु ..
इतिहासात निघून गेलेल्या काळाच्या पावलांवर साचलेली धूळ अलगद पुसून, विस्मरणात गेलेल्या वाद्यांना नवा श्वास देणार्या एडवर्ड व्हान टोंगेरेन या कलाकाराने मला हवा तसा सुबक, आटोपशीर असा सुरेल चेलो तयार केला तो क्षण माझी सगळी तगमग संपवणारा होता. मला ज्या प्रकारचे वादन करायचे होते त्यासाठी त्यांनी त्यात नव्या आणि वेगळ्या पट्टीतील काही तारा लावल्या होत्या. भारतीय संगीतात असते ती एखाद्या स्वराची दीर्घकाळ आस देणारी मिंड वाजवण्याची सोय या चेलोमध्ये होती. आता गुरुंच्या समोर जमिनीवर बसून मी भारतीय संगीत वाजवू शकत होते. माझी शैली निर्माण करण्यासाठी मला भारतीय संगीतातील घराणी आणि त्यांची वैशिष्ट्य व दृष्टिकोन जाणून घ्यायला हवा होताच. शिवाय कोणत्या एकाचे अनुकरण न करता भारतातील पहिल्या चेलोवादक कलाकाराची सही असलेली ओळख निर्माण करायची होती. त्यासाठी मला मार्गदर्शन केले ते व्हायोलिनवादक पंडित डी. के. दातार, सतारवादक पंडित शुभेंद्र राव, गायिका सुमती मुटाटकर यांनी. माणसाच्या ध्वनीशी खूप जवळचे साम्य असलेल्या माझ्या वाद्याला या सगळ्या गुरु ंनी स्वत:ची शैली मिळवून देण्यासाठी मदत केली. स्वत:ची भाषा सापडणे आणि त्या भाषेत डौलदारपणे काही मांडता येणे हे दोन वेगळे टप्पे असतात. या टप्प्यांच्या दरम्यान नैराश्य उभे असते. घुसमट तुमचा श्वास रोखत असते. हे सगळे फार अवघड आहे असे वाटायला लागले की मी स्वत:ला सांगायची, नेमके काय आणि कुठे अवघड जातेय ते शोधून बघूया. सततचा रियाझ, कित्येक शंकांची गुरुंकडून पुन्हा-पुन्हा मागितलेली उत्तरे यातून कधीतरी वाट दिसू लागायची. पाब्लो कॅसल नावाचा अद्भुत चेलोवादक नेहमी म्हणायचा, ुी23 238’ी ्र2 3ँी ल्ली 6ँ्रूँ ्र2 ल्ल3 ँीं1 िुीा1ी. आजवर कोणी चोखाळलेली वाट शोधण्याचा हा ध्यास मला अनेकदा थकवून टाकायचा. अखेर, सतारीसारख्या एखाद्या वाद्याने छेडलेल्या स्वरांमध्ये आपला स्वर मिळवत एकमेकांशी संवाद करीत, अधून-मधून जुगलबंदी छेडीत एखादी रागाचा अवकाश निर्माण करण्याची मौज या माझ्या शैलीमुळे मला मिळायला लागली आणि मला वाटले आता मी नक्की पुरती भारतीय झाले. जुगलबंदीच्या या मैफलीने मग मला माझा जोडीदार दिला आणि माझ्या कामाला नवी दिशा..! या देशाशी अशा वेगळ्याच नात्याने बांधले जाण्याचा हा अनुभव विलक्षण रोमांचकारी, शब्दात मांडता न येणारा; पण त्याबद्दल पुढील लेखात..
सास्कीया हास-राव
सास्कीया हास-राव या नेदरलँड्समध्ये ‘चेलो’ हे वाद्य शिकत असताना भारतीय संगीताबद्दलच्या कमालीच्या ओढीने भारतात वाद्यवादन शिकण्यासाठी आल्या. नव्वदीच्या दशकात जे अनेक परदेशी कलाकार भारतात संगीत शिकण्यासाठी आले, त्यापैकी त्या एक. जागतिक कीर्तीचे बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्याखेरीज सतारवादक शुभेंद्र राव, व्हायोलीनवादक पंडित डी. के. दातार, गायिका मालती मुटाटकर अशा विविध गुरूंकडे त्यांनी शिक्षण घेतले. ‘चेलो’मध्ये भारतीय गरजेनुसार बदल करीत त्याला स्वतंत्न मैफलीचे वाद्य बनवण्याचे र्शेय त्यांच्याकडे जाते. देशासह जगभरातील सर्व प्रसिद्ध संगीत महोत्सवात त्या आणि त्यांचे पती शुभेंद्र राव यांची जुगलबंदी झालेली आहे. त्या प्रवासाचा हा पुर्वार्ध.
मुलाखत, शब्दांकन : वंदना अत्रे
vratre@gmail.com
(ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होईल.)