धर्म सहिष्णुतेचा संदेश देणारा सासवडचा संतशिल्पपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 06:18 PM2018-12-24T18:18:50+5:302018-12-24T18:20:16+5:30
प्रासंगिक : थोर अष्टपैलू साहित्यकार, वक्ते, संपादक आचार्य प्र. के. अत्रे यांचे जन्मगाव म्हणून पुणे जिल्ह्यातील सासवड हे गाव प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वरांचे धाकटे बंधू सोपानदेवांची समाधीही येथेच आहे. याच ठिकाणचा अनमोल ठेवा असलेल्या प्राचीन संतशिल्पपटाविषयी...
- प्रा. डॉ. किरण देशमुख
१) आपल्या महाराष्ट्राने विविध धर्मपंथीयांना प्राचीन काळापासूनच उदारपणे राजाश्रय व लोकाश्रय दिल्याचे येथील संत साहित्यिकांच्या वाणी आणि वाङ्मयातून जसे ज्ञात होते त्याचप्रमाणे येथे उपलब्ध होणाऱ्या अनेक प्रकारच्या पुरातत्वीय साधनांद्वारेही स्पष्ट होते. त्यातच सासवड (जि. पुणे) येथील अनोख्या संत-शिल्पपटाचाही समावेश करावा लागतो.
२) अनेक मराठा सरदारांच्या सहवासाने इतिहासाचा साक्षीदार बनलेल्या पुरंदर गडाच्या कुशीत शांतपणे खळाळणाऱ्या कºहेच्या काठावरच थोर साहित्यिक आचार्य प्र.के. अत्रेंचे सासवड हे गाव ज्ञानदेवांचे ज्येष्ठ बंधू सोपानदेवांच्या समाधी स्थानामुळे वारकरी संप्रदायाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र झाले आहे.
३ ) तेथीलच कै. वामनराव लक्ष्मणराव चव्हाण यांच्या घराच्या बांधकामात काही वर्षांपूर्वी ७६ सें.मी. लांब व ५१ सें.मी. उंच (रुंद) एवढ्या आकारमानाचा ग्रॅनाईट दगडाचा एक सुरेख शिल्पपट उपलब्ध झाला असून, सध्या तो तेथील सोपानदेवाच्या मठात एका नव्याने बांधलेल्या ओट्यावर उभा बसविण्यात आला आहे.
४) प्रस्तुत शिल्पपटाच्या पूर्वाभिमुखी अंगावर एका वृक्षाखाली संत ज्ञानेश्वरांनी गर्विष्ठ चांगदेवाच्या केलेल्या गर्वाहरणाचा प्रसंग विचारपूर्वक कोरला असून, त्यात प्रेक्षकांच्या उजवीकडून डावीकडे या दिशांनुसार निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानदेव व मुक्ताई ही भावंडे एका भिंतीवर आशीर्वादमुद्रेत बसलेली असून, मुक्ताबाई मात्र हाती माळ घेऊन विठ्ठलनामाचा जप करीत आहे. अहंकाराचे हरण झालेले चांगदेव त्याच भिंतीखाली नमस्कारमुद्रेत बसलेले असून, त्यांच्या समोरच त्यांचा ऊर्ध्वमुखी वाघही दिसतो.
५) त्याच शिल्पपटाच्या डाव्या भागावर उत्तर दिशानुवर्ती असलेले श्री दत्तात्रेय त्रिमुखी व षड्भुज असून, ते गायीला टेकून उभे असून, त्यांची दोन कुत्री दोन्हीकडे नम्रपणे बसली आहेत.
६) या पटाच्या मागील (पश्चिमाभिमुखी) बाजूवर विष्णूची शेषशायी अनंताच्या रूपातील प्रतिमा कोरलेली असून, तीमध्ये चतुर्भुज विष्णूचे दोन्ही पाय स्वत:च्या दोन हातांनी दाबत असल्याचे दर्शविले आहे. हे वेगळेपण होय. विष्णू देवाच्या नाभीतून निघालेल्या पद्मासनावर षड्भुज व त्रिमुखी ब्रह्मदेव स्थानापन्न दिसतात.
७) त्याच बाजूकडे पटाच्या वरील भागावर विठ्ठल-रुख्मिणी आणि राधाकृष्ण वगैरे देवता स्थानक असून, त्याच्या खालील भागावर नमस्कारमुद्रेतील पाच प्रतिमा अनोळखी आहेत.
८) शिल्पपटाच्या तिकडीलच अगदी वरील भागावर एक लहान शिवलिंग असून, त्याच्यावर जल वा दुग्धाभिषेक केल्यावर त्याचे पाणी वा दूध त्या पटावर विरुद्ध दिशेला असलेल्या ज्ञानेश्वरादी सर्व भावंडांना चरण स्पर्श करून, खालील चांगदेवाच्या अंगावर पडण्याची अनाकलनीय व्यवस्था त्याच पाषाणात अंतर्गत केल्याचे समजते. त्यावरून त्या वैशिष्ट्यपूर्ण शिल्पपटाचा कोरकू किती कल्पक होता, त्याची आपल्याला कल्पना येते.
९) अत्यंत विचारपूर्वक अखंड पाषाणात घडविलेल्या या एकमेवाद्वितीयम् ठरणाऱ्या शिल्पपटात एका बाजूवर शैवपंथाचे शिवलिंग आणि शिवोपासक नाथपंथीय ज्ञानेश्वरादी संत मंडळी बसली असून आणि त्याच पटाच्या दुसऱ्या भागावर वैष्णव पंथाचे विष्णू (शेषशायी अनंत), तसेच उत्तर भागावर दत्तसंप्रदायाचे आद्यप्रवर्तक त्रिमुखी दत्त या सर्वांना एकत्रित कोरून अज्ञात सिद्धहस्त शिल्पीने आपल्याला परधर्मसहिष्णुतेचा फार मोठा संदेश दिला आहे, हे विशेष.
१0) इ.स.च्या सुमारे १८ व्या शतकातील या दुर्मिळ शिल्पपटाला संस्थानच्या विश्वस्थांनी चोहोबाजूंनी पारदर्शक काचेचे आवरण घातल्यासच तेथे जाणाऱ्या भाविकांच्या हळद, कुंकू, बेल-फूल, तेलादी पूजासाहित्यामुळे त्या पटाचे मूळ स्वरूप नष्ट होणार नाही, असे वाटते.
११) अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या प्रस्तुत शिल्पपटाच्या संशोधनासाठी मला सासवडचे नि:स्वार्थी संशोधक शिवाजीराव एक्के गुरुजी आणि ठाणे येथील देना बँकेचे क्षेत्रीय अधिकारी गणेश पवार व साताराचे रोहन उपळेकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
१२) सासवडला सोपानदेवांच्या समाधीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक भाविक व पर्यटकाने हा अबोल; पण अनमोल असणारा संत-शिल्पपट आवर्जून पाहावाच, इतका तो सर्वांगसुंदर आहे.