साता समुद्रापार

By admin | Published: June 14, 2014 07:53 PM2014-06-14T19:53:47+5:302014-06-14T19:53:47+5:30

अमोल आढाव- अवघ्या ३३ वर्षे वयाचा पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड भागात राहणारा हा तरुण.. या भारतीय युवकाने सात समुद्रांतील लांब पल्ल्याच्या जलतरण सफरीचे लक्ष्य नुकतेच साधले आहे. या सातासमुद्रापार यशाची सफर...

Sata Beach | साता समुद्रापार

साता समुद्रापार

Next

- शेखर जोशी

 
आईच्या पोटात असतानाच काही मुलं जगावेगळं स्वप्नं घेऊन जन्म घेतात..किंवा नियती त्यांचं भविष्य आधीच अधोरेखित करून ठेवत असावी. अशाच एका स्वप्नाळू पण जिद्दी युवकाची दोनेक वर्षांपूर्वी माझी भेट झाली होती. अमोल आढाव हे त्याचे नाव. त्या वेळेपर्यंत त्याने चार समुद्र पोहून पार केले होते. त्याच्या भावूक डोळ्यांत तेव्हाही ते स्वप्न स्पष्टपणे दिसत होतं..नजरेत आत्मविश्‍वास होता.. २0१४ सालापर्यंत सात समुद्र पोहून ओलांडण्याचा विक्रम करण्याची खूणगाठ त्याच्या मनात पक्की बांधलेली.. उत्तुंग ध्येयाच्या दिशेने मजल-दरमजल करीत १९ मे २0१४ या दिवशी त्या स्वप्नाची पूर्तता झाली..एका संकल्पाचे सार्थक झाले! मोठे यश मिळूनही पाय जमीनीवर ठेवणे म्हणजे काय असतं, हे पाह्यचं असेल तर एकदा अमोलशी प्रत्यक्ष बोलायलाच हवं !
अमोलचा आजवरचा प्रवास त्याच्याकडून ऐकला की एक मात्न नक्की जाणवतं, ‘तुमचं आयुष्य तुम्हाला भव्यदिव्य करण्यासाठी साह्य करायला नेहमीच तत्पर असतं..प्रश्न असतो तुमच्या दृष्टिकोनाचा, मनाच्या उभारीचा आणि आत्मविश्‍वासाचा.’ अमोलचे वडील लष्करात असल्यामुळे पुण्याजवळच्या खडकी येथील लष्कराच्या शाळेत प्रवेश घेण्यास काहीच अडचण आली नाही. त्या शाळेतील शारीरिक तपासणीच्या अहवालानुसार ‘जलतरण’ हा खेळ त्याच्यासाठी ठरवण्यात आला. जलतरणातील प्राथमिक धडे त्याने तेथेच गिरविण्यास सुरवात केली. आर्मी होस्टेलमधील वास्तव्य आणि तेथील बॉइज स्पोर्ट्स कंपनीच्या माध्यमातून त्याने राज्य स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरवात केली. लष्करातील ज्येष्ठ आणि पट्टीच्या जलतरणपटूंमुळेच आपल्यामध्ये स्पर्धात्मक मनोभूमिका विकसित झाली, हे श्रेय तेथील मार्गदर्शकांना तो आजही मनापासून देतो. लांब पल्ल्याच्या सागरी जलतरणाची सुरवात व्हायला अजून बराच काळ जावा लागणार होता. कारण १९९८मध्ये टाटा मोटर्स (तेव्हाच्या टेल्को) या कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश घेतल्यावर मैदानी स्पर्धांमध्ये (अँथलेटिक्स) अमोल अधिक रमू लागला. एकीकडे पोहण्याचा सराव सुरु होताच.. पण धावणे या क्रीडाप्रकाराला अधिक प्राधान्य मिळत गेले. कंपनीतील आंतर विभागीय स्पर्धा, आंतर औद्योगिक स्पर्धा आणि टाटासमूहांतर्गत अँथलेटिक्समधील धावण्याच्या प्रकारात त्याने अनेक सुवर्ण पदकं मिळवली. जिद्द वाढत गेली आणि अशाच उर्मीतून त्याच्या शारीरिक जोमाचा कस २00५ मध्ये लागला. २४ तासात जास्तीत जास्त वेळा सिंहगड चढून जाण्याचा ध्यास त्याने घेतला! अमोलने २२ तास ४७ मिनिटात एकूण १६ वेळा न थांबता सिंहगडावर स्वारी केली आणि ‘लिम्का बुक ऑफ इंडिया रेकॉर्डस’ मध्ये मानाचे पान मिळवले.
असे म्हणतात की, ‘ प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्नी असते’..पण अमोलच्या यशामध्ये तीन स्त्नियांचा वाटा आहे. पहिली स्त्नी म्हणजे जन्मदात्नी आई, दुसरी रूपाली रेपाळे. जगातील सर्वात लहान (१४ व्या वर्षी) वयात जिने इंग्लिश खाडी पोहण्याचा विश्‍वविक्रम पहिल्यांदा केला आणि जिच्या प्रोत्साहनाने आणि प्रेरणादायी कर्तृत्वाने अमोलला लांब पल्ल्याच्या सागरीजलतरणाची दिशा लाभली ती आणि तिसरी महत्वाची व्यक्ती म्हणजे वैवाहिक जीवनाच्या सहप्रवासात जीवनसाथी होणारी गृहकर्तव्यदक्ष पत्नी वैशाली अमोल आढाव. अर्थात हे असले तरी आपल्या वडलांचा मोठा वाटा देखील यात आहे, हे अमोल जाणीवपूर्वक नमूद करतो.
अमोलच्या सिंहगडावरील चढाईचा विक्रम ऐकल्यावर-‘इतकी शारीरिक तंदुरुस्ती असेल, तर इंग्लिश चॅनेल तू आरामात मारशील..’ रूपालीचे हे वाक्य अमोलसाठी प्रेरणा देऊन गेले..आणि एका विशाल स्वप्नाची रूजवात इथे झाली ! पुण्यासारख्या ठिकाणी ना समुद्र .. ना किनारा..ना चांगला आंतरराष्ट्रीय दर्जाचा पोहण्याचा तलाव. हे वास्तव ही परिस्थिती. वास्तविक युरोपातील सागरी जलतरणपटू दर रविवारी दोन वेळा समुद्रात सराव करतात आणि इतर दिवशी पोहण्याच्या तलावात..त्यांचे ठीक आहे, पण इथे सगळं गणितच वेगळं! मग त्या वेळी असणारा एक जलतरण तलाव - टिळक टँक. तिथे जलतरण गुरु जितेंद्र खासनीस यांच्या मार्गदर्शनाखाली रोज ४ तासांचा सराव सुरु झाला. कंपनीत पहिली शिफ्ट करून पोहायला जायचे..असे चक्र सुरु झाले. अमोलची गती, प्रगती, शारीरिक आणि मानसिक क्षमता हेरून खासनीस सरांनी अमोलला रत्नागिरी, मुंबई आणि मालवण इथे होणार्‍या ५ कि.मी. अंतराच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लावले. या तीनही शर्यतीमध्ये त्याने पहिला क्रमांक मिळवला आणि त्याच्या आत्मविश्‍वासात भर पडू लागली. इंग्लिश खाडी पोहायचे पहिले स्वप्न होते. पण त्यासाठी एक अट होती. ती म्हणजे किमान ३५ ते ४0 कि.मी. इतके अंतर न थांबता पोहण्याची किंवा सलग ६ तास पोहता आले पाहिजे. असा एक तरी अनुभव पाठीशी असावाच लागतो..दुर्दैवाने त्याच सुमारास मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया या शर्यतीवर बंदी आलेली..मार्ग तर काढायला हवाच होता. मग बंगालच्या खाडीचा संकल्प आखला गेला. तब्बल ८१ कि.मी. पोहायचे म्हणजे एक आव्हान होते. सर्व क्षमतांचा कस लागणे म्हणजे काय असते, हे जाणण्याची सुरवात इथून झाली. मनस्वी माणूस आणि सर्वसाधारण व्यक्तींमधला फरक इथे दिसतो. ५ सप्टेंबर २0१0 रोजी ८१ कि.मी. लांबीची बंगालची खाडी ११ तास ४४ मिनिटात पोहून गेल्यावर अमोलचे मन:सार्मथ्य वाढले. इंग्लिश खाडीच्या मोहिमेआधी फेब्रुवारी २0११ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील रॉबेन आयलंड्स हा १८ कि.मी.जलप्रवास त्याने अवघ्या ६ तास ६ मिनिटात पोहून पार केला. हे अंतर इतक्या जलद पोहून जाणारा अमोल हा पहिला आशियाई नागरिक ठरला आणि जगात दुसर्‍या क्रमांकाची वेळ या जलसफरीत त्याने नोंदवली. त्यानंतर अमोलने जुलै २0११ मध्ये ४८ कि.मी. लांबीची इंग्लिश खाडी केवळ १0 तास ५६ मिनिटात पार केली. पोहताना लागणारा वेळ हा अनेक बाबींमधील एक घटक असतो. सागरावरील हवामान, वार्‍याचा वेग आणि दिशा, पाण्याचे तापमान तसेच लाटांची दिशा असे इतर महत्वाचे घटक पोहणार्‍याची परीक्षा घेतात. वेळप्रसंगी दमछाक देखील करतात. असाच अनुभव अमोलला अनेकदा आला आहे. इंग्लिश खाडीतील १५ डिग्री सेंटीग्रेड इतक्या गार पाण्यात ११ तास नुसते हात आणि पाय मारत राहायचे, हे येरा गबाळ्याचे काम नव्हेच..
या साहसानंतर एप्रिल २0१२ मध्ये ऑस्ट्रेलिया मधील रॉटनेस्ट खाडी जलद गतीने पोहून जाणारा अमोल हा पुन्हा एकदा पहिला आशियाई नागरिक ठरला. आता नवनवीन विक्रम करणे ही गोष्ट अमोलसाठी नित्याचीच बाब होऊ लागली. 
पुढचे आव्हान अमेरिकेतील हवाई बेटांच्या खाडीचे होते. कारण सप्टेंबर २0१२ पर्यंत कोणीही भारतीय जलतरणपटू ही खाडी पोहून गेलेला नव्हता. पण त्यामुळे दडपण वगैरे येणे हे अमोलच्या स्वभावात बसणारे नव्हते. २२ कि.मी. अंतर त्याने अवघ्या ६ तास १५ मिनिटात पोहून पार केले खरे.. पण सातही समुद्रधुनिंमध्ये अमोलला हे सर्वाधिक आव्हानात्मक वाटले. याचे कारण सांगताना तो म्हणतो की त्या समुद्रावरील वारे इतक्या प्रचंड वेगाने वाहत होते की विचारता सोय नाही..त्यात भर म्हणजे उलट्या दिशेने वाहणारा (फी५ी१२ी उ४११ील्ल३) पाण्याचा प्रवाह ! सगळेच विपरीत..अनपेक्षित आणि म्हणूनच आव्हान देणारे होते !
ऑगस्ट २0१३मध्ये डेन्मार्क ते र्जर्मनी मधील बाल्टिक खाडीचे २८ कि.मी. इतके अंतर अमोलने ८ तास ५७ मिनिटात पार केले. ही खाडी पार करणारा अमोल हा पुन्हा एकदा पहिलाच भारतीय ठरला.
एव्हाना सहा समुद्र अमोलने आपल्या बाहुबलाने वश केले होते. आता आणखी एक सागरकिनारा..मध्ये अथांग खारे पाणी आणि त्याच्या पल्याड..ध्येयपूर्र्ती व स्वप्नपूर्र्ती !! स्पेन ते मोरोक्को मधील जिब्राल्टर समुद्रधुनी आता अमोलला खुणावत होती. आफ्रिका आणि युरोप खंडांमध्ये पसरलेली जिब्राल्टर खाडी. आठ महिन्यांच्या कालावधीची प्रतीक्षा संपली आणि शेवटचे चरण सुरु झाले. २0१४चा मे महिना उजाडला. 
पहिली सागरी सफर ८१ कि.मी. ची होती आणि ही शेवटची मोहीम बरोबर उलटया अंकाइतकी म्हणजे १८ कि.मी.ची होती. अमोलच्या हिशेबाने अंदाजे ५ तास लागणार होते..पूर्ण आत्मविश्‍वासाने अमोल पाण्यात उतरला आणि नियोजित वेळेत म्हणजे ४ तास ५९ मिनिटात अमोल पलीकडच्या तीरावर पोहचला. यातील काही मोहिमांमध्ये खासनीस सर आणि मिलिंद गुंजाळ हे अमोलच्या कायम सोबत होते. तसेच या सफरीसाठी त्याला आर्थिक पाठबळ देणार्‍या सर्व संस्थांचे ऋण मान्य करणारे त्याचे गोड शब्द हे त्याचे पाय समुद्रातील खार्‍या पाण्यात राहूनही   ‘जमिनीवर’ असल्याचीच ग्वाही देत होते. 
परकीय भूमीवर त्या क्षणी भारताचा ध्वज मोठ्या अभिमानाने हातात धरताना त्याचे डोळे आनंदाने ओलावले..अनेक वर्षांची तपश्‍चर्या फळाला आली होती..स्वप्न साकार झाले होते.
(लेखक व्यवस्थापन सल्लागार आहेत.)

Web Title: Sata Beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.