‘प्रतिभावंत-‘संपूर्ण’’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 06:04 AM2019-08-11T06:04:00+5:302019-08-11T06:05:12+5:30
खंडाळा. धो धो पाऊस कोसळत होता. मी तसाच भिजत उभा होतो. ओळख ना देख, पण मला पाहिल्याबरोबर लांबूनच त्यांनी मला बोलवलं. त्यांच्या छत्रीत घेतलं. नजरानजर झाली अन् त्या अवस्थेतही माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. गुलजार यांची अनेक छायाचित्रे मी नंतर काढली, पण त्या पहिल्या भेटीच्यावेळी कॅमेरा असूनही मला त्यांचा फोटो घेता आला नाही.
- सतीश पाकणीकर
आत्ता महाराष्ट्रात पडतो आहे तसाच पाऊस तेव्हाही बरसत होता. जराही उसंत नव्हती. आभाळ र्जद निळ्या अन गडद करड्या रंगांच्या ढगांनी नुसतं ओथंबलेलं. शिक्षण पूर्ण करून ग्रुपमधले सर्व मित्न काम-धंद्याला लागलेलो. मी प्रकाशिचत्नणाच्या व्यवसायाला सुरु वात केलेली. पण वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरीही सर्वांचा नक्की भेटायचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट. त्या दिवशी आम्ही कोणत्या ना कोणत्या ट्रेकसाठी जायचोच. शुक्र वार, 15 ऑगस्ट 1986 या दिवशी सर्वांनी मिळून ‘ड्युक्स नोज’च्या ट्रेकला आणि मनसोक्त भिजायला जायचे ठरले. पहाटे 6.26 च्या सिंहगड एक्स्प्रेसने खंडाळा.. आणि तेथून पुढे ट्रेक.
मी नुकतेच माझ्या व्यवसायासाठी स्टेट बँकेतून कर्ज घेतलेले. आणि अचानक मला बँकेकडून निरोप आला की त्यांच्या शिवाजीनगर शाखेत सकाळी 7.30 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे. कोणी महत्वाचे अधिकारी येणार आहेत. त्या कार्यक्रमाचे त्यांना फोटो काढून हवे आहेत. झालं. घेतल्या कर्जाला जागायला तर हवं. मी मित्नांना सांगितलं की तुम्ही पुढे व्हा. मी नंतरच्या लोकलने येऊन त्यांना सामील होईन. स्टेशनवर जाऊन मी अगोदरच लोकलचे तिकीट काढून ठेवले. बरोबर 7.30 ला बँकेचा सुरू झालेला कार्यक्र म सुमारे पंचेचाळीस मिनिटे चालला. मला 8.30 ची लोणावळा लोकल होती. कॅमेरा पटकन प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळला आणि पाठीवरच्या सॅकमध्ये ठेवून दिला. धावतच शिवाजीनगर रेल्वे स्टेशन गाठले. मी आणि लोकल जवळजवळ एकाच वेळी फलाटावर पोहोचलो. मिळाली एकदाची. पण अडचण एकच होती की लोकल लोणावळ्यापर्यंतच होती. मला तर पुढे खंडाळ्याच्या स्टेशनपर्यंत जायचे होते. अर्थातच माझा ट्रेक माझ्या मित्नांपेक्षा 4.5 कि.मी. ने जास्त असणार होता.
लोणावळ्याला उतरलो. गपचूप रेल्वे ट्रॅकच्या कडेने चालायला लागलो. ढगांनी परत बरसायला सुरु वात केली. आणि आता तर लोणावळ्याचा पाऊस. चेहर्यावर ते मोठाले थेंब वेगाने आपटत होते. पण एकूणच वातावरणातला तो कुन्दपणा, अचानक ढगातून चालल्याचा अनुभव आणि मित्नांना भेटण्याची उत्सुकता यांचा मिलाफ होत पाय भरभर पडत होते. मधेच पाऊस थांबे. काही क्षण उन्हाचे कवडसे पडत. सुस्नात झालेले वनवैभव. झाडांच्या पानांवरून गळणार्या थेंबातून ती किरणे परावर्तीत होताना हिरा चमकल्याचा आभास. ‘हिरा मोती निबजे ..’ ही कुमारजींची बंदिश न आठवली तरच नवल.
साधारण सव्वा तासाच्या चालण्यानंतर मला खंडाळा स्टेशन दिसू लागले. स्टेशन संपल्यावर डावीकडे वर जाणारी वाट आपल्याला ‘ड्युक्स नोज’ला घेऊन जाते. पावलांचा वेग नकळत वाढला. स्टेशन पार करून थोडा पुढे आलो, तर साधारण शंभर-सव्वाशे फुटांवर एका प्लास्टिकच्या भल्यामोठ्या तुकड्याखाली काही माणसं उभी होती. सगळे जण पाठमोरे. चार जणांनी तो तुकडा ताणून धरला होता. त्यांच्या पाठीमागे काही अंतरावर पांढरा पोलो शर्ट, पांढरी पँट, पांढरे शूज आणि काळी छत्नी डोक्यावर धरून एक व्यक्ती उभी होती. कोणत्यातरी चित्नपटाचे शूटिंग चालले आहे हे माझ्या लगेच लक्षात आले. आवडीचा विषय. माझे पाय थबकले. पावसापासून संरक्षण म्हणून तो प्लास्टिकचा तुकडा. त्याखाली कॅमेरामन आणि त्याचे युनिट. त्यातच असणार डायरेक्टर. माझ्या विचारांची साखळी भरभर धावू लागली. कशाचे शूटिंग करीत असतील ते? एखाद्या गाण्यासाठी तर नाही? असे माझे विचार सुरू असतानाच माझ्या मागून म्हणजे खंडाळा स्टेशनकडून एक माणूस धावत आला. तो त्या युनिटकडे ओरडून सांगत होता की पलीकडच्या स्टेशनवरून म्हणजे मंकी हिल स्टेशनवरून ट्रेन सुटली आहे. आणि काहीच मिनिटात ती ट्रेन येथे पोहोचेल. युनिटमधल्या काही लोकांनी मागे वळून पाहिले. त्याबरोबरच त्या छत्नीवाल्यानेही मागे वळून पाहिले. मी त्यांच्यापासून पन्नास फुटांवर असेन. स्तब्ध उभा. पाठीवर सॅक. पूर्ण भिजलेला. प्रकाश पुरेसा नसल्याने आणि त्यातही छत्नीच्या सावलीमुळे त्या व्यक्तीचा चेहरा मला नीट दिसत नव्हता. मला पाहताच त्या व्यक्तीने मला जवळ बोलावण्यासाठी एका हाताने खूण केली. मी नकळत माझ्या मागे वळून पाहिले. माझ्या मागे आता कोणीच नव्हते. म्हणजे ते मलाच बोलावत होते तर? त्यांना ते लक्षात आले असावे. त्यांनी परत एकदा खूण केली. आणि मीही त्यांच्या दिशेने चालू लागलो. तोपर्यंत त्यांनी परत युनिटकडे तोंड फिरवले होते.
मी तेथे पोहोचलो. माझी चाहूल लागताच त्यांनी परत पाहिले. आता मी त्यांच्यापासून दोन पावलांवर उभा होतो. माझी आणि त्यांची नजरानजर झाली. त्या भिजलेल्या अवस्थेतही माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना. कारण ती छत्नीधारी व्यक्ती होती सुप्रसिद्ध लेखक, कवी, पटकथाकार, गीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक संपूर्णसिंग कालरा म्हणजेच ‘गुलजार’! गुलजार या शब्दाचा अर्थ आहे बगीचा. माझ्या पुढ्यात कलेचा बगीचाच उभा होता. माझ्या दृष्टीने माझा अत्यंत आवडता कवी आणि दिग्दर्शक. त्यांनी मला जवळ बोलावले आणि आमच्या दोघांच्या डोक्यावर छत्नी धरली. माझ्या ओल्या कपड्यांची जराही पर्वा न करता. मी जणू मूकच झालो होतो. पण मनात अर्थातच लाखो विचारांची आवर्तने चालू झाली होती.
इतक्यात समोरून ट्रेन आली. आमच्या उजव्या बाजूने खंडाळा स्टेशनकडे गेलीही. कॅमेरामनने ट्रेनच्या बरोबरीने कॅमेरा पॅनिंग केले. शॉट ओके झाला आहे असे सांगितले. केवळ काही सेकंदांचाच तो शॉट. पण त्यासाठी सर्वांनी बरीच तयारी केलेली होती. त्यामुळे सर्वांनाच आनंद झाला. एका अत्यंत प्रतिभावान दिग्दर्शकाच्या चित्नीकरणात त्याच्याच छत्नीत उभे राहून ते शूटिंग मी अनुभवले होते. वातावरण हलके फुलके झाले. मी तोपर्यंत मनात शब्दांची जुळवाजुळव केली होती.
मी त्यांना म्हणालो, ‘आप गुलजारजी है ना ?’ त्यांनी मानेनेच होकार दिला. माझ्या मनात त्यांना किती सांगू आणि किती नको अशा भावना दाटल्या होत्या. मी परत त्यांना म्हणालो, ‘मैं ने आपकी हर एक फिल्म देखी है.’ यावर त्यांच्या चेहर्यावर सौम्य हास्य उमटले. त्यांना भेटणारा प्रत्येकजण हेच सांगत असणार की. मग ते एकदम म्हणाले, ‘मेरी कौनसी फिल्म तुम्हें सबसे अच्छी लगी?’ मी क्षणाचाही विलंब न लावता म्हणालो,‘कोशिश.’ आता ते हसले. माझ्या मनात त्यांच्या ‘मेरे अपने’, ‘परिचय’, ‘अचानक’, ‘मौसम’, ‘खुशबू’, ‘आँधी’, ‘किताब’, ‘किनारा’, ‘मीरा’, ‘नमकीन’, ‘अंगूर’ या इतर चित्नपटांच्या दृश्यांची एक मालिकाच झळकून गेली. काय समृद्ध काम केलंय या माणसाने!
मग माझ्याकडे पाहत ते म्हणाले, ‘इस घनी बारिश में, अकेले कहाँ जा रहे थे?’ मी त्यांना आमच्या ‘ड्युक्स नोज’च्या ट्रेकबद्दल सर्व सांगितले. त्यांना ते सर्व ऐकून अतिशय आश्चर्य वाटले. त्यांनी मला परत विचारले, ‘अगर तुम्हारे दोस्त आगे जाकर तुम्हें नहीं मिले तो?’
त्यावर मी उत्तर दिले की ‘फिर तो मैं अकेलाही ‘ड्युक्स नोज’ होकर फिर लोकलसे पूना जाऊंगा.’ तर्जनी आणि अंगठा यांच्या चिमटीत नाक पकडून त्यांनी मान हलवली. ते परत एकदा आश्चर्यचकित!
हा संवाद होईपर्यंत मला उत्सुकता निर्माण झाली होती की आता ते कोणती फिल्म बनवीत आहेत? म्हणून तसे मी विचारले. त्यांनी उत्तर दिले, ‘इस फिल्म का नाम है ‘इजाजत’. अभी जो ट्रेन का शॉट लिया है वह टायटल सिक्वेंस मे आनेवाला है. बाकी फिल्म शूट पुरा हुआ है.’’ मी फिल्ममधील कलावंत कोण आहेत हे विचारल्यावर त्यांनी, ‘रेखा, निसरु द्दीन शाह और अनुराधा पटेल’ ही नावे सांगितली. ती काही मिनिटे आम्ही दोघेही त्यांच्या छत्नीत उभे राहून बोलत होतो. मी तर आधीच भिजलेला होतो, पण आता तेही एका बाजूने भिजले होते. इतक्यात पलीकडच्या रस्त्यावर त्यांची कार आली आहे असा निरोप घेऊन एक माणूस आला. त्यांनी हात हातात घेऊन ‘शेक-हँड’ केला. आणि ते जाण्यासाठी वळले. काही पाऊले गेल्यावर परत मागे वळून म्हणाले, ‘तुम्हारे ट्रेक के लिये बेस्ट लक. टेक केअर.’ त्यांच्या या निरोपानंतर ही स्वप्नवत वाटणारी भेट संपली. माझ्याजवळ माझ्या सॅकमध्ये कॅमेरा असूनही मला तो बाहेर काढता आला नाही याची रुखरु ख मनात घेऊन मी ट्रेक पूर्ण केला.
1987 मध्ये ‘इजाजत’ प्रदर्शित झाला. पुण्याच्या डेक्कन थिएटरमध्ये मी तो पाहिला. त्यात आशा भोसले यांच्या आवाजात एक अति सुंदर गाणं आहे. त्यात शब्द येतात. –
‘एक अकेली छत्नी में जब आधे आधे भीग रहे थे
आधे सूखे, आधे गिले, सुखा तो मैं ले आयी थी
गिला मन शायद, बिस्तर के पास पडा हो
वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो..’
त्यांच्या त्या भेटीच्या आठवणीने मला परत एकदा खंडाळ्याला नेऊन ठेवलं. भावनांचा किती तरल आविष्कार ! आणि तो ही खास ‘गुलजार’ शैलीत! त्या सिनेमाचं वर्णन करायचं झालं तर असं म्हणता येईल की ‘इजाजत ही गुलजार यांनी लिहिलेली सिनेमारूपी कविता आहे.’
नंतर एका कार्यक्र मात त्यांची प्रकाशचित्ने घेण्याची संधी मिळाली. पुढे त्यांचे अनेक कार्यक्र म, भाषणे ऐकण्याची संधी मला मिळाली. जसा चित्नपट तसेच तरल भाषण. त्यांच्या एका भाषणात मला भावला तो त्यांचा आशावाद. भाषणादरम्यान त्यांनी त्यांची एक कविता सादर केली. आशावादाने ओतप्रोत भरलेली -
‘थोडेसे करोडो सालोमें,
सूरज की आग बुज़ेगी जब,
और राख उडेगी सूरजसे,
जब कोई चाँद न डुबेगा,
और कोई जमिन न उभरेगी,
तब एक बुज़े कोयलेसा टुकडा
ये जमिन का घुमेगा,
भटका भटका..मद्धम मद्धम..
खाकिस्तरी रोशनी में..
मैं सोचता हूँ उस वक्त अगर,
कागज़ पर लिखी एक नज्म कही,
उडते उडते कही सूरज में गिरे,
और सूरज फिरसे जलने लगे..’
येत्या 18 ऑगस्टला ‘गुलजार’ या प्रतिभावान कलावंताची 85 वर्षे पूर्ण होतील. त्यांचा हा आशावाद त्यांना त्यांच्या शंभरीपर्यंत विनासायास घेऊन जाईल या शुभेच्छांसह...
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)
sapaknikar@gmail.com