बळवंतराव मोरेश्वरराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 06:03 AM2019-07-28T06:03:00+5:302019-07-28T06:05:05+5:30
शिवशाहीर र्शीमंत बाबासाहेब पुरंदरे. समोरची व्यक्ती कितीही लहान असली तरी आजही प्रत्येकाला ते ‘अहो-जाहो’ करतात. वेळ दिली आणि ती पाळली नाही, असंही कधीच त्यांच्याकडून होत नाही. बाबासाहेबांच्या भेटीचा योग असंख्य वेळा आला, त्यांचा झपाटा आपल्याला कायमच थक्क करतो. शिवचरित्नात अनेक गुणी माणसं आहेत, ज्यांची इतिहासाने नोंद घेतलेली नाही. अशा व्यक्तींच्या गोष्टी फोटोग्राफीच्या आधारे, प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन चित्नीकरण करून, खरे हत्ती, घोडे, शस्रे वापरून करण्याची जिद्द ते आजही बाळगून आहेत.
- सतीश पाकणीकर
पुण्यातील रेणुका स्वरूप शाळेच्या पटांगणात मुंगीलाही शिरायला जागा नसेल अशी गर्दी. दिवस थंडीचे. नाही. नाही.. मी ‘सवाई गंधर्व’ महोत्सवाबद्दल बोलत नाहीये. तो कार्यक्र म होता छत्नपती शिवाजी महाराजांच्या उदात्त, उत्कट आणि उत्तुंग जीवन कथेचा - शिवचरित्नाचा. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती ज्या शिवचरित्नाने शब्दश: भारून जाते ते चरित्न त्याच्याच निर्मात्याच्या तोंडून ऐकायला प्रत्येक जण रोज उपस्थिती लावत होता. जिवाचे कान करून चरित्नात समरस होत होता.
त्यादिवशी तर ‘पन्हाळ्याच्या लढाईचा’ प्रसंग रंगणार होता. गर्दीमध्ये एक आठवीतला मुलगा होता. त्याने शिवशाहिरांच्या ‘राजा शिवछत्नपती’ या पुस्तकातील त्या प्रसंगाच्या चित्नावरून तसेच एक चित्न काढून आणले होते. त्या मुलाला त्याच्यावर व्याख्यानकर्त्याची स्वाक्षरी हवी होती. दीड तास चाललेल्या कथनातून सर्व वातावरण शिवमय होऊन गेले होते. जणू उपस्थितातील प्रत्येकजणच पन्हाळ्याच्या लढाईत सहभागी झाला होता. कार्यक्र म संपला. व्याख्यात्यांभोवती गर्दी जमली. तो मुलगाही त्या गर्दीतून त्याने काढलेले चित्न जपत, वाट काढत घाईने पुढे गेला. व्याख्यात्यांच्या प्रमाणेच त्यानेही काळी शेरवानी ‘पेहेनली’ होती. त्याच्या छोट्याशा मूर्तीकडे जेव्हा व्याख्यात्यांचे लक्ष गेले तेव्हा त्यांच्या चेहर्यावर हसू उमटले. त्यांनी मुलाला पुढे बोलावले. तो पुढे झाला आणि त्याने स्वाक्षरीसाठी ते चित्न त्यांच्या पुढय़ात धरले. त्याच्या हातातील चित्नावर ओळी लिहिल्या होत्या - ‘‘हा भास? नव्हे इतिहास.. घेतला घास पन्हाळ्याचा.’’
चित्न पाहून व्याख्याते खूश झाले. त्यांनी त्या चित्नाच्या पाठीमागे संदेश लिहिला - ‘‘वा. छान. खूप मोठे चित्नकार व्हा !’’ मग मोडी लिपीत स्वाक्षरी केली- ‘बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे.’
मुलाच्या चेहर्यावर आनंद पसरला. त्या भरात त्याने सांगितले की, माझ्या आजोळचे आडनावही पुरंदरे आहे. त्यावर व्याख्यात्यांनी मुलाच्या पाठीवर शाबासकी देत ते म्हणाले- ‘‘अरे, मग भाचे की तुम्ही आमचे’’.
शिवशाहीर र्शीमंत बाबासाहेब पुरंदरे यांना मी आयुष्यात पहिल्यांदा भेटलो तो हा प्रसंग. ते समोरची व्यक्ती कितीही लहान असली तरी ‘अहो-जाहो’ करतात. आज हा प्रसंग घडून चव्वेचाळीस वर्षे झाली. तपस्वी व्यक्तींचे आशीर्वाद वाया जात नाहीत. त्यांच्या संदेशात थोडा बदल होत मी प्रकाशचित्नकार मात्न झालो. आणि माझ्या भाग्याने मला नंतर असंख्यवेळा त्यांना भेटण्याची संधीही मिळाली.
थीम कॅलेंडरच्या माझ्या प्रकल्पातील 2005 सालचे कॅलेंडर होते ‘दिग्गज’. वेगवेगळ्या क्षेत्नातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वांची मी टिपलेली प्रकाशचित्ने त्यात वापरली होती. त्यात मला र्शीमंत बाबासाहेबांचे प्रकाशचित्र वापरावयाचे होते. माझ्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे मी त्या सर्वांना परवानगी विचारणारी पत्ने पाठविली. दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी मी आदरणीय बाबासाहेबांना फोन केला त्याचवेळी मी त्यांना ‘फोटोसेशन’साठी वेळ देण्याची विनंतीही केली.
त्यावर्षी दिवाळी सहा दिवस होती. बाबासाहेब सुदैवाने पुण्यातच होते. मी विचारल्यावर क्षणात त्यांनी मला शनिवार, 13 नोव्हेंबर 2004 रोजी संध्याकाळी 4 वाजता येण्यास सांगितले. त्यांचा वक्तशीरपणा मला ठाऊक असल्याने मी पर्वती येथील त्यांच्या ‘पुरंदरे वाड्यावर’ दहा मिनिटे आधीच पोहोचलो. तळ मजल्यावरील मोठय़ा हॉलमध्ये मोठमोठे हंडे, भिंतीवर ढाल-तलवारी, एक दोन मोठी पेंटिंग्ज, चौरंग, जरीकाम असलेले पडदे असा सगळा ‘दरबारी’ थाट होता. बरोब्बर 4 वाजता बाबासाहेब पायजमा, गडद रंगाचा सिल्कचा झब्बा, त्यावर त्यापेक्षा गडद असे जाकीट, सोनेरी काडीचा चष्मा आणि डोक्यावर फरची टोपी या वेशात त्या हॉलमध्ये आले. त्यांची चपळता पाहून त्यांचे वय त्यावेळी 82 वर्षे आहे असे कोणाला वाटलेही नसते. दरवाज्यातून आत येणारा ‘सॉफ्ट’ असा प्रकाश ज्या सोफ्यावर पडला होता त्या ठिकाणी बसण्याची विनंती मी त्यांना केली. त्यांच्या स्वभावात असलेली मृदुता त्या सौम्य अशा प्रकाशात जास्तच दृग्गोचर होत होती. असा छान उपलब्ध प्रकाश मिळाल्यावर ‘फोटोसेशन’ला वेळ तो कितीसा लागणार? त्यांच्या चेहर्यावरील भावही बदलत होते. कोठेही कृत्रिमतेचा लवलेश नव्हता. होती ती अपार सहजता आणि एखाद्या लहान मुलाची निरागसता. स्वाभाविकच ती त्यांच्या प्रकाशचित्नातून उजळून आली. माझं काम अवघ्या वीस मिनिटात झालं होतं. कॅलेंडरमध्ये त्या प्रकाशचित्नाखाली अजित सोमण सरांनी ओळी लिहिल्या- ‘शिवरायांचा प्रताप, विवेक आणि साक्षेप अखिल भूमंडळी पोहोचविण्यासाठी वाणी आणि लेखणीचा हिलाल चेतवणारे : शिवमय झाले अवघे जीवन’. - किती यथार्थ वर्णन.
नंतरही वेळोवेळी बाबासाहेबांकडे अनेक वेळा जाण्याचा योग आला. प्रत्येकवेळी मला त्यांच्या माझ्यावरच्या प्रेमाचा अनुभव येत गेला. 28 सप्टेंबर 2013 ते 3 ऑक्टोबर 2013 या दरम्यान मी पुण्याच्या बालगंधर्व कलादालनात माझ्या तीस वर्षातील विविध कामांच्या प्रकाशचित्नांचे प्रदर्शन भरवले होते. हातातील व्यावसायिक कामे, प्रदर्शनाची गडबड आणि उपलब्ध असलेला कमी वेळ यामुळे मी माझा लहान भाऊ हरीश याच्यावर निमंत्नणे देण्याची कामगिरी सोपविली. त्याप्रमाणे वेळ घेऊन तो बाबासाहेबांच्या घरी गेला. त्यांनी निमंत्नण पत्रिकेच्या संरचनेचेही तोंडभरून कौतुक केले. ‘‘मी प्रदर्शनास नक्की येईन, असे सतीशरावांना सांगा.’’ असा निरोप त्यांनी हरीशजवळ दिला.
2 ऑक्टोबर 2013. आता प्रदर्शनाचा एकच दिवस राहिला. म्हणून मी माझ्याकडे असलेल्या बाबासाहेबांच्या नंबरवर फोन केला. बाबासाहेब तेथे नव्हते. फोन त्यांचे सहायक प्रतापराव टिपरे यांनी घेतला. त्यांनी मला विचारले की - ‘‘बाबासाहेबांनी येतो असे सांगितले आहे का?’’ मी उत्तर दिले - ‘‘हो. त्यांनी माझ्या भावाजवळ तसा निरोप दिला आहे.’’ यावर प्रतापराव म्हणाले - ‘‘बाबासाहेबांनी येतो सांगितले आहे ना, मग ते येणारच. निश्चिंत रहा.’’
3 ऑक्टोबर 2013. प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस. सकाळपासूनच बरीच गर्दी होती. मी सकाळी 11 च्या सुमारास परत फोन केला. यावेळी प्रताप्ररावांना. ते म्हणाले - ‘‘आम्ही सकाळी 7 वाजता मुंबईला जायला निघालोय. एक काम उरकून संध्याकाळपर्यंत पुण्यात येणार. घरी जाताना बालगंधर्व कलादालनात जाऊ असे बाबासाहेब म्हणाले आहेत.’’ संध्याकाळचे साडेसहा होत आले म्हणून मी परत एकदा प्रताप्ररावांना फोन केला. त्यावेळी त्यांनी खुलासा केला - ‘‘बाबासाहेबांचे एक घनिष्ठ मित्न अचानक वारले आहेत. आम्ही परस्पर वैकुंठात आलोय. आता घरी जाऊन अंघोळ करून मग आम्ही प्रदर्शनाला येणार आहोत.’’ साडेसात वाजता कलादालनाच्या पोर्चमध्ये बाबासाहेबांची इनोव्हा थांबली. मी पळत खाली आलो. त्यांना नमस्कार केला. कठड्याला धरून ते वर आले. दिवसभराच्या प्रवासाने आणि नंतर घनिष्ठ मित्नाला द्याव्या लागलेल्या निरोपाने ते थोडेसे थकलेले होते. कलादालनात एक ‘एक्झिक्युटिव्ह’ खुर्ची होती. त्यावर ते बसले. त्या खुर्चीला चाकं होती. पंधरा मिनिटांनी मी त्यांना म्हणालो - ‘‘बाबासाहेब, तुम्ही खुर्चीतच बसा. मी ती खुर्ची ढकलत नेतो. त्यामुळे तुम्हाला बसूनच प्रदर्शन पाहता येईल.’’ माझं बोलणं झटकून टाकत ते म्हणाले - ‘‘ नाही मी चालत-चालतच प्रदर्शन बघीन’’ आणि उठून निघालेही. प्रताप्ररावांच्या खांद्यावर एक हात ठेवून संपूर्ण प्रदर्शन त्यांनी सुमारे पाउणतास घालवून बारकाईने पाहिले. औद्योगिक व जाहिरातींसाठी काढलेल्या प्रकाशचित्नातील बारकावे जाणून घेतले. ‘सेल-ओ-ग्राफी’ या मी नव्याने निर्माण केलेल्या प्रकाशचित्नांचं मनापासून कौतुक केलं. एक एक पॅनल पाहत आम्ही शेवटी असलेल्या गायक-वादकांच्या फोटो- पॅनलपाशी पोहोचलो. त्यात एक फोटो होता पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा. त्या फोटोपाशी आल्यावर त्यांच्या तोंडून एकदम दाद आली - ‘‘अरे वा .. सतीशराव, काय सुंदर भावमुद्रा पकडलीय तुम्ही आमच्या बाळासाहेबांची ! असं वाटतंय की बाळासाहेबांचे स्वरच आता ऐकू येतील. फार छान!’’ त्यांच्या या अभिप्रायाने माझं मन मोहरून गेलं. मग ते परत थोडावेळ बसले. त्यांना सोडायला मी त्यांच्याबरोबर परत पोर्चमध्ये आलो. गाडीत बसल्यावर ते मला म्हणाले - ‘‘सतीशराव, माझं एक काम आहे तुमच्याकडे.’’ मी काय म्हणून विचारल्यावर म्हणाले- ‘‘ मी तुम्हाला 6 तारखेला सकाळी 9 वाजता फोन करतो’’. मी ‘‘बरं’’ म्हणालो. प्रदर्शनाची सांगता मोठी समाधानकारक झाल्याने मी खुश होतो.
बाबासाहेबांनी सांगितलेली वेळ मी दोनच दिवसात विसरून गेलो. पण ते विसरले नाहीत. तीनच दिवसांनी म्हणजे 6 तारखेला बुधवारी सकाळी बरोबर 9 वाजता माझा मोबाइल वाजला. पलीकडे स्वत: बाबासाहेब बोलत होते. त्यांनी मला विचारले की, शुक्रवारी संध्याकाळी 4 वाजता मी त्यांच्या घरी येऊ शकेन का? माझे उत्तर अर्थातच ‘‘हो’’ असे होते. मग अगदी लक्षात ठेवून मी शुक्र वारी बरोबर पावणेचारला त्यांच्याकडे पोहोचलो. बाबासाहेब कोणत्यातरी मीटिंगसाठी एक वाजताच बाहेर गेलेले होते. ते यायचे होते. तेथे त्यांचे एक पुत्नवत सहायक र्शी. गणेशराव ढालपे हजर होते. बाबासाहेबांनी चारची वेळ दिली आहे हे कळल्यावर त्यांनी बाबासाहेबांना फोन केला. मीटिंग लांबली होती. ते यायला अजून एक तास लागणार होता. मग माझ्या गणेशरावांबरोबर गप्पा सुरू झाल्या. आणि बाबासाहेबांच्या सहवासात असलेली ही व्यक्ती किती अभ्यासू आणि तयारीची आहे याचा मला साक्षात्कार होत गेला.
5 वाजता बाबासाहेब आले. वेळ सांगून काही कारणामुळे ती पाळता आली नाही याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. मीच ओशाळून गेलो. त्यांनी थेट मला काय काम आहे हे सांगायला सुरुवात केली.
‘‘शिवचरित्नात अशा अनेक घटना आहेत, अनेक गुणी माणसं आहेत की ज्यांची इतिहासाने नोंद घेतलेली नाही. अशा व्यक्तींच्या गोष्टी आपण फोटोग्राफीच्या आधारे, प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन चित्नीकरण करून, खरे हत्ती, घोडे, शस्रे वापरून करू या. अनेक फोटोंमधून ती कथा रसिकांपुढे उलगडत जायला हवी.’’
अशी सुरुवात करून बाबासाहेबांनी शिवकाळात पुण्याजवळ बांधल्या गेलेल्या एका धरणाची, त्यावेळी घडलेल्या प्रसंगाची, महाराजांच्या एकनिष्ठ आणि दूरदृष्टी असलेल्या सहकार्यांची, आपल्या राजावर निरतिशय प्रेम करणार्या एका युवकाची एक कथा मला त्यांच्या नाट्यमय शैलीत ऐकवली. कथा सांगणारे बाबासाहेब आणि ऐकणारा एकटा र्शोता मी. जणू त्यांच्या कथनाने सोळाव्या शतकातील तो काळ जसाचा तसा त्या दिवाणखान्यात जिवंत होऊन पुन्हा आला आहे. कथा संपली. एवढी सुंदर कथा सांगून झाल्यावरही ते म्हणाले - ‘‘मी आता एकदा नीट टिपणं काढतो याची. मग आपण त्यावर काम करू.’’ वयाच्या फक्त 91व्या वर्षी आपल्या कामात अचूकता यावी यासाठी इतका विचार करणारी व्यक्ती विरळाच. त्यांच्या या वयातीलही व्यग्र अशा दिनक्रमामुळे म्हणा किंवा माझं नशीब अजून कच्चं म्हणा ती कथा अजून प्रत्यक्षात टिपली गेलेली नाही. पण मला खात्नी आहे की ती आज ना उद्या नक्कीच चित्रित होईल.
उद्या 29 जुलै 2019. शिवशाहीर 98व्या वर्षात पदार्पण करतील. त्यांच्या या जन्मदिनी आपण सगळे मिळून असा निर्धार करू शकतो की आळस, अज्ञान व अनास्था झटकून ‘डोळसपणे शिवचरित्नाचे आचरण’ हाच आपला धर्म असेल. ज्यायोगे आदरणीय बाबासाहेबांना अपेक्षित असलेला विवेकी आचार-विचारांचा उष:काल होईल.
sapaknikar@gmail.com
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)