प्रल्हाद परसराम छाब्रिया ऊर्फ पी.पी. सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 06:01 AM2019-05-05T06:01:00+5:302019-05-05T06:05:01+5:30

वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली. महिना दहा रु पये पगारापासून ते अडीच हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या स्वत:च्या कंपनीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. साध्या सायकलपासून ते स्वत:च्या खासगी विमानापर्यंत भरारी घेणारी ही व्यक्ती मात्र अतिशय विनयशील होती..

Sateesh Paknikar's memories with great industrialist Finolex group chairman P.P. Chhabria | प्रल्हाद परसराम छाब्रिया ऊर्फ पी.पी. सर

प्रल्हाद परसराम छाब्रिया ऊर्फ पी.पी. सर

Next
ठळक मुद्देप्रसिद्ध उद्योगपती पी.पी. छाब्रिया यांची आज तृतीय पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांच्या सहवासातील आठवलेली क्षणचित्रे..

- सतीश पाकणीकर

एखादा सत्काराचा कार्यक्रम सुरू असतो. वेगवेगळे वक्ते उत्सवमूर्तीचे भरभरून तसेच आदराने कौतुक करीत असतात. कार्यक्रमभर उत्सवमूर्तीच्या चेहऱ्यावर समाधानाची लहर पसरलेली असते. कोणीतरी पट्टीचा वक्ता मग वर्णन करतो की उत्सवमूर्ती म्हणजे ‘सेल्फ मेड मॅन’ आहेत. कार्यक्रम रंगत जातो. असे अनेक कार्यक्रम सगळ्यांनी अनुभवलेले असतात. पण मी असा एक कार्यक्रम अनुभवला की त्यात उत्सवमूर्तीचे स्वतःचे असे म्हणणे होते की - “ देअर इज नो सच थिंग अॅज अ सेल्फ-मेड मॅन ”. ही व्यक्ती होती फिनोलेक्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा प्रल्हाद परसराम छाब्रिया उर्फ पी. पी. सर. त्यांच्या स्वतःच्याच शब्दात सांगायचे झाले तर-  “ बरेच लोक कठोर परिश्रम करतात,  बरेच जण उच्च तत्त्वांचे पालन करतात, उच्च गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून त्या गुणवत्तेला सर्वोच्च प्रतिबद्धता मानतात. त्यामुळे माझ्याबद्दल विशेष असे खास काही नाही. आतापर्यंत मला भेटलेल्या लोकांमध्ये मी अत्यंत भाग्यवान आहे. माझ्या प्रयत्नांमध्ये सामील होणारे सहकारी मला मिळाले. माझ्या आयुष्यात एका अदृश्य शक्तीने मला सतत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे मी केलेल्या कृतींचे श्रेय त्या अदृश्य शक्तीला जाईल. त्यामुळे माझा असा विश्वास आहे की ‘स्व- निर्मित मनुष्य अशी कोणतीही गोष्ट नाही.” 

पी.पी.सर असे म्हणत असले तरीही वयाच्या दहाव्या वर्षापासून कापडाच्या दुकानात दहा रुपये पगारावर स्वच्छतेचे काम करण्यापासून ते जवळजवळ अडीचहजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या स्वतःच्या कंपनीचे अध्यक्षपद भूषवणारी व्यक्ती, साध्या सायकल पासून स्वतःच्या खासगी विमानापर्यंत भरारी घेणारी ही व्यक्ती जर हे सर्व श्रेय अदृश्य शक्तीला देत असेल तर तो त्या व्यक्तीचा विनयशील स्वभावाच म्हणायला हवा ना?

माझे एक ज्येष्ठ मित्र श्री. अनिल बी. अत्रेसाहेब यांच्यामुळे मी फिनोलेक्स या ग्रुपशी जोडला गेलो. साल होते २००१-२००२. मला कंपनीच्या वार्षिक अहवालासाठी पी.पी.सरांचे काही फोटो काढायचे काम होते. त्याआधी मी पी.पी.सरांना कमिन्स कंपनीच्या एका कार्यक्रमात पाहिले होते. पण जेव्हा मी त्यांचे व्यक्तीचित्रण करण्यास त्यांच्याच ऑफिसमध्ये गेलो त्यावेळी मला प्रथमतः जाणवला तो त्यांचा दरारा आणि नंतर कायम माझ्या वाटयाला आले त्यांचे आदरातिथ्य व सौम्य स्वभावाची वागणूक. त्या पहिल्याच फोटोसेशनमध्ये त्यांच्या वेळेअभावी मी जरी त्यांचे फार फोटो काढू शकलो नाही तरीही नंतरच्या साधारण बारा-तेरा वर्षात कंपनीच्या कामाबरोबरच मला त्यांचे बरेच फोटोसेशन करण्याची संधी मिळाली.

एकदा काही कामासाठी मी फिनोलेक्समध्ये गेलो होतो. त्यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते श्री. प्रकाश छाब्रिया. त्यांच्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो. त्यांचे कोणाबरोबर फोनवर बोलणे सुरु होते. फोनवर बोलून झाल्यावर अचानकपणे प्रकाश छाब्रियांनी मला प्रश्न केला की फोटोची मदत घेऊन मला एक ग्रीटिंग हवे आहे. त्यांचे सासरे म्हणजे सुप्रसिद्ध हिंदुजा ग्रुपचे को-चेअरमन श्री. जी. पी. हिंदुजा. तर हिंदुजा ग्रुपचे चेअरमन श्री. एस. पी. हिंदुजा हे प्रकाश छाब्रियांच्या मावशीचे पती. या हिंदुजा बंधुद्वयांच्या विवाहाच्या चाळीसाव्या वाढदिवसानिमित्त ते ग्रीटिंग करायचे होते. मग काय काय करता येईल याच्यावर चर्चा झाली. आपल्यायेथे डिजिटल फोटोग्राफीची नुकतीच सुरुवात झाली होती. त्याचा उपयोग करून एखादे डिजिटल ग्रीटिंग करता येईल असे मी बोलून गेलो. हाच धागा पकडून मग काही व्यक्तींचे व्हिडियो शूटिंग करून ते एकत्र करून एक सी डी हिंदुजा कुटुंबीयांना पाठवण्याचे ठरले. माझ्या हातात दोन दिवस होते. प्रकाश सर मला म्हणाले – “ आज पपा घरी आहेत. तुम्ही आधी जाऊन पपांचा व्हिडियो पूर्ण करा. मग इतरांचे  बघू.” मी थेट ऑफिसवर येऊन कॅमेरा घेऊन ‘मोहिनी’ या छाब्रियांच्या आय सी एस कॉलनीतील घरी पोहोचलो. पी.पी.सरांना आधीच निरोप गेला असल्याने त्यांच्या बंगल्याच्या भल्या मोठ्या सिटआउटमध्ये ते आरामात बसलेले होते. त्या एवढ्या मोठ्या बंगल्यात मला पार्श्वभूमीसाठी काहीच अडचण नव्हती. माझ्याकडे त्यावेळी ‘फुजी फाईनपिक्स’ हा सहा मेगापिक्सेल्सचा कॅमेरा होता. त्याला व्हिडियो घ्यायची सुविधा होती पण अडचण एकच होती ती म्हणजे त्याला बाहेरून मायक्रोफोन जोडायची सोय नव्हती. त्यामुळे व्हिडियोचित्रण करताना पी.पी.सरांना मोठ्या आवाजात बोलायला लागणार होते. मी हे सांगितल्यावर कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी मला पूर्ण सहकार्य केले. तेथील बागेत एका बाकावर बसून त्यांचे दोन-तीन टेक घेतल्यावर मला हवा तसा व्हिडियो रेकोर्ड झाला. दरम्यान मी जेव्हा कॅमेरा स्टँडवर लावत होतो त्यावेळी पी.पी.सर बारकाईने सर्व न्याहाळत होते. माझ्या कॅमेऱ्यावर छोट्याशा अक्षरात एक लोगो लिहिलेला होता. त्याकडे लांबूनच पाहून त्यांनी मला विचारले- “ तुमच्या कॅमेऱ्यावर ‘Finolexअसं का  लिहिलंय?” मी क्षणभर चक्रावलो. पण लगेचच माझ्या लक्षात आलं की ते माझी थट्टा करीत आहेत. कारण माझ्या कॅमेऱ्यावर प्रत्यक्षात ‘Finepix असा लोगो होता. तो शब्द ‘Finolex शी साधर्म्य असणारा होता. त्यांनी सहजच केलेल्या या थट्टेने मी ही जरा रिलॅक्स झालो. झालेले व्हिडियो शूटिंग मी त्यांना दाखवले व नंतर बनणाऱ्या ग्रीटिंगविषयीही सांगितले. मग मी त्यांना मला त्यांच्याबरोबर एक फोटो घेता येईल का असे विचारले. त्यांनी लगेचच होकार दिला. त्यांच्याबरोबरचा माझा तो फोटो नंतर मला ‘वेगळ्याच’ प्रकारे उपयोगी पडला. कंपनीमधील एक अधिकारी मला नेहमी कोणत्याही गोष्टीत अडचणी आणत असत. काही दिवसांनंतर प्रॉडक्ट फोटोसाठी ते अधिकारी माझ्या स्टुडिओत येणार होते. मी मुद्दामहून तो फोटो माझ्या डेस्कटॉपवर आणून ठेवला. इतर फोटोंचे सिलेक्शन करताना मी हळूच तो फोटोही ओपन केला. माझा व पी.पी.सरांचा तो फोटो पाहून त्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांनी विचारले – “ हा फोटो कधी काढलाय?” मी मनात ठरलेले उत्तर लगेच दिले. “ पी.पी.सर एकदा माझ्याकडे आले होते तेव्हा.” माझी मात्रा लागू पडली. मला त्या अधिकाऱ्याने परत कधी त्रास दिला नाही.

नंतर २००८ साली फिनोलेक्सला पन्नास वर्षे पूर्ण झाली. त्याचाच एक भाग म्हणून पी.पी.सरांच्या  आत्मचरित्राचे काम सुरू होते. या कामाची जबाबदारी पी.पी.सरांची कन्या व आय स्क्वेअर आय टी च्या अध्यक्षा अरुणा कटारा यांच्यावर होती. त्यांच्याकडून मला बरेच जुने फोटो एडिटिंग करण्यासाठी आले होते त्या बरोबरच फिनोलेक्स परिवाराचे व छाब्रिया कुटुंबीयांचेही नव्याने फोटो काढणे गरजेचे होते. त्या कामासाठी आधी ठरल्याप्रमाणे मी प्रकाश छाब्रियांचे फोटो घेण्यास कंपनीत पोहोचलो. मला पाहताच प्रकाश सर म्हणाले – “ तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तर आत्ता रत्नागिरीला असायला हवे. कारण पपा कालच रत्नागिरीला गेले आहेत. त्यांचे तेथील सर्व फोटो पुस्तकात हवे ना?” त्यांनी लगेचच रत्नागिरीला फोन केला. आणि मी तेथे येत असल्याचे कळवले. चिंचवड मध्ये असलेला मी कपड्यांची बॅग भरून बरोबर एक तासाने रत्नागिरीच्या दिशेने निघालो होतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजताच मी गेस्ट हाउसच्या कक्षात आलो. तर समोरच पी.पी.सर कोणाशीतरी बोलत उभे. मला पाहताच त्यांना आश्चर्य वाटले. कारण त्यांना फोटोग्राफीसंबंधी निरोप मिळालाच नव्हता. त्यामुळे त्यांच्या काही महत्वाच्या मिटींग्स ठरल्या होत्या. पण तरीही अतिशय शांत चेहऱ्याने त्यांनी मला विचारले की- “आपल्याला कोठे कोठे फोटो काढायचे आहेत?” मी यादीच सांगितली. फिनोलेक्स जेट्टी, फिनोलेक्स अॅकेडेमी, फिनोलेक्स प्लांट व त्यांच्या स्वतःच्या विमानात त्यांचे फोटो घ्यायचे होते. सव्वादहा पर्यंत त्यांच्या मिटींग्स संपणार होत्या. त्यांनी फॅक्टरी मॅनेजर श्री. रथ यांना मला बरोबर १०.३० वाजता जेट्टीवर घेऊन येण्यास सांगितले व मला म्हणाले- “ आपण जेट्टी पासून सुरुवात करू व शेवटी प्लांटवर येऊन मग विमानतळावर जाऊ.” मी मान हलवली.

१० वाजून २९ मिनिटांनी पी.पी.सरांची कार जेट्टीवर पोहोचली होती. सूर्य खूपच वर आला होता. प्रकाशाची तीव्रताही वाढू लागली होती. मला चपळाई करणे गरजेचे होते. पण त्या उन्हात व उकाड्यातही पी.पी.सर एकदम शांत व मला पाहिजे तेथे उभे राहत वेगवेगळ्या पोझ देत होते. जेट्टीच्या परिसरात फोटो घेतल्यावर आम्ही फिनोलेक्स अॅकेडेमीमध्ये काही फोटो घेतले. त्यानंतर आम्ही प्लांटवर पोहोचलो. चेअरमन येणार हे कळल्यामुळे प्लांटवर एकदमच शिस्तीचे वातावरण होते. प्लांटच्या पार्श्वभूमीवर मी सरांना एका जिन्याने वर चढायला सांगितले. तेही चपळाईने पाच-सहा पायऱ्या चढले. माझ्या शेजारी उभे राहून मॅनेजर श्री. रथ हे सारे पाहत होते. ते मला हळुच म्हणाले- “ पी.पी.सर व तुमचे काही नाते आहे का?” मी नाही म्हणालो व कारण विचारले तर ते म्हणाले- “ मी केव्हापासून पाहतोय की तुम्ही ज्या ठिकाणी सांगता, जसे सांगता त्याप्रमाणे सर उभे रहात आहेत. इथे कोणाचीही अशी हिम्मत होणार नाही.” मी त्यांना यावर काय सांगणार?

सर्वात शेवटी आम्ही रत्नागिरीच्या छोट्याशा एअरपोर्टवर पोहोचलो. मायक्रोलाईट प्रकारचे सहा आसनी विमान तयारच होते. आम्ही दोघे विमानात बसलो. तेथून मुंबईचा प्रवास फारतर अर्धातासाचा होता. पी.पी.सरांनी मला माझ्या कॅमेऱ्याविषयी विचारले. कोणता मेक, किंमत, लेन्स सर्व जाणून घेतले. नंतर म्हणाले “ प्रकाशकडेही हाच कॅमेरा आहे नां?” त्यांच्या निरीक्षण शक्तीचा परत एकदा मला अनुभव मिळाला. मग मी त्यांना तेथीलच ‘Happy year ever…’ अशा शीर्षकाची एक पुस्तिका वाचायची विनंती केली. जेणेकरून मला त्यांच्या विमानप्रवासातील प्रकाशचित्रे टिपता यावीत. ते प्रकाशचित्र टिपल्यावर माझं काम झालं होतं.  त्यांनी मला सांगितले की मला मुंबईत एक मिटिंग आहे. मला सोडून तुम्ही पुढे पुण्याला जा. खरं तर त्यांना मला सांगता आले असते की तुम्ही पुढे टॅक्सीने जा. पण त्यांनी तसं केलं नाही. संध्याकाळी मी पुण्यात पोहोचलो. येताना मनात एकच विचार होता- ‘आत्ता जर फॅक्टरी मॅनेजर श्री. रथ इथे असते तर पी.पी.सरांच्या या आदेशाविषयी त्यांनी काय अर्थ काढला असता?’    

(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)

sapaknikar@gmail.com

Web Title: Sateesh Paknikar's memories with great industrialist Finolex group chairman P.P. Chhabria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.