नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई - गेल्या २३ वर्षांची ढिम्म कहाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 06:01 AM2019-02-17T06:01:00+5:302019-02-17T06:05:02+5:30
- सतीश नाईक १९९६ साली नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचं मुंबईत उद्घाटन झालं. त्याप्रसंगी आयोजित केलेल्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपच्या ...
- सतीश नाईक
१९९६ साली नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचं मुंबईत उद्घाटन झालं. त्याप्रसंगी आयोजित केलेल्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपच्या प्रदर्शनात प्रोग्रेसिव्ह ग्रुपचेच एक संस्थापक सदस्य वयोवृद्ध चित्र-शिल्पकार सदानंद बाकरे मुरूड-हर्णे येथून खास आले होते. आयोजकांनी त्यांच्यासाठी साधी बसण्याची व्यवस्थाही केली नाही. थकलेले वयोवृध्द बाकरे अर्ध्याहून अधिक कार्यक्रम उभेच होते. ते दृश्य पाहून अस्वस्थ होऊन त्या संपूर्ण प्रदर्शनाचा समाचार घेणाऱ्या एका लेखमालेत मी अत्यंत जळजळीत शब्दात लिहिलं होतं, ‘चित्रकारांना जर भविष्यातदेखील असाच अनुभव येणार असेल तर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई या संस्थेला फारसं भवितव्य नाही हे निश्चित.’
- आज तब्बल २३ वर्षांनी नॅशनल गॅलरीविषयी लिहिताना माझं ते तेव्हाचं विधान शब्दश: खरं ठरल्याचा अनुभव मी घेतो आहे.
गेल्या आठवड्यात अमोल पालेकर यांच्या बाबतीत जे काही घडलं तसंच काहीसं २३ वर्षांपूर्वी उद्घाटनप्रसंगी बाकरे यांच्या संदर्भात घडलं होतं. स्थळ तेच, जागा तीच, प्रसंगही तसाच, वेळही तीच. फक्त कलावंत, डायरेक्टर आणि क्युरेटर ही माणसं कालमानपरत्वे बदललेली. असं म्हणू या की बाकरे यांचा अवमान नकळत झाला; पण पालेकरांच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येणार नाही. तो प्रकार असभ्यपणाच्या सर्वच मर्यादा ओलांडणारा आणि म्हणूनच अक्षम्य होता. म्हणूनच पालेकरांनी प्रेस कॉन्फरन्स बोलावण्याचा अगदी योग्य निर्णय घेतला असावा. तो इतका अचूक होता की, संबंधित सरकारी यंत्रणेला त्याची त्वरित दखल घेऊन २४ तासाच्या आत निर्णय बदलून खुलासा करावा लागला.
१९९६ च्या डिसेंबर महिन्यातच सदर गॅलरीचं उद्घाटन झालं. त्या आधी एक वर्ष १९९५ च्या डिसेंबर महिन्यातच चित्रकार प्रभाकर बरवे यांचं निधन झालं. १९९६ नंतर आणखीन पाच वर्षांनी चित्रकार वासुदेव सांतू गायतोंडे यांचं निधन झालं. दोघेही जेजेचेच, दोघेही मराठी, दोघेही मूळचे मुंबईकर. दोघांचंही कर्तृत्व फुललं ते या मुंबापुरीतच. दोघंही मितभाषी, पण या दोघांनीही अगदी मूकपणानं आपल्या कर्तृत्वाचा ठसा भारतीय चित्रकलेवर उमटवला; पण नॅशनल म्हणवणाºया या गॅलरीला मात्र बरवे यांचं कर्तृत्व समजून घ्यायला दोन तपं लागली. गायतोंडे यांचं कर्तृत्व जाणून घ्यायला त्यांना अजून किती वर्षं लागणार आहेत कुणास ठाऊक ?
- हे असं अत्यंत तिरकस विधान मी करतोय ते २३ वर्षांपूर्वी नॅशनल गॅलरीने उद्घाटनप्रसंगी गायतोंडे यांच्या चित्राचा जो घोळ घातला गेला त्याला उद्देशूनच. कारण त्या कॅटलॉगमध्ये गायतोंडे यांचं एक चित्रं चक्क उलटं छापण्यात आलं होतं. उद्घाटनप्रसंगी असला आचरटपणा केला गेला असेल तर त्या संस्थेच्या वकुबाविषयी आणखीन काय सांगायचं? तो आचरटपणा १९९६ साली खपून गेला, कारण गायतोंडे तोपर्यंत अज्ञातवासातच होते. २००१ साली त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या चित्रांनी कोट्यवधींची उड्डाणं केली आणि ते अचानक प्रकाशझोतात आले. तेव्हा केलेला आचरटपणा नंतरच्या काळात/आता कुणी खपवून घेईल/ घेतला असता का ?
***
तब्बल तीन साडेतीन तपांपूर्वीची गोष्ट. जेजे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलो होतो. त्याचवेळी कावसजी जहांगीर हॉलमध्ये दिल्लीच्या नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टची मुंबई शाखा सुरू होणार अशा बातम्या झळकल्या होत्या. कोण आनंद झाला होता त्या वाचून ! कारण, जेजेत शिक्षण घेत असताना आणि नंतरही दिल्लीच्या नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्टला अनेकदा भेट दिली होती. इंडिया गेट जवळच्या जयपूर हाउसचा तो रम्य परिसर पाहूनच अक्षरश: अवाक् झालो होतो.
- पहिल्या भेटीत ती गॅलरी पाहून काय पाहू न काय नको अशा अवस्थेत वेडावून गेलो होतो.
भारतातल्या जवळजवळ सर्वच महत्त्वाच्या चित्रकारांची पद्धतशीर लावलेली एक एक चित्रं पाहून तोंडून अक्षरश: शब्द फुटत नव्हता. तिथंच त्या काळी मला आवडत असलेल्या राजा रवि वर्माची असंख्य चित्रं पाहायला मिळाली. अमृता शेरगील, रवींद्रनाथ टागोर यांच्या दुर्मीळ चित्रांसाठी एअर कंडिशनर वापरून खास केलेली नियंत्रित तापमानाची व्यवस्था पाहून तर मी थक्क झालो होतो. भारतीय हवामानात चित्रं खराब होऊ नयेत, ती चांगल्या पद्धतीने जतन व्हावी यासाठी अशी काळजी घेतली जाते ही सारीच माहिती मला नवीन होती. त्या म्युझिअमला दिलेली ती पहिली भेट चित्रांविषयी, चित्रकलेविषयी खूप काही शिकवून गेली.
त्यामुळेच नॅशनल गॅलरी मुंबईत येणार या बातमीनं माझ्यासारखे अनेक चित्रकार तेव्हा आनंदित झाले होते. बहुदा ८४-८५ साल असावं, नॅशनल गॅलरीने वृत्तपत्रात एक जाहिरात देऊन मुंबई शाखेच्या संग्रहासाठी चित्रं आणि शिल्प मागवली. निवड समितीने जी मोजकी चित्रं निवडली, त्यात माझं जलरंगातलं एक चित्र होतं. तेव्हा तरुण होतो, त्यामुळे साहजिकच मला त्या गोष्टीचा अभिमान वाटला. वाटलं, आता आपण खरेखुरे चित्रकार झालो.. आता नॅशनल गॅलरीतून जाणारे येणारे रसिक आपली चित्रं पाहतील आणि आपल्याशी चित्राविषयी बोलतील वगैरे; पण गेल्या २३ वर्षांत असे क्षण माझ्या वाट्याला फारच थोडे आले.
कारण?- ही संग्रहातली चित्रं फारच थोड्या वेळा तिथं लावली गेली! गेल्या २३ वर्षांत तिथं सतत एका आर्ट गॅलरीप्रमाणे प्रदर्शनं आली आणि गेली, त्यामुळे मूळ संग्रहालयाकडे गॅलरीचं दुर्लक्षच झालं.
दिल्लीत तसं झालं नाही. तिथं गॅलरीचा संग्रह महत्त्वाचा ठरला आणि तोच कायमस्वरूपी दिसत राहिला. तिथंही प्रदर्शनं झालीच! राजा रवि वर्मा, अमृता शेरगील ते थेट पॉल क्ली ते पिकासोपर्यंत अनेक प्रदर्शनं तिथं झाली; पण ती संग्रहातल्या चित्रांना मारक न ठरता पूरकच ठरली.
- मुंबईच्या गॅलरीची शोकांतिका आहे, ती इथेच! अशा प्रकारचं संग्रहालय चालविण्यासाठी जो प्रशिक्षित स्टाफ लागतो तोच तिथं निवडला न गेल्यानं गॅलरीची दशा दशा होत गेली. कलेची, कलेच्या इतिहासाची किंवा कलासंग्रहाची जाण असलेला सुविद्य डायरेक्टरही या संस्थेला कधी लाभला नाही. त्यामुळे मुंबईतल्या कला रसिकांवर फॅशन शो पाहायची वेळ आली. ज्या काही सल्लागार समित्या नेमल्या गेल्या, त्यातल्या नेमणुकांमध्ये कधीच एकसंधता साधली गेली नाही. साहजिकच प्रबळ झालेल्या सल्लागारांच्या वैयक्तिक मतांचं प्रतिबिंब गॅलरीच्या कामकाजांवर आणि कार्यक्र मांवर पडू लागलं, जे या गॅलरीच्या दृष्टीनं घातक ठरलं. गॅलरीचं सूत्रचालन करणारा सूत्रधारच नेमला न गेल्यानं गॅलरीशी संबंधित प्रत्येकानं आपल्या आपल्या पुरतीच लक्ष्मणरेषा आखून घेतली आणि त्या मर्यादेतच काम केलं. साहजिकच २३ वर्षांत गॅलरी स्वत:चं अस्तित्वच निर्माण करू शकली नाही.
- मुंबई महानगरपालिकेच्या डॉ. भाऊ दाजी लाड म्युझिअमची अवस्था काही वर्षांपूर्वी कशी होती, आणि आता कशी आहे; याचा अधिक खोलात जाऊन विचार केला तर मी केलेली विधानं सहजच पडताळून पाहता येतील!
आणखीनही अशी बरीच कारणं आहेत.
त्यातलं प्रमुख म्हणजे ढिम्म उदासिनता! माझं चित्र या गॅलरीच्या संग्रहात स्थापनेपासून आहे; पण या गॅलरीच्या निमंत्रितांच्या यादीत (जर ती असेल तर) मी नाही. चित्रकलेवर सतत लिहिणाऱ्याची, कलाविषयक नियतकालिक चालवणाऱ्याची ही अवस्था!कलाक्षेत्रातल्या संबंधितांशी या गॅलरीचा ‘संपर्क’ किती अशक्त, तुटलेला आहे, हे यावरून कळतंच!
६ वाजताच बंद!
मुंबईसारख्या महानगरात बहुसंख्य कार्यालयं पाच-साडेपाच, सहा वाजताच्या सुमारास सुटत असल्याने गॅलरीची वेळ जहांगीर आर्ट गॅलरीप्रमाणे ११ ते ७ अशी करावी अशा सूचना गेल्या २३ वर्षांत अनेक चित्रकारांनी, कलारसिकांनी केल्या; पण गॅलरीने त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. ही गॅलरी रोज सायंकाळी ६ वाजताच बंद होत राहिली. त्यामुळेच संघ्याकाळी जहांगीरमध्ये येणारा कलारसिक या गॅलरीकडे कधी फिरकलाच नाही.
वेळ का बदलत नाही? - तर म्हणे दिल्लीवाले परवानगी देत नाहीत. प्रत्यक्षात दिल्लीची गॅलरी संध्याकाळी ६.३० ला बंद होते, मुंबईची दारं मात्र ६ वाजताच बंद! - आता काय बोलणार?
काय करता येईल?
एखाद्या जुन्या वास्तूला पुनर्जीवन देतांना काय काय करावं लागतं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे दिल्लीचे आर्किटेक्ट रोमी खोसला यांनी जुन्या सी.जे. हॉलचं नव्या ‘एनजीएमए’त केलेलं रूपांतरण होय. हे काम इतकं मोठं आणि महत्त्वाचं होतं की , ‘एनजीएमए’च्या स्वतंत्न दालनात त्याचंच दर्शन घडवणारं दालन उभारलं जायला हवं होतं, पण त्यासाठी संबंधितांना ‘दृष्टी’ असावयास हवी होती. त्यामुळेच ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची अशी ही निर्मिती समाजासमोर येऊ शकली नाही. याच कर्मदरिद्रीपणाचं प्रतिबिंब ‘एनजीएमए’च्या गेल्या 23 वर्षाच्या काळात वारंवार दिसून आलं आहे. कला रसास्वाद वर्ग, कला कार्यशाळा, व्याख्यानमाला, कलाविषयक चित्नपटांचं नियमित आयोजन, कलाविषयक पुस्तकांचं दुकान, कलाविषयक गप्पांचा कट्टा यासारखे असंख्य कलाविषयक उपक्रम राबवून ही वास्तू चैतन्यमय करून मुंबईकरांच्या कलाविषयक जाणिवांमध्ये भर टाकता आली असती, पण कर्मदरिद्री व्यवस्थापनाने ही संधी घालवलीच. जुन्या चित्नांना खूप मोठं आंतरराष्ट्रीय मार्केट आता तयार झालं आहे. अशा चित्नांना अस्सलपणाचं प्रमाणपत्न देण्याच्या बाबतीत देखील ‘एनजीएमए’ला खूप मोठी कामिगरी करून स्वत:च्या पायावर उभी राहण्याची मोठी सुवर्णसंधी होती, पण तेथेही सरकारी कर्मदरिद्रीपणाच आड आला. आता हे लिहून सार्याची जाणीव केल्यावर तरी सरकार कारवाई करते की पुन्हा एकदा अमोल पालेकरांना प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागेल हे आता पाहायचं !
(ज्येष्ठ चित्रकार असलेले लेखक ‘चिन्ह’ या ख्यातनाम कला-नियतकालिकाचे संपादक आहेत)
sateesh.naik55@gmail.com