‘संगीत राजदूत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 06:03 AM2019-04-07T06:03:00+5:302019-04-07T06:05:08+5:30
सोनेरी काठ असलेला सिल्कचा झब्बा, खांद्यावर शाल, कपाळावर खास बंगाली पद्धतीचे गंध आणि त्यांचा हसरा चेहरा. मी धीर करून पुढे झालो. पं. रविशंकरजींना विचारले, ‘क्या मैं आपकी एक तस्वीर ले लुं?’ चेहऱ्यावरील हास्य तसेच ठेवत त्यांनी शाल नीट केली. क्षणात माझ्या कॅमेऱ्यावरील फ्लॅश चमकला अन् ती हसरी मुद्रा माझ्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाली..
- सतीश पाकणीकर
मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील एनसीपीएच्या वातानुकूलित अशा शांत ग्रंथालयात मी माझ्या पहिल्यावहिल्या थीम कॅलेंडरच्या तयारीसाठी वाचन करीत बसलो होतो. महिना जून आणि साल होतं २००२. संगीत रसिकांसाठी खजिना असलेल्या त्या ग्रंथालयात भारतीय अभिजात संगीतातील महत्त्वाच्या कलाकारांविषयी माहिती घेण्याचं माझं काम सुरू होतं. इंडियन पोस्टच्या ३० आॅगस्ट १९८९च्या अंकात आलेल्या एका वाक्यावर माझी नजर खिळली. ते वाक्य होतं - I want to do something, create something that will endure, that will never die. भारतीय अभिजात संगीताचे जगभराचे राजदूत म्हणून गणल्या गेलेल्या पंडित रविशंकर यांनी केलेलं हे विधान. आपल्या सहजच असं लक्षात येईल की, त्यांनी हे विधान करण्याआधीच भरभक्कम असं सांगीतिक काम करून ठेवलं होतं. तीन ग्रॅमी अवॉडर््स, देशोदेशीच्या चौदा डी.लिट.पदव्या, भारतातील महत्त्वाचे नागरी सन्मान मिळाल्यावरही त्यांच्या तोंडून आलेलं हे विधान म्हणूनच महत्त्वाचं ठरतं.
आज ७ एप्रिल. पं. रविशंकर यांचा जन्मदिन. त्यांची आठवण झाल्यावर मला त्यांच्याशी झालेली पहिली भेट प्रकर्षाने आठवली. १९८५चा सुमार असेल तो. कलाकारांच्या भावमुद्रा टिपण्यासाठी मी जवळपास सर्वच मैफलींना उपस्थिती लावायचो. मग ते पुण्यातील असोत की पुण्याबाहेरील. तेव्हा दूरध्वनी ही चैन होती व मोबाइल फोनचा तर आपल्या इथे उदयही झाला नव्हता. एकदा मला मित्राकडून असे कळले की, मुंबईच्या सेंट झेविअर कॉलेजमध्ये पंडित रविशंकर यांचा कार्यक्र म आहे. आतापर्यंत त्यांची प्रकाशचित्रे मी कधी टिपली नव्हती. कार्यक्र म संध्याकाळी होता. सकाळच्या डेक्कन क्वीनने मी मुंबई गाठली. हातात भरपूर वेळ होता. आणि मनात धाकधूक. धाकधूक अशासाठी की आयत्यावेळी कार्यक्रमाचे तिकीट मिळेल याची शाश्वती नव्हती आणि पं. रविशंकर यांना मैफलीत कॅमेरा चालत नाही हेही ऐकलं होतं. संध्याकाळपर्यंतचा वेळ त्या बेचैनीत कसातरी काढला. सेंट झेविअर कॉलेजवर पोहोचलो. तिकिटाला भली मोठी रांग होती. पण मिळालं एकदाचं तिकीट. एक बाजी तर झाली पूर्ण. कार्यक्र म सुरू व्हायला थोडा वेळ होता.
मी बॅगमधून कॅमेरा काढला व गळ्यात अडकवला. कॅमेरा गळ्यात असला की ग्रीनरूममध्ये प्रवेश सुकर होतो हा माझा अनुभव होता. घडलेही तसेच. मी पोहोचलो थेट ग्रीन रूममध्ये. मोठा हॉलच होता तो. एका बाजूला गाद्यांवर स्वच्छ व शुभ्र चादरी वापरून भारतीय बैठक केलेली. दुसºया बाजूला काही खुर्च्या व कॉलेजमधील बेंच ठेवलेले. तेथे बरीच गर्दी झालेली होती. स्वयंसेवकांची धावपळ सुरू होती. कार्यक्र म सुरू होण्याची वाट पाहात असलेले काही कलाकार तर कलाकारांना भेटायला उत्सुक असलेले काही रसिक असा एकूण माहोल होता. इतक्यात मला तेथे खुर्चीवर बसलेले उस्ताद अल्लारखाँ दिसले. राखाडी रंगाची पॅण्ट, लालसर तपकिरी रंगाचा कुडता आणि सिल्कचं जाकीट असा पेहराव असलेल्या अब्बाजींच्या चेहºयावर लहान मुलाप्रमाणे अत्यंत निरागस असे भाव होते. मी पुढे होऊन नम्रपणे त्यांना ‘‘एक फोटो घेऊ का?’’ असं विचारलं. तेही लगेच म्हणाले - ‘‘जरूर !’’ एवढ्यावरच थांबले नाहीत तर म्हणाले - ‘‘मेरे लिये और एक फोटो लिजिये’’ आणि त्यांनी तेथे असलेल्या चार जणांना बोलावले. त्या पाच जणांचा मी फोटो टिपला. त्या फोटोत अब्बाजींबरोबर होते तौफिक व फझल कुरेशी हे त्यांचे दोन शिष्य व पुत्र तसेच दुसरे दोन तबलजी म्हणजे सुखविंदर सिंग नामधारी आणि पं. अनिंदो चटर्जी. माझ्या फोटोंच्या मैफलीची सुरुवात तर छान झाली होती. पण माझे डोळे पं. रविशंकर यांचा शोध घेत होते.
दाराच्या बाजूने जरा जास्त आवाज येऊ लागला म्हणून तिकडे पाहिले तर पं. रविशंकर आत येत होते. संधी छान होती; पण मनाला समजावलं की बाबा जरा दमानं घे. थोडा वेळ जाऊ दिला. पंडितजी आत येऊन स्थिरस्थावर झाले. त्यांचे काही जिवलग त्यांना भेटल्यावर तेही आनंदित झाले होते. सोनेरी काठ असलेला सिल्कचा झब्बा, खांद्यावर घेतलेली शाल, कपाळावर लावलेले खास बंगाली पद्धतीचे गंध आणि त्यांचा हसरा चेहरा सर्वांनाच आकर्षून घेणारा होता. मी धीर करून पुढे झालो. त्यांना विचारले- ‘‘क्या मैं आपकी एक तस्वीर ले लुं?’’ चेहºयावरील हास्य तसेच ठेवत त्यांनी शाल नीट केली. क्षणात माझ्या कॅमेºयावरील फ्लॅश चमकला अन् ती हसरी मुद्रा माझ्या कॅमेºयात बंदिस्त झाली. मी पुढे होऊन वाकून त्यांना नमस्कार केला व म्हणालो - ‘‘मैं पुनासे आया हुं. अगर आपकी इजाजत हो तो प्रोग्राम में आपकी कुछ तस्वीरें लेना चाहता हुं,’’ यावर ते म्हणाले - ‘‘आप अभी जितनी भी तस्वीरें निकालना चाहते हों निकाल लिजिये. प्रोग्राम में फ्लॅशलाइट से मुझे बहुत तकलीफ होती है. वो लाइट इतना ब्राइट रहता है की चमकने के बाद मुझे फिरसे कॉन्सेन्ट्रेशन करने में दिक्कत होती है.’’ त्या खोलीत पुरेसा प्रकाश नसल्याने मी कॅमेºयावर फ्लॅशगन लावली होती. त्यांना असे वाटले असावे की मी मैफलीतही फ्लॅश वापरणार. मी लगेच त्यांना ही अडचण सांगून म्हटले की - ‘‘प्रोग्राममें मै फ्लॅश का उपयोग नहीं करुंगा. वहां तो मैं स्टेज लाइटही इस्तेमाल करुंगा.’’ माझं हे उत्तर ऐकून ते म्हणाले - ‘‘अगर फ्लॅश नहीं यूज करोगे तो आप तस्वीरें ले सकते हो.’’ त्यांच्या त्या परवानगीने मला हायसं वाटलं. कार्यक्र माला थोडा वेळ होता म्हणून मी कॅमेरा परत बॅगेत ठेवला.
मग त्यांची मैफल सुरू झाली. जगातील सर्व महत्त्वाच्या शहरात व प्रमुख सभागृहात आपली अतुलनीय कला सादर केलेल्या या कलावंताने अर्थातच पहिल्या पाच मिनिटात रसिकांवर आपली मोहिनी पसरवली. त्यांच्या साथीला होते तबलानवाज उस्ताद अल्लारखाँ. मी अगदी स्टेजच्या पुढे भारतीय बैठकीवर बसलो होतो. कान त्यांच्या वादनाकडे होते; पण नजर मात्र त्यांच्या वादनात तल्लीन झालेल्या चेहºयावर. वादन करताना पंडितजींचे डोळे बंदच होते. अर्धा तास कसा गेला ते कळलेही नाही. आलाप वाजवून झाल्यावर त्यांनी जोड वाजवायला सुरुवात केली. तसा मी कॅमेरा परत बॅगेतून बाहेर काढला. त्यावर टेली लेन्स बसवली. जेणेकरून बसल्या जागेवरून मला प्रकाशचित्रे टिपता यावीत. पंडितजी मधूनच डोळे उघडत असले तरीही जास्त वेळ ते डोळे मिटूनच सतार छेडत होते.
इतक्यात एका उत्साही स्वयंसेवकाला माझ्या गळ्यातला कॅमेरा दिसला. तो कडेनी खाली वाकूनच त्वरेने माझ्यापर्यंत पोहचला. मी पंडितजींवर कॅमेरा रोखून लेन्सचे फोकसिंग करणार इतक्यात त्याने मला हटकले. आणि म्हणाला - “In this concert photography is not allowed. Keep your camera in your bag.” मी त्याला म्हणालो - “I have taken permission from Panditji. He has allowed me to take his pictures.” पण स्वयंसेवक काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. आमची थोडी बाचाबाची झाली. माझ्या मनात विचार आला की, हे म्हणजे ‘चहापेक्षा किटली गरम’. पण त्यावेळी तमाशा नको म्हणून मी त्याला म्हटले की- “As soon as Panditji finishes this ‘Raaga’ you better go and ask him whether I have taken his permission or not. Else I’m going to take photographs.”
सुमारे तासाभराने पंडितजींनी पहिला राग संपवला. ते परत सुरुवात करणार इतक्यात मी त्या स्वयंसेवकाकडे गेलो. आणि त्याला घेऊनच परत स्टेजपाशी पोहोचलो. स्टेजच्या खालच्या बाजूनेच आम्ही पं. रविशंकर यांच्याकडे बघून काही बोलणार इतक्यात स्टेजवरून तेच म्हणाले- “Let him take pictures. He has taken my permission in greenroom.” स्वयंसेवकाचा चेहरा बघण्यासारखा झाला याचा मला आनंद झाला नाही; पण आनंद याचा झाला की, आमची बोलाचाली सुरू असताना पंडितजींनी ते पाहिले होते व काय प्रकार असणार हे ताडून त्यांनी लगेचच त्याचे उत्तरही दिले होते. आभाळाएवढ्या कलावंताने एका अगदी नवख्या कलाकाराचे भान ठेवून त्याला न्याय देणे ही एरव्ही न आढळणारी घटना मी अनुभवत होतो. आधीच मला त्यांच्याबद्दल असलेला आदर शतपटीने वाढला. स्वाभाविकच त्या मैफलीत नंतर मला त्यांच्या काही खास भावमुद्रा टिपता आल्या.
पुढे कॅलेंडरच्या माध्यमातून त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार होत राहिला. माझ्या तीन कॅलेंडरमध्ये मी त्यांच्या भावमुद्रा वापरू शकलो. प्रत्येक वेळी मला याची प्रकर्षाने जाणीव होत गेली की, मोठे कलाकार हे नेहमीच सर्वार्थाने मोठे असतात. पंडित रविशंकर हे किती मोठे कलाकार होते हे सांगण्यासाठी मला त्यांच्याच एका कलाकार सहकाºयाच्या शब्दांची मदत घ्यावी लागेल... जगप्रसिद्ध व्हायोलिनवादक येहुदी मेन्युहिन म्हणतात - “Through him I have added a new dimension to my experience of Music. To me, his genius and his originality can only be compared to that of Mozart.”
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)
sapaknikar@gmail.com