सौरकंदील ते सराई कुकर
By admin | Published: December 12, 2015 06:45 PM2015-12-12T18:45:32+5:302015-12-12T18:45:32+5:30
विनाशाच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी पॅरिसमध्ये जागतिक समुदाय एकवटलेला असताना, उत्तर प्रदेशातल्या एका ‘देहाती’ वृद्धेच्या खारीच्या प्रयत्नांची चर्चा भारतात सुरू होती. असे प्रयत्न भले ‘किरकोळ’, अपुरे असतील; पण त्यांचं महत्त्व कमी नाही. त्या पाश्र्वभूमीवर या प्रश्नावर लढणा:या महाराष्ट्रातल्या ‘ऊर्जे’ची खबरबात.
Next
>- समीर मराठे
पर्यावरण समस्येच्या उकलीत महाराष्ट्राचा प्रयास.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिस येथील हवामानबदलासंदर्भाच्या शिखर परिषदेला रवाना होण्याच्या आदल्याच दिवशीची घटना. उत्तर प्रदेशातील एक अशिक्षित, खेडवळ वृद्धा देशभरात चर्चेचा विषय झाली होती.
त्या महिलेचं नाव नूरजहान.
पृथ्वीचं वाढतं तपमान, हवामानबदल, त्यामुळे सर्वसामान्यांच्या जगण्यावरच आलेलं गंडांतर आणि याबद्दलची सामूहिक जबाबदारी या गोष्टी या परिषदेच्या निमित्तानं पुन्हा एकदा ‘व्हायरल’ झाल्या.
हवामानबदलाला आणि पृथ्वीच्या प्रदूषणाला सर्वाधिक जबाबदार विकसित देशच आहेत, हे आता खुद्द विकसित देशही अमान्य करीत नाहीत. त्यामुळे यासंदर्भातील उपाययोजनांतील त्यांचा वाटा आणि अर्थातच जबाबदारीही त्यांचीच सर्वाधिक आहे. हरितगृह वायूंचं उत्सर्जन थांबवताना ‘हळद पिऊन क्षणात गोरी’ होण्याचा आततायी मार्ग अवलंबणं विकसनशील देशांनाही शक्य नाही. मात्र त्याचवेळी यासंदर्भातील प्रत्येकाचा खारीचा वाटाही तितकाच महत्त्वाचा आहे.
पॅरिसमधील हवामानबदलासंदर्भाची जागतिक परिषद आणि कानपूरच्या एका अंगठेबहाद्दर वृद्धेचा अर्थाअर्थी काय संबंध?
- आहे !
विकासापासून आजही कोसो दूर असलेल्या कानपूर जिल्ह्यातील बैरी शोभन या टिचभर खेडेगावातल्या नूरजहान या अशिक्षित महिलेचं यासंदर्भातील वैयक्तिक योगदान आणि ‘नागरिक’ म्हणून परिसराच्या विकासात स्वच्छ ऊर्जेच्या माध्यमातून तिनं केलेले प्रयत्न! भले ते छोटे असतील, पण ‘जबाबदारी’ घेणारे असल्यानं अधिकच महत्त्वाचे आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणूनच आपल्या ‘मन की बात’मध्ये या महिलेचं तोंडभरून कौतुक केलं.
असं काय विशेष केलं या महिलेनं?
म्हटलं तर काहीच नाही.
25 वर्षापूर्वी नवरा वारल्यानंतर सहा अपत्यांच्या आपल्या भरल्या गोकुळाच्या तोंडात निदान दोन घास तरी सुखासुखी पडावेत यासाठी तिनं जिवाचा आटापिटा केला. कामासाठी वणवण भटकली. मोलमजुरी केली. आजही तिची चार मुलं मजुरी करूनच पोट भरतात, तर एका मुलाचं हेअर कटिंग सलून आहे.
तीन वर्षापूर्वी मात्र तिच्या आयुष्यात एक अभूतपूर्व घटना घडली. रेडिओ सव्र्हिस ऑपरेटिंग करणा:या एका स्वयंसेवी संस्थेनं तिला एक रिचार्जेबल सौरकंदील आणि सोलर प्लेट दिली. सुरुवातीला आपल्या घरात रात्रीच्या वेळी किमान काही तास तरी प्रकाश मिळावा यासाठी ती त्याचा उपयोग करीत होती. अर्थात हा प्रयोग तसा नवा नाही. मात्र आपल्याला मिळालेले सौरदिवे आणि प्लेट विकून ‘अंधा:या’ आयुष्यातच समाधान मानणा:या कुटुंबांची संख्याही कमी नाही. नूरजहाननं तसं काहीही न केल्याचं पाहून त्या स्वयंसेवी संस्थेनं नूरजहानला आणखी काही सौरकंदील आणि सोलर प्लेट्स दिल्या.
यानंतर मात्र या जिद्दी महिलेनं आपल्याबरोबर इतरांच्याही घरात प्रकाश पेरण्याचा वसा घेतला. या सौरकंदिलांची संख्या तिनं पन्नासर्पयत वाढवली आणि आसपासच्या तब्बल पाच गावांतली घरं या ऊर्जेनं तिनं प्रकाशमान केली.
त्यासाठीचा उपायही अगदी साधा.
ज्या कोणाला आपल्या घरात प्रकाश हवा असेल त्यानं दिवसाला केवळ तीन-चार रुपये भाडं द्यायचं (मासिक शंभर रुपये) आणि हा कंदील घरी घेऊन जायचा! त्यामुळे त्यांच्या घरातला अंधार तर दूर झालाच, शिवाय मुलांच्या अभ्यासासाठीही त्याचा उपयोग झाला!
नूरजहानकडून सौरकंदील घेतलेले गावकरी रोज सकाळी तिच्याकडे कंदील आणून देतात, आपल्याकडे असलेल्या सोलरप्लेटच्या माध्यमातून नूरजहान हे कंदील चार्ज करून ठेवते. दुपारनंतर गावकरी ते परत घेऊन जातात.
साधासा उपाय.
पण किती गोष्टी त्यातून साधल्या!
- अनेकांच्या घरांत पहिल्यांदाच ‘प्रकाश’ आला. त्यांची मुलं शिकायला, अभ्यास करायला लागली. त्याचवेळी पारंपरिक ऊर्जेचा वापर कमी झाला. पर्यायी ऊर्जास्त्रोत सुरू झाला, लोकांना त्याची सवय लागली, वैयक्तिक पातळीवर प्रदूषण कमी झालं, स्वत:चं आयुष्य बदलताना स्वच्छ ऊर्जेच्या एका महाप्रचंड स्रोताचा वापर सुरू झाला, हवामानबदल आणि जागतिक तपमानवाढीच्या संदर्भातला आपला खारीचा वाटा प्रत्येकानं उचलायला सुरुवात झाली!..
- पृथ्वी अक्षरश: विनाशाच्या उंबरठय़ावर उभी असताना ‘किरकोळ’ म्हणवणारे असले उपाय खचितच पुरेसे नाहीत, पण त्यांचं महत्त्वही कमी नाही.
सरकारी आणि सार्वजनिक पातळीवरील मोठय़ा उपायांबरोबरच, वैयक्तिक पातळीवरील अशा सार्वत्रिक प्रयत्नांनी पृथ्वीचं आयुष्य वाढतानाच सुदृढ आरोग्याकडे पावलं टाकण्याची ही ‘सामान्य’ वाट आहे.
नूरजहान हे एक उदाहरण.
अशा प्रकारची उदाहरणं देशात, महाराष्ट्रात नसतीलच असं नाही, जाणतेपणी किंवा अजाणतेपणी अशा मार्गाचा अवलंब ठिकठिकाणी केला जातोय हे खरंच आहे.
महाराष्ट्रात यासंदर्भात काय स्थिती आहे?
त्यासाठी कोणकोण काय करतंय?
हवामानबदल किंवा पर्यायी ऊर्जेसंबंधात अगदी थेट नाही, तरी काही प्रमाणात हे कार्य निश्चितपणो सुरू आहे.
यासंदर्भात काही संस्था राष्ट्रीय स्तरावर काम करताहेत, तर काहींचे कार्यकर्ते महाराष्ट्रात सक्रिय आहेत.
त्याचीच ही थोडक्यात तोंडओळख.
‘समुचित एन्व्हायरोटेक’
पुणो येथील संशोधक आणि सामाजिक कार्यकत्र्या प्रियदर्शिनी कर्वे यांनी आपल्या ‘समुचित एन्व्हायरोटेक’ कंपनीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण कार्य करताना शहरी, निमशहरी आणि मुख्यत्वे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी घरोघरी वापरता येतील अशी सहजसोपी आणि शाश्वत उत्पादनं विकसित केली आहेत. पर्यावरणाच्या संदर्भात सर्वसामान्य माणसांच्या सवयी बदलताना त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडविण्याचा त्यांचा प्रयत्न अतिशय आश्वासक असा आहे. केवळ भारतच नव्हे, तर विकसनशील देशांतील सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील नागरिकांना सहजपणो राबवता येतील असे कृतिशील प्रयोग हे या प्रयत्नांचं महत्त्वाचं वैशिष्टय़ आहे.
देशभरात, विशेषत: ग्रामीण भागात स्वयंपाकघराच्या माध्यमातून होणारं प्रदूषण आणि त्याचा स्त्रियांच्या आणि कुटुंबाच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळणं हे त्यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे.
ग्रामीण भागात स्वयंपाकघरात मुख्यत्वे लाकडे आणि बायोमासचा, तर शहरी भागात एलपीजीचा इंधन म्हणून मोठय़ा प्रमाणात वापर होतो. या इंधनांवरची अवलंबिता कमी करावी, प्रदूषण टाळावं आणि आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून प्रियदर्शिनी कर्वे यांनी सराई कुकर, संपदा आणि भारतलक्ष्मी स्टोव्ह, निधरुर चुली. अशा अनेक उत्पादनांची निर्मिती केली आहे.
संपूर्णत: शास्त्रीय पद्धतीनं तयार केलेली असूनही पर्यावरणपूरक, गरिबांनाही सहजपणो परवडू शकतील अशी. त्यांच्या सवयींचा पूर्णपणो अभ्यास करून तयार केलेली ही उपकरणं हाताळण्यासही अत्यंत सोपी अशी आहेत. कमीत कमी इंधनात जास्तीत जास्त उपयोगिता, जवळजवळ निधरूर, अन्नपदार्थ शिजवण्याच्या वेळेत बचत, पारंपरिक इंधनातून उत्सर्जित होऊ शकणा:या घातक वायूंपासून मुक्तता, त्याचबरोबर एकाचवेळी मोठय़ा प्रमाणात अन्नपदार्थ शिजवण्याची क्षमता असणारी उत्पादनं (मेस, कॅण्टिन, हॉटेल, रेस्टॉरण्ट्स, हॉल्स. इत्यादि) यामुळे पारंपरिक इंधनांवरील भार ब:यापैकी हलका होत आहे. याशिवाय किचन वेस्ट, फूड वेस्ट, भाजीपाला, फळं, झाडांची पानं, बागा, शेती इत्यादिंपासून निर्माण होणा:या कच:याचं शास्त्रीय पद्धतीनं नियोजन, औद्योगिक पातळीवर, कार्पोरेट ऑफिसेसमध्ये आणि वैयक्तिक पातळीवर होणा:या कार्बन फूटप्रिंटचं मोजमाप करणारं कॅलक्युलेटर. अशा अनेक गोष्टींत प्रियदर्शिनी कर्वे यांचं महत्त्वाचं योगदान आहे. याबरोबरच पारंपरिक विजेला पर्याय म्हणून सौरकंदील, दिवे (यासाठी सूर्यप्रकाशाचीही गरज नाही, दिवसाच्या साध्या प्रकाशातही ते चार्ज होऊ शकतात), कचरा व्यवस्थापनासाठी पर्यावरणपूरक बॅग, शाकाहारी आणि मांसाहारी नागरिकांसाठी वजनाने जगातील सर्वात हलके बार्बेक्यू. हे सारेच प्रयत्न पर्यावरण आणि भारतीय नागरिक डोळ्यांसमोर ठेवूनच केले आहेत, केले जात आहेत.
तेर पॉलिसी सेंटर
संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमाचे (यूएनईपी) माजी संचालक आणि ‘ओझोन अॅक्शन’ शाखेचे प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या डॉ. राजेंद्र शेंडे यांच्या पुढाकारातून तयार झालेली संस्था म्हणजे ‘तेर पॉलिसी सेंटर’. या संस्थेचे ते संचालक आहेत.
पर्यावरणाच्या स्तरावर आणि कास पठाराला जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित होण्यातील त्यांचे योगदान सगळ्यांनाच ठाऊक आहे.
त्यांनी उभारलेल्या ‘तेर पॉलिसी सेंटर’च्या माध्यमातून पर्यावरण आणि हवामानबदलाच्या संदर्भात महाराष्ट्रात आणि पर्यायाने भारतात महत्त्वपूर्ण काम केले जात आहे.
1) अर्थ केअर अवॉर्ड
पर्यावरणसंकटामुळे पृथ्वीच्या आयुष्याची दोरी विटत चालल्याने त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना, यासंदर्भात उल्लेखनीय कार्य करणा:या संस्था आणि व्यक्तींना ‘तेर’तर्फे विविध पुरस्कारांनी गौरविले जाते. पाच लाखांर्पयतच्या रोख रकमेने गौरविल्या जाणा:या या पुरस्कारासाठी इतरही काही संस्थांतर्फे साहाय्य केले जाते. मुख्यत: चार प्रमुख गटांत या पुरस्कारासाठी वर्गवारी केली जाते. ‘कम्युनिटी’, ‘रुरल’, ‘इंडस्ट्री’ आणि ‘इनोव्हेशन’.
2) डॉ. अब्दुल कलाम फेलोशिप
पर्यावरणाच्या क्षेत्रत उल्लेखनीय कार्य करणा:या तरुणांना एक लाख रुपयांर्पयतची फेलोशिप देण्यात येते. ग्रामीण भागात काम करणा:यांचाही प्राधान्याने यासाठी विचार केला जातो.
3) स्मृतिवन
आज हयात नसलेल्या आपल्या जवळच्या नातेवाईक आणि आप्तांसाठी उभारलेले ‘स्मृतिवन’ (फॉरेस्ट ऑफ मेमरी) असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीचे नाव ‘अजरामर’ व्हावे आणि त्याच्या स्मृती चिरंतन राहाव्यात म्हणून त्या व्यक्तीच्या नावाने झाड लावले आणि जगवले जाते. अशा अनेक झाडांचे वन म्हणजे ‘स्मृतिवन’!
या उपक्रमांव्यतिरिक्त ‘तेर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन किट’, ‘अर्बन फॉरेस्ट्री’, ‘वेस्ट मॅनेजमेंट अॅसेसमेंट’, पश्चिम घाट आणि कास पठाराच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती, संरक्षण, जागतिक वारसा स्थळांच्या संदर्भात स्थानिक लोकांना प्रशिक्षण, पुरस्कार. असेही अनेक पर्यावरणपूरक उपक्रम ‘तेर’तर्फे राबवले जातात.
प्रयास
ऊर्जा क्षेत्रत अतिशय महत्त्वपूर्ण काम करणारी महाराष्ट्रातली संस्था म्हणजे ‘प्रयास’. अर्थात त्यांचे प्रयास फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाहीत. देशातील काही राज्यांत आणि अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही या संस्थेचे कार्य चालते ते नावाजलेही गेले आहे.
एनर्जी एफिशिअन्सी, रिन्युएबल एनर्जी, ऊर्जेच्या सरकारी धोरणांबाबत सरकारला मदत करणो, त्यांना सल्ला देणो, त्याचं विश्लेषण करणो आणि ऊर्जाविषयक एकूणच पॉलिसी अॅनालिसिस आणि पॉलिसी अॅडव्होकसी यासंदर्भातील संस्थेचं योगदान अतिशय उल्लेखनीय असं आहे.
सरकारी धोरणांत पारदर्शकता यावी यासाठीचे अथक प्रयत्न करतानाच सामाजिक दबावगट निर्माण करून प्रशासकीय यंत्रणा आणि धोरणांत सुसूत्रता आणण्यासाठीचे संस्थेचे प्रयत्न अतिशय फलदायी ठरले आहेत.
विजेचे कार्यक्षम उत्पादन आणि वहन यासंदर्भात ‘प्रयास’चे सातत्याने संशोधन सुरू आहे. ऊर्जेचे उत्पादन जितके महत्त्वाचे, तितकेच किंवा त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे ऊर्जेचा कार्यक्षम वापर आणि त्याच्या गळतीचे मार्ग रोखणो. वातावरणबदलाच्या आणि जागतिक तपमानवाढीच्या संकटाला रोखायचे तर अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरालाही प्राधान्य मिळायला हवे. तशी परिस्थिती तयार व्हायला हवी. यासाठीही संस्थेचं योगदान अतिशय उल्लेखनीय आहे.
पवनऊर्जा, जलविद्युत, सौरऊर्जा, वाया जाणा:या पदार्थापासून ऊर्जानिर्मिती यांसारख्या उपायांची कास धरणो भारताला अनिवार्य आहे. त्यासाठीचे भारताचे अलीकडच्या काळातील प्रयत्नही अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील दखलपात्र असेच आहेत.
या प्रयत्नांना चालना देणं आवश्यक आहे. मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्तीत आणि पर्यावरणाच्या प्रतिकूल परिस्थितीत भारतासारख्या बलाढय़ लोकसंख्येच्या देशाला स्वच्छ आणि आधुनिक ऊर्जेचा पुरवठा होणं हीदेखील एक बिकट समस्या आहे.
या सा:या गोष्टींत मार्गदर्शकाचं काम करतानाच अगदी घरगुती पातळीवरील सर्वसामान्यांनाही या प्रक्रियेत सामील करून घेण्याचे ‘प्रयास’चे प्रयत्न पर्यावरणसमस्येवरील उत्तरांना पूरक ठरतील असेच आहेत.
काय उपाय करता येतील?
वातावरणातील कार्बन डायऑक्साइडवर र्निबध
वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी करायचं तर त्यासाठी झाडांची संख्या वाढवणं, वृक्षलागवड हा एक प्रभावी मार्ग आहे. जंगलांखालची भूमी काही पट वाढली तर कार्बन डायऑक्साइडचे दुष्परिणाम कमी होऊ शकतील.
कार्बन डायऑक्साइडची साठवण
कोळशाच्या ज्वलनानंतर त्यातील कार्बन डायऑक्साइड वेगळा काढून तो भूगर्भातील खाणींमध्ये साठवून ठेवता येतो. त्यासाठी वेगवेगळ्या तंत्रंचा उपयोग केला जातो.
ऑक्सिफ्युरल फायरिंग
कोळशाचे हवेच्या ऐवजी फक्त ऑक्सिजनने ज्वलन केले तर त्यामुळे ज्वलनानंतर फक्त कार्बन डायऑक्साइड तयार होतो. त्याची लगेच साठवण करता येऊ शकते.
हायड्रोजनचे नियोजन
हायड्रोजन हे प्रभावी इंधन आहे. त्याच्या ज्वलनाने फक्त पाण्याची निर्मिती होते. हायड्रोजन हा हलका वायू असल्याने त्याला दाबाखाली साठवता येते, मात्र तो अतिशय ज्वालाग्राही असल्याने त्याच्या वापरावर बंधने आहेत.
जैविक इंधने- शेती उत्पादनांतून निर्माण होणा:या इंधनांना जैविक इंधने म्हणतात. ही इंधने प्रामुख्याने प्रकाश संश्लेषणातून निर्माण होतात. त्यापासून कार्बन डायऑक्साइड निर्माण होत असला तरीदेखील इंधनासाठी वापरले जाणारे खनिज तेल किंवा कोळशाचा वापर यामुळे मर्यादित करता येऊ शकतो.
अपारंपरिक ऊर्जास्रोत
अणुऊर्जा- अणुऊर्जेच्या वापरामुळे हरितवायूंचे उत्सर्जन होत नाही, पण किरणोत्सर्गाचा त्रस आणि अणुभट्टय़ांची सुरक्षितता हे यासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे आहेत.
कर- हरितवायूंच्या जादा उत्सर्जनावर त्या त्या प्रमाणात कर लादणो.
र्निबध- हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाविषयी बेफिकीर असलेल्या देशांवर र्निबध लादणो किंवा उत्सर्जन कमी करण्याबाबत त्यांना बाध्य करणो.
कार्बन क्रेडिट-
क्लीन डेव्हलपमेंट मेकॅनिझम अंतर्गत कार्बन क्रेडिटची सोय करण्यात आली आहे. या कलमानुसार विकसित देशांनी अविकसित देशांत विकास केल्यास त्यांना त्याचा फायदा मिळतो. अविकसित देशही विकसित देशांना आपले कार्बन क्रेडिट विकू
शकतात.
आयएनईसीसी
कोणत्याही क्षणी प्रगतीची वाट न सोडता विकास साधणं ही प्रत्येक देशासाठी अत्यंत अत्यावश्यक गोष्ट. प्रगतीची, विकासाची दिशा तर सोडायची नाही आणि या वाटेवरील ‘काटे’ही आपल्याला बोचू द्यायचे नसतील तर त्यासाठीचा मार्गही चांगला असला पाहिजे. देशाने ही वाट चालत असताना चांगल्यात चांगल्या कोणत्या मार्गाचं बोट धरलं पाहिजे याविषयी सजग करणारी संस्था म्हणजे ‘इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अॅण्ड क्लायमेट चेंज’ अर्थात ‘आयएनईसीसी’.
हे खरं तर एक जाळं, नेटवर्क आहे आणि भारतभरात ते पसरलेलं आहे. महाराष्ट्रातही त्याचे कार्यकर्ते आहेत आणि पर्यावरणाच्या संदर्भात आपल्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा फायदा ते इतरांनाही करून देत आहेत.
पर्यावरणासंदर्भात सातत्यानं संशोधन आणि त्यासंदर्भातलं ‘डॉक्युमेंटेशन’ असा अजोड संयोग या नेटवर्कनं साधला आहे.
स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीर्पयत सर्वसामान्य स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि पर्यावरणासंबंधांची धोरणं ठरवताना त्यांच्या आवाजाला ‘किंमत’ मिळवून देण्यात या नेटवर्कनं महत्त्वाचा वाटा उचलला आहे. पर्यावरणासंदर्भातील प्रक्रिया, पर्यावरणपूरक धोरणांचा प्रचार आणि प्रसार, त्यामुळे वैयक्तिक वर्तन आणि आचारात करावे लागणारे बदल तसेच पर्यावरणासंबंधाची धोरणं राबवली जात असताना कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी तरुण आणि वेगवेगळ्या क्षेत्रतील नागरिकांची मोट बांधण्याचं कामही या नेटवर्कतर्फे केलं जातं. विकासाच्या वाटेत या सगळ्याच घटकांना आपलंही मत मांडण्याचा रास्त अधिकार मिळावा यासाठी चर्चेची आणि संवादाची व्यासपीठंही निर्माण केली जातात.
(लेखक ‘लोकमत’मध्ये
उपवृत्तसंपादक आहेत.)
marathesam@gmail.com