स्री-दास्यमुक्तीसाठी सावित्रीबाईंचा संघर्ष...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 06:00 AM2021-01-03T06:00:00+5:302021-01-03T06:00:07+5:30
महात्मा फुले यांनी ज्या काळात स्रीशिक्षणाची चळवळ हाती घेतली, लोकांना आपल्या गुलामगिरीची जाणीव निर्माण करून दिली, तो काळ अतिशय कठीण होता. अशा काळात सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांना मोलाची साथ दिली. एवढेच नव्हे, त्यांचे स्वकर्तृत्वही फार मोठे होते.
-बी. व्ही. जोंधळे
महात्मा जोतिबा फुले यांनी ज्या सनातनी काळात स्रीशिक्षणाची चळवळ हाती घेऊन शूद्रातिशूद्रांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव निर्माण करून देणारे महान कार्य केले, त्या कार्यात सावित्रीबाई फुलेंचे योगदान फार मोठे राहिलेले आहे. यासंदर्भात खुद्द, जाेतिबांनीच असे नमूद करून ठेवले आहे की, ‘मी जे काही सामाजिक कार्य करू शकलो त्यात सावित्रीबाईंचा वाटा मोठा आहे.’ खरे आहे. सावित्रीबाई या म. फुलेंच्या क्रांतिकारी आंदोलनाच्या साथी होत्या. जोतिबांप्रमाणेच त्यांच्यात अलौकिक गुण होते. समाजनिंदा हसतमुखाने सहन करत जोतिबांच्या कार्यात त्यांनी निष्ठेने साथ दिली. ज्या काळात मुलींना शिक्षण देणे हा धर्मद्रोह मानला जात होता, त्या काळात मुलींच्या शाळेत शिकवायला जाणाऱ्या सावित्रीबाईंवर सनातन्यांनी दगड-धोंड्यांचा- शेणसड्याचा मारा केला; पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. त्या म्हणाल्या ‘हे माझ्या भावांनो, मला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही माझ्यावर दगड-धोंडे नव्हे, तर फुलांचा वर्षाव करीत आहात. तुमच्या या कृतीने मला हाच धडा मिळत आहे की, मी निरंतर आपल्या बहिणींची सेवा करत राहावे, ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो.’ म. फुलेंनी मुली व अस्पृश्यांसाठी ज्या शाळा काढल्या, त्या सर्वच शाळांतून सावित्रीबाईंनी शिक्षिकेची भूमिका सनातन्यांचा विरोध पत्करून समर्थपणे पार पाडली. सावित्रीबाई देशाच्या पहिल्या शूद्र शिक्षिका होत्या.
म. जोतिबा फुलेंनी अनैतिक संबंधातून जन्माला येणाऱ्या अर्भकांचा सांभाळ करण्यासाठी १८६३ साली जे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले, त्याठिकाणी जन्माला येणाऱ्या अनाथ बालकांच्या त्या आई बनल्या. काशीबाई नामक विधवा-बाईने जन्म दिलेल्या बालकास फुले दाम्पत्याने दत्तक घेतले. त्याला शिकविले. डॉक्टर केले. त्याचे नाव यशवंत ठेवले. त्याचे लग्न करून दिले. सावित्रीबाई विशाल अंत:करणाच्या होत्या.
महाराष्ट्रात १८७६-७७ साली मोठा दुष्काळ पडला होता. म. फुलेंच्या सत्यशोधक समाजाने अन्नछत्रालये उघडून तेव्हा दुष्काळग्रस्तांना जी मदत केली, त्या दुष्काळ निवारण कार्यातही सावित्रीबाईंनी मोलाची भूमिका निभावली. १८९७ साली महाराष्ट्रात जी कॉलऱ्याची मोठी साथ आली होती त्या साथीतही सावित्रीबाईंनी काॅलराग्रस्तांची सेवा केली. या साथ काळातच अस्पृश्य जातीचे एक मूल रस्त्याच्या कडेला काॅलऱ्यामुळे असहाय स्थितीत पडले होते. त्याच्याकडे कुणी लक्षच देत नव्हते. सावित्रीबाईंनी त्या मुलाला खांद्यावर घेऊन त्यांचे दत्तकपुत्र डाॅ. यशवंत यांच्या दवाखान्यात नेऊन त्याच्यावर उपचार केले. परिणामी, सावित्रीबाईंनाही काॅलऱ्याची लागण होऊन १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले. सावित्रीबाई लेखिका- कवयित्री होत्या. त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह १८५४मध्ये प्रसिद्ध झाला. शूद्रातिशूद्रांची दु:खे त्यांनी कवितेतून मांडली. जोतिबांच्या निधनानंतर त्यांनी फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे नेतृत्वही समर्थपणे केले.
फुले दाम्पत्याने हाती घेतलेल्या शैक्षणिक चळवळीमुळे मुली शिकू लागल्या. सर्वच क्षेत्रांत प्रगती करू लागल्या; पण खरा प्रश्न असा आहे की, फुले दाम्पत्याला अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तनाचे स्वप्न खरोखरच प्रत्यक्षात उतरले आहे काय? दलित, आदिवासी, स्रीवर्गाची रूढी- परंपरा- अन्याय, अत्याचार व गुलामगिरीच्या जोखडातून खरोखरच मुक्तता झाली आहे काय? उत्तर नाही असेच आहे.
महाराष्ट्र हे स्वत:ला एक पुरोगामी राज्य म्हणविते; पण म्हणून महाराष्ट्रात स्रियांचा सन्मान करून खरोखरच त्यांच्यावर अत्याचार होत नाहीत काय? राष्ट्रीय गुन्हे नोंदणी कार्यालय (एनसीआरबी) दरवर्षी देशात घडलेल्या गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करत असते. एनसीआरबीचा २०१९मध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार स्रियांसंदर्भात देशात घडलेल्या गुन्ह्यांपैकी ९.२ टक्के गुन्हे महाराष्ट्रात घडले आहेत. त्यानुसार गेल्या तीन वर्षांतील वर्गवारी अशी की, स्रियांसंदर्भात २०१७ साली ३१,९७९, २०१८ साली ३५,४७९, तर २०१९ मध्ये ३७,१४४ गुन्हे घडले. म्हणजे दरवर्षी अत्याचारात वाढच होत गेली. २०१९मध्ये बलात्कार आणि खुनाची ४७ प्रकरणे घडली. हुंडाबळी १९६, आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या ८०२ घटना, ६ ॲसिड हल्ले, पळवून नेण्याच्या ७,००८ घटना, नातेवाइकांकडून अत्याचाराच्या ८,४३० घटना घडल्या. लग्नाचे आमिष दाखवून ९०६ महिलांना पळवून नेण्यात आले. २०१९ मध्ये महाराष्ट्रात २,३०५ महिलांवर बलात्कार झाला. पैकी १८ ते ३० वयोगटातील १,५४९ व ३० ते ४५ वयोगटातील ६९५ स्रिया बलात्काराच्या बळी ठरल्या. ४५ ते ६० वयोगटातील ५९, तर ६०हून अधिक वयोगटातील दोन स्रियांवर बलात्कार झाला. बलात्कार करणारे ओळखीचे, तसेच नात्यातील होते. महाराष्ट्रात सावित्रीच्या लेकींची स्थिती ही अशी आहे. देशाचा तर प्रश्नच नाही. तरीही आपण पुरोगामीच ठरतो. तात्पर्य, महिला-मुली, दलित, आदिवासी व गोरगरीब वर्गावर होणारे अन्याय, अत्याचार, थांबवून त्यांना समतेची वागणूक देणे व यासाठी जातिव्यवस्था मोडून टाकणे हीच सावित्रीबाई फुलेंना खरी मानवंदना ठरेल. सावित्रीबाईंचा स्मृतीस प्रणाम !
(लेखक फुले-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.)