सावित्रीच्या नाती
By admin | Published: January 2, 2016 02:45 PM2016-01-02T14:45:53+5:302016-01-02T14:45:53+5:30
या पोरींच्या आईबापांनी, आज्या-पणज्यांनी जंगलाबाहेरचं जग बघितलेलं नाही. त्यांच्याही पायाखालचा रस्ता धुळीचा आणि मोठय़ा कष्टांचा! पण त्यांनी पाय उचलला आहे, शाळेच्या दिशेने.. काय आहे त्यांच्या मनात आणि आयुष्यात?
Next
>सावित्रीबाई फुले. देहाने हयात असत्या तर 185 वर्षाच्या असत्या. नाही ती त्यांची कुडी. पण शाळेकडे जाणा:या मुलींच्या प्रत्येक पावलात आजही त्या आहेतच. आज त्यांचा जन्मदिवस. 1848 मध्ये पुण्याच्या ज्या भिडे वाडय़ात त्यांनी सहा पटसंख्येसह मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, त्यालाही आता 168 वर्षे उलटली आहेत.
..पण अजूनही शाळेच्या दिशेने वळणारी मुलींची पहिलीवहिली पावलं महाराष्ट्राच्या मातीत उमटणं थांबलेलं नाही.
मेळघाटात जाऊन पाहा. संशोधक असोत, अभ्यासक वा पत्रकार, मेळघाटात लोक जातात, ते कुपोषणाचा ‘घास’ ठरणा:या दुर्दैवी मुलांची खबर घेण्यासाठी.
पण इथल्या वाडी-वस्त्यांमधून जाणा:या पायवाटा आश्रमशाळांच्या दिशेनेही जातात आणि त्यावरून चालणा:या कच्च्याबच्च्यांमध्ये मुलींची संख्या सगळ्यात जास्त असते.
या मुलींची नावंही जुनी, कोरकू भाषेतली नाहीत. इथे भेटतात त्या रविना, अनिता नाहीतर पल्लवी. या मुलींनी काहीशे किलोमीटर अंतरावर असलेलं जिल्ह्याचं ठिकाण - अमरावती पाहिलेलं नाही. त्यांनीच काय त्यांचे आई-बाप, आजे-पणजे कुणीच पाहिलेलं नाही.
- पण म्हणून काय झालं?
जग त्यांच्यार्पयत पोचलं नसलं, तरी इथली अनिता किरण बेदींना ओळखते आणि तिला शिकून पोलीस व्हायचंय.
सावित्रीबाईंना भेटती अनिता, तर धन्य वाटलं असतं त्यांना.
- पण आपण तरी भेटूया या मुलींना.
म्हणूनच आम्ही थोडी पायपीट केली आहे. मेळघाट आधीच दुर्गम. आम्ही निवडली या दुर्गम भागातली काही दुर्गम आणि अतिदुर्गम गावं. बोरी, केकर्दा, मोगर्दा, हरिसाल. अशी दोन टोकाची. अमरावती जिल्ह्याच्या धारणी तालुक्यातली. यातलं बोरी गाव कदाचित येत्या काही महिन्यांत भारताच्या नकाशावरूनच अस्तंगत झालेलं असेल. हे गाव अतिदुर्गम असून, जंगलाच्या बफर झोनमध्ये आहे. त्यामुळे हे संपूर्ण गाव जंगलातून उठवून त्याचं पुनर्वसन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे हरिसाल! हे त्यातल्या त्यात मोठं, हमरस्त्यावरचं आणि बॅँकेपासून वन विभागार्पयत सरकारी कार्यालयं असलेलं, बाहेरच्या लोकांशी ‘जानपहेचान’ असलेलं संमिश्र लोकवस्तीचं मेळघाटातलं मध्यवर्ती गाव. मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं देशातलं पहिलं ‘आदर्श डिजिटल व्हिलेज’ होण्याच्या दिशेनं या गावानं पावलं टाकायला सुरुवात केलीय.
तिथे भेटल्या सावित्री कुरारटे.
म्हणजे कोरकू भाषेत ‘सावित्रीच्या नाती’.