शाळा बंद, शिक्षण सुरूच.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 06:03 AM2020-06-14T06:03:00+5:302020-06-14T06:05:09+5:30
लॉकडाउननंतरच्या काळात ग्रामीण, आदिवासी भागातील शाळा आणि तिथली मुलं यांचं शिक्षण कसं होणार हा आज अत्यंत कळीचा प्रश्न आहे. ना तंत्रज्ञान, ना मोबाइल, ना रेंज. पण तरीही काही धडाडीच्या शिक्षकांनी त्यावर अफलातून उपाय शोधलेत.
- संतोष मुसळे
शाळकरी मुलांचे जून 2019 पासून सुरू झालेले शैक्षणिक सत्न एप्रिलमध्ये परीक्षा घेऊन संपते, मात्न यावर्षी अचानक 22 मार्चपासून शाळांना सुट्टी लागल्यामुळे मुलांसह पालक व शिक्षकही चिंतावले. जूनमध्ये शाळा सुरू होतील, की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे.
आजघडीला राज्यातील ग्रामीण भागात मात्र काही ठिकाणी शाळा बंद; पण शिक्षण सुरू आहे. ग्रामीण भागातील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचलेच पाहिजे या हेतूने मुख्यमंत्नी उद्धव ठाकरे, शिक्षणमंत्नी प्रा. वर्षा गायकवाड, शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक दिनकर पाटील व आयटी उपसंचालक विकास गरड यांनी पुढाकार घेऊन ‘दीक्षा अँप’च्या माध्यमातून ते पोहचवणे सुरू केले आहे. याचा लाभ दररोज ग्रामीण भागातील दोन लाख मुले घेताना दिसतायेत.
दि. 13 एप्रिल 2020 पासून पहिली ते दहावीच्या मार्च-एप्रिलमधील अभ्यासक्रमावर आधारित अभ्यासमाला सुरू होती. दीक्षा नावाच्या अँपवर ते प्रसारित केले जाते आहे.
दीक्षा अँपमध्ये इयत्ता पहिली ते दहावीचे 9700हून अधिक व्हिडीओज व स्वाध्याय उपलब्ध आहेत.
मात्र खरी चिंता होती ती ग्रामीण भागात. जिथे ना मोबाइलची रेंज, ना शिक्षणाच्या कुठल्या सुविधा. या ग्रामीण भागातील मुलांना पाठय़पुस्तक व पाठय़पुस्तकाबाहेरचे म्हणजेच परिघाबाहेरचे शिक्षण देणारे काही शिक्षक मनापासून काम करताहेत.
ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागातील हे शिक्षक मुलांचे शिक्षण बंद पडू नये, यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून मुलांची शिक्षणाची गोडी वाढवताहेत. शाळा प्रत्यक्ष बंद असली तरी त्यांचे शिक्षण मात्र सुरू आहे. असे उपक्रमच ग्रामीण भागातील शिक्षणाला चालना देऊ शकतील.
अँपच्या मदतीने
घरात भरताहेत वर्ग..
आवलगाव
लॉकडाऊनमुळे आवलगाव (ता. घनसावंगी, जिल्हा जालना) येथील शाळा बंद झाली. मुलांना शाळेव्यतिरिक्त शिक्षणाचा कुठलाही स्रोत गावात नसल्यामुळे ही मुले शिक्षणापासून दुरावतील, अशी भीती होती. मात्न दीक्षा अँपचा फायदा विद्यार्थी व पालकांनी घेतला.
आजूबाजूच्या मुला-मुलींना शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष र्शीमती शारदाताई ठेंगडे यांच्या घरी बोलावून दीक्षा अँपवरील वर्गनिहाय अभ्यासक्रम त्यांना दाखवला जातो. मुले तो पाहतात. शिकतात. आपसात चर्चा करून काही अडचणी असल्या तर सोडवतात.
याकामी शाळेतील सर्व शिक्षक, सधन व्यक्ती, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचेही मार्गदर्शन वेळोवेळी घेतले जाते.
जंगल देतेय
व्यावहारिक शिक्षण
आतोणे
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका डोंगराळ तालुका म्हणून ओळखला जातो, रोहा तालुक्यात सुगम, दुर्गम व अतिदुर्गम क्षेत्नात शाळेची विभागणी केली आहे.
तालुका ठिकाणापासून 23 किलोमीटर अंतरावर अतिदुर्गम क्षेत्नात चिंचवली व आतोणे ही गावे मिळून गटग्रामपंचायत आहे. आतोणे येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र गेल्या चार वर्षांपासून या शाळेला इमारत नाही. एका आदिवासी वाडीतील समाजमंदिरात ही शाळा भरते. तेथे ना शौचालय आहे, ना किचन शेड, ना मुलांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था.
गजानन जाधव नावाचा तरुण शिक्षक तीन-चार दिवसाआड शाळेत जाऊन चार भिंतीबाहेरील ज्ञानदानाचे धडे तिथल्या मुलांना देतोय.
शाळेतील 95 टक्के मुलांकडे व त्यांच्या पालकांकडे साधे फोनही नाहीत. ऑनलाइन शिक्षण तर खूप दूरची गोष्ट आहे. तरी लॉकडाउन काळातही शाळेतील मुलांचे शिक्षण थांबलेले नाही. ते अनुभवातून व व्यावहारिक ज्ञानातून शिक्षण घेत आहेत. जंगलात गलोल घेऊन जाणे, गलोलच्या दगडीने आंबे पाडणे, किती दगडात किती आंबे पाडले याचे गणित करणे, करवंद जमा करणे, ते मोजून शंभर-शंभरचे गट तयार करणे, आंबे डझनात विलग करणे, ते गावात विकणे, पैशाचा हिशेब ठेवणे, घरी आई-वडिलांना कामात मदत करत मूल्यशिक्षण उपयोगात आणणे, बकरी, कोंबडी अशा पाळीव प्राण्यांची काळजी घेणे, जंगलात गेल्यावर विविध प्राणी, पक्षी, वनस्पती यांची माहिती समजून घेणे. अशा प्रकारचे चार भिंतीबाहेरील शिक्षण शाळेतील मुलं घेत आहेत.
आकाश निरीक्षण आणि
वैज्ञानिक दृष्टिकोन
शेजबाभुळगाव
देश-विदेशातील शास्रज्ञ, महाराष्ट्रातील विविध अभियांत्रिकी, वास्तुविशारद, विज्ञान महाविद्यालयांचे विद्यार्थी यांच्याबरोबरीने पाणी, निवारा, ऊर्जा, शेतीमध्ये संशोधन करणारे प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक हे दृश्य आहे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेजबाभुळगाव या शाळेचे.
शाळेत जून 2018मध्ये पैगंबर तांबोळी हे शिक्षक रुजू झाले. शाळेपासून जवळ असणार्या विज्ञानग्राम या संशोधन संस्थेच्या साहाय्याने विविध उपक्रम त्यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने राबविण्यास सुरुवात केल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये रुजतो आहे.
पैगंबर तांबोळी यांनी लॉकडाउनच्या काळात मागील दोन महिन्यांपासून 135 मुलांना दररोज आकाश निरीक्षणाचे धडे दिले. मुलांमध्येही त्याची आवड निर्माण केली.
चंद्राच्या विविध कला, सुपरमून व त्यामुळे पृथ्वीवर होणारे परिणाम, ढग येणे, वादळे निर्माण होणे याचा मुलं निरीक्षणातून अनुभव घेतात. सोबतच सद्यस्थितीत आकाश खूप निरभ्र व स्वच्छ असल्यामुळे शुक्र, गुरु, मंगळ, शनि, बुध हे ग्रह, ध्रुव तारा, मृग, पुनर्वसू व रोहिणी नक्षत्ने मुले आता सहज ओळखायला लागलीत.
तांबोळीसरांना वैज्ञानिक अरुण देशपांडे व खगोलप्रेमी शिक्षक शावरसिद्ध पाटील यांचे मार्गदर्शन मिळते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ, पंढरपूर, माळशिरस व सोलापूर तालुक्यातील अनेक शिक्षक याचा फायदा घेत आहेत.
मुलांना लागलीय
वाचनाची गोडी
कोयनागुडा
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील नक्षलग्रस्त भागातील उपक्रमशील शिक्षक विनीत पद्मावार यांची कोयनागुडा ही शाळा. या आदिवासी गावात कुठल्याच फोनची रेंज व्यवस्थित नसते. अशावेळी विनीत यांनी लॉकडाउन काळात मुलं शिक्षणापासून दुरावू नयेत यासाठी देवराई आर्ट व्हिलेज व जिल्हा परिषद शाळा कोयनागुडा यांच्या संयुक्त विद्यमाने देवराई ग्राम ग्रंथालय सुरू केले आहे. या वाचनालयात आजघडीला आठशे पुस्तके आहेत. दररोज सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत हे वाचनालय सुरू असते. वाचनालयावर नियंत्नणासाठी गावातील एक सुशिक्षित तरुणी शशी मडावी काम बघते. मुलं दररोज वाचनालयात येऊन पुस्तके वाचतात व सरांना वाचलेल्या पुस्तकाची माहिती एक कागदावर लिहून पाठवतात. यामुळे मुलांचे शिक्षणही चालू आहे व गावातील नागरिकदेखील लॉकडाउनच्या काळात वाचनाचा आनंद घेत आहेत.
santoshmusle1983@gmail.com
(लेखक जालना येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत विषय सहायक आहेत.)