सिनेमाच्या माध्यमातून 'ऊर्जेचा शोध'
By Admin | Published: March 17, 2017 03:09 PM2017-03-17T15:09:09+5:302017-03-17T15:19:46+5:30
‘‘जाग येणं, परिस्थिती बदलणं, प्रेरणा मिळवणं यासाठी सिनेमा हे अत्यंत प्रभावी माध्यम. अंधश्रद्धांचं जोखड मोडण्यासाठी, स्वत्वासाठी, न्यायासाठी, सत्याच्या शोधासाठी लढा देणारी अनेक माणसं सिनेमातून भेटतात;
- संध्या गोखले
‘‘जाग येणं, परिस्थिती बदलणं, प्रेरणा मिळवणं यासाठी
सिनेमा हे अत्यंत प्रभावी माध्यम.
अंधश्रद्धांचं जोखड मोडण्यासाठी, स्वत्वासाठी, न्यायासाठी,
सत्याच्या शोधासाठी लढा देणारी अनेक माणसं सिनेमातून भेटतात;
जी जगण्यासाठी ऊर्जा देऊ करतात. अनेक सिनेमांनी ही ऊर्जा दिली आहे.
ती तरुणाईपर्यंत पोहोचावी, ‘बदलासाठीची सळसळ’ त्यातून निर्माण व्हावी हाच ‘अजेय’ सिनेमालिकेचा हेतू आहे.’’
सिनेमासारख्या माध्यमाचा उपयोग ‘चळवळी’चा एक उपक्रम म्हणून करावा हे कसं सुचलं?
एक गोष्ट सांगते, एका बौद्ध भिक्षूने त्याच्या शिष्यांचे लक्ष एका हत्तीच्या कळपाकडे वेधलं. त्या हत्तींचे पाय साध्या सुतळीने बांधले होते. इतका महाकाय प्राणी असा कसा काय राहू शकतो याचं आश्चर्य शिष्यांच्या चेहऱ्यावर उमटलं तेव्हा भिक्षू म्हणाला, ‘जन्मापासून त्याच सुतळीच्या बंधनात राहायची सवय झाल्यामुळं सुतळी तोडता यावी इतकी कमजोर आहे हा विचार व प्रयत्न हत्तींकडून झालाच नाही. तसं झालं असतं तर सहजपणानं त्यांना बंधमुक्त होता आलं असतं.’ - नव्या पिढीची अवस्था ‘अशी’ होऊ नये. कुठल्याही माध्यमानं जाग येणं, घटनांचा मागोवा घेता येणं, परिस्थिती बदलण्यासाठी प्रेरणा मिळवत राहणं नि समकालीन परिस्थितीच्या योग्य जाणिवा होणं महत्त्वाचं आहे. सिनेमा हे यासाठीचं फार प्रभावी माध्यम आहे. प्रत्येक क्षणी बदलत चाललेल्या भवतालाला जगभरातली माणसं कशी तोंड देतात, वैयक्तिक आणि सामूहिक भविष्याची दिशा कशी ठरत जाते या कहाण्या दृश्यरूपात पाहताना होणाऱ्या परिणामांपासून स्वत:ला वेगळं ठेवणं अगदीच अशक्य असतं. अंधश्रद्धांचं जोखड मोडण्यासाठी, स्वत्वासाठी, न्यायासाठी, सत्याच्या शोधासाठी लढा देणारी अनेक सामान्य, असामान्य माणसं सिनेमातून भेटतात, जी जगण्यासाठी ऊर्जा देऊ करतात. निर्णायक क्षणी यातलं कुठलंतरी पात्र आपल्याला भीती मोडायला भाग पाडतं. हा अनुभव माझ्यासह असंख्य माणसं घेताहेत नि बदलताहेत... म्हणून ठरलं हे!
येत्या वर्षभरात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांत साठ ठिकाणी नऊ सिनेमांची मालिका दाखवत महोत्सव होणार आहेत. पुढे दर दोन महिन्यांनी हे सिनेमे बदलून त्याची धार वाढवली जाईल. ‘दक्षिणायन’ चळवळीशी जोडलेल्या केवळ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाच नव्हे तर सगळ्या स्तरातील माणसांचा प्रतिसाद प्रचंड मोठा व वेगवान आहे. साठचा आकडा ओलांडून पुढे धावू लागला आहे. महाराष्ट्रात मुंबई, सोलापूर, कोल्हापूरसारख्या शहरांपासून कोपर्डी, माडा नि इस्लामपूरसारखी छोटी गावंही यासाठी पुढाकार घेताहेत.
सिनेमे कसे निवडले?
सामान्यपणे सांगायचं तर चित्रपट रसास्वाद शिबिरात वेगळ्या प्रकारचे सिनेमे पाहिले जातात. इथे प्रेक्षक सरमिसळ असणारा असणार. तेव्हा ‘बदलासाठीची सळसळ’ हा हेतू ठेवून सिनेमे निवडले. ते समकालीन जागतिक सिनेमे असतील शिवाय प्रादेशिक सिनेमाही यात जरूर असेल हे पाहिलं. ते उगीच अवघड, प्रचंड कलात्मक मूल्य असणारे किंवा अॅब्स्ट्रॅक्ट निवडायचं टाळलं. जास्तीत जास्त लोकांना सिनेमा भावायला हवा, त्यातलं कथन काहीतरी ठिणगी जागवेल हे पाहिलं. हे माहितीपट नव्हेत. व्यक्तिचरित्रात्मक, एखाद्या जागतिक महत्त्वाच्या विषयाचे असे आहेत. उदाहरणार्थ ‘इनविक्टस’सारखा सिनेमा. नेल्सन मंडेलांसारखा नेता विल्यम हेन्री या कवीच्या ‘इनविक्टस’ या कवितेमुळे जगण्याचं सूत्र सापडल्यानं २७ वर्षं तुरुंगात शांत राहत नव्या देशाची आखणी करतो नि वर्णद्वेषामुळे गांजलेल्या देशाला स्थिर करतो ही केवढी मोठी गोष्ट! ‘एरिन ब्रोकोविच’सारख्या सिनेमात सिंगल मदर असणारी, कायद्याचं शून्य ज्ञान असणारी बाई केवळ नोकरी टिकवण्यासाठी जे काम हाती घेते त्यातून पर्यावरणविरोधी असणाऱ्या अमेरिकेतल्या बड्या फॅक्टरीविरोधात लढा उभारला जाऊन माणसांना न्याय मिळतो. ‘अॅक्वेरिअस’ची कथा आणखी वेगळी. कॅन्सरशी लढा देणारी ब्राझीलमधली पासष्टीची एक बाई यात ज्या तऱ्हेचा विरोध व्यवस्थेला करते त्यानं अचंबित व्हायला होतं. जुनी घरं आणि अन्य इमारती पाडून विकास होतो तेव्हा धाकदपटशाही होते. याला सामान्य, कमकुवत माणूस कसा चिकाटीनं सामोरा जातो यानं आपल्याला ताकद मिळते. शिवाय ब्राझील आणि अशा असंख्य ठिकाणी दमनाचे असे प्रकार घडतात नि त्याला व्यक्तिगत पातळीवर विरोध करून लोक शोषणाला शह देतात याचीही खूणगाठ पटत जाते. ‘मेड इन डॅगनहॅम’सारखा सिनेमा कामगार दिनाच्या औचित्यानंच नव्हे, तर अशा लढ्यांना स्मरणात ठेवून संघर्षाची ताकद कमवत राहण्यासाठी वारंवार बघितला जावा असा सिनेमा आहे. कामगार चळवळीतील स्त्रियांच्या योगदानाची जाणीव यातून होईल. उदाहरणादाखल मी इतकीच नावं दिली तरी पोतडीत अजून बरंच आहे. ते पाहत पाहत प्रेक्षक तयार होत गेला की तो पोतडीबाहेरचं पाहण्यासाठी निश्चित धडपडेल. - सिनेमातल्या अशा माणसांच्या जगण्यातील बलस्थानांना अधोरेखित करत आम्हाला मुलांनी विचार करायला हवा आहे.
शिवाय समूह म्हणून सिनेमाशी समरस होताना उमटणाऱ्या उत्कट प्रतिक्रिया विचारीही होत असाव्यात...
हो!! पुस्तकांइतकेच सिनेमे मनावर कोरले जातात. एकेकट्या साध्या माणसानं आपला विद्रोह अत्यंत सभ्य पद्धतीनं उभा करणं ही प्रक्रियाच मला खूप महत्त्वाची वाटते. तुम्ही एकटेच आहात म्हणून गप्प न बसता उभं राहून बेगडी व्यवस्थेला, त्यातून होणाऱ्या अन्याय व चुकीच्या गोष्टींना विरोध केलाच पाहिजे. दृश्यमाध्यमातून अशा कहाण्या बघताना आपला भवताल तपासला जाऊन प्रतिक्रिया उमटू शकते. नकळतपणे आपल्याला ती प्रेरणा मिळते. शिवाय सिनेमातली जी सूक्ष्म विधानं असतात ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजेत म्हणून शक्य तितका संवाद मुलांबरोबर साधायचा असं मनात आहे. पहिला टप्पा पार पडला की या सिनेमालिकेतून नेमकं काय शोषलं गेलंय, पटलंय का, कुठे टीका करावी वाटतेय या सगळ्याविषयी आदानप्रदान करू. सिनेमा पाहण्यापूर्वी त्यांचं सिनॉप्सिस हाती जावं अशी व्यवस्थाही केली आहे. पण माझं मत असं की, सिनेमा समजतोच, त्यासाठी पूर्वतयारी करून जाण्यानं अनुभव अस्सल राहत नाही. सिनेमाला थेट भिडावं. आश्चर्यचकित होणं संपवू नये. एखादा सिनेमा बघण्यापूर्वी तो ‘आॅनर किलिंग’वरचा सिनेमा आहे हे कळलं तर गोष्ट केवळ हा मुद्दा लक्षात घेऊन बघितली जाते व रसभंग होतो. सिनॉप्सिसनी आपण अधिक फोकस्ड होतो ही गोष्ट खरीय, पण ते सिनेमा पाहून झाल्यावर करता येऊ शकतं.
महोत्सवाचा अपेक्षित प्रेक्षक युवावर्ग आहे, त्यांच्या संवेदनक्षमतेबद्दल काय वाटतं?
मला ही पिढी खऱ्या अर्थानं भन्नाट वाटते. फक्त फोकसची गरज आहे. कारण उधाणणाऱ्या उत्साहात नेमकी दिशा नसेल तर वाहवत जाऊन चुकीच्या ठिकाणी ओढले जाण्याची शक्यता असते. आमच्या लहानपणाचा विचार केला तर वाटतं या मुलांच्या तुलनेत आम्ही खरंच मूर्ख होतो. आज ही मुलं केवढी आव्हानं पेलताहेत! बदलत्या राजकीय व सामाजिक संदर्भात आजची पिढी सजग वाटते आहे, पण त्यानुसार जबाबदारीचं आव्हान पेलण्याकरता दृष्टिकोन पक्के हवेत. या सिनेसाखळीतून स्फूर्ती नि प्रेरणांसारख्या व्यक्तिविशिष्ट संकल्पनांच्या कक्षा आजमावता येण्याची संधी आहे. तरुणांना स्वत:तल्या ऊर्जेची ओळख नि तिची वाट यातून सापडू शकेल.. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट म्हणायचे, ‘ओन्ली थिंग वी हॅव टू फिअर इज फिअर इटसेल्फ’. स्वातंत्र्यासाठी निर्भीडपणे, सकारात्मक ऊर्जेनं लढत राहण्याची आजच्या काळात फार गरज आहे. ती स्फूर्ती ‘दक्षिणायन’च्या या प्रयोगातून सापडावी...
संवाद : सोनाली नवांगुळ