अस्तित्वाच्या शोधात...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 03:14 PM2018-02-17T15:14:20+5:302018-02-18T06:42:25+5:30
अजिंठा चित्रशिल्पांच्या रिस्टोरेशनचं माझं काम सुरू झालं तेव्हा माझ्याजवळ फक्त बुद्ध होते. त्या डोळे मिटलेल्या मूर्तीसमोर बसत माझा संवाद नि ध्यान सुरू झालं. या कामाचा आवाका फार मोठा व दीर्घ पल्ल्याचा आहे.
- प्रसाद पवार
अजिंठा चित्रशिल्पांच्या रिस्टोरेशनचं माझं काम सुरू झालं तेव्हा माझ्याजवळ फक्त बुद्ध होते. त्या डोळे मिटलेल्या मूर्तीसमोर बसत माझा संवाद नि ध्यान सुरू झालं. या कामाचा आवाका फार मोठा व दीर्घ पल्ल्याचा आहे. विविध कला व संशोधनातले जगभरातले २०० मास्टर्स आता या प्रकल्पाशी जोडले गेलेत. कामाशी इतक्या खोलात जाऊन संवेदनेने कनेक्ट झाल्यामुळं असं काहीतरी घडतंय की लोक येऊन भेटताहेत. प्रोजेक्ट पुढे जातोय. इच्छाशक्तीच्या बळावर लोक पोहोचताहेत व पाठबळ देताहेत. त्यांचा संबंध मोबदल्याशी नाही आहे.
कातळात गुंफा खोदत त्यावर चित्रं आणि शिल्पं यांच्या माध्यमातून दिसणारी जातककथांची सूक्ष्म रेखाटनं, भिंत आणि छतावरच्या पानाफुलांच्या भौमितिक आकृत्या, आधुनिक त्रिमितीय वास्तुरचना, लाकडावरील नक्षीकाम, मौल्यवान दगडी खांब व त्याच्या गोलाईवरील नक्षी, सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही अशा अंधारातील अन्य काम, वेशभूषेतील जाडेभरडे व पारदर्शक रेशमी कपडे, अंगठीपासून मुकुटापर्यंतचं अलंकरण, विविध पक्षी-प्राण्यांचं जीवनातलं स्थान असं बरंच काही या चित्रांमध्ये आहे जे आजघडीला संपण्याच्या मार्गावर निघालं आहे. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध यांच्या जन्माच्या कथा इथं आहेत ज्या आपल्याला आपलं अस्तित्व शोधायला भाग पाडतात.
भारतीय कला २००० वर्षांपूर्वी अतिशय प्रगत होती. उदाहरणच द्यायचं तर, इथल्या गुंफेतला पूर्णा नावाचा प्रसंग पहा. पूर्णा बोटीतून व्यापार करायचा. त्याची बोट चितारलीय. बोटीत पिण्याच्या पाण्याचे घडे भरून ठेवलेत. म्हणजे प्रवास दूरचा आहे. त्याला जलराक्षसाने घेरलंय व बोट पुढे जात नाहीये. तो भगवानांची प्रार्थना करतोय असं दृश्य आहे. त्या चित्रात ‘जहाजा’चं १८० डिग्रीत चालणारं सुकाणू, अत्याधुनिक वाटणारे वल्हे, किडल दिसतं. केवळ चार महिने नदीला पाणी असणाºया अजिंठ्यातल्या कलाकारानं जहाज कधी बघितलं असेल? आपला इतिहास सांगतो, दर्यावर्दी असणाºया पोर्तुगीज आणि ब्रिटिश आल्यावर आपण जहाज पाहिलं. मग हे जलराक्षस नदीतले की समुद्रातले? आपल्याला पडणाºया प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न चित्रकारांनी केलाय. अशा कितीतरी कथा. या कथांमधले उडून भुकटी झालेले भाग पुरावे प्रमाणित करत जिवंत करणं हे फार वेळखाऊ नि खर्चिक काम आहे.
जेव्हा मी भगवान बुद्धांच्या जातककथेच्या अगदी जवळ असतो आणि छदंत नावाचं जातक वाचतो, त्यामध्ये भगवान बुद्ध पांढºया हत्तीच्या रूपाने जन्माला आलेत आणि त्यांना सहा दात होते. सहा दातांचा हा राजबिंडा हत्ती त्याच्या परिवारासह ज्या प्रदेशात राहात होता त्या प्रदेशातील राजाच्या राणीने याचं देखणं रूप बघितलं आणि राजाला सांगितलं की, मला दागिने घडवण्यासाठी याचे दात हवेत! राजा समजावतो, दात काढले तर हत्ती मृत्यू पावेल. राणी स्त्रीहट्ट धरून अन्नपाणी सोडते, आजारी पडते. राजा निरूपायाने हत्तीसाठी शिकारी पाठवतो. शिकारी बाण रोखतो. हत्तीच्या रूपातील बुद्धांच्या लक्षात येतं की आपला अवतार संपवायची वेळ आलीय. ते शिकाºयाला विचारतात, तुला काय हवंय? मग म्हणतात, ‘दातच हवेत ना? मग मला मारून तुम्ही पाप नका घेऊ अंगावर. मी तुम्हाला दात काढून देतो.’ शेवटचा दात तोडताना शिकाºयाच्या लक्षात येतं की हा कुठलातरी पवित्र आत्मा दिसतोय जो स्वत:हून दात काढून देत मृत्यूच्या दिशेनं चालला आहे. प्रत्येक जन्मात कुणातरीसाठी तुम्ही त्याग करा असं शिकवलं जातं. हे जातक याचंच उदाहरण. या कथेतील भागाचं डिजिटल रिस्टोरेशन करून मी संगणक खोलीतून बाहेरच्या जगात येतो तेव्हा लक्षात येतं की, तुम्ही जन्माला आलाय तर प्रचंड पैसा कमवा, प्रसिद्ध व्हा, यासाठी मोठाली महाविद्यालयं, क्लासेस असतात. ते हजारो रुपये घेऊन तुम्हाला यश कशात मानायचं याचे धडे देतात. तेव्हा मी विचार करतो की दोन हजार वर्षांपूर्वी यश कशाला म्हणायचं नि जगण्याची सार्थकता कशात याचं ‘त्याग’ हे उत्तर आपण सोबत काय नेतो याचं भान देणारं आहे. त्यामुळं आजच्या काळात जगताना धीर व विचार मिळतो.
आज अथक काम करून १४,४०० स्क्वेअर इंचांच्या संशोधनातून ५२ चित्रांचं प्रदर्शन दिल्लीत होऊ शकलं. चार फेजपैकी एका फेजचं म्हणजे दोन लाख २३ हजार २०० स्क्वेअर इंचाचं काम संशोधनासाठी टेबलवर आहे. एक स्क्वेअर इंच काम पूर्ण करायला १५ हजार खर्च येतो. त्या एका इंचाला प्रमाणित करण्यासाठी त्या त्या वेळी स्पॉटला जाऊन फोटो काढावे लागतात, प्रवास करावा लागतो, पुरावे मिळत नाहीत तोवर शोध व संशोधन गरजेचं बनतं. अखेर हे आपल्या येणा-या पिढ्यांकरता आहे.
म्हणून हा माझा किंवा स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कष्टणाºया ‘फाउण्डेशन’च्या नीलेश बोथरेसारख्या रिसर्च फोटोग्राफर व रमेश साळवेसारख्या प्रगतिशील मित्रांचाच फक्त प्रकल्प नाहीच. ‘प्रसाद पवार फाउण्डेशन’ आजवर हे प्रचंड खर्चिक काम करतेय. आता सक्रिय जनाधार हवा आहे. जगभरातल्या शंभर कोटी लोकांपर्यंत भारताचा हा देदीप्यमान इतिहास जावा असं मनात आहे. सांस्कृतिक मंत्रालय यासाठी पुढे झालंय; पण सर्वसामान्यांपासून सगळेच हात याला लागायला हवेत. अखेर आपण माणूस म्हणून कुठं येऊन पोहोचलोय याचं, आत्म्याबद्दलचं विधान यातून पोहोचतं आहे. बुद्धाच्या आदिम कणवेपर्यंत हा प्रवास आहे.