तलाश पुरी हुई.
By admin | Published: January 9, 2016 02:18 PM2016-01-09T14:18:07+5:302016-01-09T14:18:07+5:30
भारतीय नागरिकत्वासाठी पंधरा वर्ष अदनान सामी आस लावून बसला होता. त्याचं हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे.
Next
>
- मनोज गडनीस
'जिस दिन मैंने पहली साँस ली, उस दिन से मैं खुद को, मेरे घर को तलाश रहा हॅँू, 46 साल के बाद यह तलाश आज पुरी हुई.’
- अदनान सामी.
गेल्या 16 वर्षापासून तो भारतात वास्तव्यास आहे. लग्नासारख्या व्यक्तिगत आयुष्यापासून ते त्याच्या वजन कमी करण्यार्पयत आणि भारतातील वास्तव्यापासून ते त्याच्या संगीतार्पयत अदनान हे नाव कायमच चर्चेत असतं. पण अदनानची चर्चा यावेळी होण्याचं निमित्त म्हणजे, 1 जानेवारी 2क्16 पासून भारत सरकारने त्याला दिलेली ‘भारतीय नागरिकत्वा’ची भेट.
अदनानला भारतीय नागरिकत्व देण्याचा मुद्दा गेली 13 वर्षे चर्चेत आहे. त्याच्या संगीतविश्वातील काही दिग्गजांशी आणि त्याच्याशी संपर्कात आलेल्या काही लोकांशी या निमित्ताने बोलताना मिळालेल्या माहितीने वादग्रस्त अदनानच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे उलगडवून दाखविले.
अदनानची लाइफस्टोरी 70 एमएम स्क्रीनवर शोभेल अशीच आहे. 31 डिसेंबर 2015 च्या मध्यरात्रीर्पयत पाकिस्तानी नागरिक असलेल्या अदनानच्या जन्मतारखेपासून त्याच्या आयुष्याचा सिनेमा सुरू होतो. कारण, अफगाणिस्तानी वंशाचे पाकिस्तानी सैनिक, माजी महावाणिज्यदूत अर्षद सामी खान आणि काश्मिरी प्रांतातील नौरीन खान यांच्या पोटी पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी नव्हे, तर भारताच्या स्वातंत्र्यदिनी अर्थात 15 ऑगस्ट 1973 रोजी अदनानचा जन्म झाला. गर्भश्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या अदनानचे बालपण आणि शालेय शिक्षण रग्बी स्कूल, लंडन येथे झाले, तर पत्रकारिता आणि राज्यशास्त्र विषयात लंडन विद्यापीठातून अदनानने आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. पदवी शिक्षणानंतर अदनानने एलएलबीचे शिक्षण पूर्ण करून, मग त्याची पॅशन असलेल्या संगीत क्षेत्रचा पूर्णवेळ करिअर म्हणून स्वीकार केला.
लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या अदनानला वयाच्या दहाव्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा संगीत हेच तुङो करिअर असा आशीर्वाद लाभला. हाच आशीर्वाद आज सार्थ ठरलेला दिसतो आहे.
अफगाणी वंशाचा आणि पाकिस्तानी नागरिक असलेला पण लंडनमध्ये वाढलेल्या अदनानने व्यक्तिगत आयुष्यातील अनेक आरोह-अवरोहांच्या सुरावटी अगदी सहज सांभाळल्या. मात्र करिअरसाठी व्यासपीठ म्हणून भारत हेच ठिकाण असू शकते, यावर ठाम विश्वास असलेल्या अदनानने 13 मार्च 2001 रोजी भारताच्या दिशेने प्रयाण केले. कर्मभूमीत आता कायमचे वास्तव्य याच हेतूनं हे प्रयाण झालं होतं. एक-दोन नव्हे, गेली तब्बल 15 वर्षे प्रत्येक वर्षी रिन्यू होणा:या व्हिजिटर व्हिसावर त्याचे वास्तव्य भारतात आहे. 2003 मध्ये त्याने भारतीय नागरिकत्वासाठी सरकारला अर्ज केला होता. तेव्हापासून त्याची प्रक्रिया प्रलंबित होती. 26 मे 2015 रोजी त्याच्या पाकिस्तानी पासपोर्टची मुदत संपली. पाकिस्तानी सरकारने त्याच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यास नकार दिला आणि इथूनच भारतीय नागरिकत्व मिळविण्याची अदनानची धडपड अधिक तीव्र झाली. केंद्रीय गृहमंत्रलयाला वेळोवेळी भेट देत आणि आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया त्याने पूर्ण केली. ‘इंडियन सिटिझनशिप अॅक्ट ऑफ नॅच्युरलायङोशन’ या भारतीय नागरिकत्वाशी संबंधित कायद्याच्या सेक्शन 9, पॅरा-1 अंतर्गत असलेल्या तरतुदींच्या आधारे त्याला भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. या तरतुदींनुसार कला, संस्कृती, विज्ञानाच्या क्षेत्रत उत्तुंग कामगिरी करणा:या व्यक्तीस भारतीय नागरिकत्व बहाल करण्याचा स्वेच्छा अधिकार भारत सरकारला आहे. या कलमांतर्गत नागरिकत्व प्राप्त झालेला अदनान सामी हा पहिलाच भारतीय ठरला आहे !
भावविश्वातील अनेक तरंग आपल्या कलेच्या कोंदणात बसवून मांडणा:या कलाकारांना या भावविश्वातील अनेक रंग अनाहुतपणो चिकटतात. प्रसंगी त्यांच्यात ते एकरूपही होतात. काहींसाठी या रंगाचे वरदान होते, तर काहींसाठी शाप. अदनानच्या आयुष्यपटात डोकावले तर या शापित गंधर्वाला कितीही रंग चिकटले असले तरी, त्यातील सूर नेहमीच निरागस राहिलेला दिसतो!
आणखी दोन दशकं वाट पाहायची तयारी होती.
अदनान सांगतो, सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच मी जन्माला आलो, हे माझं भाग्य. पण भारत हाच माझा देश असावा हे नियतीनंच लिहून ठेवलेलं होतं. तो योगायोग नव्हता आणि नाही. मुळात माझा जन्मच भारतीय स्वातंत्र्यदिनी झाला. मी इंग्लंडमध्ये शिकायला असताना कोणाही एका जागतिक नेत्यावर मला प्रबंध लिहायचा होता. माङयाकडून आपोआपच गांधीजी निवडले गेले. माङयाकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे, माझी बायको जर्मन आहे, तिथलंही नागरिकत्व मला मिळू शकत होतं. पण एका अनामिक ओढीनं 16 वर्षापूर्वी नियतीनं मला भारतात आणून सोडलं. इतके देश मी फिरलो, पण नियतीही मला कायम टोचत राहिली, तुझं अस्तित्व इथे नाही, भारतात आहे! आज मी भारतीय आहे. हे क्षण त्रसदायक होते, तसे आनंददायीही. एखाद्या मातेसारखे. प्रसूतीवेदनांचा त्रस होतोच, पण हाती मूल आलं की ती सारं काही विसरते. मीही त्याला अपवाद नाही.
तब्बल दीड दशक मी या क्षणाची वाट पाहत होतो, पण आणखीही एवढीच किंवा त्यापेक्षा जास्त वाट पाहावी लागली असती, तरीही त्यासाठी माझी तयारी होती.
चार लग्न आणि नात्यातील ताण अदनानच्या संगीतसाधनेच्या आड क्वचितच आला असावा. अदनान नुसता संगीतकार, गायक नाही, तर त्याच्या रक्तातूनच संगीत वाहतं. वयाच्या पाचव्या वर्षापासून पियानो वाजविणा:या अदनाननं वयाच्या नवव्या वर्षी स्वत:ची पहिली रचना सादर केली. शाळेच्या सुटीच्या काळात थेट भारताचे विमान पकडून पं. शिवकुमार शर्मा यांच्याकडे संतूर शिक्षणाचे अनेक धडे घेतले. एखाद्या संगीतकार, गायकाचे किती वाद्यांवर प्रभुत्व असावे? - तब्बल 35 वाद्यं अदनान अगदी सफाईने वाजवतो. की-बोर्ड वादकांच्या दुनियेत, विद्युलतेच्या वेगाने बोटे फिरविणारा अवलिया म्हणून त्याला जग ओळखतं.
(लेखक ‘लोकमत’ समूहात विशेष प्रतिनिधी आहेत.)
manoj.gadnis@lokmat.com