स्वयंभू

By admin | Published: August 12, 2016 05:42 PM2016-08-12T17:42:41+5:302016-08-12T18:32:42+5:30

कॉम्प्युटर ही गोष्ट तेव्हा फार भारी वाटायची, पण त्याचे नक्की आपण काय लोणचे घालायचे हे कळलेच नव्हते. एके दिवशी तो घरी आलाच. भलामोठ्ठा, जड, माझ्यासारखाच. नंतर इंटरनेटही वेळेत आले. त्याने माणसाच्या खासगी आयुष्याची तरुणपणीच भुयारे खणली. आमची साजूक मने मुक्त झाली. आम्हाला घरचे आणि दारचे असे दोन चेहरे आले. आयुष्याची मोठी पार्टी सुरू झाली.

Self-made | स्वयंभू

स्वयंभू

Next

 
- सचिन कुंडलकर

प्रत्येक राजकारणी माणसाची सामान्य माणसाच्या मनामध्ये एक प्रतिमा असते. तशी राजीव गांधींची माझ्या मनात चांगली प्रतिमा होती. शाळेत असताना, मी दहावीच्या वर्गात गेलो तेव्हा त्यांची हत्त्या झाली. मला पहिल्यांदा आणि शेवटचे वाईट वाटलेले आठवते. राजीव गांधी आवडण्यामागे आमच्या शालेय वयामध्ये काही कारणे होती. ते सुशिक्षित होते. ते पायलट होते. ते तरु ण होते आणि दिसतही. त्यांच्यात एक शहरी सोफिस्टिकेशन होते. ज्याला योग्य असा मराठी शब्द काय असावा हे मला माहीत नाही. बाकीचे राजकारणी लोक जसे आपल्या जिवावर, आपल्या पैशांवर टपून असतात असे वाटते तसे राजीवविषयी वाटत नसे. मी त्यांना पुण्यात प्रत्यक्ष पाहिले होते. ते अतिशय हॅण्डसम, हसरे आणि आपले वाटणारे पंतप्रधान होते. 
ते शालेय वयामध्ये आवडण्यामागचे एक अजून महत्त्वाचे कारण होते, ते म्हणजे त्यांनी कॉम्प्युटर भारतात आणला होता. 
आज जी गोष्ट माणसाइतकीच किंवा माणसापेक्षा महत्त्वाची होऊन बसली आहे ती पंचवीस एक वर्षांपूर्वी भारतात अजिबातच नव्हती. घरात तर अजिबातच नाही. कॉम्प्युटरशिवायचे घर याचा विचारही आज शहरी माणसाला करता येणार नाही. पण लहानपणी तो आमच्याभोवती नव्हता. 
कॉम्प्युटर भारतामध्ये आला हे ठीक आहे; पण तो नक्की करतो काय हे मला शाळेत कधी कळले नाही. माझे माझ्या वॉकमनवर जिवापाड प्रेम होते आणि तो सोडून इतर कोणत्याही यंत्राशी माझे फारसे बरे नव्हते. मला सहावीत जाईपर्यंत साधा टीव्ही लावता येत नसे. फोन तर आमच्या घरी खूपच उशिरा आला. त्यामुळे कॉम्प्युटर ही अमेरिकन गोष्ट फार भारी वाटायची. पण त्याचे नक्की आपण काय लोणचे घालायचे आहे हे कधी आम्हाला कळले नाही न कुणी आम्हाला सांगितले. आमचे शिक्षक आम्हाला उठाबशा काढणे, ‘पृथ्वीचे प्रेमगीत’सारख्या सेमी प्रेमाच्या कविता पाठ करणे, संस्कृतची घोकंपट्टी करणे आणि शिवरायांच्या सनावळ्या शिकवण्यात गर्क होते. 
उपयोग झाल्याशिवाय कोणताही माणूस नवे शिक्षण घेत नाही. कॉम्प्युटर भारतात आला होता आणि तो खूप हुशार असून, मोठी मोठी आकडेमोड सहजपणे करीत होता तेव्हा मला तो मोठ्या आकाराचा कॅलक्युलेटर असावा असे वाटले होते. 
तिथपासून कुठपर्यंत आलो मी? आता मला अन्न, वस्त्र, निवारा आणि वायफाय या माझ्या मूलभूत गरजा वाटतात. सेक्सपासून पिझ्झापर्यंत सगळे पाच मिनिटात घरपोच देणारी अ‍ॅप्स आपल्या फोनवर असतात. कॉम्प्युटर छोटा होत होत आता दिसेनासा झाला आहे. आणि काही वेळा मला मूर्खासारखी वायफळ बडबड करणारी माणसे आजूबाजूला असण्यापेक्षा हाय स्पीड ब्रॉडबॅण्डचे कनेक्शन आणि उत्तम लॅपटॉप सोबत असावा असे वाटते. आयुष्य फार वेगाने आणि अनेक प्रकारे बदलून गेले आहे. मी इंटरनेटला जोडला गेलेला नसलो किंवा माझ्यासोबत माझा फोन नसेल तर मला एक प्रकारचा नर्व्हसनेस यायला लागतो. 
माझी कॉम्प्युटरशी ओळख शाळेनंतर सुरू झाली. माझ्या मामाने कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केली होती, तिथे मी दहावीनंतरच्या सुटीत मोठीच्या मोठी फ्लॉपी घेऊन शिकायला जायला लागलो. आजच्या कॉम्प्युटरपेक्षा तो फार सोपा आणि साधा होता. मला काही ते तंत्र अजिबात कळले नाही. तेव्हा मोठ्या लांबलचक कमांड्स टाइप कराव्या लागत. मला त्या सगळ्याचा उपयोगच कळत नसे. तुम्ही विचार करा की त्या काळात इंटरनेट नव्हते. त्यामुळे कॉम्प्युटरचा सामान्य माणसाला काय उपयोग असणार? हे कुणी कुणाला सांगत नव्हते. पण सगळे उत्साहाने शिकू लागले होते आणि उगाच मोठ्या फ्लॉपी घेऊन माणसे शहरभर उंडारत होती.
शेवटी एक दिवशी तो घरी आलाच. मीच मागवून घेतला. कारण तोपर्यंत तो सगळ्यांकडेच पोचला होता आणि त्याच्या प्राथमिक अवस्थांमधून पार पडून त्याच्या आधुनिक वेगवान आवृत्त्या निघू लागल्या होत्या. मला अजूनही जे एकमेव सॉफ्टवेअर येते, वर्ड; ते तोपर्यंत मी शिकलो होतो आणि मला इंग्रजीमध्ये टाइप करता येऊ लागले होते. माझ्यापेक्षा घरात कॉम्प्युटर असावा याचा माझ्या आईवडिलांना जास्त उत्साह होता. मुलाला घरात तो घेऊन देणे हे त्यावेळी एक प्रेमाचे कर्तव्य होते. तो घरी आल्यावर आपण काय काय करू शकतो हे मी रात्री बसून एकदा आईबाबांना समजावून सांगितले होते. ते सगळे ऐकीव होते. मला एकच आकर्षण होते ते म्हणजे त्याच्यासोबत एक प्रिंटर येणार होता आणि मी स्वत: लिहिलेला शब्द मी माझ्या स्वत:च्या घरात बसून एक बटण दाबून प्रिंट करणार होतो. ती फार मोठी गोष्ट होती. कारण तोपर्यंत कुणालाही आपापल्या इच्छेने काहीही छापायची शक्यता नव्हती. छापणे आणि आपण लिहिलेले छापले जाणे याला प्रमाणाबाहेर ग्लोरी होती. आता माझ्या इच्छेनुसार मी घरात बसून मी लिहिलेले छापणार होतो. 
मी पहिल्या रात्री सन्स अ‍ॅण्ड लव्हर्स या प्रसिद्ध कादंबरीमधून एक पान निवडले. ते स्वत: टाइप करून सेव्ह केले आणि प्रिंटची कमांड दिली. सरसर आवाज करत कागद प्रिंटरमध्ये सरकू लागला आणि मी लिहिलेले छापून माझ्या हातात आले. मला वाटले की असेच कधीतरी मराठी लिखाण कॉम्प्युटरवर करणे शक्य होईल आणि आपण स्वत: लिहिलेले काहीतरी आपण स्वत:च्या घरात छापून काढू शकू.
हळूहळू त्या यंत्राने सगळ्या मनाचा आणि जगण्याचा ताबा घेतलाच. मला कधीही असे वाटले नव्हते की आपण यंत्राच्या आणि तंत्रज्ञानाच्या इतके आहारी जाऊ. कारण जुन्या मराठी वळणानुसार कोणत्याही नव्या गोष्टीला इतके आनंदाने स्वीकारणे मला चुकीचे वाटत असे. काही झाले की विरोध करून आपण पहिले लांब राहायचे आणि आपलाच जुना शिरस्ता चालू ठेवायचा हा बाणा माझ्या अंगात पुरेपूर होता. त्यामुळे मी पहिले काही दिवस कॉम्प्युटरच्या आहारी गेलो नव्हतो. 
फ्लॉपी जाऊन सीडी आल्या आणि मल्टिमीडिया ड्राइव्हज घरात जोडले गेले तेव्हा माझा ओढा कॉम्प्युटरकडे वाढला. इंटरनेटच्या येण्याआधी इंटरनेटचे जे मूळ तत्त्व आहे ते आम्ही मित्र नकळत पाळायला लागलो. ते म्हणजे शेअर करणे. आपल्याकडे असलेली गाणी, पुस्तके, सिनेमे यांचे मोकळेपणाने वाटप करणे आणि त्यातून नवी माणसे, नवे मित्र जोडणे. 
आम्ही एकमेकांकडे असलेले संगीत, चित्रपट आणि फोटो सीडीमार्फत आपापल्या घरच्या कॉम्प्युटरवर द्यायला घ्यायला लागलो. त्यामुळे आपल्या आईवडिलांच्या पिढीपेक्षा वेगळा आणि गुप्त असा आमचा व्यवहार सुरू झाला. आम्ही सगळे त्या साध्या देवाणघेवाणीतून जोडले गेलो. आपल्याकडे असलेले वेगळे आणि सुंदर यापूर्वी आपल्या नव्या मित्राला/मैत्रिणीला देता येत नसे. एक तर ते अ‍ॅनॅलॉग फॉर्ममध्ये असे. दुसऱ्याला दिले की आपले संपले. दुसरे म्हणजे आपल्या आईवडिलांचा आपल्या जगण्यावर सतत नको तितका डोळा असे. या दोन्ही भारतीय गैरसोयी सीडी ड्राइव्हनी संपल्या तेव्हा मला घरातला कॉम्प्युटर खऱ्या अर्थाने आवडू लागला. आकाराने तो खूप मोठा होता, जड होता. माझ्यासारखाच. तो माझा मित्र झाला. स्पीकर आले. आणि रात्री आईवडील झोपले की बघण्याचे जे सिनेमे असतात त्यासाठी हेडफोन आले. मी स्वयंभू झालो. 
फोनलाइनमधून घरात हळूहळू वेगाने इंटरनेट पोचण्याआधी शहरात इंटरनेट कॅफे निघाली आणि आयुष्यात खरी बहार सुरू झाली. मला इंटरनेट कॅफे या विषयावर आणि अनुभवांवर मधुर भांडारकरसारखा सिनेमा काढता येईल. त्या काळात याहूच्या चॅट साइट उघडल्या आणि मी सरळ अनोळखी लोकांशी डेटिंग सुरू केले. इंटरनेट वेळेत आले नसते तर आज माझे लग्नबिग्न होऊन बसले असते आणि मला रडकी मठ्ठ मुले असती असे मला वाटते. पण ते वेळेत आले आणि त्यामुळे माणसाच्या खासगी आयुष्याची फार तरुणपणीच खोल खोल भुयारे खणली गेली आणि आमची साजूक तुपासारखी मने कुटुंब, सणवार आणि नातेवाईक यांच्यापासून मुक्त झाली. आम्हाला घरचे आणि दारचे असे दोन चेहरे आले. आयुष्याची मोठी पार्टी सुरू झाली.

(क्र मश:)

Web Title: Self-made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.