आत्मनिर्भर भारताला चीनविरूद्ध अशी द्यावी लागेल लढत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 08:07 PM2020-07-11T20:07:43+5:302020-07-11T20:10:55+5:30

महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, १९९० मध्ये चीनचे जगामध्ये एकूण मॅन्युफॅक्चरिंग फक्त ३ टक्के होते, तर आज मात्र ते पंचवीस टक्क्यांवर आलेले आहे.

Self-reliant India has to fight like this against China! | आत्मनिर्भर भारताला चीनविरूद्ध अशी द्यावी लागेल लढत !

आत्मनिर्भर भारताला चीनविरूद्ध अशी द्यावी लागेल लढत !

googlenewsNext

- दीपक प्रभाकर भिंगारदेव

फक्त तीस वर्षांपूर्वी  भारतापेक्षाही दरिद्री असलेला देश, आफ्रिकेपेक्षाही मागास असलेला चीन, आज अमेरिकेनंतर  महासत्ता होण्याचे स्वप्न का बघत आहे, यावर आपल्या सगळ्यांना विचार करण्याची वेळ नक्कीच आलेली आहे.  मी स्वत: युरोपमध्ये  ेएक्सपोर्टबद्दल प्रशिक्षण घेण्यासाठी एक महिना गेलो होतो, त्या वेळेस आम्ही दिवसभर वर्गांमध्ये बसू आणि संध्याकाळी मात्र आम्ही फिरायला जायचो. त्या वेळेस  आमचे  मास्तर आम्हाला सांगायचे, ‘अरे, तुम्ही संध्याकाळी कसे काय बाहेर जातात, चीनचे विद्यार्थी जर आले, तर ते दिवस-रात्र कॉम्प्युटरवर बसून वेगवेगळ्या गोष्टी आमच्याकडं समजून घेतात.’ ही साधारण पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. आजही जर जगातल्या सगळ्यात मोठ्या विद्यापीठांमध्ये जर तुम्ही बघितले, तर चीनचे विद्यार्थी फार मोठ्या प्रमाणात तिथे शिक्षण घेताना आढळून येतील. असे नाही की चीनमध्ये शिक्षण व्यवस्थित नाही, किंबहुना  जगातले  जे  सगळ्यात  चांगले टॉप विद्यापीठ आहे, त्यामध्ये चीनमधील अर्धी विद्यापीठे गणली जातात, हीसुद्धा बाब लक्षात घेतली पाहिजे.

जगामध्ये जितके मोबाईल निर्माण होतात, त्यापैकी ७० टक्के मोबाईल हे फक्त चीनमधून येतात, जगामध्ये एकूण असणाऱ्या एअर कंडिशनरपैकी ८० टक्के एअर कंडिशनर हेसुद्धा फक्त चीनमधून येतात. सिमेंट ६० टक्के निर्माण होते, बूट ६०%, जगातले पन्नास टक्के तेल हेसुद्धा चीनमधून  येते, तर सोलार सेल हे चीन जवळपास ७५% जगामध्ये देत असते. चीनची अर्थव्यवस्था ही २५ ट्रिलियन डॉलर एवढी आहे. त्यापैकी २.२ ट्रिलियन डॉलर ही फक्त निर्यातीमध्ये आहे. अमेरिकेचे ९० टक्के झेंडे हे चीनमध्ये निर्माण होतात. आज भारतामध्ये येणाऱ्या जवळपास आठ हजार वस्तू चीनमधून आयात केल्या जातात.  महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, १९९० मध्ये चीनचे जगामध्ये एकूण मॅन्युफॅक्चरिंग फक्त ३ टक्के होते, तर आज मात्र ते पंचवीस टक्क्यांवर आलेले आहे. ही सगळी किमया चीनने कशी केली, हे जर पाहायचे ठरले, तर माओपासून त्याचा मागोवा घ्यावा लागेल. 1950 मध्ये क्रांतीचे पहिले बीज रुजवले त्या वेळेस चीनची अर्थव्यवस्था ही शेतीवर आधारित होती. त्यानंतर रशियाच्या साह्याने पंचवार्षिक योजना आखून माओने तिथे मोठ्या प्रमाणात मोठे उद्योग सुरू केले. मात्र, १९६० नंतर रशियाशी संबंध बिघडल्यानंतर माओनि परत आपल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले. शिक्षण व आरोग्याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. १९८० नंतर चीनची अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेसाठी मुक्त करण्यात आली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने चीनच्या प्रगतीचा आलेख वाढतच गेला. १९८९ मध्ये पॅकेजिंग स्क्वेअरमध्ये जेव्हा युवकांनी मोठ्या प्रमाणात सरकारविरुद्ध घोषणा केली. त्या वेळेस साधारण दहा हजार विद्यार्थ्यांना चिरडून ही क्रांती संपुष्टात आणली गेली.  आज चीनने त्यांच्या ८० करोड जनतेला गरिबीच्या बाहेर ओढून आणलेले आहे. त्याच्याशिवाय आज त्यांनी संपूर्ण चीनमध्ये त्यांचे रस्ते, हायवे, रेल्वे यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केली आहे. आज २६ लाख मैल रस्ते बांधण्यात आले. अमेरिकेपेक्षा ते पन्नास टक्के  जास्त आहेत.

बारा हजार मैल रेल्वेलाइन्स टाकण्यात आल्या. त्यांच्या रेल्वे तासाला १८० मैल धावतात. जगातील सगळ्या रेल्वे जरी एकत्र केल्या तरीसुद्धा चीनचे रेल्वेचे जाळे हे सगळ्यात मोठे ठरेल. वीज, पाणी संपूर्ण चीनमध्ये मुबलक प्रमाणात आहे. त्याशिवाय शिक्षण व आरोग्याच्या बाबतीतसुद्धा चीन खूपच जागरूक आहे आणि ही प्रगती माओपासून जी चालू आहे, ती अजूनही चालूच आहे. १९५० मध्ये चीनचे फक्त तीस टक्के लोक सुशिक्षित होते. मात्र, आज ९५ टक्क्यांपेक्षा त्यांचा आकडा जास्त आहे.   आधी जरी चीन लहान-लहान खेळण्यांमध्ये होता. मात्र, आज रोबोटिक फार मोठ्या प्रमाणात चीनमध्ये वापरल्या जातात. त्याच्याशिवाय जगातले सुपरकॉम्प्युटर आज अमेरिकेत नव्हे, तर चीनमध्ये आहेत. चीनची मिलिटरीसुद्धा अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेनेसुद्धा मागच्या संपूर्ण शतकात एवढे सिमेंट वापरले नाही तेवढे सिमेंट चीनने गेल्या दोन वर्षांत वापरून संपूर्ण चीनचा कायापालट केलेला आहे. कोरोना व्हायरस वुहानमध्ये आला त्या वेळेससुद्धा अवघ्या पंधरा-वीस दिवसांमध्ये वीस-पंचवीस मजली इमारती उभ्या केल्या. आज चीन २  आठवड्यांमध्ये रोम शहर उभे करू शकतो, असा त्यांचा लौकिक आहे.

पेटंटच्या बाबतीतसुद्धा चीन आघाडीवर आहे. चीनने बाँडच्या सहाय्याने अमेरिकेला इतके मोठे कर्ज दिले आहे की, जर चीनने ते परत मागितले, तर अमेरिकेची दमछाक होईल. आपल्याला जर चीनशी टक्कर द्यायची असेल, तर आधी आपले रस्ते, वीज, शिक्षण, पाणी यामध्ये प्रचंड सुधारणा करावी लागेल. त्यासाठी पुढची वीस-पंचवीस वर्षे अतोनात कष्ट घ्यावे लागतील.  आपल्या इथे जवळपास चीनकडून ८ हजार वस्तू आयात होतात. आपल्याला माहीत पण नसेल अशा बऱ्याच कंपन्यांमध्ये चीनचा सहभाग आहे आणि त्यामध्ये पेटीएम, क्विकर, बिग बास्केट, ओला, स्नॅपडील व झोमॅटो यासारख्या कंपन्यांमध्येसुद्धा चीनचा वाटा आहे!

आपल्याकडे आपल्या आयटीआयमध्ये फार झाले तर शंभर-दोनशे वेगवेगळे ट्रेड आहेत. मात्र, चीनमध्ये दीड ते दोन हजार दिसून येतील व त्यामध्ये वेळोवेळी  काळानुरूप बदल केले जातात. जगामध्ये कोणतीही एखादी काही वस्तू तयार करायची असेल, तर चीनचा उद्योजक त्याला पाहिजे त्या किमतीत करून देतो.  त्याच्याविरुद्ध भारतात येण्यासाठी जगभरातील उद्योजक कचरतात, कारण सरकार कधी बदलेल याचा नेम नाही. केंद्रात एक सरकार, तर राज्यात एक सरकार.परदेशाचे उद्योजकांचे सोडा, आपल्या इथेच टाटांना बंगालमधून त्यांचा न्यानो प्रकल्प गुजरातला देणे भाग पडले. ही घटना पण काही फार जुनी नाही.

भारतात उद्योग काढायचा असेल, तर परदेशातील उद्योजकांना आपला वेळ पैसा व आपली शक्ती वाया जाईल, अशी भीती वाटते. चीनची प्रगती होण्यापाठीमागे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी संपूर्ण चीनमध्ये वेगवेगळ्या वस्तूंसाठी  क्लस्टर्स तयार केले आहेत. या क्लस्टर्समुळे पैसा व वेळ दोन्हींची बचत होते. आता भारतानेसुद्धा त्याचे अनुकरण सुरू केले आहे. महाराष्ट्रामध्ये आपण सध्या दोनशेच्या आसपास असे क्लस्टर्स तयार करीत आहोत; पण ही सुरुवात आहे. चीनमध्ये वीजपण आहे आणि ती उद्योजकांना अगदी स्वस्तात पण मिळते. मात्र, भारतात तीच वीज वेळेवर मिळेल का, याची शंका आहे आणि मिळालीच, तर ती तीनपट महाग आहे. त्यामुळेसुद्धा तुमची वस्तूची किंमत वाढून जाते.

चीनचे नियोजन हे पुढील काळाची गरज ओळखून तीस-चाळीस वर्षांसाठी असते. कारण तिथे सरकार मजबूत आहे. त्याविरुद्ध भारतामध्ये प्रत्येक पाच वर्षांनी निवडणूक असल्यामुळे सगळ्यांचे गणित फक्त पाच वर्षांसाठीच मर्यादित असते.  आपल्याला जर खरंच आत्मनिर्भर व्हायचे असेल, खरंच स्वावलंबी व्हायचे असेल, तर फक्त टिकटॉक किंवा असे अ‍ॅप्स डिलीट करून चालणार नाही, तर पुढच्या पन्नास वर्षांसाठी नियोजन करून आपले रस्ते, वीज, पाणी, विमानतळ आपली औद्योगिक धोरणे यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल करावे लागतील, त्याशिवाय आपण आत्मनिर्भर होणार नाही.

Web Title: Self-reliant India has to fight like this against China!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.