आत्मभान देणारा कवी
By admin | Published: June 28, 2014 06:24 PM2014-06-28T18:24:20+5:302014-06-28T18:24:20+5:30
समाजाला आपल्या कवितेतून सतत आश्वस्त करणारे हिंदी कवी केदारनाथ सिंह यांना भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळणं त्यांना अपेक्षितच होतं कारण वर्तमानकाळात त्यांच्याइतकी प्रगल्भ व अस्वस्थ करणारी कविता लिहिणारा दुसरा कवी दिसत नाही.
Next
- डॉ. सुनीलकुमार लवटे
माझी कविता पुरोगामी विचार आणि उच्च मानवी मूल्य प्रतिबिंबित करते, की नाही मला नाही सांगता येणार. पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात असलेला विश्वास व आस्था, एक तळमळ जरुर आहे. ती मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जपली आहे नि जपत राहील’’, असं समाजाला आपल्या कवितेतून सतत आश्वस्त करणारे हिंदी कवी केदारनाथ सिंह यांना सन २0१३ चा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होणं अपेक्षित अशासाठी होतं, की वर्तमानकाळात त्यांच्या इतकी प्रगल्भ व अस्वस्थ करणारी कविता लिहिणारा दुसरा कवी दिसत नाही.
केदारनाथ सिंह हिंदीत सन १९५२ च्या दरम्यान लिहू लागले. आजचे हिंदीतील ज्येष्ठ समीक्षक डॉ. नामवर सिंह, माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह, त्रिलोचन शास्त्री वगैरे कवी मंडळी तरुण होती. महाविद्यालयीन युवक म्हणून ‘शब्द’, ‘सारवी’ सारखी अनियतकालिकं चालायची. कवी मैथिलीशरण गुप्त, हरिवंशराय ‘बच्चन’, शिवमंगल सिंह ‘सुमन’ सारख्या कवींना बोलवून कवी संमेलनं करत. तिकडे काशी बनारस हिंदू विद्यापीठात डॉ. हजारी प्रसाद द्विवेदींसारखा प्रखर विचारवंत साहित्य साधनेत रममाण झालेला. ‘बाणभट्ट की आत्मकथा’ सारखी त्यांची कादंबरी, ‘अशोक के फूल’ सारखा निबंधसंग्रह प्रकाशित झालेला. लखनौ विद्यापीठानं डी. लिट् ही सन्मान पदवी बहाल केलेली. गंगेच्या काठी हिंदी साहित्य संस्कृतीची चळवळ उदयोन्मुख होत असताना केदारनाथ सिंह आपली गीतं लयीत सादर करून मंच काबीज करत. उत्तरप्रदेशची गावं मागं टाकून पोट भरायला काशी सारखं अभयस्थळ त्या वेळी नव्हतं. शहरात शरीर आणि मन गावात गुंतलेला मोठा वर्ग काशीच्या कुशीत विसावलेला, त्यांना केदारनाथांच्या गीतात आपलं प्रतिबिंब दिसायचं अन् त्यांची गीतं ‘बहुत खूब’ दाद घेत रहायची. तो काळ हिंदीच्या प्रयोगवादी काव्याचा होता. कवी अ™ोय यांनी ‘पहिला तारसप्तक’ (१९४३), ‘दुसरा तारसप्तक’ (१९५१) नंतर ‘तिसरा तारसप्तक’, सन १९६६ मध्ये प्रकाशित केला, तेव्हा त्यात केदारनाथ सिंहाच्या एक-दोन नाही, तर तब्बल २३ कविता प्रकाशित करून या कवीचं वेगळेपण लक्षात आणून दिलं. यातल्या ‘अनागत’, ‘वसंत गीत’, ‘बादल हो!’ कविता गाजल्या. आजवर केदारनाथ सिंह यांनी कविता, समीक्षा, निबंध असं त्रिविध लेखन केलं असलं, तरी त्यांची ओळख राहिली ती कवी म्हणूनच. ‘अभी बिल्कुल अभी’ (१९६0), ‘जमीन पक रही है’ (१९८0) ‘अकाल में सारस’ (साहित्य अकादमी पुरस्कृत), ‘उत्तर कबीर और अन्य कविताएँ (१९९५), ‘तालस्ताय और साइकिल’ (२00४) नंतर अगदी अलीकडे प्रकाशित झालेल्या ‘सृष्टी पर पहरा’, ‘मेरे समय के शब्द’ मधील कवितांतून दिसणारे कवी केदारनाथ म्हणजे निसर्ग आणि जीवनाची सांधेजोड करत माणसाचं जगणं चित्रित करणारा कलाकार! उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यातील चकिया सारखं छोटं गाव, या कवीची जन्मभूमी त्यांचे पूर्वज ब्रह्मदेशात होते ते गौतम बुद्धांचे वंशज मानले जात. कवी केदारनाथ आजही ‘अत्त दीप भव’ चा धोशा सतत लावताना दिसतात. लहानपणी गंगा, घोगरा नद्यांच्या कुशीत वाढत असताना हा कवी नदीवर आंघोळ करताना, शेतात काम करताना, नावाडी नाव चालवताना त्यांची लोकगीतं मन लावून ऐकायचा आणि त्यात त्याला सार्या आसमंताचं जगणं भेटायचं. तो काशीत आला, रमला, तरी त्या नावाड्यांची ‘बंदिनी’ मधील ‘माँझीऽऽ रे’ ची करुण पुकार गावी बोलवत राहायची. हरवलेला गाव, नदी, नाव माणसंच त्याची कविता बनली व तो विचारु लागला -
कहाँ है माँझी?
कहाँ है उसकी नाव?
क्या तुम ठीक उसी जगह उँगली रख सकते हो
जहाँ हर पुल में छिपी रहती है एक नाव?
केदारनाथ सिंह चकियाहून आले नि काशी त्यांची पंढरी झाली. शहरं इथून-तिथून सारी सारखी. एका पायावर उभी.. विनाशाच्या!
शताब्दियों से इसी तरह गंगा के जल में
अपनी एक टाँग पर खड.ा है यह शहर
अपनी दूसरी टाँग से बिलकुल बेखबर!
शहरात एका माणसाची माहिती दुसर्यास नसते! आत्ममग्न!! आत्मरत!!! केदारनाथांची सगळी कविता म्हणजे कालभाष्य नि कालचित्रण! जीवन अनुभवांची संपृक्ती भरलेली कविता तुम्हास वाचून विसरता येत नाही. ती तुमचा पिच्छा पुरवते. ही कविता जगण्याचा पिंगा घेऊन जन्मते. तो तुमच्या कानात सतत घुमत राहतो. गावचं वात्सल्य आणि शहराची न संपणारी वासना कविता दाखवते नि उत्तर मागते, की गमावल्याचा पश्चाताप तुम्हाला बेचैन कसा करत नाही?
एक अच्छी कविता तरस खाने लगती है
अपने अच्छे होने पर
एक महान कविता ऊबने लगती है
अपनी स्फटिक गरिमा के अंदर
आपण ‘अच्छे दिन’ ची स्वप्नं आज पाहताना ही कविता आपलंच प्रतिबिंब आपणास दाखवते. हे असतं केदारनाथ सिंहांच्या कवितेचं बळ. केदारनाथ सिंहांची प्रत्येक कविता एक बिंब घेऊन येते आणि विचार देऊन जाते. ती एक समग्र, संपृक्त, संपूर्ण कविता असते प्रत्येक वेळी..
जडे. रोशनी में है
रोशनी गंध में
गंध विचारों में
विचार स्मृति में
स्मृतियाँ रंगों में
शब्द, सौंदर्य, संस्कृती, स्मृति, विचारांबरोबर प्रकाश, गंध, रंगांचं नातं व्यक्त करणारी कविता सार्या भारताचं सर्वस्व व्यक्त करत रहाते.
कवी म्हणून केदारनाथांच्या कवितेचं दु:ख गालिबचं असतं तसं बुद्धाचंही! त्यांच्या हसर्या बुद्धांच्या चेहर्यावर जीवनाचे वैषम्य, कारुण्य पसरलेलं असतं आणि गालिबच्या दर्दातही जीवनाची दाद सामावलेली असते. एकदा केदारनाथांना विचारलं होतं, की तुमची कविता कशी आहे? तर म्हणाले होते ‘परिंदों के परों जैसी’.. पाखरांच्या पंखांसारखी.. नित्य तडफडणारी तरी आकाश कवेत घेणारी! म्हणाले होते, की माझी कविता गावच्या गीतांनी सुरू झाली होती. ती गीतं होती. मी गुणगुणायचो. ऐकणारे माना डोलवायचे. मला बरं वाटायचं; पण एकदा अचानक मला एक बाप कवी भेटला. पॉल एलुअर, त्यांच्या एका कवितेचा त्यांनी अनुवाद केला, ‘स्वतंत्रता’ नावाने. पुढे एक पुस्तक हाती लागलं. ‘कंटेपररी अमेरिकन लॅटिन पोएट्री.’ पाब्लो नेरुदा त्यांनी वाचला आणि ते गीत, लोकगीत, छंद, यमकातून बाहेर पडले व स्वतंत्रपणे कविता लिहू लागले. याच काळात त्रिलोचन शास्त्रींसारख्या ज्येष्ठ कवीचं मार्गदर्शन मिळालं, तरी केदारनाथ कवी म्हणून कोण्या एका वाद, विचार, चळवळीचे अनुयायी बनले नाहीत. हेच त्यांच्या कवीचं वेगळेपण; परंतु त्यांच्या प्रभावाखाली गेल्या दोन दशकांत हिंदीत बरंच काव्य लिहिलं गेलं. अनेक हिंदी कवींनी त्यांचं अनुकरण केलं.
एम. ए. झाल्यानंतर त्यांनी पीएच.डी. साठी ‘बिंब’ विषयावर संशोधन केलं. ‘बिंब’ हाच पुढे त्यांच्या कवितेचा स्थायीभाव बनला. पुढे मग ‘बाघ’ सारख्या दीर्घ कवितेत त्यांनी पंचतंत्रातील मिथकांचा उपयोग करून वर्तमानाच्या र्ममावर बोट ठेवणारी कविता लिहिली. सतत नवं लिहिण्याकडे कल असणारे कवी केदारनाथ भाषेच्या अंगानी सुबोध असले, तरी त्यांचा आशय मात्र, अथांग असतो. चित्र, बिंबापलीकडे जाऊन केदारनाथ सिंह जे सूचवत असतात ते वाचकांना नुसतं रिझवतच नाही, तर रुंजी घालायला लावतं. त्यांची कविता जीवनाच्या सर्व अंग आणि अवस्थांना व्यापून उरतेच. त्यांना भारतीय भाषांतील विविध प्रांतांनी आपल्या श्रेष्ठ पुरस्कारांनी गौरविलं आहे. मध्यप्रदेशचा मैथिलीशरण गुप्त पुरस्कार, केरळचा कुमार आशान पुरस्कार, आंध्रचा जोशुआ पुरस्कार, ओरिसाचा जीवनभारती सन्मान, हिंदीचा श्रेष्ठ व्यास सन्मान. साहित्य अकादमीच्या राष्ट्रीय सन्मानानंतर भारतीय ज्ञानपीठाचा पुरस्कार ही क्रमप्राप्त गोष्ट होती.
काव्यात्मकता, संगीत आणि एकांत हे त्यांच्या काव्याचे प्रमुख घटक म्हणून सांगता येतील. प्राचीन हिंदी कवी कुंभनदास, उर्दू कवी गालिब, इंग्रजी पाब्लो नेरुदा (लॅटिन अमेरिकन) हे त्यांचे आदर्श. माणसानं थोडं लिहावं; पण सकस, हे सांगताना एकदा केदारनाथ म्हणाले होते, की कुंभनदाससारखं दोन ओळी लिहून माणसाला अमर होता आलं पाहिजे. अकबर बादशहाने कुंभनदासला दरबारात येण्याचं आमंत्रण दिलं. अनपेक्षित आमंत्रणानं तो भांबावला, गडबडीत जाताना त्याची चप्पल फाटली अन् बादशहाच्या धास्तीनं तो रामनाम विसरला.
भक्तन को कहा, सीकरी सो काम।
आवत जात पन्हैया टूटी, बासरि गये हरिनाम।।
या काव्य ओळी खरं तर व्यक्ती आणि सत्तेचा संघर्ष, द्वंद्व चित्रित करणार्या सामान्य माणसाचं दरबारात (फतेहपुर सिकरी) काय काम? विचारणारा कुंभनदास राजा आणि प्रजेतलं अंतर स्पष्ट करतो, तशी केदारनाथांची कविता वर्तमानातली विषमता व वैषम्य चित्रित करते. ‘तोड.ना सृजन की शर्त होती है’ समजावणारे केदारनाथ युवकांना परिवर्तनशील राहण्याचा सल्ला देतात. गालिबचं उदाहरण देऊन सांगतात, जुनं घर मोडल्याचं दु:ख, विषाद कशासाठी?
‘घर में क्या था की गया गम उसे गारद करता?’
असं सांगणारा हा कवी गालिबच्याच शब्दांत आपल्या काव्य जन्माचं रहस्य सांगतो-
आते है गायब से, मजा में खयाल आता है
अमूर्त आसमंतातून काही तरी स्फुरतं अन् शब्द फेर धरू लागतात. शब्दांवर मदार असलेला हा कवी, त्याचं काव्य शब्दांवर मांड ठोकतं म्हणून अमर होतं-निकराच्या क्षणी आधार देणारी केदारनाथ सिंहांची कविता वाचकांना आपलंच आत्मकथन वाटतं राहातं - ऐसे बदरंग और कुडे पर फेंके हुए शब्द
अपनी संकट की घडियोंमे
मुझे लगे हैं सबसे भरोसे के काबिल
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)