सेल्फी
By Admin | Published: January 18, 2017 06:31 PM2017-01-18T18:31:32+5:302017-01-18T18:31:32+5:30
काय चाल्लंय आपल्या डोक्यात आणि आयुष्यात याची टोटल लावायचा प्रयत्न.
डोक्यात काहीतरी चक्री सुरू होते. प्रेमात पडून होतं. शिंगं कधीची फुटलेली असतात. कोणी सिक्स पॅकवालं किंवा एकदम सेक्सी.. कोणी आपल्या मोबाइलमध्ये, कॉम्प्युटरच्या डिस्प्लेवर झळकायला लागतं.आणि घरी लोक अक्कल काढायला लागतात.पाय घसरून चालणार नाही म्हणतात....सगळा कल्ला होऊन जातो, तेव्हा...?
तुला काही अक्कले का?
‘स्वत:ला समजतोस काय?’
- हा एक डायलॉग आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला ऐकायला लागतो. पण खास करून शाळा सोडताना आणि कॉलेज पूर्ण करायच्या टप्प्यात तो वेगवेगळ्या प्रकारे आपल्यावर आदळतो. आपण नेमके कोण आहोत आणि आपल्याला नेमकं काय व्हायचं आहे, हा शोध केवळ करिअरच नाही, तर एकंदरीतच आयुष्याबद्दल आपल्याला घ्यायचा असतो. म्हटलं तर आपण आता लहान नसतो आणि म्हटलं तर पुरेसे मोठेही झालेलो नसतो. हा टप्पा मानसशास्त्रात अतिशय महत्त्वाचा असतो.
वयाच्या दहा-बाराव्या वर्षापर्यंत आपण ‘सर्टिफाइड’ लहान असतो.
घरीदारी सर्वत्र लोक-
‘नाव सांग बाळा’,
‘कितवीत शिकतोस/शिकतेस’,
‘कोणत्या शाळेत जातो/जातेस’ असे रु टीन प्रश्न विचारून आपल्याला हैराण करत असतात.
आपण गुड बॉय किंवा गुड गर्लसारखी त्या प्रश्नांना उत्तरं द्यायची असतात.
पण या थोड्या मोठ्या टप्प्यात अगदीच ‘नाव सांग बाळा’ असं गाल ओढून कोणी विचारत नसलं, तरी ‘नवीन काय शिकतोय’, ‘अभ्यासापेक्षा वेगळं काय करतेय’, ‘छंद कोणते’ - वगैरे प्रश्न सुरू झालेले असतात.
घरातल्या कामांमध्ये लक्ष दिलं नाही, मदत केली नाही, तर ‘आता तू काही लहान नाहीस’ हे केव्हाही ऐकवलं जातं. पौगंडावस्थेतल्या मुलामुलींनी अभ्यास आणि इतर गोष्टींबरोबरच लहानग्या भावाबहिणीची देखभाल करावी, घरकामात हातभार लावावा आणि मुख्य म्हणजे ‘शहाण्यासारखं’ वागावं अशी अपेक्षा ठेवली जाते.
पण तेच शहाणपण दाखवायला गेलो कुठे, तर लगेच ठेचलंदेखील जातं.
‘मोठ्यांमध्ये नाक खुपसू नकोस’,
‘लहानांनी यात पडायचं नाही’ - हाही डायलॉग केव्हा आणि कुठून आपल्यावर येऊन आदळेल, काहीच भरोसा उरत नाही.
आईची साडी, ड्रेस घातल्यावर ‘केवढी मोठी झालीस गं बायो’ असं कौतुक होतं. पण मोठी झाले म्हणून माझे मी काही निर्णय घेतले, तर मुलीच्या जातीने हे करायचं नाही, ते करायचं नाही, सातच्या आत घरात वगैरे सुनावलं जातं. वडिलांची चप्पल आपल्या पायात बसली, मिसरूड फुटले, कंठ फुटला, तर मुलगा मोठा आणि जबाबदार झालेला असतो. पण तरीही त्याने ‘मापात’ राहायचे, ही अपेक्षा घरी, दारी सर्वत्र असते.
त्याचा, तिचा ‘पाय घसरून’ चालत नाही.
चुकून घसरलाच कुणाचा पाय, तर पोरगा/पोरगी वाया गजेला/गेली, हा शिक्का मारायला लोक चटकन तयार असतात. मदतीचा हात देऊन उभे करणारे क्वचितच! मदत केली तरी सुनावत राहतात. ‘तुला काही अक्कल आहे का?’ म्हणून त्यांचं मत आपल्या अंगावर भिरकवतात.
त्यात सगळ्यात मोठा फोकस कशावर असेल, तर मुलांच्या प्रेमात पडण्यावर.
‘हेच दिवस आहेत अभ्यासाचे, प्रेमबिम करायला आख्खं आयुष्य पडलंय, नीट करिअर करा आधी’ - हे तर घरोघरचे कळीचे शब्द असतात.
‘वर्ष वाया नको जाऊ देऊस’,
‘फर्स्ट क्लास नाही, तर कुठंच काही मिळणार नाही... ’,
‘मित्रमैत्रिणी सगळे पुढे निघून जातील, तू मागे राहशील’
‘तो अमक्यांचा राजू आणि तमक्यांची राणी बघ, अभ्यास करून हे-ते करते, किती हुशार आहे’....
- असे शेकडो डायलॉग्ज बाहेरून आदळतात आपल्यावर. आपल्या मनात सुरू असलेला आपला शोध, आपल्या परिसराचा वेध हे सारंही नेमकं तेव्हाच सुरू होतं.
मग प्रश्न येतोच.. आपण नेमके कोण आहोत? धड लहान नाही आणि पुरते मोठे नाही. हा टप्पा आणि हे स्थित्यंतर व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असतं. या आधीच्या टप्प्यात वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपण आईवडिलांवर अवलंबून असतो. नवीन काहीही शिकायचं म्हटलं, दैनंदिन गोष्टी करायच्या म्हटल्या, तर ते लोक त्या आपल्याला शिकवत असत. त्याबद्दल चूक-बरोबर सांगून सुधारणा करत असत. तशा सुधारणा आपण सहज ऐकून घेतो कारण आपली पाटी मोस्टली कोरीच असते. पण आता आपली पाटी अगदीच कोरी नाहीये. प्रत्येक गोष्ट आईवडील, शिक्षक यांच्याच नजरेतून पाहावी असं आता आपल्याला वाटत नाही. आपलंदेखील स्वत:चं असं मत, आवड असते. आपल्याला वाटत असतं, मेरी भी कुछ फिलिंग्ज है यार....
या काळात आपण इंटरनेटवर असतो, व्हॉट्सअॅप ग्रुपवर असतो. बरंच काही वाचत असतो, चर्चा करत असतो. माहितीचा धबधबा आपल्यावर कोसळत असतो. आपण एखाद्या विचाराने भारावून गेलेलो असतो, कोणी रोल मॉडेल आपल्यासाठी तयार झालेलं असतं. कोणी सिक्स पॅकवालं किंवा एकदम सेक्सी कोणी आपल्या मोबाइलमध्ये, घरातल्या भिंतीवर, कॉम्प्युटरच्या डिस्प्लेवर झळकायला लागतं. आपण त्याच्याकडे किंवा तिच्याकडे बघून स्वत:ला आयडेंटीफाय करत असतो. मनातलं, विचारांमधलं सगळं विश्व असंच कोणीतरी व्यापून टाकलेलं असतं. आधीच्या शालेय टप्प्यात आपण चाचपडत असतो. इतर आपल्याला जे सांगतात, त्यावर मोस्टली शिक्के मारत असतो. पण आता आपल्याला ‘शिंगं फुटलेली’ असतात आणि आपलं असं मत प्रत्येक गोष्टीबद्दल तयार झालेलं असतं.
सध्या सेल्फीचं जग आहे. सेल्फी काढावासा वाटतो, कारण त्यात ‘आपण’ असतो. आपण कसे दिसतो, आपण केलेली फॅशन आपल्याला सूट होते की नाही, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आपण कसे दिसतो, कसे वावरतो, कालांतराने तोच फोटो बघताना आपल्या छान आठवणी राहतील वगैरे अशा वेगवेगळ्या कारणांसाठी आपण सेल्फीचे दिवाने असतो. इतके सेल्फी असूनदेखील आपल्या कपड्यांबाबत, चेहऱ्याबाबत, तरुणपणी चेहऱ्यावर जास्तच उगवणाऱ्या पिंपल्सबाबत, आपण स्वत:ला बरे कॅरी करतो की नाही ह्याबाबत इतके हजारो प्रश्न आणि शंका आपल्या मनात असतात की बास!
त्यात हातात फोन आहे, फेसबुक वगैरे सोशल नेटवर्किंग आहे. नेटपॅक मारलेला आहे. तरीही मनातलं बोलायला कोणी नाही. मला कोणी समजूनच घेत नाही, अशी भावना पण आहेच. काय करायचं तिचं?
या साऱ्या टप्प्यांवरची मनाची चलबिचल समजून उलगडायचा प्रयत्न मी या लेखमालेतून करीन असं म्हणते. पण त्यासाठी तुमची मदत आणि सहभागही लागेल. प्रश्न पाठवा. ईमेल करा. शेअर करा.
बाकी काही अट नाही. एक नियम तेवढा आहे : दिमाग खुला रखने का...
- प्राची पाठक
prachi333@hotmail.com
(मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच; शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)