झिडकारलेल्या आयुष्याला मायेची ‘सावली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:42 AM2019-03-17T00:42:16+5:302019-03-17T00:42:26+5:30

बेवारसपणाचा शिक्का घेऊन जगणाऱ्यांच्या विश्वात कुणी डोकावायला तयार होत नाही. अशाच स्थितीत सांगलीच्या ‘इन्साफ फाऊंडेशन’ व महापालिकेतील माणुसकी जपलेल्या अधिकाऱ्यांनी झिडकारलेल्या लोकांच्या आयुष्याला मायेची ‘सावली’ देण्याचे काम सुरू केले. मनोरुग्णांच्या अंध:कारातून प्रकाशाच्या दिशेने पडणाºया पावलांचा थक्क करणारा प्रवासही या सावलीत अनुभवास येत आहे.

'Shadow' of the scolded life | झिडकारलेल्या आयुष्याला मायेची ‘सावली’

झिडकारलेल्या आयुष्याला मायेची ‘सावली’

googlenewsNext

-अविनाश कोळी -

मळलेले, काळवंडलेले, फाटलेले कपडे... जटांचा डोईवरचा वाढत जाणारा भार...जनावरांप्रमाणे उकीरड्यावर होणारा उदरनिर्वाह...अडगळ, फुटपाथ किंवा गलिच्छ भागातील आसरा अशा गोष्टींमुळे समाजातील प्रतिष्ठित लोक बेवारस लोकांना, मनोरुग्णांना किळसवाणे ठरवितात. एकीकडे हा दृश्य गलिच्छपणा आणि दुसरीकडे विचारांनी, अन्यायकारक कृत्यांनी जपलेला पांढरपेशा समाजातील गलिच्छपणा दिसून येतो. समाजासाठी यातील कोणता गलिच्छपणा घातक असतो, हे सांगायची कोणाला गरज नाही. तरीही दृश्य स्वरूपात गलिच्छ वाटणाºया अशा बेवारस लोकांना मरणाच्या दाढेत ढकलून आपला समाज आपल्याच विश्वात रमत असतो; पण समाजातील काही घटक आजही अशा बेवारस मनोरुग्णांच्या पदरी आलेले झिडकारलेपण पाहून अस्वस्थ होतात.
सांगलीच्या इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर व त्यांच्या पथकाने सांगलीतील अशा लोकांना इन्साफ देण्याचा लढा उभारला. केवळ प्रसिद्धीसाठी चमकोगिरी करणाऱ्यांच्या गर्दीत त्यांची कृतिशील पावले अधिक प्रभावी ठरली.
मागील अनेक वर्षांपासून रस्त्यावरून फिरणाºया मनोरुग्णांना त्यांचे घर मिळवून देण्यापासून त्यांची सुश्रूषा करणे, त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी या संघटनेने केल्या. प्रसंगी कुटुंबातील व्यक्तींचे दागिने गहाण ठेवून त्यांनी या बेवारस लोकांना जपण्याचे काम केले. पदरमोड करीत कर्जाच्या खाईत लोटल्यानंतरही त्यांच्या विचारांची बैठक कधी डळमळीत झाली नाही. बेघरांसाठी एक जागा, एखादी इमारत मिळावी म्हणून कित्येक वर्षे धडपडणाºया या फाऊंडेशनला अखेर विद्यमान महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त स्मृती पाटील यांनी साथ दिली. आपटा पोलीस चौकीजवळील बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळेत ‘सावली’ हे केंद्र सुरू केले. बघता-बघता फाऊंडेशनने शहरांमध्ये फिरून २७ लोकांना याठिकाणी आसरा दिला. यातील सातजणांना त्यांचे घरही शोधून दिले.
शाळेतील खोल्यांमध्ये स्वच्छता करून प्रत्येकासाठी कॉट, गादी, बसण्यासाठी खुर्च्या, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, स्नानगृह अशा बºयाच सुविधा येथे उपलब्ध केल्या आहेत. जटा काढून, दाढी करून, अंघोळ घालून स्वच्छ कपड्यानिशी त्यांना नव्या विश्वात आणण्याचे काम फाऊंडेशनचे कार्यकर्ते करीत असतात. माया गडदे, रफिक मुजावर, अभिजित साळुंखे, राहुल चौगुले, बसवराज होसमणी, वंदना काळे, आदी कार्यकर्ते दिवस-रात्र राबत आहेत. लहान मुलांप्रमाणे अनेकांची सेवा करावी लागते. केवळ दररोज सायंकाळी हे मनोरुग्ण याठिकाणी पासिंग बॉल, क्रिकेट असे खेळही खेळत असतात. दररोज चहा, नाष्टा, जेवण यांसह रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवाही पुरविल्या जातात. नग्न मनोरुग्णांना आता स्वत: कपडे घालण्याचा आनंद वाटतो. इतका बदल या केंद्राने त्यांच्या जीवनात घडविला. सध्या महापालिका येथील सर्व खर्च करीत असली तरी, समाजातील माणुसकी जपणाºया लोकांच्या मदतीचे हातही या केंद्राला हवे आहेत. बेवारस म्हणून फिरणाºयांना एक मोठे कुटुंब यातून गवसले. अनिश्चिततेच्या दरीत कोसळणाºया या माणसांना सच्चा माणसांचे हात लाभले आणि ‘सावली’च्या माध्यमातून पोळलेल्या या जिवांना शीतल सावली गवसली.
(लेखक ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)

Web Title: 'Shadow' of the scolded life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.