शाहू पदस्पर्श की विचारस्पर्श? रविवार विशेष जागर
By वसंत भोसले | Published: February 16, 2019 11:57 PM2019-02-16T23:57:02+5:302019-02-16T23:59:51+5:30
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती गोळा करून त्याचे जतन करण्याची पद्धत ही एक भावना व्यक्त करण्याची चांगली संधी आहे. मात्र, त्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे दैवीकरण होऊ नये. एकदा दैवीकरण झाले की, त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष होते. शाहू समाधिस्थळाच्या निर्मितीनिमित्त सुरु असलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शाहू विचारस्पर्शाचा विचार करूया.
वसंत भोसले -
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती गोळा करून त्याचे जतन करण्याची पद्धत ही एक भावना व्यक्त करण्याची चांगली संधी आहे. मात्र, त्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे दैवीकरण होऊ नये. एकदा दैवीकरण झाले की, त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष होते. शाहू समाधिस्थळाच्या निर्मितीनिमित्त सुरु असलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शाहू विचारस्पर्शाचा विचार करूया.
कोल्हापुरातील नर्सरी बागेत महापालिकेच्या पुढाकाराने राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधिस्थळ साकारले जात आहे. त्या समाधिस्थळी एक पेटी ठेवण्यात येणार आहे. त्यात शाहू महाराज यांचा पदस्पर्श झालेल्या विविध ठिकाणांची माती जमा करून ठेवण्यात येणार आहे. त्याची मोहीम सध्या चालू आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचार, कार्य आणि परंपरेप्रती असलेली ही भावना आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ, स्मारकस्थळ आणि समाधिस्थळ याविषयी अनेक वर्षे चर्चा होताना दिसते. मात्र, या महान मानवाच्या कार्याला शोभेल असे स्मारक उभे राहिलेले नाही. त्यांना जाऊन २०२२ मध्ये शंभर वर्षे होणार आहेत. त्याला केवळ तीन वर्षे बाकी आहेत, तरीदेखील समाधिस्थळाचे काम पूर्ण होत नाही, हे दुर्दैव आहे.
महाराष्ट्राची विचारधारा ही छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदवी स्वराज्याची संकल्पना ते फुले-शाहू-आंबेडकर यांच्या कार्यापर्यंत व्यापून गेली आहे. याला सुमारे चारशे वर्षांचा इतिहास आहे, पार्श्वभूमी आहे. त्याच मार्गाने जाण्याचा आपण वारंवार निर्धार करतो आहोत. त्यासाठीच्या धोरणांचा आणि निर्णयांचा आग्रह धरतो आहोत. अनेक वंचित समूहघटक यावर निष्ठा ठेवून संघर्ष करीत असतात. या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरात सध्या चालू असलेल्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या जमिनीवरील माती गोळा करून ठेवण्याचा प्रयत्न स्वागतार्ह आहे; पण तो पुरेसा नाही. पदस्पर्शाने पुनीत झालेल्या मातीबरोबरच शाहू विचारांच्या स्पर्शाचे काय? असा सवाल मनात येतो. कारण महाराष्ट्राने दिवसेंदिवस फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे बोट सोडले आहे, असे वाटत राहते. कारण या विचारधारेनुसार समाजनिर्मिती करण्यासाठीची धोरणे स्वीकारण्यापासून आपण दूर जातो आहोत.
शाहू समाधिस्थळाच्या निर्मितीनिमित्त चालू असलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर शाहू विचारस्पर्शाचा विचार करूया.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्पर्शाने अनेक क्रांतिकारक निर्णय झाले. अनेक ऐतिहासिक कार्याची उभारणी झाली. ही केवळ ऐतिहासिक घटना नाही. ते एक विकासाचे मॉडेल आहे. आपल्या आजूबाजूच्या समाजाचे दु:ख, दारिद्र्य आणि गरिबी कशात आहे, याचा शोध घेत घेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी धोरणे स्वीकारली आहेत. सर्व समाजाची एकसंध उभारणी होण्यासाठी उच्च-नीच भावना संपुष्टात येण्यासाठी जातीव्यवस्थेविरुद्ध त्यांनी संघर्ष केला. तो सांस्कृतिक तसेच धार्मिक संघर्ष होता. समाजाच्या आर्थिक विकासासाठी शेती, उद्योग आणि व्यापारात प्रगती होण्याची गरज त्यांनी ओळखली होती. त्याप्रमाणे असंख्य निर्णय घेतले. शेतीसाठी पाणी, बियाणे, खते, पतपुरवठा, पशुपैदास, कृषी प्रदर्शने, आदी मार्गाने जाण्याचा विचार मांडला, तशी कृतीही केली. उद्योगासाठीही असेच निर्णय घेतले. व्यापारवृद्धीसाठी बाजारपेठांची उभारणी करण्याचा सपाटा लावला. या सर्व गोष्टी करण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज होती. रस्ते, तलाव, धरणे, रेल्वे, कारखाने, बाजारपेठ, आदींची उभारणी केली.
सामाजिक आणि आर्थिक सुधारणांबरोबरच शैक्षणिक उठाव होण्याची गरज आहे, हे त्यांनी ओळखले होते. शाहूवाडी परिसरातील थोरातांचा वडगावचा मुलगा पी. सी. थोरात-पाटील याने दहावीत गुणप्राप्त परीक्षा दिल्याचा आनंद त्यांना झाला होता. त्याचे कौतुक करण्यासाठी भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पन्हाळागडी त्यांची भेट झाली. त्या मुलाचे कौतुक करताना रयतेच्या मुलांना शिक्षण घेण्याची अडचण त्यांनी हेरली आणि केवळ एकवीस वर्षांत कोल्हापुरात वीस वसतिगृहे बांधली. क्रीडा, सांस्कृतिक, कला, संगीत, आदी क्षेत्रांचा विकासही मानवी विकासाच्या मार्गावरील महत्त्वाचे टप्पे आहेत, हे त्यांनी जाणून घेऊन निर्णय घेतले.
या सर्व निर्णयप्रक्रियेत पायाभूत सुविधा निर्माण करण्यात ते आघाडीवर होते. त्या सर्व कामांचे आपण शंभर वर्षांपासूनचे साक्षीदार आहोत. शाहू मिल, जयसिंगपूरची बाजारपेठ, राधानगरीचे लक्ष्मी धरण, खासबागेतील कुस्ती मैदान, दसरा चौकातील अनेक वसतिगृहे, रेल्वेस्थानक, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. या सर्वांचा विचार करण्याच्या त्यांच्या विचार प्रक्रियेमागे जागतिक बाजू होती. कोल्हापूर संस्थानचे राजपुत्र असल्याने त्यांना जगभरात जाण्याची संधी मिळाली. या राजाने राजेपण साजरे करीत न बसता, जगाचा विकास कोणत्या दिशेने होतो, याचा अभ्यास केला आणि हे आपल्या कोल्हापूर संस्थानात कसे करता येईल, याचा विचार मांडला. त्यांचे कार्य एक प्रकारचे शंभर वर्षांपूर्वीचे जागतिकीकरणच होते. खासबागेतील कुस्ती मैदान हे एक उदाहरण आहे. थंड हवेत कॉफी-चहाचे मळे उभारण्याचे त्यांचे प्रयोग हादेखील त्याचाच भाग आहे. आधुनिक नगररचनेनुसार जयसिंगपूरसारख्या आखीव-रेखीव व्यापारपेठेची उभारणी हा एक वेगळाच प्रयोग आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने हे सर्व घडले आहे, याबाबत संदेह नाही. त्यामुळे त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती गोळा करून त्याचे जतन करण्याची पद्धत ही एक भावना व्यक्त करण्याची चांगली संधी आहे. मात्र, त्यातून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे दैवीकरण होऊ नये. त्यांना देव्हाऱ्यात बसविले जाऊ नये. एकदा दैवीकरण झाले की, त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष होते. त्यांच्या विचारांनुसार सर्वसमावेशक समाजाची वाटचाल करण्याचा आग्रह मागे पडतो. महाराष्ट्राची आजची स्थिती पाहिली की, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची अधिक गरज आहे.
कोल्हापूरचा परिसर तर त्याच विचारांने वाटचाल करीत आला आहे. येथील औद्योगिकरण, व्यापारवृद्धी, शेती विकास, सहकार चळवळ, शैक्षणिक कार्याचा उठाव हा त्याचाच भाग आहे. किंबहुना शिव-शाहू विचारांनेच स्वातंत्र्य लढ्यातील प्रतिसरकारची उभारणीदेखील झाली. कर्मवीर भाऊराव पाटील आणि रयत शिक्षण संस्थेच्या चळवळीचा पाया याच विचारात आहे. राधानगरी धरणाच्या उभारणीच्या प्रेरणेतूनच अनेक धरणे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये होण्यासाठी येथील नेतृत्वाने काम केले. सहकार, उद्योग, दुग्धविकास, साखर उद्योग, शैक्षणिक संस्थांची उभारणी, आदी कामे करणारी स्वातंत्र्योत्तर काळातील नेतृत्वाची फळी शाहू विचारकार्यच करीत होती. हा विचार कायम प्रेरणास्थानी राहावा म्हणूनच शाहू स्मारकाची कल्पना मांडण्यात आली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारानेच जाणे सर्वसमावेश विकासाचे मॉडेल मांडता येऊ शकते. समाधिस्थळासाठी धडपडणाºया कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांच्या पायवाटेनेच जाण्याचा आग्रह धरला पाहिजे. शाहू कार्य थांबले आहे, असे सध्याची अवस्था पाहून वाटते. त्यांनी रेल्वे आणली, ती कोकणाला जोडणे, धरण उभारले. कोल्हापूर जिल्ह्यात सहा धरणांचे काम वीस वर्षे ठप्प आहे, ते करणे शाहू कार्य आहे.
सहकाराचा संकोच होतो आहे, तो टिकविणे शाहू कार्य आहे. सध्याचे शिक्षण दर्जाहीन होते आहे, ते राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारानुसार जगाला गवसणी घालणारे नाही. तसे शिक्षण देणाºया संस्थांची गरज आहे. ज्या संस्था आहेत, त्या बदलण्याची गरज आहे. वसतिगृहे ही शैक्षणिक शक्ती आहेत. ती बंद पडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. या सर्व वसतिगृहांचे फेडरेशन करून एकमेकांना मदत केली पाहिजे. कोल्हापूरला जोडणाºया सर्व रस्त्यांचा विस्तार करण्याची गरज आहे. कोल्हापूर समृद्ध हवाई मार्गाने जोडण्याची गरज आहे. हे सर्व कार्य शाहू विचारस्पर्श आहे. यासाठी आपण आग्रही आहोत का? आजची गरज ओळखून जागतिक दर्जाचे शिक्षण आपण भावी पिढीला देतो आहोत का? शेतीची कुंठित अवस्था जाणतो आहोत का? धरणे पटापट बांधतो आहोत का? यापैकी कोणतेही काम आपण करीत नाही आहोत.
कोल्हापूर ही कलानगरी, क्रीडानगरी, सांस्कृतिकनगरी, उद्योगनगरी, चित्रनगरी, ऐतिहासिकनगरी, पर्यटननगरी, आयटीनगरी, आदी सर्व क्षेत्रांत शाहू विचारांनी काम करण्याची संधी आहे. कोल्हापूर शहराचे एकही प्रवेशद्वार शाहूनगरीला शोभणारे नाही, याचा तरी साधा विचार करा. चित्रपटनगरी कोठे गायब झाली? क्रीडानगरीच्या विभागीय क्रीडासंकुलाची अवस्था केविलवाणी आहे. शिवाजी पुलाचा घोळ शरमेने मान खाली घालतो आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मारक जागतिक दर्जाचे करायला हवे. ते पर्यटनस्थळ नाही, तर ते विकासाचे मॉडेल मांडणारे केंद्र ठरणार आहे. यासाठीच केवळ पदस्पर्शापर्यंत न राहता विचारस्पर्शाचा आग्रह धरला पाहिजे. मागील पिढीने आणि नेतृत्वाने हे काम केले आहे. ते पुढे चालू ठेवायला हवे.