शकुंतला

By admin | Published: August 20, 2016 08:44 PM2016-08-20T20:44:29+5:302016-08-20T20:44:29+5:30

या ‘आजी’नं वयाची शंभरी ओलांडली आहे. गचके खातेय, पण आजही ती लेकरांना मायेनं अंगाखांद्यावर खेळवते, फिरवते. लेकुरवाळ्या बायकांचं तर तिला कोण कौतुक! आजच्या सुपरफास्ट जगातही तिला कोणतीच घाई नाही. रस्त्यावरचे प्रवासीच काय, अगदी वाहनं, गायी, म्हशींसाठीही ती थांबते, त्यांची वास्तपुस्त करते, त्यांना रस्ता करून देते. मग स्वत: जाते.. लचकत मुरडत.

Shakuntala | शकुंतला

शकुंतला

Next

- अविनाश साबापुरे
या ‘आजी’नं वयाची शंभरी ओलांडली आहे. गचके खातेय, पण आजही ती लेकरांना मायेनं अंगाखांद्यावर खेळवते, फिरवते. लेकुरवाळ्या बायकांचं तर तिला कोण कौतुक! आजच्या सुपरफास्ट जगातही तिला कोणतीच घाई नाही. रस्त्यावरचे प्रवासीच काय, अगदी  वाहनं, गायी, म्हशींसाठीही ती थांबते, त्यांची वास्तपुस्त करते,  त्यांना रस्ता करून देते.  मग स्वत: जाते.. लचकत मुरडत..
आता ती थकलीय. पावलं जडावलीत, अडखळत चालते, अधूनमधून आजारीही पडते, पण तिच्या डोळ्यांतला मायेचा पाझर आजही तसाच आहे. या आजीचा यवतमाळकरांनाही तेवढाच लळा..
खरं तर ती सगळ्यांची पणजी, खापरपणजीच. तरीही सारे तिला नावानंच हाक मारतात..



याची शंभरी ओलांडली म्हणून यवतमाळच्या लोकांना ती आजीसारखी मायाळू वाटते. लेकरांना तिचा लळा आहे. तिच्या अनेक सुरस कथा पंचक्रोशीत पसरल्या आहेत, म्हणून तरुणांमध्ये ती एखाद्या चित्रपट ललनेसारखी फेमस आहे. कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये तिच्यावर भरमसाट विनोदही होतात. ती रेल्वे आहे. पण शकुंतला हे तिचे नामाभिधान एखाद्या जवळच्या नातेवाइकासारखे यवतमाळकरांनी केले आहे. मूर्तिजापूर ते यवतमाळ दरम्यानच्या खेड्यापाड्यातील नागरिकांना प्राणप्रिय असलेली ही रेल्वेगाडी श्रावणात तपोनेश्वराच्या दर्शनाला जाण्यासाठी सोयीची म्हणून महिलावर्गातही मानाची. ब्रिटिशांनी सुरू केलेली अन् प्रदीर्घ काळापासून टिकून असलेली शकुंतला रेल्वे आता गचके खात आचके देऊ लागली आहे. पण अजूनही तिच्या अस्तित्वावर यवतमाळला अभिमान आहे. जिल्ह्याची अस्मिता बनलेली शकुंतला जगविण्यासाठी यवतमाळकर धडपडत आहेत.
रेल्वेफाटकावरचे एक दृश्य कॉमन असते. रेल्वे जाईपर्यंत चारचाकी, दुचाकी वाहने खोळंबून उभी राहतात. पण शकुंतला एक्स्प्रेसची रीतच न्यारी. दुचाकी वाहनांसाठीही ती अदबीने उभी राहते. आधी इतर वाहनांना जाऊ देते अन् मग ही रेल्वे रस्ता ओलांडते! रेल्वेचा हा अजब समंजसपणा पाहायचा, तर मंडळी, यवतमाळला यावंच लागेल. शकुंतलेच्या डब्यात चढले की असे अनेक विचित्र तरीही हृदयस्पर्शी प्रसंग घडत जातात.
शकुंतला रेल्वेची एकदा तरी वारी घडावी, ही प्रत्येक यवतमाळकर माणसाची इच्छा असते. श्रावणाच्या हिरव्या वातावरणात आम्हीही एका सोमवारी शकुंतलेची सैर करून पाहिली. तोटा सहन करूनही ग्रामीण प्रवाशांना अंगाखांद्यावर बसवून नेणारी ही रेल्वे खरोखरच निर्लेप आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर स्थानकावरून आम्ही शकुंतलेचे बोट धरले ते यवतमाळ स्थानक येईपर्यंत आम्ही वेगळ्या जगातच वावरलो. शकुंतला ही केवळ गाडी नसून एक आगळी दुनियाच आहे, तिच्या तऱ्हाही आगळ्या आहेत. या गाडीत बसल्याशिवाय या दुनियेची मौज कळत नाही. 
देशातील इतर रेल्वे कितीही सुसाट पळत असल्या तरी, शकुंतला रेल्वे ताशी १५ किलोमीटरपेक्षा जास्त पळत नाही. एक अवजड इंजिन आणि त्याला जोडलेले तीन-चार डबे..बस्स. मूर्तिजापूरपासून कारंजापर्यंत दहा-बारा प्रवासी दिमतीला. कारंजानंतर यवतमाळपर्यंत तर डब्यांमध्ये ठणठणाटच. शंभर आसनक्षमतेच्या डब्यात एखाद दुसराच प्रवासी, तोही पेंगुळलेला. हातपाय ताणून राजेशाही थाटात त्याचा प्रवास सुरू झालेला. बसा, झोपा, दारात उभे राहा, काहीही करा... रोखणारे कुणी नाही. दोन्ही बाजूंनी खुल्या असलेल्या दारा-खिडक्यांतून यवतमाळ जिल्ह्याचा निसर्ग खुणावतो. डोंगर-कपारी, शेत, माळ यांचा शेजार शकुंतलेला लाभत जातो. प्रवाशाने दारात उभे राहून गार वारा तोंडावर झेलत शकुंतलेची धिम्या गतीची किमया भोगत राहावी. त्यातच पावसाचे तुषार गात सुटतात 
आपल्या तळपायाखालून सरकणारी नदी पाहण्याची गंमत काही औरच. दारव्हा जिल्ह्यातील अडाण, गोखी या नद्या सध्या पुराने उधाणल्या आहेत. शकुंतलेच्या दारातून ही नदी पार करताना विमानप्रवासाचा प्रत्यय येतो. श्रावणाने धरित्रीला दिलेले हिरवेगार दान शकुंतलेच्या रुळांनाही लगडून गेले आहे. हिरव्याकंच गवतांमुळे रूळ अदृश्य झालेले. खिडक्यांतून कामुन्यांची फुले डब्यात डोकावून पाहतात. ही रानफुले इतकी जवळ येतात की जणू हात लांबवावा अन् तोडून घ्यावी. पण क्षणाक्षणाला डोळ्यापुढचे निसर्गचित्र इतक्या कलाटण्या घेत राहते की आपलीच अवस्था भ्रमरासारखी होते. कामुन्या मागे सरतात न सरतात तोच काटेसावरी दर्शन देते. मग सुबाभुळाची पिवळीधम्म फुले, मग सागवानाची सुपाएवढी पाने, जरा मान उंचावली की कपाशीच्या पऱ्हाट्या, तरारून आलेली सोयाबीनची रोपटी... एक ना अनेक. यवतमाळ जिल्ह्यातला हिरवा स्वर्गच दिसतो शकुंतलेच्या हळुवार प्रवासात!
नावाप्रमाणेच शकुंतलेची चालही लचकत मुरडत. पहिला डबा डावीकडे झुकला की दुसरा डबा उजवीकडे कललाच समजा. पण या नखरेल चालीची आतल्या प्रवाशांना झळ जाणवत नाही. जाणवलीच तर झुल्यासारखी. धावपळीच्या जगण्याचा कंटाळा आलेल्या लोकांनी एकदा शकुंतलेत प्रवास करूनच बघावा. तिची गती अत्यंत संयमी. या रेल्वेमार्गावर जागोजागी १० किलोमीटर प्रती तास, १५ किलोमीटर प्रती तास अशी गतिमर्यादेची फलके दिसतात. प्रत्यक्षात चालक त्या गतीहूनही अधिक हळवा होतो. चढावावर शकुंतलेची पावलं जडावतात. कधी-कधी तर वाटते गाडी थांबलेलीच आहे. बाहेर डोकावले तरी झाडे भराभर मागे सरताना जाणवत नाही. मग थोडे जमिनीकडे कटाक्ष टाकला तरच सत्य कळते... शकुंतला धावत नाही, चालतेय! 
हा प्रवास असाच सुरू असताना मध्येच एखाद्या शेतातले मजूर उठून प्रचंड उत्सुकतेने शकुंतलेकडे बघत राहतात. वर्षानुवर्षे शेतशिवारातून धावणारी शकुंतला त्यांच्या जगण्याचा भाग बनली आहे. दैनंदिन कामाचे तास मोजण्याचे शकुंतला घड्याळ बनली आहे. शकुंतला चालली म्हणजे दोन वाजले, शिदोरी सोडण्याची वेळ झाली, हे मजुरांना कळते. म्हणूनच शकुंतलेचे दर्शन मजुरांसाठी दिलासा ठरते. शकुंतला जनसामान्यांशी जुळली आहे. 
सामान्यपणे रेल्वेमार्गांचा परिसर भकास असतो. रुळांच्या आसपास कुणाला भटकायला परवानगी नसते. लोकांनाही भीती वाटते. पण शकुंतलेच्या रेल्वेरुळांना अगदी लागूनच पायवाटा आहेत. एकीकडे शकुंतला अन् तिच्याच बाजूने एखादा कास्तकार गडी पायदळ चाललाय, हे दृश्य इथे नवलाचे नाही. म्हणूनच रुळावर गायी-म्हशींचे कळप नेहमी आडवे येतात. शकुंतला कुरकुरत नाही. गुरांसाठी थांबते. गुरे बाजूला गेली की मगच शकुंतला पुढे निघते. तेवढ्यात गुराखी प्रवाशांना रामराम ठोकतो. यवतमाळकरांचा हा सन्मान प्रवाशांना भारावून टाकतो. काहींना मजेशीरही वाटतो. डबक्यात डुंबणाऱ्या म्हशी शकुंतलेचा धडधडाट ऐकून माना वळवितात. झाडावरची वानरे टणाटण उड्या मारत पळून जातात. शहरात कधीही न दिसणारे राघूचे थवे भर्रकन् झेपावतात. ही मजा संपते न संपते तोच तपोना गावातील जिल्हा परिषद शाळेची मुले बाहेर येऊन शकुंतलेला ‘टाटा’ करतात. शकुंतला कितीही ‘स्लो’ असली तरी यवतमाळ जिल्ह्यातून धावणारी ही एकमेव रेल्वे असल्याने तिचे अप्रूप आहे.
तपोना गावाच्या थांब्यावर शकुंतला थांबते. काही तासांपासून दारातच बसलेला कंडक्टर पाय मोकळे करायचे म्हणून खाली उतरतो. एक नंबरच्या डब्यातला एकमेव प्रवासी डब्यातून उतरून जातो. हात पाय मोकळे करण्याचा कार्यक्रम आटोपल्यावर कंडक्टर आम्हाला विचारतो, 
‘चलायचे की थांबायचे थोडावेळ?’ 
आम्ही हरखून जातो. तरी म्हणतो, ‘नाही नाही, थांबायचे कशाला? चला जाऊ या..’ 
आम्ही डब्यात चढणारच, तेवढ्यात तपोना गावातील दोन इसम धापा टाकत धडकतात. एकाच्या काखेत लेकरू. कंडक्टरला वाटते, प्रवासी आले. पण आलेले दोघे अजिजीने विणवतात, 
‘सायेब, थांबाना जरासे. लेकरानं शकुंतलेसंगं फोटो काढाचा हट्ट धरला.’ कंडक्टरही उभा राहतो. एक जण शकुंतलेच्या दारात लेकरू घेऊन उभा राहतो. दुसरा फोटो काढतो. त्यानंतरच शकुंतला पुढचा मार्ग धरते. सर्वसामान्य माणसांसाठी एवढा वेळ देणारी दुसरी रेल्वे कुणीही दाखवून द्यावी!
हात दाखवा एसटी थांबवा या योजनेला अनेक एसटीचालकही फाटा देतात. पण शकुंतला रेल्वेचे चालक ही माणुसकी फार जपतात. लिंगा नावाच्या गावात दोन महिलांनी धावत्या शकुंतलेला हात दाखवला अन् शकुंतला कोणतीही कुरकुर न करता निमूट थांबली. दोन्ही महिला आत चढल्या. विशेष म्हणजे, त्यांनी तिकीट काढण्याची तसदी घेतली नाही अन् कंडक्टरही त्यांच्याकडे कधीच फिरकला नाही. यवतमाळ शहर जवळ येताच लोहाराच्या रेल्वे क्रॉसिंगवर शकुंतला थांबली तेव्हा या महिला राजरोस उतरूनही गेल्या. 
शकुंतलेचा आजवर कधीही अपघात झाला नाही. त्याचे कारण या प्रवासातून कळले. रेल्वेरुळांवर पहिला हक्क रेल्वेचा असला तरी शकुंतला आधी इतर वाहनांना जाऊ देते. आतताईपणे अधिकार नाही गाजवत. रेल्वे फाटक आले की आगळीच मजा. फाटकापूर्वीच रेल्वे थांबून जाते. ट्रक, एसटी, जीप, कार, दुचाकी वाहने भराभर शकुंतलेच्या पुढून निघून जातात. फाटकापूर्वी ठिकठिकाणी ‘इंजिन स्टॉप’चे फलक लावले आहेत, त्याचा हा परिणाम. शकुंतलेच्या फाटकांवर माणसांची नेमणूक नाही. फाटक आले की, रेल्वेतीलच एक कामगार उतरून लाल झेंडी घेऊन रस्त्यावर उभा राहतो. वाहने थांबली तरच रेल्वे पुढे जाते. 
ढुमणापूरच्या रेल्वेफाटकावरचा हा किस्सा... शकुंतला आणि ट्रक एकाच वेळी फाटकापर्यंत पोहोचले. ट्रकचालकाला वाटले, रेल्वेला आधी जाऊ द्यावे. तो थांबला. शकुंतलेचा चालक मात्र सवयीप्रमाणे रेल्वे थांबवून मोकळा झाला. दोघेही पुढे सरायला तयार नाही. हा प्रकार एका दुचाकी चालकाला अत्यंत बुचकळ्यात टाकून गेला. दोन्ही चालकांकडे आश्चर्याने पाहत तो भुर्र निघून गेला. मग अदमास आल्याने ट्रकही निघून गेला. पण शकुंतला मात्र अजून कोणते वाहन येतेय का, याची काळजी घेत जागच्या जागी उभीच! 
अत्यंत हळू चालणे... अडखळणे... मध्येच आजारी पडणे... पुन्हा काठीचा आधार घेत चालण्याचा प्रयत्न करीत राहणे.. ही म्हातारपणाची व्यवच्छेदक लक्षणे शंभरी ओलांडलेल्या शकुंतलेतही आहेत. पण कासवाच्या गतीने धावणारी ही रेल्वे कासवाची सचोटीही बाळगून आहे. म्हणूनच जराजर्जर झाली तरी अस्तित्व टिकवून आहे. हळू चालणे शकुंतलेचे वैगुण्य आहेच, पण तेच तिचे वैशिष्ट्यही आहे. गतीचे वेड लागलेल्या आजच्या आधुनिक पिढीला शकुंतला रेल्वेची धिमी चाल हास्यास्पद वाटली तर नवल काय? पण वर्षानुवर्षांपासून याच धिम्या गतीमुळे शकुंतला प्रसिद्धी पावली आहे. 
महाराष्ट्र यवतमाळला ज्या काही मोजक्या कारणांसाठी ओळखतो, त्यात शकुंतला हे नाव अग्रभागी आहे. 
यवतमाळ-मूर्तिजापूर (जि. अकोला) या ११३ किलोमीटरच्या तसेच मूर्तिजापूर-अचलपूर (जि. अमरावती) या ७६ किलोमीटरच्या रेल्वेमार्गावर धावणारी शकुंतला गाडी ब्रिटिशांनी (क्लिक निक्सन अँड कंपनीने) १९१६ मध्ये सुरू केली. शतकी प्रवास करणाऱ्या या रेल्वेची गती कधीच वाढली नाही. 
नॅरोगेजऐवजी या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. 
नुकताच २२ जुलै २०१६ ला क्लिक निक्सन कंपनीचा करार संपला असून, भारतीय रेल्वेने शकुंतलाबाबत पुढची प्रक्रिया सुरू केली आहे. हा मार्ग ब्रॉडगेज करण्यासाठी दीड हजार कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. शकुंतलेला ऊर्जितावस्था आली तर यवतमाळ जिल्ह्याच्या विकासालाही नवी झळाळी येणार आहे.
या निमित्ताने म्हटले, सांगूयाच या शकुंतला आजी-पणजीची न्यारी गोष्ट!

कारंजा येथून शकुंतलाचे तिकीट दर
कारंजा ते कारंजा टाऊन : ५ रुपये
दादगाव : ५ रुपये
पोहणी : ५ रुपये
विलेगाव : ५ रुपये
किनखेड : ५ रुपये
सोमठाणा : ६ रुपये
सांगवी : ७ रुपये
वरुडखेड : ८ रुपये
भांडेगाव : ९ रुपये


दारव्हा : १० रुपये
तपोना : १३ रुपये
बोरीअरब : १३ रुपये
लाडखेड : १४ रुपये
लिंगा : १४ रुपये
लासिना : १५ रुपये
यवतमाळ : १८ रुपये
यवतमाळ ते 
मूर्तिजापूर : २७ रुपये




रेल्वेस्थानकांची पडझड

ब्रिटिश राजवटीत सुरू झालेली शकुंतला रेल्वे कण्हत-कुथत का होईना, पण सुरू आहे. मात्र या रेल्वेमार्गावर बांधण्यात आलेली दर्जेदार स्थानके आता अडगळीत पडली आहेत. एकेकाळी प्रवाशांनी गजबजलेल्या या इमारती आता ओस पडल्या असून, नानाविध गैरप्रकारांना या पडक्या ठिकाणांचा आडोसा मिळत आहे. शकुंतलेच्या रेल्वेमार्गावर एकंदर १७ स्टेशने आहेत. या ठिकाणच्या इमारती पडत-झडत असल्या तरी ब्रिटिशकालीन पक्क्या बांधकामांमुळे अद्यापही तग धरून आहेत. रेल्वेमार्गावरील पुलांच्या डागडुजीची अत्यंत गरज आहे. पुलांच्या आणि रुळाच्या वाईट अवस्थेमुळे शकुंतलेचा वेग मर्यादित ठेवण्यात आला आहे, हे विशेष.

४०० लिटर डिझेल अन् 
१४५ रुपये उत्पन्न !
पूर्वी शकुंतलेची गती ताशी २७ ते ३० किलोमीटर होती. आता ही गती १५ किलोमीटरपर्यंत घटली. जुने इंजिन बदलून नागपूरवरून नवीन इंजिन बोलावण्यात आले. २०१३ आणि २०९ नंबरचे हे इंजिन आहे. पूर्वी कोळशावर चालणारी शकुंतला आता डिझेलवर चालत आहे. खिळखिळे झालेले पूल आणि रूळ यामुळे इंजिनची गती कमी करण्यात आली आहे. यासोबतच डब्यांची संख्याही पाचवरून तीन अशी कमी करण्यात आली आहे. 
सकाळी ७.०५ वाजता मूर्तिजापूरवरून शकुंतलेचा प्रवास सुरू होतो. दुपारी ३ वाजता ती यवतमाळात पोहोचते. चारशे कर्मचारी पूर्वी कार्यरत होते. आता या ठिकाणी शंभरच कर्मचारी उरलेत. मूर्तिजापूर ते कारंजापर्यंत बऱ्यापैकी प्रवासी असतात. तेथून पुढे मात्र प्रवासीच मिळत नाहीत. यवतमाळ ते मूर्तिजापूर एसटीने प्रवास करण्यासाठी १६० रुपये लागतात. हाच प्रवास शकुंतलेने केवळ १८ रुपयात होतो. तरीही शकुंतलेला प्रवासी न मिळण्याचे कारण म्हणजे तिची धिमी गती. आम्ही प्रवास केला त्या सोमवारी मूर्तिजापूर ते यवतमाळ हे अंतर पार करण्यासाठी शकुंतलेला ४०० लिटर डिझेल लागले, तिकिट बुकिंग मात्र केवळ १४५ रुपयांचे झाले!

Web Title: Shakuntala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.