या सौंदर्याला आरसा दाखवा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:06 AM2019-05-26T00:06:00+5:302019-05-26T00:10:02+5:30

गिरचे सिंह दगावले की राष्ट्रीय वाहिन्यांवर बातम्यांची धामधूम... ताडोबात वाघ दिसला की महाराष्ट्रभर आनंदाची लहर... मग पांढरकवड्याच्या टिपेश्वर अभयारण्याने कुणाचे काय घोडे मारले? इथे एक दोन नव्हे, तीन-तीन वाघ एकत्र दिसतात, पण साधी स्थानिक वर्तमानपत्रातही बातमी झळकत नाही. वाघांच्या प्रजननासाठी आणि नैसर्गिक अधिवासासाठी टिपेश्वरचे जंगल अत्यंत पोषक असल्याचे इथले वनाधिकारी वारंवार सांगतात. पण वाघांची संख्या टिकविण्यासाठी धडपडणारे सरकार आपल्याच अधिकाऱ्यांचे कानावर घेत नाही.

Show the mirror to this beauty ..! | या सौंदर्याला आरसा दाखवा..!

या सौंदर्याला आरसा दाखवा..!

googlenewsNext
ठळक मुद्देटिपेश्वर अभयारण्याचा दुर्लक्षित देखणेपणा

महाराष्ट्राच्या वन्यजीवसृष्टीचा देखणा खजिना असलेल्या या टिपेश्वर अभयारण्यावर एवढे दुर्लक्ष का? यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा-घाटंजी तालुक्यापासून तर थेट तेलंगणाच्या सीमेपर्यंत ५० किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरात पसरलेले हे जंगल. रंगबिरंगी फुलपाखरांचा अभ्यास करणारे, तर कधी व्याघ्रदर्शनाची आस घेऊन येणारे अन् कधी औषधी वनस्पतींचा ध्यास घेऊन येणारे व्यासंगीच येथे येत असतात. महाराष्ट्रभरातील निसर्गसौंदर्याची आसक्ती असणाऱ्या पर्यटकांपर्यंत कधीही टिपेश्वरची खबरबातच पोहोचू दिली जात नाही. ते जेव्हा विदर्भाचे सौंदर्य पाहायला येतात, तेव्हा साहजिकच ताडोबाकडे धावतात. पण यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वरमध्ये २० वाघ असल्याची माहिती त्यांना का दिली जात नाही? राज्याच्या वनमंत्र्यांनी व्याघ्र बचाव मोहिमेसाठी बिगबी अमिताभ बच्चन यांना व्याघ्रदूत केले आहे. पण या व्याघ्रदूताला तरी टिपेश्वरची माहिती मिळालेली आहे की नाही, प्रश्नच आहे. कारण गेल्या तीन वर्षात टिपेश्वरकडे येणे तर दूरच, पण साधा शासकीय जाहिरातींमध्येही टिपेश्वरचा उल्लेखही झाला नाही.
स्थानिक गावकऱ्यांनी या भागात वाघांचा मुक्त संचार पाहिला आहे. वारंवार पाहिला आहे. वन्यजीव अभ्यासक डॉ. रमझान विराणी तर म्हणतात, येथे २० पेक्षा अधिक वाघ आहेत. टिपेश्वरच्या हद्दीत आणि हद्दीबाहेरही अनेक वाघांचा वावर आहे. हे क्षेत्र आता वाघांसाठी अपुरे पडत आहे. मात्र शासनाच्या यंत्रणेला येथे गणना करताना केवळ दोनच वाघ का दिसतात, हा प्रश्न अनुत्तरित आहे. खुद्द या जंगलात काम करणारे वनकर्मचारीही या आकडेवारीने चकित आहेत. एकीकडे प्रसिद्धी माध्यमे अन् दुसरीकडे सरकार दोघांकडूनही टिपेश्वरच्या सौंदर्याचे दमनच सुरू आहे. या अभयारण्याला व्याघ्रप्रकल्पाचा दर्जा मिळण्याची अत्यंत आवश्यकता असताना साधे अभयारण्य म्हणूनही त्याचा सन्मान होताना दिसत नाही. त्यामुळे स्थानिक जिल्हावासीयांच्या मनातही टिपेश्वर म्हणजे केवळ घनदाट जंगल या पलिकडची जाणीव नाही. उन्हाळी सुटीत टिपेश्वरमध्ये जाणाऱ्या पांढरकवड्यातील पर्यटकांना मात्र वाघांचे बेसुमार दर्शन घडत आहे. ताडोबापेक्षाही अत्यंत ‘नैसर्गिक’ दर्शन होत असल्याचे संजय महाजन व त्यांच्या सोबत गेलेल्या तीन-चार पर्यटक कुटुंबांनी सांगितले. स्थानिकांमध्ये हळूहळू टिपेश्वरचे मोल वाढत आहे. आता अवघ्या महाराष्ट्रातील आणि देशातील पर्यटकांपर्यंत ही द्वाही पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी शासनाने टिपेश्वरच्या सौंदर्याला आरसा दाखवला, तरच टिपेश्वरच्या रूपाचे प्रतिबिंब खुलेल आणि टिपेश्वरला स्वत:लाही कळेल.. आपण नुसते जंगल नव्हे, वाघांचे माहेरघर आहोत!

  • अविनाश साबापुरे

Web Title: Show the mirror to this beauty ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.