रेशमाच्या पायघडय़ा
By admin | Published: October 3, 2015 10:20 PM2015-10-03T22:20:50+5:302015-10-03T22:20:50+5:30
आठ कोटी एकर पसरलेलं ते उजाड वाळवंट. तिथल्या विरळ ओयासिस-ठिपक्यांना जोडत जाणारी, अस्ताव्यस्त, पिंजारलेल्या फाटय़ांत गुंतलेली ती अवघड-खडतर व्यापारवाट.
Next
>- डॉ. उज्ज्वला दळवी
आठ कोटी एकर पसरलेलं ते उजाड वाळवंट.
तिथल्या विरळ ओयासिस-ठिपक्यांना जोडत जाणारी,
अस्ताव्यस्त, पिंजारलेल्या फाटय़ांत गुंतलेली ती अवघड-खडतर व्यापारवाट.
व्यापा:यांनी या दुर्गम भागांतही हितसंबंधांचं रेशमी विणकाम केलं.
जेव्हा दळणवळण अशक्य झालं तेव्हा तो दोस्तीचा गालिचा
त्यांनी गुंडाळून, जपून ठेवला.
अपेक्षा आहे तो पुन्हा उलगडण्याची.
सारे धनाढय़ व्यापारी प्रासादतुल्य कारावानसराईमध्ये गाद्यागिरद्यांवर पहुडले होते. त्यांचा मौल्यवान माल कडय़ाकुलपांत, सशस्त्र पहा:यात सुरक्षित होता. ज्याच्या भरवशावर ते प्रवास करत होते तो त्यांचा जाणकार, तरबेज, कलंदर वाटाडय़ा बाजूच्या लहानशा खाणावळीत सुखाने झोपला होता. त्याच्या भटक्या, मेंढपाळ जमातीने वाळवंटी भटकंतीचं बाळकडू त्याला अगदी लहानपणापासूनच पाजलं होतं. उन्हाळ्यात आग ओकणा:या, हिवाळ्यात हाडं गोठवणा:या आणि बेसावध माणसावर हा हा म्हणता वाळूचं थडगं उभारणा:या द्रृष्ट वा:यांना पाठ कशी द्यावी ते त्याला उपजतच अवगत होतं. आसपासच्या बहुतेक गावबोलींमध्ये पोटापुरती दरखोरी आणि दोस्तीही त्याला जमत होती. मेंढय़ा-लोकर-दूध देऊन त्या बदल्यात पोटभरीचे गहू-तांदूळ घेताना त्याची त्या श्रीमंत व्यापा:यांशी जानपहचान झाली होती. अडीच हजार वर्षांपूर्वीच्या त्या निष्पर्ण-निष्तृण ताकलामकान वाळवंटातल्या मार्गावर तशा वाटाडय़ाची किंमत व्यापा:यांनी जाणली आणि चुकवलीही होती.
‘ताकलामकान’चा अर्थच ‘विनापरतीचं ठिकाण’ असा आहे. आठ कोटी एकर पसरलेल्या त्या उजाड वाळवंटाच्या उत्तर-दक्षिण किना:यांवरून, विरळ ओयासिस-ठिपक्यांना जोडत जाणारी, अनेक अस्ताव्यस्त पिंजारलेल्या फाटय़ांत गुंतलेली ती अवघड-खडतर व्यापारवाट होती प्राचीन ‘रेशीमवाट’ ऊर्फ ह्यर्र’‘ फ43ी! उत्तरेला आणखी एक गोबीचं वाळवंट, दक्षिणोला हिमालय, काराकोरम आणि कुनलान पर्वतांच्या दुर्गम रांगा, वायव्येला तियानशान पर्वत, पश्चिमेला पामीरचं पठार आणि हिंदुकुश पर्वत अशा अडचणींनी घेरलेल्या प्रदेशातून माणसाच्या अदम्य साहसाने तो मार्ग काढला होता. त्याचे उत्तरापथ-दक्षिणापथ पूर्वेला एकवटून गॅन्सूच्या सुपीक पट्टय़ातून शांगानपर्यंत जात. पश्चिमेलाही एक वाट होई पण तिला पुन्हा अनेक फाटे फुटत. त्यांच्यातला मुख्य फाटा भूमध्यसागराच्या काठी, इस्तंबूलला जाई. दक्षिणोला पर्वतांच्या अवघड खिंडींतून काही फाटे भारतातही पोचत.
शांगान ते रोम 4000 मैल ऐल ते पैल जायचं धाडस क्वचित कुणी करत असे. बहुतेक जण काही ओअॅसिसपर्यंतचं, पुण्यामुंबईइतकं अंतर कापून पोटापुरता व्यापारउदीम साधत. दर बारा मैलांवर भाषेबरोबर दलाल बदलत. तशा हस्तांतरणाने माल पूर्वेहून पश्चिमेपर्यंत पोचायला युगं लोटत. दूरपर्यंत जाणा:या साहसी व्यापा:यांना वाट दाखवायला जागोजागचे भटके लोक त्यांच्यासोबत जात.
युएत्झी (कुषाण), सोग्डियन (शक), झॉइंगन्यू (हूण) वगैरे अनेक भटक्या जमातींनी आपापल्या स्वभावाप्रमाणो व्यापा:यांशी हातमिळवणी केली किंवा त्यांच्याशी हातघाईवर आले. सीमेजवळून जाणा:या रस्त्यांना हूणांपासून संरक्षण मिळावं म्हणून तिथे किल्ले आणि तटबंदी उभारली होती. चीनची प्रसिद्ध भिंत त्या तटबंदीचाच भाग आहे.
पार्थियन (इराणी) युद्धकैद्यांच्या अंगावर झुळझुळीत, तलम रेशमी वस्त्रं बघून दोन हजार वर्षांपूर्वी रोमनांना पूर्वेकडच्या गूढ ‘रेशमी लोकां’चा ध्यास लागला. त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी पश्चिमेकडून रेशीमरस्त्याची निगा केली गेली. पण त्या रस्त्यावर केवळ रेशमाचा व्यापार झाला नाही. चिनी मातीची भांडी, जेड रत्नं आणि नवलकोलदेखील चीनकडून जगाला लाभले. मोबदल्यात सोनंरूपं, हस्तीदंत, लापिसलाझूली त्या मार्गाने चीनला गेले. द्राक्षांची दारू गाळायची कलाही चीनला त्याच वाटेने पोचली. कागद बनवायचं तंत्र चीनने जगाला दिलं ते त्याच मार्गावरून आणि पोकळ बांबूतून रेशीमकिडे चोरायची रोमच्या हस्तकांची पळवाटही तीच! चीनहून पळालेल्या कारागिरांनी उझबेकिस्तान्यांना धातूचं ओतकाम शिकवलं.
रोमपासून चीनपर्यंतच्या 4000 मैलांच्या परिसरातल्या अनेक प्रकारच्या माणसांमध्ये सुमारे दोन हजार वर्षं ती आर्थिक-सांस्कृतिक देवाणघेवाण चालली होती. व्यापारवाटेच्या गरजेनुसार मार्गात अनेक थांबे निर्माण होत, त्यांचं गजबजलेल्या वसाहतींत रूपांतर होई. तिथे भोवतालच्या संस्कृतीचं येत्याजात्या पाहुण्यांच्या संस्कृतीशी मेतकूट जमे. मध्य आशियात पार्थियन (इराणी) आणि सीरियन चालीरीतींचं मिश्रण होतं. सव्वादोन हजार वर्षांपूर्वी सिकंदराने त्यात ग्रीक पुराण, कला, स्थापत्य यांचं विरजण लावलं आणि संमिश्र गांधार संस्कृती जन्मली. हूणांशी लढणं सोपं जावं म्हणून चीनच्या सम्राटाने पश्चिमेचे बलवान घोडे आणवले. त्यासाठी त्याने पश्चिमेच्या दिशेने रेशीमरस्ता अधिक काळजीपूर्वक बांधला. घोडय़ांसोबत गांधार संस्कृतीतल्या धार्मिक कलाकृतीही चीनला पोचल्या. उत्तरेकडच्या कुषाणांना हूणांनी हुसकलं. ते रेशीमपट्टय़ातून भारतात गेले. येत्या-जात्या प्रत्येकाने आपापली संस्कृती सोबत आणली. आधीच अनेकरंगी असलेल्या त्या सांस्कृतिक गालिचात नवे रंग मिसळले. तिथल्या प्राचीन अवशेषांत सापडलेल्या, भारतीय बनावटीच्या एका सुती कापडावरच्या चित्रत चिनी ड्रॅगन आणि ग्रीक देवता गुण्यागोविंदाने एकत्र नांदताहेत!
मोगाव लेण्यातला बुद्ध
शक धर्माने झोरोस्ट्रियन असले तरी ते ब्रrा-विष्णू-महेश-दुर्गा यांनाही भजत असं म्हणतात. दोन हजार वर्षांपूर्वी चिनी सम्राटाच्या आमंत्रणामुळे कश्यप मातंगाने चीनला जाऊन बौद्ध धर्मोपदेश आणि धर्मग्रंथांचं चिनी भाषांतर केलं. कुषाणसम्राट कनिष्काच्या अश्वघोष नावाच्या भारतीय सल्लागाराने पेशावरपर्यंत, पथनाटय़ांतून बौद्ध धर्माचा प्रसार केला. गांधारात बुद्धाला देवत्व लाभलं. धर्मभीरू गावक:यांनी रेशीमरस्त्यालगत मठ-स्तूप-धर्मशाळा बांधल्या, लेणी खोदली. त्यांच्यातल्या बुद्धपुतळ्यांत त्या-त्या ठिकाणच्या भक्तांच्या रूपाची प्रतिमा आणि कारागिरांची प्रचलित शैली दिसते. मोगाव लेण्यांत हजारो बौद्ध धर्मग्रंथांचा खजिनाही सापडला आहे.
सातव्या शतकात ह्यूएनत्संग रेशमाच्या रस्त्यावरूनच भारतात जाऊन 6क्क् हून अधिक धर्मग्रंथ घेऊन परतला. त्या काळात राजाश्रयाच्या जोरावर संस्कृत आणि पाली धर्मग्रंथांची चिनी भाषांतरं मोठय़ा प्रमाणात होत. ताश्कंदला तशा अनेक भाषांतरकारांचा मुक्काम असे. अश्वघोषाच्या ‘बुद्धचिरता’चं कुमारजिवाने केलेलं भाषांतर चीनमध्ये सन्मानाने जपलेलं आहे. बौद्ध धर्माखेरीज चौथ्या शतकातला मनिशैइझम हा पंथ आणि ािस्ती नेस्टोरियन पंथही रेशीमरस्त्यावर चालले. सातव्या शतकानंतर मध्य आशियात इस्लाम अवतरला आणि रेशीमरस्त्याने जोडलेलं पूर्वपश्चिमेचं नातं दुरावलं. आठशे वर्षांपूर्वी कुबलाखानाने रेशीमरस्त्याचं पुनरुज्जीवन केलं. मार्को पोलो त्याच रस्त्यावरून जाऊन त्याला भेटला अणि मग चीनच्या पासपोर्टाची पाटी गळ्यात घालून भटकला. त्याच्या प्रवासवर्णनातून त्यावेळच्या रेशीमवाटांवरच्या वस्त्यांची बरीच माहिती मिळते.
सातशे वर्षांपूर्वी रेशीमवाटांवर प्लेग फोफावला. इतर कारणांनीही तो प्रवास फार धोक्याचा झाला. उपेक्षित रेशीमवाटा हळूहळू विस्मृतीच्या वाळूखाली हरपल्या. एकोणाविसाव्या शतकात तिथल्या लेण्यांचं, ग्रंथसंग्रहांचं मोल पुरातत्व शास्त्रज्ञांच्या ध्यानात आलं. पाश्चात्त्य संशोधकांनी आधाशासारखे उचलून नेलेले तिथले मौल्यवान अवशेष दुस:या महायुद्धात नष्ट झाले. उरलेले आता अनेक देशांच्या संग्रहालयांत विखुरलेले आहेत.
आता वाळवंटाला थोपवायच्या वैज्ञानिक पद्धती निघाल्या आहेत. लोहमार्ग, विमानसेवा वगैरेंमुळे ताकलामकान-काराकोरम सहज-प्रवासाच्या आवाक्यात आले आहेत. तिथे इतिहासप्रेमींच्या सहली जातात. चीन-सरकारने आजूबाजूच्या देशांच्या सहकार्याचे धागे गुंफून पुन्हा एकदा रेशीमवाटांचा गालिचा व्यापारासाठी उलगडायचा घाट घातला आहे.
आजवरच्या इतिहासात सैन्यांनी देश पादाक्र ांत केले पण व्यापा:यांनी ते जिंकून घेतले. ताकलामाकन-काराकोरम-हिमालय या दुर्गम भागांत त्यांनी हितसंबंधांचं रेशमी विणकाम केलं. जेव्हा दळणवळण अशक्य झालं तेव्हा तो दोस्तीचा गालिचा त्यांनी गुंडाळून, जपून ठेवला. आता त्या आंतरराष्ट्रीय सलोख्याच्या रेशमी पायघडय़ा पुन्हा उलगडोत, ‘व्यापारीं रती वाढो’ आणि ‘परस्परें मैत्र जिवाचें’ पडो इतुकेंचि मागणों.
पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये
वास्तव्याला होत्या. ‘जेनेटिक्स कशाशी खातात?’
आणि ‘सोन्याच्या धुराचे ठसके’
ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.
‘मानवाचा प्रवास’ हा गेली दोन दशके त्यांच्या वाचनाचा,
संशोधनाचा विषय आहे.)