सिंदीच्या तान्हा पोळ्याची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:04 AM2019-08-25T00:04:08+5:302019-08-25T00:06:16+5:30
विदर्भात नागपूरची मारबत, पांढुर्ण्याची गोटमार आणि सिंदी (रेल्वे) येथे साजरा होणारा बालगोपालांचा लाकडी नंदी पोळा प्रसिद्ध आहे. या तान्हा पोळ्याची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल सुरू आहे. पिढ्यान्पिढ्यांपासून साजरा होत असलेला पोळा उत्सव लोकोत्सवाप्रमाणे साजरा होत आहे. यामुळेच सिंदी नगराची पोळासिटी अशी नवी ओळख निर्माण होत आहे.
नंदी देतात कारागिरांच्या कलात्मकतेची साक्ष
गावातील जयस्वाल कुटुंबीयांचा मानाचा नंदी हा या पोळ्याची ओळख आहे. १९ व्या शतकाच्या प्रारंभी हा लाकडाचा नंदी तयार करण्यात आला. या नंदीचे शरीरसौष्ठव देखणे आणि प्रमाणबद्ध आहे. तो चार फूट उंच, आसनासह नऊ फूट लांब आहे. हा नंदी घडविताना काष्ठ शिल्पकाराने संपूर्ण कौशल्य पणाला लावल्याचे दिसते.
१९७७ मध्ये दीपकसिंह राठौर यांनी बनविलेला साडेतीन फूट उंच उंचीचा हा नंदी अतिशय आकर्षक आहे. तसेच विकास पेटकर यांनी साडेपाच फूट उंच नंदी बनवून पोळ्याची शान वाढविली. रवींद्र बेलखोडे, मुन्ना शुक्ला यांनी मोठे नंदी बनवून पोळ्याचे स्वरूप मोठे केले. यात चंद्रशेखर अवचट, पुरूषोत्तम मुठाळ, प्रणय चावरे, हेमंत सोनटक्के, बांगडे आदींनी पोळा उत्सवात भर टाकली. प्रत्येक नंदी बैलाची सजावट व विद्युत रोषणाई उत्सवात येणाऱ्यांचे मन मोहून घेते.
सिंदीला जत्रेचे स्वरूप
पोळा सणाची एक महिन्यापासूनच आतुरतेने सिंदीवासी वाट पाहतात. तान्हा पोळ्यासाठी ४ ते ५ दिवसांपासूनच गाव सजविण्यात येते. दरवर्षी ४० ते ५० हजार लोकांच्या साक्षीने हा महोत्सव पार पडतो. लाकडी नंदी बैलांना सजवून ट्रॅक्टर ट्रॉलीवर ठेवले जाते. त्यासमोर आकर्षक देखावेही आकारले जातात. ढोलताशाच्या निनादात नंदींची बाजार चौकाकडे मिरवणूक काढण्यात येते. नंदीमालक व देखाव्यांवर २ ते ३ लाखांपर्यंत खर्च केला जातो. महोत्सवादरम्यान सिंदी गावात प्रत्येकाच्या घरी पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळते. नंदींच्या सोबतीलाच १० ते १२ मंडळातर्फे देखावे सादर होतात. यामुळे पोळ्याला लोकोत्सवाचे स्वरूप येत आहे. नगर पालिकेच्यावतीने आयोजित या पोळ्यात पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. हा ऐतिहासिक पोळा डोळ्यात साठविण्यासाठी संपूर्ण विदर्भातून लोक सिंदीत दाखल होतात.
- प्रशांत कलोडे