सिंगापूर

By Admin | Published: August 26, 2016 05:16 PM2016-08-26T17:16:20+5:302016-08-26T17:31:08+5:30

सिंगापूरची यशोगाथा अनुभवताना अस्वस्थ करणारे प्रश्न पडतात. जगातल्या कोणत्याही देशाच्या तुलनेत जलदगतीनं आणि सर्वांगीण दृष्टीनं जनतेचं जीवनमान सुधारण्यासाठी कोणती तपश्चर्या सिंगापूरला करावी लागली असेल?

Singapore | सिंगापूर

सिंगापूर

 - जानेश्वर मुळे 

सिंगापूरची यशोगाथा अनुभवताना 
अस्वस्थ करणारे प्रश्न पडतात.
जगातल्या कोणत्याही देशाच्या तुलनेत
जलदगतीनं आणि सर्वांगीण दृष्टीनं 
जनतेचं जीवनमान सुधारण्यासाठी 
कोणती तपश्चर्या सिंगापूरला 
करावी लागली असेल? 
निर्मितीच्या मागची कोणती प्रसूतिवेदना
या देशानं झेलली असेल? 
अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या बाबतीतल्या जनतेच्या गरजा 
या देशानं कशा भागवल्या असतील?

विमान सिंगापूरमध्ये खाली उतरणार अशी घोषणा होताच, हवाईसुंदरीने आमच्या बाजूच्या सगळ्या खिडक्या उघडलेल्या आहेत आणि सगळ्यांनी सीटबेल्ट्स नीट लावलेले आहेत याची खात्री करण्यासाठी बाणाच्या गतीने धाव घेतली. माझ्या रांगेकडे बघून ती वायुवेगाने आपल्या स्वत:च्या खुर्चीच्या दिशेनं धावता धावता माझ्या खुर्चीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पडलेलं चॉकलेटचं प्लॅस्टिक कव्हर तिच्या धारदार नजरेत आलं. विजेच्या चपळाईनं तिनं ते उचललं आणि ती आपल्या जागेवर स्थानापन्न झाली. हे सगळंच फार फार तर २० सेकंदात झालं असावं. 
त्या २० सेकंदात मला सिंगापूर या नगर-द्वीप-राष्ट्राच्या मोठेपणाची किल्ली, प्रगतीचं रहस्य सापडलं. नीटनेटकेपणा, कार्यक्षमता, शिस्त आणि परिश्रम याची ती झलक होती. 
कशामुळे हा देश मोठा? त्याला जनतेत कोणत्या गुणांची वृद्धी करणं भाग पडलं? इतक्या अल्पकाळात गरिबी, कुपोषण, विषमता आणि निरक्षरता या सगळ्यांवर कशी मात केली? देशबांधणी किंवा राष्ट्रबांधणी याचा काही गुरुमंत्र असतो का? एखादा देश पुढे जातो तेव्हा त्याच्या प्रवासावरून इतरांना शिकता येतं का? या प्रश्नांनी मला सिंगापूरमध्ये छळलं. मी पण मग त्यांची उत्तरं शोधण्याच्या मागे लागलो.
आपल्यानंतर जवळ जवळ दोनेक दशकांनंतर स्वतंत्र झालेल्या या देशातल्या दृश्य गोष्टी काय आहेत?
या देशाचं चांगी हे विमानतळ. ‘फर्स्ट इम्प्रेशन’ टाकण्यात ते यशस्वी होतं. विमानतळ हे देशाचं मुखमंडळ असतं हे आता कुठं थोडंफार आपल्या लक्षात येऊ लागलंय. चांगी विमानतळ हे व्यावसायिकता आणि ग्राहकसेवा या दोन्ही बाबतीत जगातलं क्रमांक एकचं विमानतळ आहे. वेळेचं भान आणि महत्त्व ओळखून या देशात शक्यतो जनतेनं वाट पाहू नये अशी व्यवस्था केली गेली आहे. विमानाचं आगमन झाल्यापासून १२ मिनिटांत सामानाच्या बॅगा पट्ट्यावर येतात. शेवटची बॅग ३० मिनिटांत आलीच पाहिजे असा तिथला नियम आहे.
‘विविधतेतून एकता’ ही गोष्ट सिंगापूरच्या बाबतीत आपल्यापेक्षा जास्त खरी आहे. यांचं इंग्रजीसुद्धा (सिंग्लिश) अनेक भाषा आणि बोली यांची मिसळ आहे. त्यात राणीची इंग्रजी, मलेय, तमीळ, होक्कियेन, तेवच्यू, कॅन्टोनिज, बंगाली आणि पंजाबी या भाषांचं प्रतिबिंब दिसतं. आपल्याकडे विविधतेवर खूप भर दिला जातो, तिथं मात्र ‘सगळे मिळून एक’ या भावनेचा स्वीकार दिसतो.
कोणत्याही राष्ट्राचा स्वाभिमान बळकट व्हायचा असेल तर जनतेला आपलं वाटणाऱ्या आणि सतत नजरेसमोर असणाऱ्या भव्य अशा दृश्य इमारतींची, आकारांची, बाजारांची गरज असते. सिंगापूरमध्ये अशा दृश्य गोष्टींनी संपूर्ण बेट सजवलेलं आहे. जगातल्या सगळ्यात महागड्या तीनपैकी दोन इमारती सिंगापूरमध्ये आहेत. त्यात इथल्या प्रसिद्ध ‘स्ट्रँडेड सर्फबोर्ड’चा समावेश आहे. याशिवाय ‘बनाना स्प्लिट’ ही इमारत (सोललेल्या केळीसारखी दिसणारी), सुपरट्रीज, सेन्तोसा बेटावरच्या सुविधा सगळंच ‘प्रेक्षणीय’ आहे. जसं भव्य दृश्य स्मारकांचं तसंच मूलभूत सुविधांचं. या छोट्या देशात (फक्त ५५ लाख लोकसंख्या) ३० हजार टॅक्सी आहेत आणि स्थानिक नियम असे की त्या सगळ्यांचा रखरखाव उत्तम असा ठेवावाच लागतो. शहरांची वाढ म्हणजे सुरक्षित असं ‘नाइटलाइफ’ हवं. सिंगापूरची रात्रीची ‘जंगल सफारी’ जगात पहिली आहे. याशिवाय हवेतून चालण्यासाठी ‘एरियल वॉकवेज’ आहेत. आपोआपच तुम्हाला झाडांची, पक्ष्यांची अशी ‘हिरवी स्पेस’ अनुभवायला मिळावी हा उद्देश. इथले रस्ते सुरक्षित आहेतच, पण आल्हाददायकही आहेत. रात्रीसुद्धा गुन्हेगारीमुक्त वातावरण आहे.
सर्व प्रकारचे धर्म असल्यानं इथे चिनी, मलेय आणि भारतीय यांचे सगळे उत्सव साजरे होताना दिसतात. दिवाळीत इथला ‘छोटा’ भारत उजळून निघतो, तर बुद्ध पौर्णिमेला बौद्ध मंदिरं सजतात. हिंदू, चिनी, मुस्लीम, बौद्ध, शीख आणि ख्रिश्चन सगळ्या धर्मांचे अनुयायी इथं आनंदानं आणि एकोप्यानं राहतात. याशिवाय फॉर्म्युला वनपासून रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांपर्यंत आणि थीमपार्कपासून शॉपिंग मॉलपर्यंत पर्यटकांना आणि रहिवाशांना आवश्यक असतील त्या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहेत.
आता पुढचा प्रश्न हा की हे सगळं या देशानं अल्पावधीत कसं साध्य केलं असेल? निर्मितीच्या मागची कोणती प्रसूतिवेदना या देशानं झेलली आहे? जगातल्या कोणत्याही देशाच्या तुलनेनं जलदगतीनं आणि सर्वांगीण दृष्टीनं जनतेचं जीवनमान सुधारण्यासाठी कोणती तपश्चर्या सिंगापूरला करावी लागली? अन्न, निवारा, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या बाबतीतल्या जनतेच्या गरजा या देशानं कशा भागवल्या? 
१९६५ साली या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सिंगापूरचं दरडोई उत्पन्न घाना या देशाइतकं म्हणजे ५०० डॉलर होतं. आज ते ५५,००० डॉलर्स इतकं आहे. नवजात बालकांच्या मृत्यूचं प्रमाण दरहजारी ३५ (१९६५ मध्ये) पासून नगण्य पातळीवर आलं आहे. एकेकाळच्या झोपडपट्ट्याच्या या देशात आज ९० टक्के जनतेची स्वत:ची घरं आहेत.
हे असं का होऊ शकलं? ली क्वा यू या पहिल्या प्रधानमंत्र्यांचं नेतृत्व ही एक महत्त्वाची किल्ली आहे. त्यांनी गुणवत्ता, व्यावहारिक भूमिका आणि सचोटी या तीन स्तंभावरती देश उभारला. हे करत असताना व्यक्तिगत हितापेक्षा सामाजिक हित पाहिलं. मूलभूत सुविधांचं अतिजलद विस्तारीकरण, विदेशी उद्योगांसाठी सहज प्रवेश आणि जनतेला द्यावयाच्या सवलतीत वृद्धी असं धोरण राबवलं. नावीन्य आणि निर्मितीक्षमता यांना प्रोत्साहन देत असतानाही जगात ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते’ या सर्वांचं थेट अनुकरण केलं आणि हे सगळं करतानाही या देशानं प्रगतीच्या क्षेत्रात भौतिक-आध्यात्मिक, कल्याण-चंगळवाद, साम्यवाद-भांडवलशाही अशा शब्दच्छलावर न जाता सहजीवन आणि प्रगती यांची नवी व्याख्या जगासमोर ठेवली.
या प्रगतीच्या प्रक्रियेविषयी टीकाही होताना दिसते. सिंगापूर म्हणजे ‘कल्याणकारी हुकूमशाही’ असं म्हणण्यापासून ते तिथं एकपक्षीय सरकार असल्यानं स्वातंत्र्याची कुचंबणा होते इथपर्यंत अनेक मतं आहेत. पण कुठंतरी कधीतरी स्वातंत्र्य, सुव्यवस्था, स्वैराचार या गोष्टींची आपण साधकबाधक चर्चा करणं आवश्यक आहे, नाही का?
अत्यंत वैभवशाली इतिहास आणि परंपरा असणाऱ्या भारत देशानं स्वातंत्र्योत्तर काळात सामान्य माणसाचे प्रश्न सोडवले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक देशानं विकासाची व्याख्या ठरवावी हे खरंय! पण कुठंतरी आपल्या सामाजिक, वैचारिक, राजकीय नेतृत्वानं आपली फसवणूक केलीय हेही खरं आहे. म्हणूनच इंग्रजांनी बांधलेली नवी दिल्ली सुंदर आहे, पण स्वातंत्र्योत्तर काळात दिल्लीतली एकही नवी वसाहत आदर्श म्हणता येईल, अशी नाही. स्टॅनफर्ड, एमआयटी यांच्या तोडीच्या शिक्षणसंस्था आपल्याला उभ्या करता आल्या नाहीत. कारण धर्म, जात, प्रांत, भाषा यांच्यामुळे आपल्यात रुजलेली उच्च-नीचतेची भावना आपण दूर करू शकलो नाही.
खंबीर प्रशासन, कायद्याचं राज्य, कल्पनेपलीकडचं पुरोगामी नेतृत्व आणि पराकाष्ठेचे परिश्रम या तीन स्तंभांना जर असीम निर्मितीक्षमतेची जोड दिली तर भारत १० वर्षांत जगात प्रथम कमांकावर येईल. या देशातल्या १२० कोटी लोकांच्या प्रतिभेचं आणि नवनिर्मितीचं वारू मुक्तपणे उधळू देण्यासाठी पूरक वातावरण तयार करू शकलो तर सिंगापूरसुद्धा अभिमानाने आपल्या देशाच्या नावाची व्युत्पत्ती संस्कृतमधल्या ‘सिंह’ आणि ‘पूर’मध्ये आहे हे जगाला अभिमानानं सांगेल. तो दिवस केव्हा येईल?

Web Title: Singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.