एकल वाट..

By admin | Published: June 17, 2016 05:16 PM2016-06-17T17:16:32+5:302016-06-17T18:02:15+5:30

स्वत:च स्वत:चा गुरू होऊन जे हवे आहे ते शिक्षण मिळवण्याचे अनेक प्रयोग मी केले. जुन्या, भंगार गाड्यांपासून नवीन गाडी तयार करणे हाही माझा आॅर्गनइतकाच जिव्हाळ्याचा छंद. भंगार बाजारातून जुनी गाडी घरी आणली की ती उघडून पूर्ण समजून घेण्याचा सोपस्कार पार पडला की त्या इंजिनला साजेशी नवी गाडी बनवण्याचा मार्ग दिसू लागतो. हार्मोनियम आणि आॅर्गनला मी तसेच आधी समजून घेत गेलो..

Single Wat .. | एकल वाट..

एकल वाट..

Next

 
मुलाखत आणि शब्दांकन
- वन्दना अत्रे


राजीव, तुला कोणीतरी भीमसेन यांचा फोन आलाय रे..’ असे वाक्य ज्या कुटुंबात खरोखर म्हटले गेले अशा कुटुंबातील मी संगीतकार- वादक आहे. असे म्हणताना त्या घराला पंडित भीमसेन जोशी नावाच्या एका अफाट कलाकाराचा अवमान करायचा नव्हता, तर त्यांना भीमसेन नावाचे अद्भुत रसायन काय आहे हेच मुळात ठाऊक नव्हते..! 
या घराला क्रि केट प्रिय, बॅडमिंटनबद्दलही मनापासून जिव्हाळा, पण संगीताच्या वाट्याला काही हे घर फारसे कधी गेले नाही. थोडक्यात काय, तर गाण्याचा किंवा स्वरांचा वारसा वगैरे मला माझ्या कुटुंबाकडून अजिबात मिळालेला नाही. माझ्या बहुधा एखाद्या नातलगाने किंवा ओळखीच्या कोणीतरी त्यांच्या घराच्या माळ्यावर असलेली हार्मोनियम आमच्या घरी आणून दिली, ती मी वाजवू लागलो म्हणून माझ्या मुंजीत मला नवी कोरी हार्मोनियम मिळाली. त्या हार्मोनियमची निवडही अप्पा जळगावकर यांच्यासारख्या जाणत्या कलाकाराने केलेली होती. पण हे कौतुक इतपतच. त्यानंतर हार्मोनियमचे शिक्षण देणारा क्लास शोधण्याचा खटाटोप करून मला त्या क्लासमध्ये टाकणे (!) आणि त्यासाठी आईने रोज धापा टाकत स्कूटरवरून माझे पार्सल क्लासमध्ये ने-आण करण्याची धावाधाव करणे असे काहीही न घडता हे कौतुक संपले. दहाव्या वर्षी मी पहिले नाटक बघितले. निर्मला गोगटे या माझ्या दूरच्या नातलग. त्यांनी ज्यात भूमिका केली होती त्या स्वयंवर नाटकाचा पुण्यातला प्रयोग बघायला गेलो तेव्हा पहिल्यांदा आॅर्गन नावाचे भलेमोठे वाद्य बघितले. त्याचा टोन, नाद मला फार आवडला आणि वाटले शिकावे हे वाद्य. मग बालगंधर्वांना जे आॅर्गनची साथ करीत अशा एका प्रख्यात वादकाकडे आॅर्गन शिकायला गेलो. पण तिथे आॅर्गनला हातही न लावता त्याचे शिक्षण मिळतेय (!) हे जेव्हा जाणवले तेव्हा आॅर्गन शास्त्रशुद्ध शिकण्याचा तो एकमेव प्रयत्नही संपला. तरीही आॅर्गनबद्दल मनात निर्माण झालेली ओढ मात्र कमी झालेली नव्हती. एकीकडे घरात असलेली हार्मोनियम वाजवण्याचे प्रयोग मी करीत होतो, स्वत:च स्वत:चा गुरू होऊन जे कानावर पडेल ते वाजवून बघण्याचा प्रयत्न करीत होतो. 
संगीताचा वारसा भले माझ्या घरात नसेल, गुरूपुढे बसून मी संगीताचे व्याकरण आणि धडे गिरवले नसतील; पण तरीही मी अनेक नाटकांना संगीत दिले आहे. या प्रत्येक नाटकाची जात आणि पोत वेगळा, कधी अगदी परस्परविरोधी आहे. मराठी संगीत रंगभूमीवरील सगळ्या महत्त्वाच्या नाटकांच्या किमान दोन-अडीच हजार प्रयोगांना आॅर्गनची साथ केली आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या अभंगवाणीपासून विजय कोपरकर यांच्या शास्त्रीय मैफलीपर्यंत तऱ्हेतऱ्हेच्या कार्यक्र मांना साथ केली आहे. असे कितीतरी..
हे सगळे काहीसे अशक्य या कोटीतील वाटणारे आणि म्हणून त्याविषयी बोलणे अवघड जावे असे..! गुरूने माथ्यावर हात ठेवल्याशिवाय कोणतीही कला अवगत करणे अवघड यावर ठाम विश्वास असलेली आपली संस्कृती. माझ्यासाठी गुरूचे काम माझ्यामधील कुतूहलाने, उत्सुकतेने केले आणि आॅर्गनवर असलेल्या माझ्या कमालीच्या प्रेमाने केले. मराठी संगीत नाटक आणि नाट्यसंगीत यावरील माझ्या मनात असलेल्या अतीव जिव्हाळ्याने केले. आणि ‘हातात घेतलेली प्रत्येक गोष्ट उत्तमच केली पाहिजे’ - माझ्या कुटुंबाने माझ्यावर केलेल्या या संस्कारानेही केले..! 
स्वत:च स्वत:चा गुरू होऊन जे हवे आहे ते शिक्षण मिळवण्याचा माझा हा एकमेव प्रयत्न नाही. भंगारात मिळणाऱ्या जुन्या गाड्यांपासून नवीन गाडी तयार करणे हाही माझा आॅर्गनइतकाच जिव्हाळ्याचा छंद, आणि तिथेही माझा कोणी गुरू नाही. भंगार बाजारातून जुनी गाडी घरी आणली की ती उघडून पूर्ण समजून घेण्याचा सोपस्कार पार पडला की त्या इंजिनला साजेशी नवी गाडी बनवण्याचा मार्ग दिसू लागतो तसेच मी हार्मोनियम आणि आॅर्गनला आधी समजून घेत गेलो. हार्मोनियमच्या पट्ट्यांवर बोटं ठेवीत, स्वरांच्या कोमल-तीव्र जागा समजून घेत शिकत जाणे तुलनेने सोपे वाटावे असा आॅर्गनचा रु बाब आहे. कारण तो वाजवताना एकाच वेळी तुम्हाला तीन अवधाने ठेवावी लागतात. स्वरांच्या पट्ट्यांवर फिरणारे दोन्ही हात आणि पायाशी असलेल्या भात्यावर हलणारे पाय. पण ही झाली केवळ शारीरिक पातळीवरची अवधाने. या अवधानांचे सतत भान देणारी बुद्धी आणि समोरच्या कलाकाराकडून निर्माण होत असलेल्या स्वरांचा माग घेत राहणारे मनाचे अखंड सावधपण, तेही या वाद्यांचे एक आव्हान आहेच की..! स्वत:च स्वत: शिकत जाण्याचा एक फायदा म्हणजे मला मिळालेली प्रयोग करून बघण्याची मुभा. मराठी संगीत नाटकांबरोबर थिएटर अकॅडमीच्या प्रायोगिक नाटकांसाठीही आॅर्गन वाजवण्याचा प्रयोग एरवी कदाचित मी करू शकलो नसतो. 
या प्रयोगाचा पहिला टप्पा होता तो थिएटर अकॅडमीचे ‘बेगम बर्वे’ हे सतीश आळेकर यांचे नाटक. संगीत या समान आवडीमुळे चंद्रकांत काळे, माधुरी पुरंदरे, आनंद मोडक अशी मित्रमंडळी भोवती होती. रंगभूमीवर नवीन असे काही करू बघणारी, सांगू बघणारी. परंपरागत वाट झुगारून देण्याचा सत्तरीच्या दशकातील धीटपणाचा हा काहीसा आविष्कार होता. हे नाटक म्हणजे संगीत नाटकात स्त्री भूमिका करणाऱ्या एका दुय्यम दर्जाच्या नटाची शोकांतिका होती आणि अर्थातच गंधर्व गायकीची समज असलेल्या संगीतकाराची त्या नाटकाला गरज होती. त्यामुळे ते नाटक, थिएटर अकॅडमीचा नेहमीचा संगीतकार आनंद मोडक यांनीच माझ्या स्वाधीन केले. 
आजवर जे गंधर्व संगीत ऐकत होतो, ते ऐकता-ऐकता शिकत होतो, समजून घेत होतो त्या अभ्यासाचा प्रत्यक्ष उपयोग करून बघण्याची ही संधी होती. पण हा उपयोग करताना, या नाटकाच्या कथानकामुळे, एक कसरत माझ्यासमोर होती आणि ती म्हणजे या नाटकाच्या नायकाच्या कोणत्याही गाण्याला वन्समोअर न मिळण्याची..! 
हा नायक सामान्य कुवतीचा गायक-नट आहे त्यामुळे तो जे गातोय तेही त्याच दर्जाचे आहे याचे भान ठेवत काम करणे गरजेचे होते..! काळाच्या कितीतरी पुढे असणाऱ्या, वास्तव आणि फँटसी याचे विलक्षण मिश्रण असणाऱ्या या नाटकाचे प्रयोग अगदी माफक झाले असतील; पण त्या नाटकावर खूप चर्चा, परिसंवाद झाले, पुस्तके लिहिली गेली. मराठी नाटकांच्या इतिहासातील मैलाचा दगड असलेल्या या नाटकाने संगीतकार म्हणून माझीही कारकीर्द केवळ सुरूच करून दिली नाही, तर अनेक संधींचे दरवाजे त्यानंतर उघडत गेले. अस्सल लोकसंगीताचा बाज असलेले आणि तब्बल वीस-बावीस गाणी असलेले विठो रखुमाय किंवा ज्या नाटकातील प्रत्येक गाणे मी एका रागापेक्षा अधिक रागांचे मिश्रण करून बसवले आहे ते ‘नि:शब्द माजघरात’ हे नाटक. समोर येणारे प्रत्येक नाटक नव्याने काही करून बघण्याचा हुरूप देणारे होते. 
अशा अनेक संस्कृत-मराठी नाटकांनंतर सुरू झाला चंद्रकांत काळे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या शब्दवेध संस्थेचा समृद्ध कालखंड...! अमृतगाथा, प्रीतरंग, साजणवेळा, शेवंतीचे बन या प्रयोगांतून रसिकांपुढे आल्या त्या भिन्न-भिन्न बाजाच्या, रंगाच्या मराठी कविता. शब्दांचे नेमके उच्चार आणि त्यातील भाव याची जाण संपन्न करणारा असाच तो अनुभव होता. शब्दांचे हे असे अर्थपूर्ण उच्चार मराठी नाट्यसंगीतात का नकोत, असा प्रश्न या सगळ्या अनुभवानंतर माझ्यापुढे उभा केला. आॅर्गनइतकाच हा प्रश्नही माझ्यासाठी जिव्हाळ्याचा होत गेला. आणि माझा रियाजही एका वेगळ्या वाटेवरचा होत गेला... 
(पूर्वार्ध)

Web Title: Single Wat ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.