धुम्मस

By admin | Published: September 2, 2016 04:43 PM2016-09-02T16:43:10+5:302016-09-02T16:43:10+5:30

कुणी सांगतो, ‘मैं नमाज पढने जा रहा था..’ कुणी म्हणतो, ‘मैं दोस्तों के साथ क्रिकेट खेल रहा था..’ कुणाची अवस्था तर अशी की, ‘टॉयलेट जा रहा था..आर्मीने पेलेट चलायी, तबसे आॅँखो की लाईट चली गयी..’

Smoke | धुम्मस

धुम्मस

Next
- सुधीर लंके / समीर मराठे

श्रीनगर. तिथलं ‘एसएमएचएस’. श्री महाराजा हरिसिंग हॉस्पिटल. 
श्रीनगरमधील सर्वात मोठं आणि सरकारी हॉस्पिटल. सर्वसामान्य, गरीब लोकांबरोबरच अनेक जण येथे उपचार घेतात. काही विशेष आजारांसाठी तर केवळ इथेच इलाज होतात.
शहराच्या साधारण मध्यवर्ती ठिकाणी हे प्रचंड मोठं असं हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलची माहिती नसणारा नवीन माणूस इथे हमखास गांगरतोच. काश्मीरमधल्या ताज्या भटकंतीत याच ‘एसएमएचएस’मध्ये जाणं झालं.
हॉस्पिटलचे एकामागोमाग एक वॉर्ड ओलांडले की एक मोठा हॉल.
सगळ्या खाटांवर काश्मिरी तरुण. काही बसलेले, काही झोपलेले, काही जण भिंतीला उशी टेकवून त्याच्या साहाय्यानं बसलेले. त्यातच दहा-बारा वर्षांची लहान मुलंही..
काश्मिरी धरती आणि तारुण्य मुळातच तिथल्या लखलखीत रुबाबाच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध. त्यात झाडून सगळ्यांनी डोळ्यावर काळे गॉगल घातलेले. 
थोडं पुढे दुसरा हॉल.. तिथेही हीच गर्दी. वरच्या मजल्यावरही तेच. गॉगल घातलेले काश्मिरी तरुण. आसपास नातेवाईक. 
कोणी गप्पा मारतंय, कोणी फोनवर बोलतंय, कोणी मोबाइलमध्ये डोळे खुपसून मोठ्या मेहनतीनं काहीतरी स्क्रोल करतंय.
व्हॉट्सअ‍ॅप?..
पण नाही. संपूर्ण काश्मीरमध्ये सध्या तर गेल्या दोन महिन्यांपासून इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे.
काय करत असतील हे तरुण?

२५-३० बेड असलेले हे सारे मोठमोठे हॉल म्हणजे हॉस्पिटलमधील आॅप्थॉल्मॉलॉजी डिपार्टमेंटचे वॉर्ड. डोळ्याच्या विकारांशी संबंधित साऱ्या रुग्णांवर या ठिकाणी उपचार होतात. सारे वॉर्ड फिरून झाल्यावर आम्ही एका गॉगलधारी तरुणाच्या बेडजवळ जातो.
तिथे उभे राहतो. आतापर्यंत कोणाचंच आमच्याकडे तसं विशेष लक्ष नाही. 
‘क्या हुआ?’ त्याच्याशी बोलायला सुरुवात केल्यावर तो तरुण आपल्या डोळ्यांवरचा गॉगल थोडा वेळ बाजूला करतो, नजर तिरकी करून आम्हाला खालून वरून पूर्ण न्याहाळतो.
आम्ही ‘बाहेरून’ आलोय, हे आमच्याकडे पाहिल्याबरोबरच त्याला कळतं. थोडा वेळ विचार करून थंड आवाजात तो सांगतो, ‘पेलेट लगी.. बाये आंखमें.. दो आॅपरेशन हुए, तिसरा होनेवाला है..’
‘कैसे लगी?’
तो गप्पच..
आता हळूहळू आमच्याभोवतीची गर्दी वाढत जाते. वॉर्डमधील रुग्णांचे नातेवाईक, आई, वडील, भाऊ.. बेडवर बसलेला तरुण थोड्या वेळाने उत्तर देतो,
‘नमाज पढने जा रहा था. कुछ हंगामा हुआ. आर्मीने पेलेट चलायी, बाये आॅँख में गयी..’
‘कुछ दिखता है उस आॅँखसे?’
- ‘नहीं, कुछ भी नहीं..’
‘क्या कहा डॉक्टरने?’
- ‘सब अल्लाताला की मर्जीपर! देखते है क्या होगा तिसरे आॅपरेशन के बाद.
डॉक्टरने कहा है, शायद कुछ धुंधला सा दिख पाये..’
हळूहळू गप्पा सुरू होतात. गर्दीचा आवाज वाढत जातो. खाटांवरचे तरुण बोलता बोलता मध्येच आपल्या डोळ्यांवरचा काळा गॉगल काढतात, पुन्हा लावतात.
यावेळी चित्र अधिक स्पष्ट दिसतं.
त्या काळ्या गॉगलच्या खाली अनेकांच्या डोळ्यांवर बॅँडेज लावलेलं. काहींच्या तर दोन्ही डोळ्यांवर. अनेकांच्या डोळ्यांवर लावलेल्या बॅँडेजच्या पट्ट्याही डोळ्यांमागून डोक्यापर्यंत गेलेल्या. काहींच्या चेहऱ्यावर, मानेवर, हातावर बारीक बारीक असंख्य लाल लाल ठिपके. गुठळ्यांसारखे. सगळे पेलेट गनचे. पण त्याकडे लक्ष द्यायला कोणालाच फुरसत नाही. त्यांना त्याची फारशी चिंताही नाही.
तेवढ्यात एक धिप्पाड, गोरागोमटा मध्यमवयीन गृहस्थ पुढे सरसावला. झटक्यात आमच्या हाताला धरून त्या गर्दीला ढकलत, ओढतच त्यानं आम्हाला बाहेर काढलं. 
‘बाप’ होता तो. आपल्या मुलाच्या खाटेजवळ घेऊन गेला. विशी-बाविशीचा तरुण. ग्रॅज्युएशन करतोय. शेजारीच स्टुलावर त्याची आई गप्प बसलेली. तो तरुण झोपलेला. गॉगल घातलेला नव्हता, पण आपला संपूर्ण चेहरा त्यानं हातरुमालानं झाकलेला होता. 
‘सोया है?’
- आम्ही त्याच्या वडिलांना विचारलं.
आमच्या आवाजानं त्यानं आपल्या चेहऱ्यावरचा रुमाल काढला आणि आमच्या दिशेनं बघायला लागला. त्याचे दोन्ही डोळे बंद होते.. सुईदोऱ्याने जणू शिवल्यासारखे! त्याच्याकडे पुन्हा पाहण्याची आणि त्याच्याशी बोलण्याची आमची हिंमतच झाली नाही.
‘इसके दोनो आॅँखो मे पेलेट्स गयी है..’
त्याच्या वडिलांनीच सांगायला सुरुवात केली..
‘मैं दोस्तों के साथ क्रिकेट खेल रहा था..’
- झोपल्या झोपल्या आणि डोळे बंद असलेल्या अवस्थेत तो तरुण सांगत होता. डॉक्टरांनीही त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना स्पष्टच सांगून टाकलंय,
‘आयुष्यात आता परत कधीच तुला तुझ्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहता येणार नाही. ‘अब अल्लातालाही कुछ कर सकता है. उसने दुआ की तो शायद धुंधला सा देख पाओगे..’
शेजारी स्टुलावर बसलेली त्या तरुणाची आई गप्पच होती.
कोणाच्याच बोलण्यात फार विषाद नव्हता. खूप घाबरलेले किंवा हादरलेलेही वाटत नव्हते. जणू हे रोजचंच असावं.
बऱ्याच पेशंट्सना घरी पाठवण्यात आलं होतं आणि रोजच्या रोज नवीन पेलेट पेशंट तिथे अ‍ॅडमिटही होत होते. काळ्या गॉगलची संख्या रोज वाढत होती.
सगळ्यांचं म्हणणं साधारण एकसारखंच..
‘मैं नमाज पढने जा रहा था..’
‘मैं दोस्तों के साथ क्रिकेट खेल रहा था..’
‘फुटबॉल खेल रहा था..’
‘टॉयलेट जा रहा था..’
‘आर्मीने पेलेट चलायी, तबसे आॅँखो की लाईट चली गयी..’

- आम्ही उभे होतो तिथे एव्हाना आता बरीच गर्दी जमली होती. इतके सारे काळे गॉगल आणि त्यांचे नातेवाईक. पण कुणाच्याच डोळ्यांत पाणी नाही, कुणाचेच चेहरे चिंताग्रस्त नाहीत. एक अस्वस्थता तेवढी. आत धुमसता राग.
आणि एक वेडी आशा :
‘शायद.. शायद...अल्लाताला मेहरबान हो और हमारी जिंदगी की लाईट वापस आये..’

महाराष्ट्रातील डॉक्टर देताहेत काश्मिरी तरुणांना दृष्टी..

काश्मीर खोऱ्यात अजूनही सुरू असलेली धुम्मस, कर्फ्यू, गोळीबार, सुरक्षा दलं आणि संतप्त काश्मिरी युवक यांच्यात अगदी समोरासमोर सुरू असलेली चकमक.. तरुणांच्या दगडफेकीला सुरक्षा दलांकडूनही दगडफेकीनं आणि प्रसंगी पेलेट गन्सनी दिलं जात असलेलं प्रत्युत्तर यामुळे अनेक तरुणांना आपल्या दृष्टीला कायमचं मुकावं लागलं आहे. श्रीनगरमधल्या ‘एसएमएचएस’ हॉस्पिटलमधल्या रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढते आहे. या एकट्या रुग्णालयात आतापर्यंत साधारणपणे सहाशेच्या वर रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र डोळ्यांवरची ही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट असल्यानं आणि त्यासाठी अत्यंत निष्णात अशा डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे रुग्णांच्या उपचारावरही मर्यादा येत आहेत.
रुग्णांना अत्याधुनिक सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या आणि काश्मिरात कार्यरत असलेल्या बीडब्ल्यूएफ (बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन) या स्वयंसेवी संस्थेनं पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील काही तज्ज्ञ डॉक्टरांची पथकं श्रीनगरला पाठवणं सुरू केलं आहे.
मुंबईस्थित भारतातील नामांकित रेटिना सर्जन (डोळ्यातील पडद्यावरील शस्त्रक्रिया करणारे) डॉ. एस. नटराजन यांच्यासहित बेंगळुरूचे डॉ. महेश शन्मुगम, चेन्नईचे डॉ. असगर, दिल्लीचे डॉ. केनशुक मारवा, सांगलीचे डॉ. गौरव परांजपे, औरंगाबादचे डॉ. आशिष होलानी.. यांसारख्या निष्णांत डॉक्टरांनी बीडब्ल्यूएफ संस्थेच्या माध्यमातून काश्मिरात हिंसाचार आणि कर्फ्यू असतानाही येथे येऊन रुग्णांवर मोफत उपचार, शस्त्रक्रिया केल्या. मुंबईच्या डॉ. एस. नटराजन यांनी तर वेळोवेळी येथे भेट देऊन आतापर्यंत शंभरच्या आसपास मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. प्रत्येक भेटीत त्यांनी एकेका दिवसात वीस-वीस, तीस-तीस शस्त्रक्रिया केल्या असून, त्यामुळे रुग्णांना निदान काही प्रमाणात तरी आपली दृष्टी परत मिळाली आहे. येथील अनेक रुग्णांनी तर डॉ. एस. नटराजन यांनीच आपल्यावर शस्त्रक्रिया करावी यासाठी आपल्या शस्त्रक्रिया पुढेही ढकलल्या आहेत आणि त्यांच्या पुढच्या श्रीनगर भेटीची वाट ते पाहत आहेत. 
‘बीडब्ल्यूएफ’नं डॉक्टरांच्या पथकाबरोबरच कार्डियाक आणि ट्रॉमा केअरच्या चार अत्याधुनिक रुग्णवाहिकाही जम्मू-काश्मीर सरकारला भेट दिल्या आहेत. येत्या काही दिवसांत आणखी चार रुग्णवाहिका सरकारला दिल्या जाणार आहेत.

दृष्टी गेली, परत मिळणं अशक्यच..
पेलेट गन्समुळे डोळ्यांना होणारी दुखापत अत्यंत गंभीर स्वरूपाची असते. पेलेट गन्समध्ये असलेले छर्रे डोळ्यांत वरच्या भागात घुसले तर त्यावरचे उपचार, शस्त्रक्रिया तुलनेने सोप्या; मात्र हे छर्रे जर डोळ्यांत खोलवर गेले तर डोळ्यांची दृष्टी परत येणं नुसतं कठीणच नाही, तर अशा शस्त्रक्रिया करणंही अत्यंत जोखमीचं असतं. एवढासा डोळा. त्यावर शस्त्रक्रिया तरी किती वेळा करणार? डोळ्यावर जास्तीत जास्त तीन ते चार वेळा शस्त्रक्रिया होऊ शकते. त्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया करता येत नाही. 
कितीही तज्ज्ञ उपचार आणि अत्याधुनिक पद्धती वापरली तरी डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे कधीच परत येऊ शकत नाही. जास्तीत जास्त पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत दृष्टी परत येऊ शकते. पण बऱ्याचदा तुमची दैनंदिन कामं तुम्हाला करता येईल इतकं, अंधुकसं दिसू शकतं.
- डॉ. तारेक कुरेशी
हेड आॅफ आॅप्थॉमॉलॉजी डिपार्टमेण्ट, एसएसएचएस हॉस्पिटल, श्रीनगर


काय आहे पेलेट गन्स?
एके-४७ किंवा इतर घातक शस्त्रांनी आंदोलकांचा थेट मृत्यू होऊ शकतो, त्याऐवजी निदर्शकांना पांगवण्यासाठी आणि तुलनेनं कमी घातक असलेल्या पेलेट गन्सचा वापर सुरक्षा दलांकडून काश्मीर खोऱ्यात सुरू झाला. पेलेट गन म्हणजे म्हटलं तर एक छर्ऱ्यांची बंदूक. या छर्ऱ्यांनी सहसा मृत्यू होत नाही, म्हणून ही बंदूक काश्मीर घाटीत वापरली जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. 
२०१० साली काश्मिरातच पेलेट गन वापरली गेली होती. परंतु यावेळी तिचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागला. पेलेटमुळे मृत्यू येण्याची शक्यता तशी कमी; पण खूप जवळून ही गन चालवल्यास आणि शरीराच्या महत्त्वाच्या भागांत हे छर्रे गेल्यास मृत्यूही येऊ शकतो. ही गन चालवल्यानंतर एकाच वेळी त्यातून जवळपास चारशे ते साडेचारशे छर्रे बाहेर पडतात आणि कोणत्याही दिशेला उडतात. 
हे छर्रे म्हणजेच शिशाच्या बारीक गोळ्या. मोहरीपेक्षाही लहान आकाराच्या. त्यामुळे फारशी मोठी जखम होत नाही. मात्र हे छर्रेे डोळ्यांत गेल्यास कायमचं अंधत्व येऊ शकतं. 
पेलेट शक्यतो कमरेच्या खाली मारा असा सुरक्षा दलांना आदेश आहे. मात्र इतर गोळ्यांसारखं या छर्ऱ्यांचं नेमकं निशाण नसतं. त्यामुळे समोर ते कोठेही विखुरतात. 
शिशाचे हे छर्रे शरीरात गेल्यानंतर काही काळानंतर आपल्या शरीरातील उष्णतेमुळे हे शिसं आपोआप वितळतं आणि नंतर हळूहळू बाहेर पडतं. डोळ्यांच्या बाबतीत मात्र शस्त्रक्रियाच करावी लागते. अगदी मेंदूपर्यंतच्या नसांना हे पेलेट इजा पोहोचवू शकतं.

सुधीर लंके : 
लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख
sudhir.lanke@lokmat.com
समीर मराठे : 
लोकमत वृत्तपत्रसमूहात उपवृत्तसंपादक 

sameer.marathe@lokmat.com

Web Title: Smoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.