बर्फाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 06:56 PM2018-01-13T18:56:21+5:302018-01-14T10:01:26+5:30
तापमानाचा पारा शून्याखाली तीस ते चाळीस अंश सेल्सिअस! नायगारा गोठलेला आणि रस्त्यावर बर्फाचे ढीग साचलेले. अशा भीषण थंडीत इकडे कॅनडा-अमेरिकेत कसे जगतो आम्ही?
- दुर्गा पाच्छापूरकर
एरवी आम्हा कॅनडावासीयांना दरवर्षीच्या हिवाळ्याची तशी दांडगी सवय. हाडं गोठवणारी थंडी सवयीची आणि ऐनवेळी बर्फवृष्टीने घरात कोंडून घातल्यास खाण्याजेवण्याचे हाल होऊ नयेत म्हणून हरक्षणी घरात पुरेशी ग्रोसरी भरलेली आहे ना, हे बघत राहण्याचा धाकही दरवर्षीचाच!
यंदाचा आमचा हिवाळा मात्र जगभर जरासा गाजतोच आहे. आमचा म्हणजे उत्तर अमेरिकेतला. अमेरिका आणि कॅनडा या दोन शेजाऱ्यांवर यावर्षीच्या हिवाळ्याने भलती आफत ओढवली आहे आणि भारतातले लोक इकडल्या तापमानाचे शून्याखालचे आकडे वाचूनच कापरं भरल्यासारखे गोठले आहेत.
याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कॅनडा आणि अमेरिकेतील पर्यटकांचं एक आवडतं स्थान असलेला नायगारा फॉल्स (उच्चारी नायग्रा फॉल्स!) चक्क गोठला असल्याच्या बातम्या पुराव्याने शाबीत केल्यासारख्या फोटोसहित छापल्या जाताहेत..
ते फोटो भारतात मुंबई-पुण्यातल्या अगदी नागपूर-औरंगाबादकडल्या कुणाचीही दातखिळी बसावी असे ‘थंडगार’ आहेत, हे मान्य!
एरवी आम्ही कॅनडावाले थंडीच्या कडाक्याला तसे निर्ढावलेले. हिवाळ्यात शून्याखाली घसरणारा पारा आम्हाला नवा नव्हे. हिवाळ्यात - २० ते उन्हाळ्यात + ३५ असा वर्षभरात तब्बल ५५ डिग्रीतला फरक अनुभवून (खरं तर सोसून) आम्ही पुरे बनचुके झालेले असतो, तरी दरवर्षीच्या हिवाळ्यात दातखिळी बसणं चुकत नाहीच.
साधारण ५७-५८ वर्षांपूर्वी मी कॅनडात स्थायिक झाले. कॅनडात स्थिरावल्यावर अगदी सुरुवातीच्या काळात ‘नायगारा गोठणसीमेवर पोचला आहे’ अशी बातमी फुटली, की तेवढ्या थंडीत गाड्या काढून दीडशे किलोमीटर अंतरावरच्या नायगाराला जाण्याची ओढ विलक्षण असे. ठेवणीतल्या सर्व गरम कपड्यांचे अक्षरश: थर अंगावर चढवत, टोप्या-हातमोजे-पायमोजे आणि भरभक्कम स्नोबूट चढवून नायगाºयाची वाट धरलेली आठवते. तो थरार काही वेगळाच असे. नायगारासंदर्भातले रंजक किस्से आणि आख्यायिकाही खूप आहेत. या धबधब्याचं रूपच इतकं विलक्षण आणि अवाढव्य की अनेकजण त्या दृश्यानंच ‘वेडे’ होतात. अनेकांनी तर या धबधब्यात उड्या घेऊनही जिवंत राहाण्याचा भीम पराक्रम केला आहे. याची सुरुवात झाली १८२९ साली. १९०१ मध्ये एनी एडिसन या ६३ वर्षीय तरुण आजीनं तर ड्रममधून या धबधब्यात उडी घेतली होती.
तरीही हे जग पाहायला ती जिवंत होती!
नायगारा धबधब्याचा अर्धा भाग अमेरिकेत, तर अर्धा कॅनडात.
ग्रेट आयलंडनं या धबधब्याचे दोन भाग केले आहेत. कॅनडाच्या सीमेला लागून असलेला ‘हॉर्स शू फॉल्स’ आणि ‘अमेरिकन फॉल्स’. साधारण दहा हजार वर्षांपूर्वी नायगारा धबधबा तयार झाल्याचं सांगतात.
प्रचंड उंचावरून पडणाºया या धबधब्याच्या पाण्यामुळे जमिनीची मोठ्या प्रमाणावर धूप होते. ही धूप टाळण्यासाठी आणि जिथे पाणी पडतं, तिथली रचना बदलण्यासाठी १९६९ मध्ये ‘अमेरिकन फॉल्स’ काही काळासाठी चक्क बंद करण्यात आला होता! ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ म्हणून हा चमत्कार जगप्रसिद्ध आहे. जमिनीखालचे प्रवाह काळजीपूर्वक बंद करण्यात आले होते आणि जास्तीचं पाणी ‘हॉर्स शू फॉल्स’मध्ये सोडण्यात आलं होतं. त्यासाठी अमेरिकन फॉल्सच्या अलीकडे एक तात्पुरतं धरणही बांधण्यात आलं होतं. सर्व काम पूर्ण झाल्यानंतर बॉम्बनं हे धरण उडवून देण्यात आलं आणि ‘अमेरिकन फॉल्स’चा जलप्रपात पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आला!
नायगाराच्या संदर्भात अशा अनेक गोष्टी..
पण नायगाराची खरी मजा अनुभवायची तर ती रात्री! ‘हॉर्स शू फॉल्स’मधून पाण्याचा जो प्रपात वाहतो, त्यावर कॅनडाच्या बाजूनं मोठमोठे प्रकाशझोत सोडलेले आहेत. रात्रीच्या नायगाराचं दृश्य कॅनडाच्या याच बाजूनं जास्त सुंदर दिसतं. क्षणाक्षणाला पाण्याचे रंग बदलत असतात. रंगात नखशिखांत चिंबलेला हा धबधबा त्याच्या रंगांत आपल्यालाही न्हाऊन काढतो. या धबधब्याची हिवाळ्यातली ऐट काही वेगळीच असते. इथल्या कडाक्याच्या थंडीत त्याचं पडणारं पाणी गोठतं आणि ते स्फटिकासारखं दिसतं. अर्थात संपूर्ण नायगारा कधीच गोठत नाही. कारण त्या पाण्याचा वेगच इतका प्रचंड की तो कुणालाच जुमानत नाही.
नुकतीच एक-दोन दिवस कॅनडात अविरत स्नोवृष्टी झाली. ऐन जानेवारीत! त्यानंतर ढगांनी आपली पांघरूणं भिरकावून लावली आणि लख्ख सूर्यप्रकाश डोळे दिपवू लागला. शिवाय वर निळंभोर आकाश!
हे नेहमीचंच.. आणि निसर्गाची ही अद्भुत किमया तशी ‘फसवी’!
प्रचंड बर्फवृष्टीनंतर अचानक बाहेरचा स्वच्छ सूर्यप्रकाश खुणावू लागला, तरी अनुभवानं इथली माणसं ताडतात, की हे खरं नाही. बाहेरचं तापमान शून्याखाली किमान दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस आहे ! ज्यावेळी बर्फ पडत असतो, त्यावेळचं तापमान मात्र फारतर शून्याखाली पाच अंश असतं.
ऐन हिवाळ्यातलं या सृष्टीचं रूप कधीकधी भीषण, पण सौंदर्य मात्र अनुपम! निसर्ग बाहू उभारून चारही बाजूंनी आपल्याला हाका मारत असला तरी अशावेळी त्याला भेटायला जायचं म्हणजे जणू युद्धाचाच प्रसंग. सारी चिलखतं अंगावर चढवूनच त्याला भेटायला जावं लागतं. योद्ध्याचा हा पेहराव चढवायलाच अर्ध्या तासाचा वेळ खर्चायचा आणि मग साºया आयुधांनिशी रणांगणावर निघायचं.
पण खरं सांगू? हे ॠतुबदल अनुभवणं सापेक्ष असतं. माझी फ्लॉरिडात राहणारी मैत्रीण जेव्हा आम्हाला खिजवायला म्हणते की, ‘कसे बुवा तुम्ही कॅनडात राहता? काय ती भयानक थंडी!’.. तेव्हा मी हसून म्हणते, ‘तुम्हा फ्लॉरिडाकराना ॠतुबदलाची गंमतच कळत नाही. एव्हढ्या गोठवणाºया थंडीनंतर लागणारी वसंतॠतूची चाहूल, काटक्यांची लक्तरं बाळगणाºया शुष्क झाडांना फुटलेली कोवळी पालवी, एकदम चिवचिवायला लागलेले पक्षी वगैरे सृष्टीचा नवा साजशृंगार हे सगळं अनुभवताना आम्हाला वाटतं की, अख्खा हिवाळा बिनतक्रार सोसल्यावर हे जणू आम्ही कमावलं आहे. ‘वी डिझर्व धिस..’
इथलं हिवाळ्याचं आगमनही मोठं देखणं असतं. अवघे तीन महिनेच टिकणाऱ्या उन्हाळ्यातल्या हिरव्यागार पर्णराजीवर पिवळसर तांबूस रंगछटेची आकर्षक रंगउधळणी सुरू झाली की अजूनही अनिमिष नेत्रांनी ते फॉल कलर्स टिपणं.. हवेतला सूक्ष्म गारवा कणाकणानं अनुभवणं.. अंगावर येणाºया शहाºयांनी थरथरणं.. आणि मग अचानक एके दिवशी सुरू होणारा हिमतुषारांचा वर्षाव हिवाळ्याचं आगमन जाहीर करतो! दर वेळी तोच खेळ. दर वेळी पडदा केव्हा वर जाणार ही उत्सुकता. हे नाट्य कधीच कमी होत नाही.
या थंडीची मजा काही न्यारीच. बाहेर पडल्यावर श्वासोच्छ्वासासाठी नाक आणि बघण्यासाठी डोळे तेवढे उघडे ठेवायचे आणि सुटायचं! सृष्टीचं सौंदर्य न्याहाळत हिंडायचं..
अनेकदा लोकं आम्हाला विचारतात, इतक्या थंडीत तुम्ही राहता तरी कसे?
मी त्यांना म्हणते, फ्लोरिडात अनेकदा वादळं येतात, कॅलिफोर्नियात भूकंप.. तरीही तुम्ही तिथे राहतातच ना? तशी आमच्याकडे थंडी! तिची मजाच और!
इथलं तापमान बºयाचदा शून्याखाली तीस-चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जातं. थंडी असतेच; पण वरवर वाटतं तितकी परिस्थिती भीषण नसते, कारण इथल्या सुविधा आणि प्रशासनाने केलेली जय्यत तयारी! इतक्या थंडीत आणि वयाच्या पंचाहत्तरीत आजही कामानिमित्त मी स्वत: ड्राइव्ह करीत जाते. साचलेल्या स्नोवरून आपल्या गाडीचं चाक आणि आपलं पाऊल सटकणार नाही याची काळजी घेतली, की झालं! रस्त्यावर बर्फाचे थर साचतात; पण सरकारी कर्मचारी नियमितपणे वाळू आणि मिठाचं मिश्रण त्यावर टाकतात. त्यामुळे बर्फ साचून राहात नाही. रस्त्यावर चार ते पाच सेंटीमीटर बर्फाचे थर साचले की ट्रक येतात आणि वाळू-मिठाचं मिश्रण फवारतात. जे अगदीच तळमजल्याला राहतात, त्यांना सकाळी क्वचित कधीतरी दरवाजा उघडायचा त्रास होतो, कारण दरवाजातच बर्फाची भिंत उभी असते. असा घरात कोंडून पडण्याचा प्रसंग आमच्या पाचवीला पुजलेला, त्यामुळे त्यासाठीची जय्यत तयारी आधीच केलेली असते. भारतातल्या उन्हाळ्यात वाळवणं घालायला पूर्वी बायकांची लगबग असे, तशाच लगबगीने आम्ही सगळे इथे हिवाळ्याची तयारी करतो. त्यात घरात जास्तीचं वाणसामान कायम तयार ठेवण्यापासून अनेकानेक इमर्जनसीच्या प्रसंगी घरातल्या कुणी काय करायचं याच्या जबाबदारीच्या वाटपापर्यंत कित्येक गोष्टी सरावाने पार पाडल्या जातात.
निसर्ग आणि अनुभव आपल्याला आपोआप शहाणपण देतोच. तेवढं एक शस्त्र आम्हाला पुरतं. ही ऋतुबदलाची साखळी मला नेहमीच दुर्गा भागवतांच्या ऋतुचक्र ाची आठवण करून देते. दरवर्षी तोच खेळ.. गणरायाच्या आगमनावेळचा आनंद आणि विसर्जनावेळची हुरहूर याच्याशीच त्याची तुलना होऊ शकेल!
(लेखिका कॅनडा येथील टोरांटोच्या रहिवासी आहेत.)