....तर काय हरकत आहे शब्दावाचून बोलायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 08:10 AM2018-12-09T08:10:00+5:302018-12-09T08:10:02+5:30

ललित : स्वभावाला औषध नसते, असे म्हणतात; पण तरीही मी थोडे कमी बोलण्याचे ठरवले. हा प्रयोग स्वत:चा स्वत:साठीच होता. त्यामुळे जिथे बोलणे टाळता येईल तिथे गप्प राहणे सुरू केले; पण घरच्या व्यक्ती, शाळेतील सहकारी, पालक आणि महत्त्वाचे म्हणजे माझे विद्यार्थी या साऱ्यांशी तर माझा कायम संबंध येणारच. त्यांच्याशी बोलावेच लागणार.

So what is wrong with the words? | ....तर काय हरकत आहे शब्दावाचून बोलायला

....तर काय हरकत आहे शब्दावाचून बोलायला

googlenewsNext

- सुषमा सांगळे - वनवे

सांगायचे कारण एवढेच की मला काही मौनव्रत पाळणे तसे शक्यच नव्हते आणि त्याही पलीकडे अगदी गप्प बसणे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी शिक्षाच होती. मग अशावेळी मितभाषी, कमी बोलणाऱ्या लोकांचा खूप हेवादेखील वाटायचा. त्यात माझा स्वभाव तुसडा किंवा माणूसघाणाही नाही, माणसं जोडायला आणि नाती जपायला खूप आवडते.

त्यात गप्पा मारणे तर माझा आवडता छंद. पुरुषांच्या तुलनेत बायका कायम जास्त बोलतात. हे अगदी जगमान्य झाले आहे. त्यांना बोलण्यासाठी अगदी खास विषय असावाच लागतो असे मात्र मुळीच नसते. बऱ्याचवेळा महिलांच्या बाबतीत जर दोन स्त्रियांच्या डोक्यावरील टोपलीत अंडी ठेवली तर त्यातून पिल्ले बाहेर येईपर्यंत त्या बोलत राहण्याचा विश्वविक्रम करू शकतील, असेही विनोदाने म्हटले जाते. बायका खरंच जास्त बोलतात हे फक्त पुरुषांनाच नव्हे, तर बायकांनासुद्धा मान्य आहे बरे. त्यामुळेच हा कमी बोलण्याचा निर्धार मी केला. सुरुवातीला जिथे आवश्यकता नाही, तिथे विनाकारण बोलणे टाळू लागले. बऱ्याच वेळा बोलण्यासाठी तोंड आपोआप उघडले जायचे. मग तिथल्या तिथे शब्द गिळून मी पुन्हा गप्प राहायचे. अशावेळी थोडा त्रासही व्हायचा. अगदी एखादे व्यसन सोडताना जसा त्या व्यक्तीस होत असावा तसेच मला वाटायचे. शेवटी बडबड करणे म्हणजे एक व्यसनच ना..!

हळूहळू माझे बोलणे नियंत्रणात येऊ लागले आणि मला गप्प राहण्यातल्या गंमती-जमती कळू लागल्या. मी कळत-नकळत माणसं न्याहाळू लागले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जाणू लागले. बोलण्याच्या प्रत्येकाच्या निरनिराळ्या तऱ्हा समजू लागले. काही नजर चुकवून बोलतात, तर काही नजरेला नजर भिडवून बोलतात. काही खूप हळू आवाजात बोलतात, तर काही साधे बोलणेही ओरडून ओरडून बोलतात. काही अधिक विचारपूर्वक बोलतात, तर काही बेदिक्कत वाटेल ते बोलत राहतात. अशा अनेक बाबींकडे माझे लक्ष जाऊ लागले व माझी मलाच लाज वाटू लागली. आपण आजपर्यंत बकबक करून नाही तिथे, नाही ते बोलून ओढून घेतलेली संकटे आठवू लागली. किती निरर्थक आपण बोलतो हे जाणवू लागले. काहींना तर एखादा शब्द रिपीट करून बोलण्याची एवढी सवय असते की, तो शब्द कुठेही ते सहज बोलून जातात. आमच्या शेजारचे एक गृहस्थ आमच्या घरी आलेले. तेवढ्यात त्यांच्या पत्नीचा त्यांना फोन आला तर ते सवयीप्रमाणे ‘आदरणीय पत्नीजी बोला, काय म्हणता?’ असे बोलून गेले. आता तुम्हीच सांगा नवऱ्याकडून बायकोची अपेक्षा आदरणीय म्हणून घेण्याची असेल, की प्रिये म्हणून घेण्याची? अशा अनेक गंमतीकडे माझे लक्ष जाऊ लागले.

खरंच माणसे किती बोलतात. बसस्टँड, सभागृह, रेल्वेस्टेशन अशा ठिकाणी अगदी शांत उभे राहिले, तर किती गोंगाट, निरर्थक बडबड करतात हे जाणवते. खरंच एवढे बोलण्याची आवश्यकता असते का? निसर्गाची शब्दहीन भाषा माणसाच्या मनावर कसे बरे राज्य करते. पावसाचे थेंब लहान-मोठे त्यांचा वेग किती काही बोलतात. पानांची सळसळ, उमलत्या कळ्यांचा गंधित वारा. गायीचे वासराला चाटणे, आईने डोक्यावरून हात फिरवणे, प्रेमी युगलांच्या नजरा, हे सारे शब्दहीन असले तरी त्यांची भाषा अर्थपूर्ण असते. म्हणूनच तर ते गीत लिहिले असावे. धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्दरूप आहे, मुक्या भावनांना. खरंच अशा मुक्या भावनांना जर एवढे शब्दरूप असेल, तर काय हरकत आहे शब्दावाचून बोलायला. 

Web Title: So what is wrong with the words?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.