२०१८ वेबसिरीज- ‘सोप’कडून ‘सीझन’कडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 06:04 AM2018-12-30T06:04:00+5:302018-12-30T06:05:10+5:30

टीव्हीवरल्या मूर्ख मनोरंजन-तमाशाला वैतागलेले अनेक लोक सरत्या वर्षात टीव्हीला रामराम ठोकून वेबसिरीजच्या नव्या, चकचकीत जगात निघून गेले आहेत. हे जग इंटरेस्टिंग आहे, स्वस्त आहे, सोयीचं आहे आणि आपल्या आपल्या स्क्रीनच्या ‘खिडकी’त मावणारं, त्यामुळे अगदीच ‘खासगी’ही आहे ! टॉयलेटमध्ये असा नाहीतर विमानात असा, कुठल्याही सीझनचा कुठलाही एपिसोड आहेच डोळ्यासमोर!

From "Soaps" to "Seasons" : How Indians ditched television to immerse into real-hot world of web series | २०१८ वेबसिरीज- ‘सोप’कडून ‘सीझन’कडे!

२०१८ वेबसिरीज- ‘सोप’कडून ‘सीझन’कडे!

googlenewsNext
ठळक मुद्देहातातल्या मोबाइलमध्ये, टॅबमध्ये, लॅपटॉपवर किंवा फायर स्टिक वापरून टीव्हीच्या स्क्रीनवर वेबसिरीज दिसायला लागल्यावर अनेकजण पारंपरिक टीव्हीवरच्या डेली सोप्सकडून ‘सीझन्स’कडे वळले आहेत.

- मुक्ता चैतन्य

रिमोट कंट्रोलवरून सेल्फ कंट्रोलकडे गेला नाहीत, तर झोपेचा सौदा पक्काच!

जवळपास दीड वर्ष उलटून गेलं असेल, टीव्हीवरच्या जनरल एण्टरटेनमेण्ट प्रकारात मोडणाऱ्या हिंदी आणि मराठी सिरिअल्स बघणं अनेकांनी पूर्णपणे बंद केलं आहे. तसा टीव्हीचा कंटाळा बऱ्याच वर्षांपासून येत होता; पण पर्याय उपलब्ध होईपर्यंत येऊन जाऊन टीव्हीशी रेंगाळण्याला पर्याय नव्हता. सरत्या वर्षात बघता बघता परिस्थिती पालटली आणि स्वस्तात उपलब्ध झालेल्या नव्या तंत्रज्ञानाने व्हिडीओ स्ट्रीमिंग अ‍ॅप्लिकेशन्स मिळायला सुरुवात झाली. डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणारे माहिती-मनोरंजनाचे पर्याय अधिक इण्टरेस्टिंग वाटू लागले, त्यातले विषय-कथानकं सगळंच समकालीन होतं त्यामुळे महत्त्वाचं वाटू लागलं तसा होता नव्हता तेवढा टीव्हीही बंद झाला... आणि शहरी नवमध्यमवर्गीयांना आपल्या जाळ्यात अलगद ओढणारं वेबसिरीजचं जग सुरू झालं.
- हातातल्या मोबाइलमध्ये, टॅबमध्ये, लॅपटॉपवर किंवा फायर स्टिक वापरून टीव्हीच्या स्क्रीनवर वेबसिरीज दिसायला लागल्यावर अनेकजण पारंपरिक टीव्हीवरच्या डेली सोप्सकडून ‘सीझन्स’कडे वळले आहेत. अर्थात, हा डिजिटल स्ट्रीमिंगचा प्रेक्षक आजही महानगर, शहर आणि काही प्रमाणातच ग्रामीण भागातला आहे. सरसकटपणे पाहता आपल्याकडे आजही टीव्हीचंच निर्विवाद वर्चस्व आहे. पण समाजाचा एक छोटा गट निराळ्या वाटेने निघाला आहे, जी वाट वहिवाट बनायला वेळ लागणार नाही.
आज आपल्याकडे १९.७ कोटी घरातून ८३.६ कोटी लोक नियमित टीव्ही बघतात, तर भारतातला महत्त्वाच्या ३० डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसचा आॅनलाइन आॅडियन्स आजही २५ कोटींच्या वर नाही. २०२० पर्यंत ही संख्या दुप्पट व्हावी, अशी नेटफ्लिक्स, अमेझॉनपासून अन्य अनेक आॅनलाइन चॅनेल्सची अपेक्षा आहे. तसं झालं तरच ते यातून नफा कमावू शकतील. नेटफ्लिक्स बरोबर अमेझॉन, हॉटस्टार सारखे इतरही तगडे स्पर्धक या क्षेत्रात जोमाने मुसंडी मारत आहेत.
टीव्हीवर डेलिसोप्स सुरू झाल्यानंतर कुटुंबातल्या स्री-पुरुषांच्या भूमिका, कामाच्या वेळा, काम करण्याच्या पद्धती, कुटुंबाने एकत्र वेळ घालवण्याच्या, जेवणाच्या पद्धती हे सगळंच बदलत गेलं. या बदलांनी आपल्या जगण्या-वागण्यात उलटसुलट चर्चांचे अक्षरश: उत्पात घडवले. त्या सगळ्याचा थांग लागणं अशक्य अशा भ्रमीत अवस्थेत असतानाच अचानक आपल्या हातातल्या स्मार्टफोनमध्येच मनोरंजनाने शिरकाव केल्यामुळे आता आपल्या कुटुंब रचनेत, मनोरंजनाचा उपभोग घेण्याच्या पद्धतीत, कुटुंबासाठीचा वेळ आणि स्वत:साठीचा वेळ या सगळ्याच संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. होऊ घातले आहेत. मनोरंजनाच्या सार्वत्रिकीकरणापासून व्यक्तिकेंद्रित मनोरंजनाकडे निघालेला हा प्रवास वेगळा आहे. एकत्र बसून एखादी सिरिअल, सिनेमा बघणेपासून ‘माझं मी बघणे’कडे आपण निघालो आहोत.
‘रिमोट’ची सत्ता नावाचा प्रकार यात गळून पडतो. संध्याकाळचा अमुक एक तास घरातल्या अमुकतमुक लोकांसाठीच राखीव, मग ते बघत असलेली सिरिअल आवडो न आवडो इतर कुटुंबीयांनी बघायची असा नियम आपल्या कुटुंबातून अप्रत्यक्षपणे निर्माण झाला होता. पण हातातल्या स्मार्टफोनमध्ये मनोरंजन उपलब्ध झाल्यानंतर हा नियम तर बाजूला पडलाच; पण एकमेकांसाठी टीव्हीचा त्याग करण्याची मानसिकताही बाजूला पडली.
एकाच घरात, हॉलमध्ये बसून सगळेच मनोरंजनाचा आस्वाद घेत असतात; पण जो तो आपल्या ब्लॅक स्क्र ीनच्या क्युबिकलमध्ये असतो. नवरा आणि बायको एकच वेबसिरीज बघत असतील तर त्यांचा प्रत्येक एपिसोड बघण्याचा आणि त्याचे सीझन्स संपवण्याचा वेळ निरनिराळा असतो. एकत्र वेळ कुठल्या गोष्टींसाठी द्यायचा आणि कुठे तो एकत्र घालवण्याची गरज नाही याची गणितं कुटुंबातून झपाट्याने बदलत आहेत. आपण कालपर्यंत ज्या सवयींनी आणि पद्धतीने टीव्ही बघत होतो, त्याच नजरेतून या नव्या माध्यमांकडे आणि त्याच्या ग्रहणाकडे बघितलं तर घोळ वाढणार हे उघड आहे. मुळात डिजिटल प्लॅटफॉर्मवर मनोरंजन उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीही टीव्हीपेक्षा पुष्कळ निराळ्या आहेत. (चौकट पाहा)
आपल्या झोपेचा सौदा ही यातली सगळ्यात काळजी करावी अशी बाब आहे. नेटफ्लिक्सच्या सीईओना त्यांची स्पर्धा अमेझॉन आणि हॉटस्टारमध्ये दिसत नाही तर आपल्या सगळ्यांच्या झोपेत दिसते आहे.
क्रोमा डाटा अनॅलिटिक्स अ‍ॅण्ड मीडिया या संशोधनात्मक काम करणाºया संस्थेने आॅनलाइन मनोरंजन कुठल्यावेळेला सर्वाधिक बघितलं जातं यावर एक सर्वेक्षण केलं होतं. या सर्वेक्षणानुसार भारतात ७० टक्के वेबसिरिज रात्री बघितल्या जातात. कामाच्या वेळात सलग एपिसोड बघण्याची शक्यता अनेकदा नसते त्यामुळे रात्री दोन-तीन तास कुणाच्याही व्यत्ययाशिवाय हवी ती सिरिज बघता येते. आपण काय बघतोय हे गुप्त ठेवता येतं. शिवाय टीव्हीप्रमाणे हे चॅनेल्स अजूनतरी सेन्सॉर्ड नाहीयेत. त्यामुळे स्त्री-पुरुषांचे मुक्त लैंगिक व्यवहार बघण्याची सोय इथे असते. या जगात सेक्स आणि हिंसा खच्चून भरलेली आहे आणि या जगाच्या खिडक्या प्रत्येकासाठी आपापल्या खुल्या आहेत.
शिवाय या चॅनेल्सची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे जबरदस्त कण्टेण्ट. गोष्ट रंगवण्याच्या भन्नाट पद्धती. कण्टेण्ट, सादरीकरण, अभिनय या सगळ्यावर केलेले कष्ट टीव्हीवरच्या डेली सोप्समधल्या प्लॅस्टिक आणि खोट्या वाटणाºया सादरीकरणापेक्षा कितीतरी सरस असतात. त्यासाठी केलेला खर्च तुफान असतो. त्यामुळे अर्थातच त्यांचं दृश्य स्वरूपही देखणं असतं.
जास्तीत जास्त प्रेक्षकांनी आपल्याकडे यायला हवं याची धडपड नेटफ्लिक्स, अमेझॉनपासून सगळेच करताना दिसतात. हजार रुपयापासून ते थेट महिना दोनशे रुपयाच्या आत मनोरंजन उपलब्ध करून देण्याच्या स्कीम्स जोर धरत आहेत. सब्स्क्रिप्शनचे हे आकडेही येत्या काही वर्षात अजून उतरतील. फुकट किंवा कमी पैशात मनोरंजन मिळवण्याच्या भारतीयांच्या सवयीला याही माध्यमांना सामावून घ्यावंच लागणार आहे. २०२० पर्यंत पन्नास कोटी ग्राहक मिळवायचे असतील तर भारतीय मनोरंजन ज्या मनो-सामाजिक आणि आर्थिक निकषांवर चालतं ते निकष समोर ठेवूनच बाजारपेठेचा विचार या सगळ्या चॅनेल्सना करावा लागणार आहे.
आजची पाऊलवाट, उद्याची वहिवाट बनणार यात शंका नाही. फक्त ग्राहक म्हणून आपण जागरूक नसू आणि मनोरंजनाच्या त्सुनामीत वाहून गेलो तर मात्र या नव्या व्यक्तिकेंद्रित मनोरंजनाची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे.
आता आपल्याला रिमोट कंट्रोलवरून सेल्फ कंट्रोलकडे जावं लागणार आहे. तरच येत्या वर्षात मनोरंजनाच्या माºयात आपण तग धरून त्यातल्या उत्तमोत्तम गोष्टींचा आस्वाद घेऊ शकू.
- नाहीतर आपल्या झोपेसकट प्रत्येक गोष्टीचा सौदा करायला बाजार तयारच आहे.

‘बिंज वॉचिंग’चं नवं व्यसन
1. वेबसिरिजच्या जगात दररोज एक एपिसोड हा प्रकार नाही.
2. प्रत्येक वेबसिरिज सीझनमध्ये उपलब्ध होते. एका सीझनमध्ये १० ते ३० असे कितीही एपिसोड असू शकतात. सिरिजचा एक सीझन आणि त्यातले सगळे एपिसोड एकदम रिलीज होतात.
3. प्रदर्शित झालेले सगळे एपिसोड आणि सीझन्स सलग एकामागे एक, कधीही, कुठेही बघता येतात. त्यासाठी अमुक एकावेळी टीव्हीसमोर बसण्याची गरजच उरलेली नाही.
4. टॉयलेटपासून प्रवासापर्यंत कुठेही, कधीही, कितीहीवेळा बघण्याची मुभा हा आपल्या मनोरंजन वर्तनात बदल करणारा महत्त्वाचा घटक आहे.
5. ...त्यात काही पॅटर्न्स दिसतात. सलग सगळे सीझन्स बघून एका दमात सिरिज संपवून टाकणारे, फक्त वीकेण्डना सगळ्या सीझन्सचा फडशा पडणारे, प्रवासात डाउनलोडेड एपिसोड्स बघणारे आणि घुबडासारखे रात्र रात्र जागून एपिसोड्स संपवणारे. हेच ते बिंज वॉचिंग !
6. शेवटचा प्रकार सगळ्यात काळजी करावी असा आहे. कारण त्याचा परिणाम माणसांच्या झोपेवर, आरोग्यावर, लैंगिक आयुष्यावर आणि पर्यायाने कुटुंबावर होतो आहे.
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

manthan@lokmat.com

Web Title: From "Soaps" to "Seasons" : How Indians ditched television to immerse into real-hot world of web series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.