सामाजिक मौन...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 03:17 PM2018-01-27T15:17:38+5:302018-01-28T07:57:26+5:30
खर्डा आणि सोनई हत्याकांड प्रकरणांच्या मुळाशी जातीसोबत आर्थिक भेदही आहेत. या घटना महिला स्वातंत्र्यावरही प्रश्नचिन्ह उमटवणाºया; पण कोणीही त्याबाबत गंभीर नाही. सारेजण सोयीस्करपणे मिठाची गुळणी धरून आहेत.
सुधीर लंके
''यापुढे जातीय अत्याचाराबाबतचे खटले लढवायचे की नाहीत, याचा मी गांभीर्याने विचार करत आहे’’, असे भाष्य विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नगर जिल्ह्यातील सोनई हत्याकांडाच्या निकालानंतर केले. निकम यांच्यासारख्या नामवंत वकिलावर असे भाष्य करण्याची वेळ यावी याचा मतितार्थ काय निघतो?
‘जातीयवाद ही समाजाला लागलेली एचआयव्हीसारखी कीड आहे’, असे भाष्य न्यायाधीशांनी सोनई हत्याकांडाचा निकाल सुनावताना केले. या घटनेत सवर्ण मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मेहतर म्हणजे दलित समाजातील तीन तरुणांची हत्या केली गेली. ‘सोशल अटॅक’ असे न्यायाधीशांनी आरोपींच्या कृत्याचे वर्णन केले. न्यायपालिका बोलली; पण ज्यांच्यावर व्यवस्थेत परिवर्तन व सुधारणा करण्याची जबाबदारी आहे त्या समाजधुरिणांकडून या शिक्षेबाबत काहीही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. नगर जिल्ह्यात राज्याचे विरोधी पक्षनेते राहतात. ते किंवा जिल्ह्यातील व राज्यातील इतर बडे नेते यापैकी कुणीही सोनई निकालावर स्वत:हून बोललेले नाही. दलित नेते आणि मेहतर समाजानेही प्रतिक्रिया दिली नाही.
सोनई व खर्डा या दोन प्रकरणांच्या निकालानंतर महाराष्टÑ एकप्रकारे असा सामाजिक मौनात गेला आहे. या घटनांवर बोलणेही सामाजिकदृष्ट्या अडचणीचे आहे हे या मौनामागील प्रमुख कारण दिसते. मेहतर समाजाचे नेते दीप चव्हाण यांची या मौनामागील भूमिका बोलकी आहे. ते म्हणाले, ‘ज्यांनी हत्या केली त्यांना न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली. त्याचे स्वागत आहे. पण, या निकालाने आनंदित कसे व्हावे? या घटनेत तीन तरुणांची हत्या झाली. आता सहा लोक फासावर जाणार आहेत. जातिवादातून असे बळी जाणे हे राज्याला शोभणारे नाही. त्यामुळे काय बोलावे?’ खैरलांजीनंतर महाराष्टÑ जातीय अत्याचाराच्या घटनेने ढवळून निघाला तो सोनई प्रकरणात. राज्याचे लक्ष वेधणाºया या काही घटना नगर जिल्ह्यात ओळीने घडल्या. सोनईनंतर दुसºयाच वर्षी २८ एप्रिल २०१४ रोजी खर्डा येथे बारावीत शिकणाºया नितीन आगे या दलित तरुणाची सवर्ण मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून हत्या झाली. त्याच वर्षी जवखेडे येथे २२ आॅक्टोबरला दोन दलितांची हत्या झाली. अर्थात या हत्याकांडाला जातीय नव्हे तर कौटुंबिक पदर आहे. पण, त्यावरून अकारण जातीय संघर्ष उभा राहिला. पुढे १३ जुलै २०१६ रोजी कोपर्डीचा अमानुष प्रकार घडला. या खटल्यात तिघांना फाशी सुनावली गेली आहे.
या सर्वच घटनांमधून जातीय तेढ वाढली. वाढवली गेली. मने कलुषित झाली. घटनांची मूळ कारणमीमांसा न करता या घटनांतील आरोपी ज्या समाजाचे आहेत तो सगळा समाजच जणू गुन्हेगार आहे, अशा मानसिकतेतून या घटनांकडे पाहिले गेले. कोपर्डी येथे प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले या दलित नेत्यांना प्रवेश नाकारला गेला. अत्याचाराचा निषेध करण्यासाठी एकदा बाबा आढाव यांनी नगरला पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत ‘सोनई-खर्डा अशा घटना घडल्यानंतरच तुम्ही का येता? दरोड्यात माणसे मरतात ती तुम्हाला दिसत नाहीत का? तेव्हा तुम्ही कोठे असता’, असा प्रश्न करत एका पत्रकाराने आढाव यांनादेखील जातीच्या पिंजºयात उभे केले. त्यामुळेच सोनई, खर्डा या निकालांचा अन्वयार्थ लावणे व त्याच्यावर भाष्य करणे अवघड बनले आहे. अॅड. निकम हेही त्यामुळेच अशा खटल्यांपासून आता बहुधा बाजूला राहू इच्छितात.
या घटना समोर आल्या; पण त्यातील आरोपी आणि पीडित या दोन्ही कुटुंबांची वाताहत फारशी बघितली गेली नाही. सोनई हत्याकांडातील सचिन घारू, संदीप थनवार आणि राहुल कंदारे हे तीनही तरुण रोजीरोटीसाठी नेवासा येथे आले होते. त्यातील संदीप हा विवाहित, तर इतर दोघे अविवाहित होते. मेहतर समाजाला आज खेडेगावात मुळात कामच उरलेले नाही. त्यामुळे हा समाज शहरांतच स्थिरावतो. मुख्य प्रवाहात सामीलच केले गेले नसल्याने व शिक्षणाचा आणि नोकºयांचा अभाव असल्याने त्यांंना आजही साफसफाईची पारंपरिक कामे मजबुरीने करावी लागतात. हे तीन तरुण नेवासा फाट्याच्या शैक्षणिक संकुलात साफसफाईची कामे करत होते. यातील सचिनचे सवर्ण मुलीशी प्रेमसंबंध होते, असे दोषारोपपत्रात व निकालपत्रात म्हटले आहे. त्याच्या नातेवाइकांनीही जबाबात तसे नमूद केले आहे. ‘या तीनही कुटुंबांना घटनेनंतर नगर जिल्हा सोडावा लागला’, असे संदीपचा भाऊ पंकज थनवार सांगतो. सचिन एकुलता एक मुलगा होता. त्याच्या आईचा आसरा गेला. मयत संदीपला घटना घडली तेव्हा नऊ महिन्यांचा मुलगा होता. या मुलाने आपला बाप गमावला.
ज्या दरंदले परिवारातील चार आरोपींना फाशी सुनावली गेली त्यांच्या वस्तीला भेट दिली असता तेथेही सन्नाटा दिसतो. हे एकत्र कुटुंब. या परिवारात तीन कर्ते पुरुष होते. ते सगळे आज तुरुंगात आहेत. माणसांचे स्वागत करायलाच तेथे आज जबाबदार पुरुष नाही. जी तरुणी या घटनेच्या केंद्रभागी आहे, तीच माझ्याशी बोलण्यासाठी पुढे आली. हा परिवार शेतकरी. गणेशवाडी हे तीन हजार लोकसंख्येचे गाव.
प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान आणि सोनईपासून तीन-चार किलोमीटरवर. दरंदले वस्ती गावाबाहेर आहे. मुख्य डांबरी रस्त्यापासून आत. सिमेंटचे पक्के घर. पुढे जनावरांचा गोठा व शेती. गोठा पूर्णपणे रिकामा दिसतोय. मी जाताच ती तरुणी भराभर कहाणी सांगू लागली, ‘माझा काहीही दोष नाही. माझे प्रेम वगैरे काहीच नव्हते. सगळे खोटे चित्र उभे केले. माझे वडील, भाऊ, दोन चुलते आत आहेत. पण बाहेर आम्ही सगळे मरण भोगतो आहोत. हा समोर गोठा पहा. चाळीस गायी होत्या. केस लढण्यासाठी सगळ्या विकल्या. घरात आज चहाला दूध नाही. जनावरेच नाही, पाच-सहा एकर जमीन विकली तेव्हा केस लढता आली. आता दीड एकरचा तुकडा उरला आहे. या सगळ्या धक्क्याने आजोबांच्या डोक्यावर परिणाम झाला. दोन महिन्यांपूर्वी ते गेले. विधीसाठीदेखील नातेवाइकांना वर्गणी जमवावी लागली. या तरुणीचा एक चुलत भाऊ-बहीण बी.कॉमला शिकतात. त्यांना कॉलेजात हिनेच पाठविले. ही तरुणी स्वत: एम.एस्सी फर्स्ट क्लास आहे. त्यानंतर ती बी.एड. करत होती. याच काळात प्रेमसंबंध जुळले व पुढे ही घटना घडली, असे पोलीस आणि सीआयडीचा तपास सांगतो. अर्थात ही तरुणी प्रेमसंबंधांचा इन्कार करते आहे. मग, या तरुणांना कोणी व का मारले, हा प्रश्न उरतोच.
सचिनने आपली आई, बहीण, दाजी व भाची यांच्याकडे या प्रेमसंबंधांबाबत विधाने केली होती. मुलीचे नातेवाईक आपणाला धमकावत होते असेही त्याने घरी सांगितले होते. त्या जबाबांच्या आधारे ही घटना प्रेमसंबंधांच्या रागातून झाली, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे. दरंदले कुटुंबातील पुरुषांनी हे कृत्य केले. त्याची कदाचित महिलांना कल्पनाही नसावी. पण, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागली. या तरुणीला प्राध्यापक व्हायचे होते. ‘नेट’ची दोनदा परीक्षाही दिली. परंतु सर्व स्वप्नांचा चुराडा झाला. प्रतिष्ठा कुटुंबाला कशी उद्ध्वस्त करते, हेही यातून समोर आले. जातीय अत्याचाराच्या घटनांत मोर्चे, आंदोलने होतात. पण नंतर खरे दु:ख या पीडित कुटुंबांना भोगावे लागते. खर्डा हत्याकांडातील मयत नितीन आगे याच्या वडिलांनाही न्यायालयीन लढाई एकट्याला लढावी लागली. त्या खटल्यातील सगळे साक्षीदार फितूर झाले असताना त्यांच्या मदतीला कुणीही आले नाही. अगदी रयत शिक्षण संस्थेचे शिक्षकही फितूर झाले. आरोपी निर्दोष सुटले तेव्हाच संघटना जाग्या झाल्या. सरकार म्हणजे ‘स्टेट’च जेव्हा भेदाभेदाला खतपाणी घालते, तेव्हा शासन याबाबत किती गंभीर आहे, हेही या घटनांतून स्पष्ट होते. न्यायालयाने निकाल दिला, पण ‘आॅनरकिलिंग’च्या घटना कोण थांबवणार? कशा थांबणार? केवळ फाशीने प्रश्न संपणार नाही..
सोनई-खर्डा का घडले?
नगर जिल्ह्यात आतापर्यंत घडलेल्या चारही मोठ्या घटना महिला व मुलींशी संबंधित कारणावरून घडल्या आहेत. पंचक्रोशीतील ग्रामीण संस्कृतीत ‘लिंगभावाबाबत’ प्रचंड सामाजिक दबाव आहे. यात माणुसकीचे उल्लंघन होते, मुला-मुलींचे जगण्याचे अधिकार नाकारले जातात हे समजण्याइतपत ग्रामीण व शहरी समाज पुढारलेला नाही. तसे प्रबोधनही कुणी करताना दिसत नाही. खेड्यातील मुलींतही आता मध्यमवर्गीय घराच्या कल्पना आहेत. मात्र, अगोदरची पिढी या बाबी मान्य करायला तयार नाही. या द्वंद्वातून असे खून पडतात. राजकीय व अध्यात्मिक व्यवस्थाही या सर्व बाबींच्या मुळाशी आहे. गावांवर आज सर्वाधिक प्रभाव राजकारण व अध्यात्म या क्षेत्रांचा आहे. पण, नेते या सामाजिक दुहीबाबत बोलत नाही. मुळात ग्रामीण राजकारणात नेत्यालाही जात चिकटलेली आहे. मूळ आडनावात ‘पाटील’ या नावाचा समावेश नसताना आपल्या नावात ‘पाटील’ हा शब्द समाविष्ट करण्याचे फॅड हल्ली वाढले आहे. खेडेगावांत अध्यात्माची परंपरा हे प्रबोधनाचे मोठे साधन आहे. मात्र, बहुतांश कीर्तन-प्रवचने ही सनातनी परंपराच सांगतात. जातिव्यवस्थेबाबत ते बोलत नाहीत. आर्थिक भेदही या प्रकरणांच्या मुळाशी आहेत. खर्डा आणि सोनईत हत्या झालेले तरुण अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत. ते कदाचित धनिक असते तर असे घडले असते का, हा प्रश्नच आहे. शिक्षणात नवीन विचार व आधुनिकता आहे तर घरात व समाजात संकुचितपणा. यातून हा कोंडमारा झाला आहे. सोनई व खर्डा प्रकरणातील मुलींचे खरोखरच प्रेमसंबंध होते का, हे त्यांनाच ठाऊक. मात्र या कारणावरून हत्याकांडे झाली.
(लेखक लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत.)