कोमल नाजूक फुलाहून छान...सखी माझी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 08:16 PM2018-10-27T20:16:30+5:302018-10-28T09:08:00+5:30
सखी माझी : ‘सखी’ लिहिताना माझी लेखणीही रोमांचित होते आणि माझ्या कवितेच्या वहीत गुलाबी अक्षरांची जत्रा आपोआप भरू लागते़
- कवी योगिराज माने
‘सखी’ हा शब्द उच्चारताच प्रत्येकाच्या हृदयाच्या तारा छेडल्या जातात़ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या सखीचे एक अढळ स्थान असते़ सखीच्या सुगंधी सहवासामुळेच आपला जीवनातील प्रवास सुखद, सुगंधी व आनंददायी होतो़ सखीच्या सोबतीने जगण्याच्या खडतर वाटांनाही मखमली रूप प्राप्त होते़
माझ्याही हृदयात सखीने व्यापलेला एक नितांत सुंदर व गुलाबी रंगाचा कोपरा आहे़ त्या सुंदर कोपऱ्यातून निरंतर होणारा प्रेमाचा वर्षाव माझ्या जगण्यास सौंदर्य प्राप्त करून देतो़ सखीच्या मोहक सौंदर्यामुळे माझ्या कविमनाला वेड लागले आहे़ सखीचा ध्यास, माझ्या प्रत्येक श्वासात मिसळला आहे़ सखीला कोणत्या उपमा द्याव्यात हा प्रश्न जेव्हा मला पडतो, तेव्हा एकच उत्तर येते की, माझी ‘सखी’ निरूपम आहे़ ‘सखी’ लिहिताना माझी लेखणीही रोमांचित होते आणि माझ्या कवितेच्या वहीत गुलाबी अक्षरांची जत्रा आपोआप भरू लागते़
‘कोमल नाजूक फुलाहून छान,
लाजाळूचे पान सखी माझी,
प्रेमळ खट्याळ लडिवाळ जीव,
उन्हाळ्यात हिव सखी माझी
मधुर मंजूळ हृदयाचा ताल,
हिवाळ्यात शाल सखी माझी,
प्रत्येक क्षणाला बोलणारी सय,
श्वासातली लय सखी माझी,
सुंदर मोहक सुगंधाचे कुळ,
अत्तराचे मूळ सखी माझी,
आखीव रेखीव कोरलेली लेणी,
निसर्गाची सखी माझी,
शब्दाचे भांडार अक्षरांची खाण,
लेखणीचा प्राण सखी माझी,
नितळ निर्मळ झऱ्यातले पाणी,
कवितेची राणी सखी माझी़़़’