ऐसे में कोई आहट
By Admin | Published: January 24, 2015 02:52 PM2015-01-24T14:52:50+5:302015-01-24T14:52:50+5:30
लताचा स्वर प्रस्थापित होणे ही साधीसुधी घटना नव्हती.तो सांगितिकदृष्ट्या मोठा बदल होता आणि अन्वयार्थ अजून पुढे न्यायचा तर, हा बदल सामाजिकही होता. - हे सारे साधले एका गाण्याने!
विश्राम ढोले
भट कंपनीने त्यांच्या ‘खामोशिया’ या आगामी चित्नपटासाठी ‘महल’मधील (१९४९) ‘आएगा आनेवाला.’ या ऐतिहासिक गाण्याचे हक्क विकत घेतल्याची बातमी नुकतीच वाचनात आली आणि मनात एकाचवेळी समाधान आणि भीती अशा दोन्ही भावना दाटून आल्या. आज पासष्ट वर्षे उलटून गेली तरी या गाण्याची मुग्ध मोहिनी कायम आहे यावर यानिमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले, ही झाली त्यातली समाधानाची बाब. पण या गाण्यावर प्रेम करणार्यांच्या मनात या अपेक्षित समाधानापेक्षा ‘खामोशिया’मध्ये या गाण्याची वाट तर लागणार नाही ना ही भीतीची भावनाच जास्त गडद असणार. ‘आएगा आनेवाला’विषयी इतकी संवेदनशीलता साहजिकच आहे ,कारण ते खर्या अर्थाने एक ऐतिहासिक गाणे आहे.
हे गाणे नितांत सुंदर आहे. केवळ लताच्याच नव्हे तर एकूणच हिंदी चित्नपटगीतांच्या सार्वकालिन सुंदर गाण्यांमध्ये त्याचा सहज समावेश होऊ शकेल. खेमचंद प्रकाश यांनी ‘आएगा आनेवाला’ला दिलेले संगीत खूप वाटावळणाचे आहे. आधी घड्याळात रात्नीचे दोनचे ठोके पडल्याचा आवाज. मग क्षणभर स्तब्धता. मग दूरवरून हळूहळू जवळ येत असल्यासारखे भासणारे े‘खामोश है जमाना.’ हे अडीच मिनिटांचे गुढरम्य अँडलिब आणि नंतर एका विलक्षण चालीत घुमावदार ठेक्यासह येणारा लताचा कोवळा आवाज. पडद्यावर त्याच्या जोडीला जुन्या भव्य हवेलीच्या आत-बाहेर होणारा छाया-प्रकाशाचा खेळ. भेदरलेला अशोककुमार आणि त्याला नादावणारे मधुबालाचे अस्फूट अस्थिर अस्तित्व. श्राव्य आणि दृश्य यांची इतकी आत्मीय एकतानता फार कमी पहायला मिळते. ही सारी संगीतकार खेमचंद प्रकाश, गीतकार नक्षबजारवची आणि दिग्दर्शक कमाल अमरोहीची कमाल.
पण या गाण्याची ऐतिहासिकता त्यातील सौंदर्यापुरती र्मयादित नाही. ‘आएगा आनेवाला’ने लता मंगेशकर नावाचा एक नवा आणि वेगळा आवाज आता कायमचा प्रस्थापित होण्यासाठी येत असल्याची पहिली द्वाही फिरविली. आणि ही या गाण्याची खरी ऐतिहासिकता आहे. तसे असेल तर हा मान प्रत्येकच मोठय़ा गायक वा संगीतकाराच्या पहिल्या लोकप्रिय गाण्याला मिळायला हवा. पण तसे नाही. कारण लतास्वर प्रस्थापित होणे ही साधीसुधी घटना नाही. तो सांगितिकदृष्ट्या मोठा बदल आहे आणि अन्वयार्थ अजून पुढे न्यायचा तर, हा बदल सामाजिकही आहे.
खरेतर लताच्या या सुरांचे सांगीतिक मोठेपण पुन्हा नव्याने सांगण्याची तशी गरज नाही. ‘आएगा आनेवाला’ ऐकल्यानंतर आपण कसे भारावून गेलो होतो हे सांगताना कुमार गंधर्वांनी तानपुर्यातून निघणारा शुद्ध गंधार कसा असतो ते लताच्या सुरातून कळते, असे म्हटले होते. एका अर्थाने आदर्श स्त्नीस्वर कसा असावा याचे हे सांगीतिक वर्णन होते. आणि प्रत्यक्षात झालेही तसेच. कारण ‘महल’, त्याचवर्षी आलेले ‘अंदाज’, ‘बरसात’ आणि नंतरच्या ‘आवारा’, ‘नागीन’, ‘चोरी चोरी’, ‘अनाडी’ वगैरे चित्नपटातील गीतांमुळे लवकरच लतास्वर हिंदी चित्नपटगीतांतील स्त्नी आवाजासाठी एक नुसताच लोकिप्रय नव्हे तर आदर्श स्वर होऊन गेला तो अगदी आजवर. अलीकडे या आदर्शाचे आकर्षण वा दडपण थोडे कमी झाले असले तरी स्त्नी आवाजाच्या अवकाशात मध्यवर्ती स्थान आजही चाळीस-पन्नासच्या दशकातील लतास्वराचेच आहे. म्हणूनच प्रतिलता होऊ इच्छिणार्यांची किंवा इच्छा असो नसो तसा शिक्का बसलेल्यांची- सुलक्षणा पंडीत, हेमलता, सुमन कल्याणपूरपासून ते अनुराधा पौडवाल, अलका याज्ञकिपर्यंत- अनेक उदाहरणे सापडतात. काहींना त्याचा फायदा झाला, प्रत्यक्ष लताच्या उपस्थितीमुळे बहुतेकांना तोटा. याचा अर्थ लतासारख्या नसलेल्या स्वरांची कधी कमी होती असा नाही. अगदी गीता दत्त, आशा भोसले, शारदापासून ते रु ना लैला, इला अरूण, ममता शर्मापर्यंत अनेक वैविध्यपूर्ण आणि सुंदर स्वर मिळत गेले. यशस्वीही झाले. पण ते त्या स्त्नीपात्नांचे, व्यक्तिमात्नांचे आवाज बनून राहिले. स्त्नीत्वाचा आवाज म्हणून प्रश्नरहीत स्वीकृतीसाठी, आंधळ्या अनुकरणासाठी, सृजनशील प्रभावासाठी, पर्यायवाचक वैविध्यासाठी किंवा थेट नकारासाठी प्रमाणभूत राहिला तो लतास्वरच. भारतासारख्या सांगीतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण भूमीत एकाच स्वराने इतका काळ इतके प्रमाणभूत होऊन राहणे, हे मोठे सागीतिक आश्चर्य (काहींच्या लेखी शल्य) आहे.
लतास्वराला हे मध्यवर्ती प्रामाण्य का मिळाले असावे हा एक अवघड प्रश्न आहे. त्याची उत्तरे फक्त संगीतात नाही तर इतिहास, संस्कृती आणि सामाजिक परिस्थितीत शोधावी लागतील. लताआधीच्या युगात पचलित असलेल्या जाडसर, अनुनासिक, कामुक आवाहनात्मक स्त्नीस्वराला आणि त्यासोबत येणार्या कोठय़ाच्या व सामाजिक अप्रतिष्ठेच्या विचारचौकटीला पर्याय म्हणून स्वतंत्न भारतात आधुनिकतेचा अनुभव घेत असलेल्या पुरूषी मानिसकतेने किशोरवयीन मुलीसारख्या कोवळ्या, पातळ लतास्वराचे प्रामाण्य स्विकारले, अशी एक मांडणी केली जाते. चित्नपटातून, गाण्यांमधून अधिकाधिक सार्वजनिक होऊ पाहणारा स्त्नीस्वर अशा पद्धतीने दक्ष अशा हिंदू आणि पुरु षी निगराणीत आणि नियंत्नणात ठेवण्याचा हा प्रयत्न होता, असे म्हटले जाते. दहाएक वर्षांपूर्वी संस्कृती-अभ्यासक संजय श्रीवास्तव यांनी एका दीर्घ निबंधात अशा प्रकारचे मत मांडले होते, पण अर्थशास्त्नाच्या अभ्यासक व संगीतरसिक आश्विनी देशपांडे यांनी त्याचा सडेतोड आणि अभ्यासपूर्ण प्रतिवादही केला होता. ‘इकनॉमिक अँड पोलिटिकल विकली’मध्ये २00४ साली प्रकाशित झालेला हा वाद मुळातून वाचण्यासारखा आहे. श्रीवास्तव यांच्या मांडणीतील त्नुटी, चुका आणि तर्कदोष देशपांडे यांनी साधार दाखवून दिले असले तरी ‘लतास्वराचे इतके प्रामाण्य का’ हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. या स्वराच्या वर्णनासाठी तज्ज्ञांपासून ते सामान्यांपर्यत अनेकजण मंगल, दैवी, निर्मळ, मुग्ध, कोमल, पवित्न अशी जी सहसंबंधी विशेषणे वापरतात त्यामागची सामाजिक-सांस्कृतिक धारणा काय, हाही प्रश्न अनुत्तरीत राहतो. परंपरा आणि आधुनिकतेच्या संवाद-संघर्षात गुंतलेली विसाव्या शतकातील भारतीय मानिसकता लतास्वरावर स्त्नीविषयक आपल्या कोणत्या बदलत्या सामाजिक जाणीवा आणि नेणिवा आरोपित करते, हे गुढ काही पुरेसे उलगडत नाही. ‘आएगा आनेवाला’च्या सुरूवातीला ‘ऐसे मे कोई आहट इस तरहा आ रही है.’ अशी ओळ आहे. या गाण्यातील लतास्वराचेही तसेच आहे. एका खूप मोठ्या सांस्कृतिक बदलाची चाहुल तर ते सुचित करते, पण नेमका कोणता बदल आला आहे याबद्दल मात्न अनिवार आकर्षक अशी मुग्धता बाळगते. अगदी थेट आएगा आनेवालासारखी..
आएगा आनेवाला.
‘महल’ (१९४९)- दिग्दर्शक- कमाल अमरोही, निर्माता- अशोककुमार व सावकवाछा, संगीतकार- खेमचंद प्रकाश, गीतकार- नक्षबजारावची, प्रमुख कलाकार- मधुबाला, अशोक कुमार
‘महल’मध्ये एकूण सात गाणी. त्यातली तीन लताने तर उरलेली चार गाणी राजकुमारी आणि जोहराबाई अंबालेवाली यांनी गायली आहेत. लताचे ‘मुश्कील है बहोत मुश्कील’ तसेच राजकुमारी आणि जोहराबाईच्या आवाजातील ‘ये रात फिर ना आएगी’ ही गाणीही अतिशय श्रवणीय. लतास्वर आणि लतापूर्व पचलित स्वर यांची दोन उत्तम उदाहरणे या गाण्यांमधून मिळतात.
असे सांगितले जाते की, ‘आएगा’ इतके गाजले की ऑल इंडिया रेडिओवर लोकांनी ही गायिका कोण या प्रश्नाचा भिडमार केला. त्या काळी गाण्यांच्या तबकड्यांवर गायिकेऐवजी चित्नपटात ज्या व्यक्तिरेखेवर गाणे चित्रित झाले आहे तिचे नाव देण्याचा प्रघात होता. अखेरीस रेडिओ अधिकार््यांनी लता मंगेशकर हे नाव शोधून काढले आणि घोषित केले.
‘आएगा आनेवाला’ याच नावाचा एक चित्नपटही १९६७ साली निघाला.
‘आएगा आनेवाला’ गाण्यामधील ‘खामोश है जमाना’ या सुरूवातीच्या ओळी दूरून हळूहळू जवळ ऐकू येत असल्याचा प्रत्यय यावा म्हणून खेमचंद प्रकाश यांनी रेकॉर्डिंग करतेवेळी लताला थोडे लांबून माईकपर्यंत हळूहळू चालत येत गायला सांगितले होते असेही म्हणतात.
(लेखक माध्यम, तंत्नज्ञान आणि संस्कृती
या विषयाचे अभ्यासक आहेत.)
हे सदर दर १५ दिवसांनी प्रसिद्ध होईल.