कुणीतरी आहे तिथे...
By admin | Published: February 25, 2017 05:57 PM2017-02-25T17:57:16+5:302017-02-25T17:57:16+5:30
‘ट्रॅपिस्ट वन’ आणि ‘एक्सोप्लॅनेट्स’: सूर्य आणि पृथ्वीच्या ‘नव्या’ मैतरांची ओळख
Next
>
आपल्यासारखेच आणखी कुणीतरी ‘तिथे’ आहे का, या प्रश्नाने विज्ञानयुगातल्या मानवाला तर छळलेच; पण त्याहीआधीपासून त्याचे औत्सुक्य ताणून ठेवले. या औत्सुक्याभोवती कादंबऱ्या रचल्या गेल्या, सिनेमे काढले गेले. ‘तिकडून’ आलेल्या कुणातरी ‘जादू’शी मैत्री करण्याची उत्सुकता तर बॉलिवूडलाही मोहात पाडून गेली. पण आता ‘नासा’ने या रहस्यावरचा पडदा थोडा किलकिला तरी नक्कीच केला आहे.
अवकाशात आपल्या पृथ्वीसारखेच आणखी किमान सात ग्रह असल्याचे ‘नासा’ने ‘पाहिले’ आहे. अन्न-पाणी-निवाऱ्यासाठी पृथ्वीशिवाय आणखी एखादी नवी जागा शोधण्याच्या भविष्यातल्या अपरिहार्य शक्यतेने जुन्या औत्सुक्याला आता नवे वळणही मिळाले आहे. त्याबद्दल...
संपूर्ण विश्वात आणखी कोठे सजीवसृष्टी आहे काय किंवा आणखी कुठले ग्रह मानवी वसाहतीस अनुकूल आहेत, याचा शोध गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ घेत आहेत. प्रखर सूर्यप्रकाशात काजवा शोधण्याचाच हा प्रकार.पण हे तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित केले असून, पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीच्या शोधात एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले आहे.
विश्वात आपण ‘एकटेच’ आहोत का, या प्रश्नाचे उत्तर तर त्यातून मिळेलच,पण पृथ्वीबाहेर आपल्याला ‘घर’ बांधता येईल का, याचीही चाचपणी त्यातून होऊन जाईल.विश्वात आपण एकटेच आहोत काय, या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक वर्षे धडपडत आहेत. अंतराळात आपल्या पृथ्वीसारखे ग्रह शोधल्यास तेथे जीवसृष्टी सापडू शकेल या सूत्रानुसार पृथ्वीसदृश ग्रहांची शोधमोहीम गेल्या काही वर्षांपासून शास्त्रज्ञांनी हाती घेतली आहे.
तारे आपल्यापासून प्रचंड दूर असल्यामुळे त्यांच्या भोवताली फिरणारे ग्रह शोधणे हे अतिशय अवघड काम असते. एक नवीन तंत्रज्ञान विकसित करून त्याच्या साहाय्याने गेल्या २०-२५ वर्षांत बोटावर मोजता येतील एवढ्याच पृथ्वीसारख्या ग्रहांचा वेध शास्त्रज्ञांना घेता आला.
गेल्या बुधवारी म्हणजे २२ फेब्रुवारी २०१७ रोजी शास्त्रज्ञांच्या समूहाने एका ताऱ्याभोवती पृथ्वीसारखे तब्बल सात ग्रह फिरत असल्याचा दावा केला. आपल्यापासून अवघ्या ३९ प्रकाशवर्ष अंतरावर असलेल्या एका छोट्या मंद ताऱ्याभोवती पृथ्वीसारखे सात ग्रह असल्याचे त्यांनी जाहीर केले.
विशेष म्हणजे या सातपैकी तीन ग्रह त्यांच्या ताऱ्यापासून, जीवसृष्टीस योग्य अशा अंतरावर (हॅबिटेबल झोन) असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कदाचित तेथे जीवसृष्टी असू शकेल किंवा ती उदयास येत असेल असे शास्त्रज्ञांना वाटते.
‘नेचर’ या प्रसिद्ध नियतकालिकाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या नव्या ग्रहांची घोषणा केली गेली. यापूर्वी एका ताऱ्याभोवती एवढ्या मोठ्या संख्येने पृथ्वीसदृश ग्रह सापडले नसल्याने या शोधाचे विज्ञान क्षेत्रामध्ये कौतुक होत आहे.
आकाशात दिसणारे तारे आपल्यापासून खूपच दूर अंतरावर असल्याने जगातल्या मोठ्यात मोठ्या दुर्बिणीतून त्यांचे छोटे ठिपके दिसतात. त्यांच्या भोवतालचे ग्रह दिसू शकत नाहीत. ताऱ्याजवळचा ग्रह शोधणे म्हणजे दूरवरच्या सर्चलाईटशेजारचा काजवा शोधण्यासारखे अवघड असल्याचे शास्त्रज्ञांना वाटते. याचमुळे तीस वर्षांपूर्वी ताऱ्यांभोवती ग्रह आहेत की नाही हे ठावुक नव्हते. मात्र शास्त्रज्ञांनी ताऱ्यांभोवतालचे ग्रह प्रत्यक्षपणे नव्हे तर अप्रत्यक्षपणे शोधण्यासाठी एक तंत्रज्ञान विकसित केले. या तंत्रानुसार, ताऱ्यांभोवताली फिरणारा ग्रह जेव्हा ताऱ्याच्या बिंबावरून जातो तेव्हा ताऱ्याचा प्रकाश ग्रहाने अडविल्याने आपल्याला तारा किंचित मंदप्रभ दिसतो व ग्रह पुढे निघून गेल्यावर पुन्हा पूर्वीप्रमाणे दिसू लागतो.
या घटनेचा म्हणजेच अधिक्रमणाचा (ट्रान्झिट) वापर करून अप्रत्यक्षरीत्या ताऱ्याभोवताली ग्रह फिरत असल्याचा शोध लावला जातो. हे तंत्र वापरून प्रथम नोव्हेंबर १९९९ मध्ये महाश्व तारकासमूहातील एका ताऱ्याभोवताली फिरणाऱ्या ग्रहाचा शोध शास्त्रज्ञांनी लावला.
हेच तंत्र वापरून ग्रह शोधण्यासाठी अमेरिकेने २००९ मध्ये केप्लर नावाची दुर्बिण अंतराळात सोडली. तिने दोन हजारावर ग्रहांचा वेध घेतला आहे. अंतराळात २००३ मध्ये सोडलेली स्पिट्झर नावाची इन्फ्रारेड तरंग लांबीवर काम करणारी दुर्बिणदेखील ग्रहांचा वेध घेत आहे. हीच दुर्बिण वापरून अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कुंभ राशीतील ताऱ्याभोवती फिरणारे सात ग्रह शोधले.
हा तारा ज्याला ‘ट्रॅपिस्ट-वन’ नावाने संबोधले जाते, तो आपल्या सूर्यापेक्षा छोटा व मंद तेजाचा आहे. या ताऱ्याकडे दुर्बिण रोखली असता त्याचा प्रकाश अधूनमधून मंद होताना दिसला. याचमुळे या ताऱ्याभोवती ग्रह फिरत असावेत व त्यांच्याचमुळे ताऱ्याचा प्रकाश कमी होत असल्याचे ध्यानात आले. एकंदर ३४ वेळा तारा मंद झाल्याचे दिसल्यावर ‘ट्रॅपिस्ट-वन’भोवती सात छोटे ग्रह फिरत असावेत, असे शास्त्रज्ञांना वाटते.
या शोधमोहिमेच्या गटाचे प्रमुख मायकेल जिआॅँ यांनी पत्रकार परिषदेत या शोधाविषयी सखोल माहिती दिली. त्यांच्या मते ते पाहत असलेला तारा छोटा म्हणजे सूर्याच्या तुलनेत आठ टक्के वजनाचा व मंद तेजाचा आहे. त्याच्या मंद तेजामुळेच त्याच्याभोवताली फिरणाऱ्या ग्रहांचा शोध लावणे सोपे झाले.
बेल्जियम शास्त्रज्ञांच्या समूहाने मे २०१६ मध्ये ट्रॅपिस्ट ताऱ्याभोवतालच्या तीन ग्रहांचा शोध लावला होता.
हे तिन्ही ग्रह ताऱ्यासमोरून एकामागून एक जात असताना त्यांचा वेध घेतला गेला. मात्र ताऱ्याचा प्रकाश जास्तच वेळा कमी-जास्त होताना दिसल्याने कदाचित तीनपेक्षा जास्त ग्रह या ताऱ्याभोवती फिरत असावेत असे वाटू लागले. यामुळे शास्त्रज्ञांनी स्पिट्झर दुर्बिणीतून या ताऱ्याची सतत तीन आठवडे निरीक्षणे घेतली.
या निरीक्षणामुळे शास्त्रज्ञांना कळून चुकले की पूर्वीच्या तीन ग्रहांशिवाय अजून चार ग्रह या ताऱ्याभोवती फिरत असावेत. हे सर्व ग्रह आपल्या मंगळ ग्रहापेक्षा मोठे असावेत. कदाचित ते पृथ्वीच्या तुलनेत ४० ते १४० टक्के वस्तुमानाचे असावेत.
हे सातही ग्रह ताऱ्याच्या अगदी जवळून; दीड दिवस ते काही आठवडाभरात प्रदक्षिणा घालीत आहेत. मात्र ट्रॅपिस्ट तारा आपल्या सूर्यापेक्षा खूपच मंद तेजाचा असल्याने त्याच्या जवळच्या ग्रहांवरचे तपमान जास्त नसून ते जीवसृष्टीस पोषक असण्याची शक्यता आहे. कदाचित यापैकी बाहेरच्या ग्रहावर द्रवरुप पाणी व समुद्रदेखील असू शकतील.
पुढील काळात या ग्रहांचे निरीक्षण हबल हवाई दुर्बीण व जेम्स वेब दुर्बिणीतून केले जाईल. या दुर्बिणीच्या सहाय्याने या ग्रहांवर वातावरण, पाणी व प्राणवायू आहे काय, याचा शोध घेतला जाईल. कदाचित या ग्रहावर वातावरण सापडल्यास तिथे जीवसृष्टीसुद्धा असू शकेल. थोडक्यात, पृथ्वी हा एकुलता एक ग्रह नाही की ज्यावर जीवसृष्टी आहे असे ट्रॅपिस्ट-१चा शोध दाखवून देईल असे वाटते.
(लेखक ज्येष्ठ खगोल अभ्यासक आहेत.prakashrtupe@gmail.com)
१९८३ ते २०१७शास्त्रज्ञ इथवर कसे पोचले?
पृथ्वीसारख्या सात ग्रहांचा शोध घेणं ही ऐतिहासिक कामगिरी असली तरी या ऐतिहासिक शोधाची पहिली वीट तब्बल तीस-पस्तीस वर्षांपूर्वी रचली गेली होती... शोधाच्या या प्रत्येक पायरीवर संशोधकांना काही ना काही नवीन सापडत गेले आणि ‘कुणी तरी आहे तिकडे’ याचा शोध घेणाऱ्या संशोधकांनी सप्तग्रहांचा एकाच वेळी शोध घेऊन जीवसृष्टीच्या शोधाच्या अखेरच्या टप्प्यात पाऊल टाकले आहे़ या अखेरच्या टप्प्यापर्यंतचा हा प्रवास...
१९८३
चकतीच्या आकाराचे काही
बेटा पिक्टोरीस नावाच्या एका भल्यामोठ्या ताऱ्याभोवती चकतीच्या आकारासारखे काही असल्याचे ए. एम. लाग्रेंज यांच्या टीमला दिसून आले़ ही धुळीची आणि गॅसची चकती असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
२४ एप्रिल १९९०
हबल अवकाश दुर्बिण
आपल्या सूर्यमालेबाहेर काय काय आहे, याचा शोध घेण्यासाठी आणि एका ताऱ्याभोवती काय काय फिरतेय हे बघण्यासाठी हबल नावाच्या अवकाश दुर्बिणीचे मिशन लाँच करण्यात आले. हा अवकाश संशोधनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता़
जानेवारी १९९२
सूर्यमालेबाहेरचे काही...
अॅलेक्झांडर वोल्शन आणि डेल फ्रेल या संशोधकांना दोन ग्रह एका ताऱ्याभोवती फिरत असल्याचे आढळून आले. आपल्या सूर्यमालेबाहेरही ग्रह असल्याचा हा पहिला शोध होता. वर्षभराने पृथ्वीपासून ११७० प्रकाश वर्ष दूर असलेल्या ग्रहाचा शोध लागला़ हा ग्रह आपल्या गुरु ग्रहापेक्षा अडीचपट मोठा होता.
आॅक्टोबर १९९५
एक नवे तारांगण
पहिल्यांदाच एक अख्खे तारांगण संशोधकांना आढळले. डिडियर क्युलोज आणि कायकेल मेयर या संशोधकांना आपल्या सूर्यासारखाच एक सूर्य दिसला. त्याला ‘५१ पेगासी’ नाव दिले गेले.
१९९९
पहिले फिरते सौरमंडल
पेगासेस तारमंडळात एका ताऱ्यासमोरून अनेक ग्रह फिरत होते आणि त्यात बदलही होत होते, याचा शोध डेव्हिड चेर्बोनेउ आणि ग्रेग हेनरी यांना लागला. हे ग्रह त्या ताऱ्याच्या अगदी जवळ होते आणि त्यामुळे त्यावर पाणी, आॅक्सिजन, नायट्रोजन तथा कार्बन असण्याची शक्यता संशोधकांना वाटली.
४ एप्रिल २००१
तिथे जीवन आहे...?
आपल्या सूर्यमालेबाहेरील एका सूर्याभोवती एक ग्रह फिरत असल्याचे दिसून आले. जिनेव्हा युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांना दिसलेला हा नवा ग्रह पृथ्वीसारखाच होता़ तो पृथ्वीसारखाच त्याच्या सूर्याभोवतीही फिरतोय, हेही दिसून आले़
आॅक्टोबर २००१
परग्रहावरील वातावरण कसे?
डेव्हिड चेर्बोनेउ आणि टिमोथी ब्राऊन यांच्या टीमने हबल अवकाश दुर्बिणीवर स्पेक्टोमीटर मापकाचा वापर करून पहिल्यांदाच परग्रहावरील वातावरणाचे विश्लेषण केले़ परग्रहवासीयांचा शोध घेण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल होते.
१ सप्टेंबर २००२
सर्वांत मोठा ‘सूर्य’
आपल्याला दिसतो त्या सूर्यापेक्षा तेरा पट अधिक मोठा आणि ४० पट अधिक प्रखर सूर्य संशोधकांना आढळला.
लोटा ड्रॅकोनिस बी असे त्याचे नाव.
१३ जून २००२
पहिली ‘नॉर्मल’ सोलर सिस्टिम
आपल्या सूर्यमालेसारखीच एक नवी सूर्यमाला या अवकाशात असल्याचे पॉल बटलर आणि जिओफ्री मर्सी या संशोधकांना आढळून आले. गुरु ग्रहासारखा एक ग्रह त्याच्या सूर्याभोवती फिरत होता़ हा शोध एक नवी सौरमाला अस्तित्वात असल्याचा पुरावा होता़
२३ जून २००३
सुटकेसच्या आकाराची दुर्बिण
कॅनडाने ‘मोस्ट’ नावाची सुटकेसच्या आकाराची अवकाश दुर्बिण लाँच केली़ ताऱ्यांच्या प्रखरतेमध्ये होणारे बदल टिपण्याचे काम करण्याची जबाबदारी या दुर्बिणीवर होती़
२५ आॅगस्ट २००३
स्पिट्झर अवकाश दुर्बिण
सात ग्रहांचा जो शोध ‘नासा’ने लावला तो याच स्पिट्झर अवकाश दुर्बिणीमुळे. ग्रह-ताऱ्यांचा आकार आणि त्यावरील वातावरण याचे संशोधन या दुर्बिणीद्वारे केले जाते.
मार्च २००५
सूर्यमालेबाहेरचा पहिला प्रकाश
स्पिट्झर अवकाश दुर्बिणीद्वारे आपल्या सूर्यमालेबाहेर इन्फ्रारेड लाइट्स असल्याचे दिसून आले़ प्रकाशमान ग्रह-ताऱ्यांचा हा पहिला शोध होता
२७ डिसेंबर २००६
कोरोट सॅटेलाइट लाँच
फ्रान्सच्या उपग्रहाने एका सूर्याभोवती ग्रह फिरत असल्याचे टिपले.
मे २००७
परग्रहाचा पहिला नकाशा
डेव्हिड चेर्बोनेऊ आणि हिदर नटसन या शास्त्रज्ञांनी स्पिट्झर अवकाश दुर्बिणीद्वारे सूर्यमालेबाहेरीत परग्रहाचा पहिला नकाशा तयार केला़ त्यातच ढगांसारखे काही घटकही परग्रहांभोवती दिसून आले.
७ मार्च २००९
केपलर मिशन
फ्लोरिडातून उड्डाण घेतलेला एक अग्निबाण नासाची केपलर दुर्बिण अवकाशात घेऊन गेला़ दीड लाखाहून अधिक ताऱ्यांसोबत ही दुर्बिण फिरेल आणि चार वर्षं अवकाशात शोधकार्य करत राहील, असे हे मिशन होते़ या केपलरने हजाराहून अधिक ग्रह-ताऱ्यांचा शोध घेतला़ ही फार मोठी कामगिरी होती़
जानेवारी २०११
पृथ्वीपेक्षा मोठा ग्रह
पर्वतरांगा असलेला पहिला ग्रह केपलर दुर्बिणीला दिसला आणि त्यासोबतच एका नवीन छोट्या ग्रहाचाही शोध लागला. पर्वरांगा असलेला हा पृथ्वीच्या दीडपट आकाराचा असावा, असा अंदाज बांधला गेला़ शिवाय त्याचे वजनही पृथ्वीपेक्षा साडेचार पट अधिक असल्याचे संशोधकांनी सांगितले़
सप्टेंबर २०१३
ग्रहाची पहिली प्रतिकृती तयार
केपलर आणि स्पिट्झर या दुर्बिणींनी पाठवलेल्या माहितीच्या आधारे संशोधकांनी आपल्या सूर्यमालेबाहेरील ग्रहावर असलेल्या वातावरणाची प्रतिकृती तयार केली़ हा ग्रह गुरू ग्रहापेक्षा ५० टक्के मोठा असल्याचे दिसले़ त्याला केपलर ७बी असे म्हटले गेले़ हा केपलर ७बी ग्रह त्यांच्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशातून पश्चिम बाजूने प्रकाशमान होतो असेही दिसून आले़
एप्रिल २०१४
पृथ्वीसारखा पहिला ग्रह
केपलर या दुर्बिणीने आपल्या सूर्यमालेबाहेर पृथ्वीसारखा ग्रह असल्याचे शोधले आणि तो एका सूर्याभोवती फिरत असल्याचेही दिसून आले़ हा ग्रह पृथ्वीपेक्षा केवळ १० टक्के अधिक मोठा आहे आणि त्यावर पृथ्वीसारखेच वातावरण असण्याची शक्यता वर्तविली गेली़ पाणीही असेल आणि ओघाने जीवनही असेल, याचाही शोध सुरू झाला़
जुलै २०१५
पृथ्वीचा मोठा भाऊ
केपलरने नवाच शोध लावला़ पृथ्वीपेक्षा जवळपास दीडपट मोठा ग्रह आपल्या सूर्यमालेबाहेरील सूर्याभोवती आपल्या पृथ्वीसारखाच प्रदक्षिणा घालत असल्याचे केपलरमधून दिसून आले़ आपल्यासारखाच सूर्य आणि त्याभोवती फिरण्याचा कालावधीही त्या ग्रहाचा जवळपास पृथ्वीसारखाच (३८५ दिवस). त्यामुळे या ‘सुपर अर्थ’वर जीवसृष्टी असल्याची दाट शक्यता वर्तविली गेली़ पाणीही असणार, असेही मानले गेले़ पण अजून खरे काय? ते बाहेर यायचे आहे.
माहितीस्त्रोत :https://exoplanets.nasa.gov
संकलन : समीर मराठे, पवन देशपांडे
‘ट्रॅपिस्ट वन’ आणि ‘एक्सोप्लॅनेट्स’
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या संशोधकांनी अवकाशातील नव्या सौरमंडलाचे अस्तित्व शोधून काढले आहे. या नव्या सौरमंडलातील सारेच ग्रह साधारण पृथ्वीसदृश आणि पृथ्वीच्या आकाराचे असून, त्यावर सजीवसृष्टीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एका छोट्या ताऱ्याच्या (सूर्य) भोवती फिरणारे पृथ्वीच्या आकाराचे सात ग्रह संशोधकांना आढळून आले आहेत. या ताऱ्याला ‘ट्रॅपिस्ट वन’ असे नाव देण्यात आले आहे. तो पृथ्वीपासून ४० प्रकाशवर्षे इतका दूर आहे.
या ‘ट्रॅपिस्ट वन’भोवती फिरणाऱ्या ग्रहांना ‘नासा’ने ‘एक्सोप्लॅनेट्स’ असे नाव दिले आहे.
आपल्या सूर्याच्या तुलनेत हा सूर्य अतिशय लहान असून, आपल्या सौरमालेतील ज्युपिटरपेक्षा तो मोठा नाही. आपल्या सूर्यापेक्षा ‘ट्रॅपिस्ट वन’चे वस्तुमानही अतिशय कमी आहे.
आपल्या सूर्यतेजाच्या तुलनेतही हा सूर्य अतिशय ‘शीत’ असून, आपल्या सूर्यापेक्षा त्याचे तेज २०० पटीने कमी आहे.
या सूर्याचे तेज कमी असल्याने त्याच्याभोवती परिक्रमा करणाऱ्या ग्रहांवरील कायम ‘संधिप्रकाश’ आढळून येतो.
या सौरमंडलातील सूर्यच तुलनेत ‘शीतल’ असल्याने त्याच्याभोवती भ्रमण करणाऱ्या या ग्रहांवर द्रव स्वरुपातील पाणी असण्याची शक्यताही खूप मोठी आहे.
या सौरमंडलातील सारेच ग्रह त्यांच्या मुख्य ताऱ्यापासून (सूर्य) खूपच जवळ असून, आपल्या सौरमालेत बुध ग्रह जितक्या अंतरावर आहे त्यापेक्षाही ते त्यांच्या सूर्यापासून जवळ आहेत.
हे ग्रह एकमेकांच्या इतक्या जवळ आहेत की समजा, यातील एखाद्या ग्रहावर आपण उभे राहिलो तर शेजारच्या ग्रहांवरील ढग किंवा त्यांचा आकार स्पष्टपणे नजरेस पडू शकतो. आपल्याला साध्या डोळ्यांनी चंद्र जितका मोठा दिसतो, त्यापेक्षाही मोठ्या आकारातील दृष्य आपल्याला दिसू शकते.
या ग्रहांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या एका भागात कायम दिवस असेल तर दुसऱ्या भागात कायम रात्र. कारण या सौरमालेतील ग्रह सूर्याशी ‘टायडल लॉक्ड’ आहेत. म्हणजे या ग्रहांना स्वत:च्या अक्षाभोवती फिरण्यास जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ साधारणपणे त्यांच्या सूर्याभोवती फिरण्यासही लागतो. (आपल्या सौर्यमालेतील चंद्रासारखेच हे उदाहरण. चंद्राला आपल्या अक्षाभोवती फिरण्यास साधारणपणे २८ दिवस लागतात, तेवढाच कालावधी त्याला पृथ्वीभोवती फिरण्यासही लागतो.)
या खडकाळ ग्रहांवर पाण्याची शक्यता तर शास्त्रज्ञांनी वर्तवली आहेच, (त्याचा स्पष्ट पुरावा मात्र अजून मिळालेला नाही) पण येथील वातावरणही सजीवसृष्टीसाठी, मानवी वसाहतीसाठी अनुकूल आहे की नाही, याच्या अभ्यासालाही आता शास्त्रज्ञ लागले आहेत.
यातील सातवा ग्रह बर्फाळ असल्यासारखा दिसत असून, तो आपल्या सौरमालेतील प्लुटोची आठवण करून देतो.
स्पिट्झर, हबल आणि केपलर या दुर्बिणींच्या सहाय्याने पुढील संशोधन सुरू असून, २०१८ मध्ये पूर्णत्वास येणाऱ्या ‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’च्या सहाय्याने नासा त्यात मूलभूत संशोधन करणार आहे.
या नव्या दुर्बिणीच्या सहाय्याने या ग्रहांवरील पाणी, आॅक्सिजन, मिथेन, ओझोन तसेच तेथील वातावरणातील इतर घटकांची ‘केमिकल फिंगरप्रिंट’ घेणे शक्य होणार आहे.
त्याचबरोबर या नव्या ग्रहांवरील तपमान, पृष्ठभागावरील दाब इत्यादि गोष्टींचाही अभ्यास करून भविष्यात हे ग्रह मानवी वसाहतींसाठी अनुकूल ठरू शकतील किंवा नाही याबाबतचे संशोधन होणार आहे.
स्पिट्झर स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने संशोधकांनी या सौरमंडलाचा शोध लावला असून, त्यातील तीन ग्रहांवर पाण्याची प्रबळ शक्यता असल्याचे संशोधकांचे मत आहे. हे ग्रह सजीवांच्या राहण्याच्या लायक असू शकतील असाही संशोधकांचा कयास आहे.
आपल्या सौरमंडलाच्या बाहेर शास्त्रज्ञांनी आतापर्यंत ३५०० ग्रहांचा शोध लावला असला तरी ते मानवी वास्तव्यासाठी अनुकूल नाहीत.
सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी आवश्यक तेवढे तपमान असलेल्या खडकाळ ग्रहांचा शोध गेल्या कित्येक दशकांपासून शास्त्रज्ञ घेत आहेत. कारण अशाच ठिकाणी तरल अवस्थेत पाणी सापडू शकते, जे सजीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे.
एकाच सूर्याभोवती इतक्या मोठ्या प्रमाणात ग्रहांची परिक्रमा शास्त्रज्ञांना प्रथमच आढळून आली आहे. शास्त्रज्ञांनी शोधलेल्या सातही ग्रहांवर पाण्याची शक्यता असली तरी त्यातील किमान तीन ग्रहांवर तरी पाणी सापडेलच असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे.
सौरमंडलातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा शोध असून, अंतरिक्षात दुसरीकडे कुठे सजीवसृष्टीचे अस्तित्व असू शकते का यासंदर्भातली ही आजपर्यंतची सर्वात मोठी उपलब्धी आहे.
याचाच अर्थ येत्या काही वर्षांत या ग्रहांवर मानवी अधिवासाची शक्यता गृहीत धरता येते.
शास्त्रज्ञांच्या मते इतर ग्रहांवर मानवी वसाहतीची शक्यता आता ‘जर-तर’ची नाही, तर ‘केव्हा’ एवढाच प्रश्न आता शिल्लक आहे.
हे सारे ग्रह पृथ्वीशी खूपच मिळतेजुळते असून, इतक्या वर्षांच्या संशोधनात शास्त्रज्ञांना अशी स्थिती पहिल्यांदाच आढळून आली आहे.
सातपैकी तीन ग्रह संशोधकांनी मे २०१६मध्ये शोधून काढले होते. हे ग्रह सजीवसृष्टीसाठी अनुकूल असल्याचे लक्षात आल्यानंतर शास्त्रज्ञांनी त्यादृष्टीने अधिक प्रयत्न सुरू केले आणि पृथ्वीसदृश आणखी काही नव्या ग्रहांचा शोध शास्त्रज्ञांना नुकताच लागला. असेच आणखीही काही ग्रह या सौरमालेत असण्याची शक्यताही शास्त्रज्ञांनी नाकारलेली नाही.